दिनविशेष हर्षोल्लासी पर्व "श्री" च्या आगमनाचे"

               दिनविशेष 

हर्षोल्लासी पर्व  "श्री" च्या आगमनाचे"

          ॐ नमोजी आद्या ।

           वेद प्रतिपाद्या

          जय जय स्वसंवेद्या ।

        आत्मरुपा

        देवा तूंचि गणेशु ।

        सकलमति प्रकाशु

        म्हणे निवृत्ति दासु ।

        अवधारिजो जी

        ...... संत ज्ञानेश्वर

      'मोरया मोरया, गणपती बाप्पा, मोरया'. आज आसमंतात हा एकच जय घोष निनादणार. भाविकच नाही तर भारतीय संस्कृतीतील मंगल वाद्याचे सुरेल सूर 'श्री' चे स्वागतास सिद्ध आहेत.

        चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे दूर करणाऱ्या.. तुमच्या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या लाडक्या बापाचे आज आगमन.. जल्लोषात आनंदोत्सवाचा प्रारंभ.

        श्री गणराया भक्तगणांच्या घरात.. मंदिरे.. सार्वजनिक मडळाचे मांडवात आणि हृदय मंदिरात विराजमान होत आहेत. प्रत्येक घर मंदिर झालेय. जल्लोषात घरोघरी आज 'श्रीं' ची विधीवत पूजा. वेदमंत्र पठन, आरती होणार. जगरहाटीतील चिंतातून मुक्त होत प्रफुल्लीत मनाने विघ्नहर्त्या चिंतामणीची मनोभावे आराधना सुरु होणार. गणेश स्तवनाचे आनंदी सूर जगाचा नूर बदलणार. सर्वत्र कलाविष्कार प्रकटणार.

        श्रीगणेश ही विश्वदेवता. जगातील कित्येक देशात श्री गणेशाच्या प्राचीन काळातील मूर्ती आहेत. यामुळेच भारतच नाही तर जगातील कित्येक देशात हा आनंदोत्सव सुरू होतोय. श्री गणेश म्हणजे जगाला एकसुत्रात जोडून शांती.. सदभाव.. एकात्मता निर्माण करणारी ज्ञानदेवता. यामुळेच ज्ञानीयाचे राजेही ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच त्यांना सकलमती प्रकाशु म्हणत वंदन करुन आशीर्वाद घेतात. 'श्रीं' च्या वंदनानेच प्रत्येक कार्य प्रारंभ होते.

        श्रीं ची गुणवैशिष्ट्ये वर्णावी तेवढी कमीच. गणपती.. गुणपती, म्हणजे गणाचा.. समुहाचा नेतृत्व करणारे गुणसंपन्न.. गुणग्राहक अधिपती. सदैव नेतृत्व बुद्धिमान असावे ते गणेशासारखे. श्रीगणेश हे जगाला सदासर्वकाळ नेतृत्वगुण बहाल करतात. नेतृत्वाचे कान असावे सुपासारखे. फोलकटे काढून फक्त उत्तम तेच ऐकणारे. डोळे बारीक म्हणजे सर्वदूर सुक्ष्मदृष्टीने लक्ष ठेवणारे. श्रीगणेश मोद.. अर्थात आनंदच वाटतात. त्यांना स्वतःला काहीच नको. सगळा प्रसाद उदारपणे समाजाला वाटतात.

        श्रीगणेशाचे आणि भारताचे नातेच आगळे. रामराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजा़ंची हिंदवी स्वराज्य स्थापना असो वा इंग्रजी पारतंत्र्यातून मुक्तता, या दोन्हींना श्री गणेशाचे आशीर्वाद लाभले होते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या राजमाता जिजाबाईंनी पुण्यात सोन्याच्या फाळाने नांगर फिरवताना गणपतीची स्थापना केली. आजही हे कसबा गणपती मंदिर, इतिहास प्रसिद्ध लालमहाल हे एकमेकांच्या शेजारी बघून भक्तमन आनंदते.

        लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनात जनजागृती साठी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करून संपूर्ण देश एक केला. असे हे देशवासीयांशी 'श्रीं' चे हृदयस्थ नाते. म्हणूनच 'श्रीं' च्या आगमनाचा देशभर उत्साह आहे.

        श्री गणपतींचा संयम हा मोठा गुण. महर्षी व्यासाचा महाभारत हा विशाल ग्रंथ श्रीगणेशांनी सलग दहा दिवस एका जागेवर बसून लिहला. शरीराची उष्णता वाढू नये म्हणून त्यांना मातीचा लेप दिला म्हणून पार्थिव गणेश मूर्ती स्थापना होते. या सगुण रुप मूर्तीची आज मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना होणार.

        समग्र देशवासीयांचा हा सण अर्थात कलेचा लोकोत्सव म्हणूनच सर्वदूर आनंदी आनंद निर्माण करतो. कलागुणांना वाव देणारे हे भक्ती पर्व. सर्वदूर सजावट.. दुर्वा.. हार फुले.. पूजा.. आरती.. गणपती अथर्वशीर्ष पठन.. मोदक याची लगबग. तनामनाला प्रफुल्लीत करणारा हा  उल्हासी उत्सव. 

        आपणास गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !!

        गणपती बाप्पा मोरया.. !!


  गणपती बाप्पा मोरया

  मंगलमूर्ती मोरया


  गणपती बाप्पा आले घरा

  घराचे मंदिर झाले पहा

  स्वागत देवाचे करू चला,

  मंगलमूर्ती मोरया


  तालात झोकात डौलात

  आता लेझीम अंगी जागले

  सुरात नादात रंगात सारे

  भक्तजन हे भारले

  आनंदाच्या किती तऱ्हा,

  मंगलमूर्ती मोरया

  गणपती बाप्पा आले घरा,

  घराचे मंदिर झाले पहा


  सजून धजून हसून बसले

  मखरी हो गणराय हे

  खुलून फुलून नटून हसले

  गौराईचे रूप हे

  पावन झाला उंबरा,

  मंगलमूर्ती मोरया

  गणपती बाप्पा आले घरा

  घराचे मंदिर झाले पहा


  वर्षाचा हर्षाचा प्रेमाचा सण हा

  वाट कधीची पाहिली

  रिद्धीचा सिद्धीचा विश्वाचा

  स्वामी आला सोनपाऊली

  घोष भिडूद्या अंबरात,

  गणपती बाप्पा मोरया,

  मंगलमूर्ती मोरया

  गणपती बाप्पा आले घरा

  घराचे मंदिर झाले पहा

     !! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ !!

     !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!

        🌺 *विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धि, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना..!!* 🌺

    ‼ *गणपती बाप्पा मोरया* ‼

                *२७.०८.२०२५*


    संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.