सहज सुचलं म्हणून.. वंदे मातरम आणि मुस्लिम लांगुलचालन
सहज सुचलं म्हणून..
वंदे मातरम आणि मुस्लिम लांगुलचालन
खरे तर वंदे मातरम हेच देशाचे राष्ट्रगीत व्हायला हवे होते. मात्र काँग्रेसने मुस्लिमांचे लांगुलचालन करायचे म्हणून वंदे मातरम हे राष्ट्रगीत न करता "जनगण मन अधिनायक जय हे," रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले गीत देशाचे राष्ट्रगीत बनवले असा दावा ख्यातनाम अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
शरद पोंक्षे यांनी केलेल्या या दाव्यातील वास्तव एकदमच नाकारता येणार नाही. वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय विचाराचे बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिले असून हे गीत संस्कृतमध्ये आहे. तसेच यात भारत मातेची स्तुती करताना त्यांनी भारत मातेला दुर्गा, विद्यादायिनी, कमला इत्यादी हिंदू देवतांचे रूप मानून गौरवलेले आहे. हिंदू देव देवतांचे उदातीकरण मुस्लिमांना स्वातंत्र्यपूर्व काळातही मान्य नव्हते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही त्यांनी ते कधीच मान्य केले नाही. त्यामुळेच तर अगदी नवव्या दहाव्या शतकापासून मुस्लिमांची जेव्हा देशात आक्रमणे होऊ लागली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम हिंदू देव-देवतांची मंदिरे उध्वस्त करण्याचाच सपाटा लावला होता ना. त्यातील अयोध्येतले राम मंदिर देखील बाबर बादशहाच्या सरदारानेच उध्वस्त केले होते. त्याची आता पुनर्बांधणी झाली आहे. मात्र मथुरा काशीसह अनेक ठिकाणची मंदिरे अजूनही वादात आहेत. विशेष म्हणजे या सर्व वादांना काँग्रेसच्या काळातच खत पाणी घातले गेले होते. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीच माध्यमांशी बोलताना प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण ही काल्पनिक पात्रे असल्याचाच दावा करून त्यांचे अस्तित्वच नाकारले होते. त्यामुळे मुस्लिमांच्या विरोधामुळे वंदे मातरम हे गीत घेतले गेले नाही या दाव्याला पुष्टी मिळते. दुसरे कारण असे की संस्कृत ही हिंदूंनी देवभाषा मानलेली आहे. मुस्लिमांचा हिंदूंच्या देवालाच विरोध आहे. मग हिंदूंची देवभाषा त्यांना कशी मान्य होणार? आणि त्या भाषेत असलेले गीत त्यांना कसे चालणार? त्यामुळेही हा विरोध झाला असावा. काँग्रेसला तर मुस्लिमांचेच तुष्टीकरणच करायचे होते. त्यामुळे काँग्रेसने देखील हा प्रस्ताव त्यावेळी मान्य केला असावा, हा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
त्याचवेळी मग "जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता" हे रवींद्रनाथ टागोरांनी शब्दबद्ध केलेले गीत देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. मात्र काही इतिहासकार असे सांगतात की स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनचे तत्कालीन राजे भारत भेटीवर आले असताना त्यांच्या स्वागतार्थ टागोरांनी हे गीत रचलेले आहे. हे जर खरे असेल तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीच्या खुणा कायम ठेवण्याचा अट्टाहास केला असेच दिसून येते.
वंदे मातरम या गीताचे ध्रुपदच मोठे आहे. त्यानंतर त्याला चार कडवे आहेत. त्यातील पहिले कडवे "शुभ्र ज्योत्स्नात पुलकित यामिनीम" हेच काँग्रेसजनांना काहीसे निधर्मिक वाटले असावे. त्यामुळे जरी जनगण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले, तरी त्याबरोबर वंदे मातरम या गीताचे हे पहिले कडवे फक्त तत्कालीन काँग्रेस सरकारने राष्ट्रीय गीत म्हणून मान्य केले होते. त्यामुळे आकाशवाणीवर सकाळी कार्यक्रम सुरू करताना हे पहिले कडवे फक्त वाजविले जात होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील अधिवेशन सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला याच गीताच्या पहिल्या कडव्याने सुरुवात केली जात असते. उर्वरित कडव्यांमध्ये हिंदू दैवतांचे उदात्तीकरण असल्यामुळे काँग्रेसजनांना त्याचा विटाळ होत असावा. त्यामुळेच ते संपूर्ण गीत स्वीकारले गेले नव्हते.
असे असले तरी हिंदुत्ववादी मंडळींनी मात्र वंदे मातरम हे गीत चारही कडव्यांमध्ये संपूर्ण गाण्याचा आग्रह धरला होता. मला आठवते हिंदू महासभेच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम गीताची चारही कडवी गायली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या विविध संघटना आहेत, तिथे देखील हे संपूर्ण गीत गाईले जाते.
मुस्लिमांच्या लांगुलच्यालानामुळे तत्कालीन काँग्रेसजनांनी वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा दिला नाही, हा मुद्दा शरद पोंक्षे यांनी मांडला हे चांगलेच केले. त्याचबरोबर त्यांनी वंदे मातरम या संस्कृत गीताचा सरळ सोपा अर्थ सर्व भारतीय भाषांमध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, आणि सोबतच जनगणमन अधिनायक जय हे या गीताचाही नेमका अर्थ जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा. त्यामुळे नेमके वास्तव काय आहे हे जनसामान्यच समजतील आणि योग्य तो निर्णय घेऊन सरकारवर काय दबाव आणता येईल याचा विचार करतील.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंना सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमांची एकगठ्ठा मते हवी होती. त्यासाठी त्यांनी मुस्लिमांचे लांगूलचालन केले. तसेच नेहरू जरी भारतीय असले तरी ते पुरते इंग्रजधार्जीणे होते. त्यामुळे इंग्रजी साम्राज्याच्या अनेक पाऊलखुणा त्यांनी स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवल्या. वस्तूत: या भूप्रदेशाचे नाव भारत हेच होते. मात्र इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी इंडिया हे नाव दिले. नेहरूंनी इंग्रज देश सोडून गेल्यावरही तेच नाव प्रतिष्ठित केले. देशाचे संविधान लिहिले गेले त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी त्याच्या प्रास्ताविकेत वी दी पीपल ऑफ भारत असा उल्लेख केला होता. मात्र नेहरूंनी तो वी दि पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत, असा करायला लावला असे सांगितले जाते. यावरूनच त्यांची परधार्जिणी मानसिकता लक्षात येते.
भारताला जर विश्वगुरू आणि जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर ही परधार्जिणी मानसिकता पुसून काढावी लागणार आहे. शरद पोंक्षे यांनी वंदे मातरम या गीतासंबंधी सांगून त्याचा प्रारंभ केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपणही ही परधार्जिणी मानसिकता त्यागून राष्ट्रीय मानसिकता कशी बनवता येईल याचाच विचार करायला हवा.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment