कालचक्र.... कबतरखान्यांचे राजकारण
कालचक्र....
कबूतरखान्यांचे राजकारण
महाराष्ट्रात आधी हत्तीणीवरून राजकारण झाले, आता कबुतरावरून राजकारण सुरू झाले आहे. जैन समाज हा अहिंसावादी आणि शांतीप्रिय म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच जैन समाजाच्या एका मुनींनी आज जरूर पडल्यास आम्ही धर्माच्या रक्षणासाठी शास्त्र देखील हातात घेऊ असा इशारा राज्य शासनाला दिला आहे. एकूणच आता या मुद्द्यावरून देखील राजकारण चांगलेच तापते आहे.
मुंबईत जैन समाज मोठ्या संख्येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी जैनांच्या मंदिराच्या आसपास जैन बांधव पक्ष्यांना दाणे टाकतात. ते बघून या सर्वच परिसरामध्ये कबुतरे मोठ्या संख्येत येतात. त्यामुळे सर्वत्र असे कबूतरखाने तयार झालेले आहेत. दादर मधला कबूतरखाना तर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येत जैन बांधव येऊन दररोज धान्य टाकतात. आणि तिथे हजारो कबुतरे येऊन ते धान्य खात असतात.
ही कबुतरे मग नागरी वस्तीतील घरांच्या व्हेंटिलेटर मध्ये आपली घरटी करतात. त्यांची पिसे आणि विष्ठा यामुळे फुफुसाचे गंभीर आजार होतात असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ञांनी काढलेला आहे. मुंबईत अशा आजारांचे बरेच रुग्ण सापडले आहेत. साधारणपणे च्या घरात व्हेंटिलेटर वर अशी कबुतरांची घरटी तयार होतात तिथेच हे रुग्ण जास्त प्रमाणात सापडले आहेत.
त्यामुळे या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने या सर्व कबूतरखान्यांवर बंदी घालावी आणि जो कोणी कबुतरांना धान्य टाकेल, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी असे आदेश दिले. त्यानुसार मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली. सर्व कबूतर खान्यांच्या परिसरात ताडपत्री टाकून तो परिसर सील केला गेला.
त्याचा परिणाम असा झाला की ही कबुतरे शहरात इतस्तत: जाऊन उपद्रव देऊ लागली. त्यावरही इलाज करण्याचे महापालिकेचे प्रयत्न होते. मात्र दरम्यान जैन समाज आक्रमक झाला आणि आम्ही पक्षांना दाणे टाकणारच, कारण आमच्या धर्मात तसे सांगितले आहे, असा दावा करून त्यांनी कायदेभंग सुरू केला. एक दिवस हजारो जैन बांधवांनी आक्रमक होत त्या ताडपत्री फाडून फेकल्या. जैन समाजाचे नेते असलेले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिका अधिकाऱ्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.
याच दरम्यान उच्च न्यायालयात पुन्हा पुनर्विचार अर्ज दाखल केला गेला. मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि महापालिका, शासन आणि जैन समाज यांनी नागरिकांचे स्वास्थ्य लक्षात घेऊन तोडगा काढावा असे सुचवले. तोडगा काही निघालेला नाही. मात्र जैन समाज दररोज अधिक आक्रमक होतो आहे. एका जैन बांधवाने आपल्या कारच्या टपऱ्यावर टोपली बांधून त्यात दाणे ठेवले आणि ते दादरमध्ये आणून उभे करत इथे कबुतरांना दाणे खायला आमंत्रित केले. त्याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे. आज तर जैन मुनींनी आधी उपोषण करण्याचा आणि नंतर शस्त्र हाती घेण्याचाच इशारा दिला आहे. इथे पुन्हा एकदा जैन समाज विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष पेटवण्याचाच प्रयत्न होताना दिसतो आहे.
मुळात जैन धर्म हा अहिंसा शिकवतो. प्राणीमात्रांना देखील जगवा असे हा समाज धर्म सांगतो. मात्र तसे करताना जनसामान्यांच्या जीवावर प्राणी आणि पक्षांना जगवा असे जैन धर्म सांगत असेल असे वाटत नाही. न्यायालयाने वैद्यकीय तज्ञांचे मत घेऊन या प्रकारात निवाडा दिलेला आहे. अनेक जाणकारांनी आणि तज्ञांनी कबुतरांची पिसे आणि विष्ठा यामुळे फुफुसाचे गंभीर आजार होतात असे निष्कर्ष दिलेले आहेत. हे बघता भलेही माणसांचा जीव गेला तरी चालेल, मात्र कबुतरे जगलीच पाहिजेत, हा हट्ट अनाठायी ठरतो. कबुतरांना जिवंत राहण्याचा देखील अधिकार आहे हे मान्य. त्यांना जसे इतर वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य तयार केले जाते तसे कबुतरांसाठी देखील एखादे नैसर्गिक अधिवास तयार करून सर्व कबुतरे तिथे राहतील आणि त्यांना तिथे जगण्यासाठी आवश्यक तो चारा मिळेल याची व्यवस्था करण्याचा जर जैन समाजाने आग्रह धरला तर तो रास्त मानता येईल. लागल्यास आज धान्यासाठी जो पैसा जैन बांधव खर्च करत आहेत तोच पैसा ते अशा नैसर्गिक अधिवासाच्या विकासासाठी देऊ शकतात. इथे मग शासनही त्यांच्या मदतीला पुढे येऊ शकेल. जैन समाज हा गर्भश्रीमंत म्हणून ओळखला जातो. त्यांनीच पुढाकार घेऊन प्रत्येक गावाजवळ असे नैसर्गिक अधिवास तयार करून तिथे कबुतरांसाठी सोय का करू नये, असाही प्रश्न मनात येतो. घडलेली घटना बघता इथे कोणालाही मार्ग काढायचा नाही, तर जैन बांधव आणि हिंदू बांधव यांच्यात संघर्षच वाढवायचा आहे असे दिसून येते.
जैन समाजात देखील अनेक विचारवंत तसेच राजकारणीही झालेले आहेत. फक्त जैन समाजाचे नाही तर एकूणच राज्याचे किंवा देशाचेही नेतृत्व त्यांनी केलेले आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन याप्रकरणी सन्मानजनक तोडगा काढावा आणि आपल्याच समाजाला अशी दुराग्रही भूमिका घेण्यापासून थांबवावे असे सुचवावेसे वाटते.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment