कालचक्र... राजकीय नेत्यांबाबत नितीन गडकरींचे स्वप्नरंजन.

 कालचक्र...

राजकीय नेत्यांबाबत नितीन गडकरींचे स्वप्नरंजन



राजकारणात सत्य बोलले जात नाही. असे असले तरी राजकीय नेत्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका ठेवून सत्यच बोलायला हवे असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पुणे येथे एका समारंभात गडकरींना लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी बोलताना गडकरींनी हे मत मांडले आहे. 

राजकीय नेत्यांनी खरे बोलले पाहिजे हे गडकरींचे मत स्वप्नरंजन म्हणून योग्यच आहे. मात्र प्रत्यक्षात तसे खरोखरी होते का याचे उत्तर नकारार्थीच मिळते. महाभारतात धर्मराज युधिष्ठिर हा सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध होता. मात्र महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी जेव्हा अश्वत्थामा धारातीर्थी पडला हे द्रोणाचार्यांना कळवायची वेळ आली त्यावेळी आपल्यातले सत्यवचन बाजूला ठेवत राजकीय खेळी खेळून  युधिष्ठिराने देखील नरोवा कुंजरोवा असे म्हणत बोटचेपी भूमिका घेतली होतीच ना. म्हणजेच राजकारणात सत्यापासून दूर पळण्याची परंपरा अगदी महाभारत काळापासून सुरू आहे, असे म्हटले तरी बागे ठरू नये. 

नितीन गडकरी हे देखील राजकारणीच आहेत. असे असले तरी ते स्पष्टवक्ते देखील आहेत. जितके स्पष्टवक्ते आहेत तितकेच ते फटकळही आहेत. जर एखादे काम घेऊन कोणी कार्यकर्ता आला आणि ते काम जमणार नसले तर ते तोंडावर त्या कार्यकर्त्याला चार गोष्टी सुनावून मोकळे होतात. मात्र त्यामुळे त्यांनी राजकारणात जेवढे मित्र तेवढेच शत्रू देखील निर्माण करून ठेवले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी इतके स्पष्ट आणि परखड बोलले नसते तर २०१३ मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कदाचित सोडावेही लागले नसते. तसेच झाले असते तर मोदीं ऐवजी गडकरीच पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिले असते. इतक्या क्षमतेचा हा माणूस आहे. मात्र जो एरवी सद्गुण मानला जातो तो खरे बोलण्याचा गुण हा गडकरींसारख्या राजकारणी व्यक्ती करिता दुर्गुण ठरला आहे. 

आज गेल्या पन्नास वर्षातले राजकारण आपण बघितले तर प्रत्येक राजकारणी कमी जास्त प्रमाणात खोटे बोलतच असतो. कधी निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळता येत नसले की मग राजकीय नेता ती टायपिंग मिस्टेक होती असे सांगतोच ना. यापूर्वी राजकीय नेत्यांनी अनेकदा अनेक आश्वासाने दिली आहेत. १९७७ साली इंदिरा गांधींसकट काँग्रेसला पराभूत करून जनता पक्ष प्रचंड बहुमताने केंद्रात विजयी झाला. त्यानंतर जनता पक्षाच्या सर्व खासदारांनी राजघाटावर जाऊन एकत्रित राहण्याची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या दोन वर्षात त्यांच्यात फाटाफूट झालेली देशाने बघितली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेत आल्यास मुंबईत ४० लाख झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्याचा शब्द दिला होता. ४० लाख बेरोजगारांना रोजगारही ते देणार होते. पुढे काय झाले. १९९६ ला रामटेक येथे झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनीच दोन वर्षात विदर्भाचा अनुशेष दूर झाला नाही, तर वेगळ्या विदर्भाचे आंदोलनाचे नेतृत्व मी करीन अशी घोषणा केली होती. दोन वर्षांनी जेव्हा बाळासाहेबांना पत्रकारांनी विचारले तेव्हा दोन वर्षे कधीपासून मोजायची ते ठरले नाही असे उत्तर दिले. त्यानंतर बाळासाहेब २०१२ पर्यंत जगले. मात्र वेगळ्या विदर्भाचे आंदोलन त्यांनी केले नाही. आजही विदर्भ वेगळा झाला नाही आणि अनुशेषही वाढतोच आहे. 

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना सर्व थकबाकी माफ करून शून्य रकमेची वीजबिले पाठवण्याची घोषणा केली होती. अजूनही ती पूर्ण झालेली नाही. अशी अनेक आश्वासने राजकीय नेते देतात आणि पुढे ते विसरून जातात. नंतर विचारले तर असे मी म्हटले होते का असे विचारायलाही मागेपुढे बघत नाही. 

फक्त जनतेलाच दिलेल्या आश्वासनांबाबत नाही, तर राजकीय नेते परस्परांशी देखील खोटे बोलतच असतात. खरे बोलले तर ते राजकारण कसे होईल? त्यामुळेच त्यांना खोटे बोलावेच लागते. ३०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये खरे कोण आणि खोटे कोण याबाबत आजही महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहे.

 एकदा एका शाळेत एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी विचारले की तुला पुढे जाऊन काय व्हायचे आहे? तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी मला राजकारणात जायचे आहे असे उत्तर दिले. तर शिक्षकांनी तत्काळ सांगितले की तुला आतापासूनच भरपूर खोटे बोलावे लागेल. तरच तू राजकारणात टिकशिल. म्हणजेच राजकारण हे खोटे बोलण्याचे ठिकाण आहे हे समीकरण सर्वमान्य झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

तरीही नितीन गडकरी राजकीय नेत्याने खरेच बोलले पाहिजे ही अपेक्षा केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. राजकारणी माणसाने खरे बोलायचे असेल तर सर्वप्रथम या देशातलाच नव्हे तर संपूर्ण जगातल्या राजकारणाचा स्तर उंचावावा लागेल. राजकारणाचे शुद्धीकरण करावे लागेल. सत्यवचनी नागरिकच राजकारणात कसे येतील हे बघावे लागेल. तोपर्यंत तरी नितीन गडकरींची ही अपेक्षा एक स्वप्नरंजनच ठरणार आहे हे नक्की. 


      अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.