घ्या समजून राजेहो... अशा कपोलकल्पित कथा सांगण्यापेक्षा शरद पवारांनी आत्मपरिक्षण करावे...
घ्या समजून राजेहो...
अशा कपोलकल्पित कथा सांगण्यापेक्षा शरद पवारांनी आत्मपरिक्षण करावे...
मात्र शरद पवारांचा हा बॉम्ब फुसका असल्याचेच जाणवते आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रपरिषद घेऊन तिथे चक्क पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या मदतीने आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली. त्यामुळेच भाजपला इतक्या जास्त जागा मिळाल्या आणि महायुतीला दणदणीत यश मिळाले असा त्यांचा दावा होता. मात्र त्यांना निवडणूक आयोगाने या संदर्भात शपथ पत्र द्यावे अशी सूचना केल्यानंतर त्यांनी शपथपत्र देण्यास नकार दिला आहे. मी संसदेत शपथ घेतली असल्यामुळे वेगळे शपथपत्र देण्याची गरज नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र निवडणूक आयोग ही अर्धन्यायिक व्यवस्था असल्यामुळे त्यांनी शपथपत्रावर आपली तक्रार द्यावी अशी सूचना करण्यात काहीही वावगे नाही. जर आपल्या तक्रारीचे निराकरण व्हायला हवे असेल आणि त्या संदर्भात आपल्याकडे ठोस पुरावे असतील तर राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यायला हवे. मात्र आम्हीच अंतिम अशा घमेंडीत असल्याने राहुल गांधी यांनी शपथपत्र देण्यास नकार दिला आहे. कदाचित त्यांच्याजवळ ठोस पुरावेही नसू शकतात. त्यामुळेच ते शपथपत्र देत नसावेत.
नेमके हेच टायमिंग साधत शरद पवारांनी नागपुरात एक पत्र परिषद घेतली. त्यात सांगितले की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्ती मला भेटायला आल्या होत्या, आणि त्यांनी महाराष्ट्रात २८८ पैकी १६० जागा आम्ही तुमच्या महाआघाडीला जिंकवून देतो अशी ऑफर दिली होती. आपण त्या दोन व्यक्तींना राहुल गांधींकडेही नेले होते. मात्र आपला लोकशाहीवर विश्वास असल्यामुळे असे प्रकार आपण करू नये असे आमचे ठरले, अशी माहितीही पवारांनी या पत्रपरिषदेत दिली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच जवळजवळ वर्षभरापूर्वी या कथित दोन व्यक्ती पवारांकडे ऑफर घेऊन गेल्या होत्या. निवडणुकीत सरळ मार्गाने जिंकून येण्यासाठी उमेदवार त्या ताकदीचा असावा लागतो आणि प्रचार यंत्रणा देखील तशी असावी लागते. त्यासाठी असे बाहेरचे कोणी दोन जण येऊन तुम्हाला ऑफर देतात म्हणजेच ते काहीतरी हेराफेरी करणार हे स्पष्ट आहे. शरद पवार आणि राहुल गांधी जर लोकशाही मानणारे असल्याचा दावा करतात, तर त्यांनी अशी हेराफेरी करून विजय मिळवून देण्याचा दावा करणाऱ्यांना लगेचच पोलिसांच्या ताब्यात का दिले नाही असा प्रश्न देखील निर्माण होतो. इथे दुसरा मुद्दा असाही येतो की असे कोणी दोन लोक आपल्याला भेटायला आले होते हा गौप्यस्फोट पवारांनी इतक्या उशिरा का केला? वस्तूतः त्यांनी लगेचच हे जाहीर करायला हवे होते. पवारांच्या डोक्यात कदाचित असेही असू शकते की या दोन व्यक्ती मग भाजपकडे गेल्या आणि भाजपने हेराफेरी करून विजय मिळवला असे सिद्ध करण्याचा लटका प्रयत्न करावा त्यामुळेच कदाचित ते आता बोललेले असू शकतात. या दोन व्यक्ती जेव्हा तुम्हाला १६० जागा निवडून आणून देण्याचा दावा करतात, तेव्हा त्याची किंमतही वसूल करणारच. हा खर्च निवडणूक खर्चात दाखवता येणार नाही म्हणजेच तिथे काळा पैसा वापरला जाणार हे उघड आहे. हे बघता पवारांनी आर्थिक गुन्हे शाखेला देखील या दोन व्यक्तींबाबत कळवायला हवे होते. मात्र त्यांनी तेही केलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या मते ही सलीम जावेची स्क्रिप्ट आहे. अजूनही विविध राजकीय नेत्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पवारांनी आता राजकारण थांबवून कादंबरी लिहायला घ्यावी असाही सल्ला एका राजकीय विश्लेषकाने दिला असल्याचे ऐकण्यात आले आहे.
शरद पवारांच्या या दाव्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंचे हीज मास्टर्स व्हॉईस असलेले संजय राऊत यांनी देखील हाच दावा केला आहे. उद्धव ठाकरेंना भेटायला देखील या दोन व्यक्ती आल्या होत्या आणि त्यांनी सर्व जागा जिंकून देण्याचे आश्वासन दिले होते असे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या प्रकरणात वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. शरद पवारांनी हा दावा केल्यानंतर अनेकांनी त्यांना त्या व्यक्तींची नावे जाहीर करा असे आवाहन केले. मात्र पवारांनी ती नावे सांगितली नाहीत. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर भेटायला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पोलीस रजिस्टर मेंटेन करत असतात. त्या रजिस्टर मध्ये पवारांसोबत आलेल्या या दोन व्यक्तींची नावे नोंदली गेली होती का? असा प्रश्न आंबेडकरांनी विचारला आहे, आणि तसे असेल तर त्या रजिस्टर मधून ती नावे कळू शकतात, असाही त्यांचा दावा आहे.
२०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. योगायोगाने २०१४ मध्ये मोदींनी भाजपला १९८४ नंतर लोकसभेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले. तेव्हापासून विरोधक भाजप ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करून निवडून येतो आणि निवडणुकीत हेराफेरी केली जाते अशा प्रकारचे आरोप करत असतात. अपघाताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला थोडे बॅकफूटवर यावे लागले. त्यामुळे विरोधकांचे हौसले बुलंद झाले. मात्र या पीछेहाटीतून शहाणे होत भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत योग्य अशी रणनीती आखून निवडणुका लढवल्या आणि भाजपप्रणित महायुतीला दणदणीत यश मिळाले. तेव्हापासून मतदार अवैधरित्या वाढवले गेले, ईव्हीएम मध्ये घोळ केले गेले, अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. त्यात त्यांनी निवडणूक आयोगालाही धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. तोच मुद्दा पुढे धरून विरोधी पक्षांनी सोमवारी देशभर आंदोलन देखील केले होते.
मात्र आपण जेव्हा समोरच्याकडे तीन बोटे दाखवतो एक बोट दाखवतो तेव्हा आपल्या हाताची तीन बोटं आपल्याकडे असतात. देशातील विरोधक नेमके हेच विसरत आहेत. महाराष्ट्रात ज्या भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागत होती, तो भाजप स्वबळावर १०० च्या वर जागा निवडून आणू शकतो. याचाच अर्थ भाजपाने आपला जनाधार वाढवला आहेह हा होतो. मग त्याचवेळी विरोधकांनी त्यांचा जनाधार का कमी होतो आहे याचा शोध घ्यायला हवा. महाराष्ट्र पुरते बोलायचे झाल्यास सत्ताधारी भाजप विरोधात उद्धव ठाकरेंची शिल्लक शिवसेना, काँग्रेस, आणि शरद पवारांची शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन घटक पक्ष आहेत. यातील काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींमध्ये गत तीन वर्षात जबरदस्त फूट पडली आहे. या दोन्ही पक्षातील बिनीचे शिलेदार आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी नेते आणि कार्यकर्ते सोबत घेऊन वेगळा पक्ष स्थापन करते झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष अक्षरशः खिळखिळे झाले आहेत. मात्र तरीही आम्हीच मोठे ही त्यांची मुजोरी आजही सुरूच आहे. वस्तूतः असे जबरदस्त फटके बसल्यावर या दोन्ही पक्ष नेत्यांनी जमिनीवर येऊन आपले विश्वासू साथीदार आपल्याला का सोडून गेले यावर आत्मचिंतन करायला हवे होते. विशेषतः शिवसेनेने धरसोड करत आपल्या मूळ तत्त्वांशी जी तडजोड केली त्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दुरावला. तर शरद पवारांची घराणेशाही त्यांना आडवी आली. परिणामी त्यांचे सख्खे पुतणै अजित पवारच त्यांना सोडून गेले. काँग्रेस देखील गेली अनेक वर्षे नेहरू गांधी घराण्याच्या दावणीला बांधली गेली आहे. आणि त्या घराण्यातील नवी पिढी आज देशाला योग्य असे नेतृत्व देण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करू शकलेली नाही. त्याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवर मुद्यांमुळे जनसामान्य त्यांच्यापासून दुरं आहे. मात्र या कोणत्याही मुद्द्यावर विचार न करता आणि कोणतीही सुधारणा करण्याचे काहीही प्रयत्न न करता हे सर्वच पक्ष फक्त भाजपवरच विविध आरोप करत सुटले आहेत. या सर्व प्रकारांमुळे आपण भाजपविरोधात जनजागृती करून मतदार आपल्याकडे वळवतो अशा भ्रमात या तीनही पक्षांचे नेते असले तरी मतदार मात्र भ्रमात नाहीत. त्यामुळेच या तीनही पक्षांना निवडणुकीत फटका बसतो आहे. तरीही आत्मपरीक्षण न करता फक्त भाजपवर टीका आणि बिनबुडाचे आरोप करण्यातच हे पक्ष धन्यता मानतात. त्यात आता शरद पवारांनी अशा कपोलकल्पित कथा सांगणे सुरू केले आहे. यामुळे जनसामान्यांचे मनोरंजन निश्चित होईल. मात्र मतपरिवर्तन कितपत होईल हे सांगणे कठीण आहे.
आता महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर आधी बिहार मग पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश अशाही विधानसभांच्या निवडणुका आहेत. दरवेळी असे आरोप केले जाणार हे निश्चित आहे. मात्र विरोधकांनी असे आरोप करण्याऐवजी आणि कपोलकल्पित कथा पसरवण्याऐवजी आपल्यात सुधारणा काय करता येतील आणि मतदारांचा विश्वास कसा जिंकता येईल याचा विचार करावा इतकेच सुचवावेसे वाटते.
वाचकहो..... पटतेय का तुम्हाला हे....?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो...
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment