दिनविशेष. गोवंशवाढीच्या संकल्पाचा *आज बैलपोळा*

दिनविशेष.

       गोवंशवाढीच्या संकल्पाचा*आज बैलपोळा*

   

          *भारत.. एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा अशी सुजलाम सुफलाम भूमी ही ओळख. या प्रचंड लोकसंख्येचे पोट भरण्याचे श्रेय जाते ते बळीराजाला.* 

         *या संस्कृतीच्या निसर्ग पूजनाचा.. पशुपक्षी पूजनाचा विशाल दृष्टिकोन बळीराजाला ठाऊक आहे. तो सूर्य.. चंद्र.. डोंगर.. नदी याचे जसे पूजन करतो तसेच आपल्या गोधनाला कुटुंब सदस्य मानतो.. त्यांची सेवा करतो.. सणावाराला सजवून पूजन करतो. हे देवतांचे संस्कार. शिवाचे वाहन हे नंदी आहे तर श्रीकृष्ण हे गोपालक. गाईला कामधेनू म्हणणारे.*

        *एकेकाळी मानवी जीवन सुदृढ.. सुसंपन्न होते जेव्हा देशात सेंद्रिय शेतीच होती. ही शेती गोधनावरच अवलंबून होती. किती गोधन आहे, यावर त्या राज्याची संपन्नता मोजली जायची.*

        *गोवंशाच्या शेणापासून होणाऱ्या सेंद्रिय खताने पिकणारे शेत.. त्यापासून मिळणारी शुद्ध सरकी, ढेप, पेंड खावून गायींनकडून प्राप्त होणारे शुद्ध दुध, दही.. लोणी.. तुप यामुळे मानव आणि गोवंश यांना निरामय आरोग्य लाभायचे. पूढे रासायनिक खते आली. तंत्र बिघडले. गोवंशाला.. मानवाला शुद्ध सकस आहार मिळणे बंद झाले, समस्या निर्माण झाल्या.*

        *पण आता जगाचे डोळे उघडले. शेतजमिनीचे आणि गोवंशाचे कमी होणारे प्रमाण बघून बळीराजा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. गोवंशाच्या आरोग्याची काळजी घेत गोवंशवृद्धीसाठी प्रयत्नरत आहे. लोकही गोरक्षणाची उत्पादने आवर्जून विकत घेत.. आपले वाढदिवस हे गोवंशासोबत साजरे करू लागलेत.*

        *मानव जन्म हा चौऱ्यांशी लक्ष् योनीतून फिरत प्राप्त होणारा आहे. कदाचित या प्राणी योनीत आपणही होतो, ही जाणीवही प्रत्येक मनात आहे. या निसर्गातील सर्वच प्राणी हे मानवाचे जन्मोजन्मीचे साथीदार आहेत.*

        *आज बळीराजाचा अत्यंत प्रिय असा सण  बैलपोळा. गोवंशावर बळीराजाचे जिवापाड प्रेम. बैल हे रक्ताच्या नात्यासारखे कुटुंबसदस्यच. त्यांच्यामुळेच बळीराजाची बरकत होते हा पवित्र भाव. शहरातील लोकही पोळ्याला घरी पूजनासाठी आलेल्या बैलाचा.. गोपालकांचा सन्मान करतात.*

        *बळीराजाच्या जीवनात आपल्या कष्टाने सोने पिकवायला मदत करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता असते. उनपावसात राबणाऱ्या या बैलांचे ऋण फेडणेच अशक्य. मग आज बळीराजा त्यांची शिंगे रंगविणार.. रंगीबेरंगी झूल घालून सजवणार. वाजत गाजत गावात मिरवणूक काढणार. त्यांना पुरणपोळी सह इष्टान्न यथेच्छ खाऊ घालून त्यांचा सन्मान करणार.*

        *ही धरती म्हणजे आभाळाची चाकच, या चाकावर चालणारी ही बैलगाडी. सूर्य-चंद्राच्या जोडीसारखीच. सूर्य चंद्रामुळे जसे हे जग चालते तेवढेच महत्त्व या प्रपंचाच्या डावात बैलजोडीचे आहे.*

        *बैलपोळ्याला बळीराजाच्या हृदयातील आनंद व्यक्त करणारे पं. हृदयनाथ यांनी गायलेलं हे सुरेल गीत.* 

 *जीवाशिवाची बैलजोड,*

  *लावल पैजेला आपली कुडं,*

   *डौल मोराच्या मानचा रं*

    *डौल मानचा*

                 *येग रामाच्या बानाचा रं*

                   *येग बानाचा*

                  *तान्या-सर्जाची हं नाम जोडी*

                   *कुना हुवीत हाती घोडी*

                    *माझ्या राजा रं*

 *धरती आभाळाची चाकं,*

  *त्याच्या दुनवेची हो गाडी*

  *सुर्व्या-चंदराची हो जोडी,*

  *त्याच्या सर्गाची रं माडी*

  *माझ्या राजा रं*

                      *सती शंकराची माया,*

                       *इस्नू लक्षुमीचा राया*

                        *पुरुस परकरतीची जोडी,*

                         *डाव परपंचाचा मांडी*

                           *माझ्या राजा रं*     

         आज पिठोरी अमावस्या

      *नास्ति मातृसमा छाया,*

      *नास्ति मातृसमा गतिः।*

      *नास्ति मातृसमं त्राणं,*

      *नास्ति मातृसमा प्रिया ॥*

      *आजवर जगात कित्येक संस्कृती आल्या. काळाच्या उदरात गडप झाल्या. पण भारतीय संस्कृती अबाधीत आहे.. राहणार आहे. ती या संस्कृतीत असलेल्या 'मातृदेवो भव' भावनेमूळे. देशालाही आम्ही 'वंदेमातरम्' म्हणत वंदन करतो. 'आई' या शब्दाची जादूच आगळी. परमोच्च प्रेम करते ती आई. आईएवढे प्रेम जगात कुठेच प्राप्त होत नाही. आई मग ती कुणाचीही असो आई शब्द ऐकताच मनात पवित्र भावना निर्माण होतात.* 

        *आज श्रावण शुक्रवार आहे म्हणून आज घरोघरी जरा जिवंतिका पूजन पण होणार. हा एक योगायोग. जरा जिवंतिका या दोन देवता, पुराणातील सप्तमातृकांपैकी एक मानल्या जातात. जिवंतिका देवी ही सात मुलांचे (सप्तकोशांचे) प्रतीक आहे. आपल्या संततीचे संरक्षण आणि सुदृढ आरोग्यासाठी हे पूजन केल्या जाते.*

        *आज 'मातृदिन'. जगात त्यागवृत्तीचे प्रतिक म्हणजे आई. सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त आहे तो मातेला.. तो तिच्या अपूर्व त्यागामुळेच. बाळाला जन्म देताना जिवघेण्या कळा.. कोंडलेला श्वास यामुळे बाळाचा जन्म हा मातेचा पुनर्जन्म ठरतो. पण तरीही बाळावर आनंदाश्रूंचा अभिषेक करणारी अशी ही जगन्माता.*

        *मुलांच्या सुखात स्वसुख शोधणे ..नेहेमी क्षमाशील राहणे, पराकोटीच्या त्यागाने जन्म खर्च करणे ही या मातेची मनोवृत्ती. जगात पहिल्या गुरुचा सन्मान होतो तो मातेचाच. आई मग ती देवकी असो वा यशोदा, तिच्या ममतेचे स्वरुप मात्र सारखेच असते.*

        *आईचे उपकार एका जन्मात फेडणेच अशक्य. जगात विकत न घेता येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम. जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणे अशक्यच. या भारतात आईच्या कर्तुत्वाला तोडच नाही. वीरमाता जिजाबाई.. राणी लक्ष्मीबाई अश्या किती मातांची थोरवी वर्णावी.. आईच्या आदर्श संस्कारानेच देशात सर्वांना शांततामय.. सुखाचे.. आनंदी जीवन लाभते.*

        *आज माता आपल्या पाल्यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून कुठे व्रत करतात तर कुठे पाल्यांना औक्षण केले जाते. कुठे पिठाचे दिवे लावून चौसष्ट योगीनींची पूजा केली जाते.* 

        *परमेश्वरी रुपात घरोघरी असणाऱ्या समस्त मातांना मातृदिनी वंदन.. साष्टांग दंडवत.* 


  *गोड तुझ्या त्या स्वप्नामधली*

  *दाखव मजला तुझी माऊली*

                    *जिने लाविला बाल मनाला*

                     *निज मायेचा रोज लळा*

                     *तुझ्या करांची वेळोवेळा*

                     *गळा गुंफिली माळ सानुली*

 *याच हातानी जिने भरविला*

  *दहिभाताचा अमृत काला*

  *या ओठांनी ओठ पुसता*

  *मकरंदाची शिते चाखिली*

                        *जिने घेउनी तुला कुशीला*

                         *जीव अपुला सुखविला*

                          *सांगणार ना कधी कुणाला*

                          *अवसेने पौर्णिमा पाहिली*


संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.