पटतेय का बघा... नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करताना...
पटतेय का बघा...
नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करताना...
नागपूर ते पुणे या अंतरासाठी रेल्वेने नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली असून रविवारी या एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. ही एक्सप्रेस नागपूर ते पुणे हे अंतर फक्त १२ तासात कापणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या एक्सप्रेसचे नागरिकांकडून स्वागतच होते आहे.
मात्र या गाडीच्या वेळा गैरसोयीच्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही गाडी नागपूरच्या अजनी स्टेशन वरून सकाळी नऊ वाजता सुटणार असून रात्री नऊ वाजता पुण्यात पोहोचणार आहे. तर पुण्याहून सकाळी सहा वाजता निघून संध्याकाळी सहा पर्यंत अजनीला पोहोचणार आहे. म्हणजेच दोन्ही परतीच्या प्रवासात दिवस पूर्ण जाणार आहे.
हीच गाडी जर रात्रीच्या वेळी दिली असती तर रात्री नागपूरहून बसायचे आणि सकाळी उठून पुण्यात पोहोचल्यावर दिवसभर कामासाठी मोकळा वेळ मिळाला असता. तसेच पुण्याहून निघाल्यावरही झाले असते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ही गाडी गैरसोयीचीच राहणार अशी सर्वसामान्यांची तक्रार आहे.
पुणे शहर गेल्या साधारणतः ३०-४० वर्षात बरेच विकसित झाले आहे. इथे औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून आयटी इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात पुण्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या तुलनेत विदर्भात औद्योगीकरण कमी आहे. त्यामुळेच नागपूर विदर्भातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी पुण्यात पोहोचलेले आहेत. या तरुण-तरुणींना रेल्वेच्या संध्याकाळी निघणाऱ्या दोन गाड्या आहेत. मात्र त्या गाड्या पुरेशा नाहीत. त्यामुळे मग खाजगी बस चालकांचे चांगलेच फावलेले दिसते आहे. नागपूर ते पुणे या रस्त्यावर किमान दहा ते बारा खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चालतात. त्या संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान निघतात आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजेस्तवर नागपुरात आणून सोडतात. या सर्व बसेस अगदी हाउसफुल चालतात.विशेष म्हणजे दिवाळी, ख्रिसमस उन्हाळ्याची सुट्टी अशा वेळी हे खाजगी बस चालक तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवतात. त्यामुळे जनसामान्यांचे चांगलेच हाल होतात. विशेष म्हणजे हे ट्रॅव्हल वाले भरधाव गाड्या सोडतात. त्यात अपघात होण्याची शक्यता असते. मात्र अशा अपघातात प्रवाशांना कोणतेही विमा संरक्षण मिळत नाही. परिणामी तरुण-तरुणींना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षात असे खाजगी ट्रॅव्हल्स चे बरेच अपघात झालेले आहेत.
ही बाब लक्षात घेता नागपूर पुणे मार्गावर रेल्वेने सोयीच्या वेळी अधिक जलद गाड्या सोडायला हव्यात अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र रेल्वे ते करत नाही. यावेळी रेल्वे अधिकारी आणि खाजगी बस चालक यांचे काहीतरी साटेलोटे आहे म्हणून ते नवी गाडी सोडत नाही, अशीही कुजबूज कानावर आली.
या पार्श्वभूमीवर रेल्वेने पुणे नागपूर अशी एक वंदे भारत एक्सप्रेस सोडली ही बाब स्वागतार्हच आहे. या गाडीमुळे ज्यांना दिवसभर प्रवास करून जाणे शक्य आहे ते या गाडीने जातील. परिणामी संध्याकाळच्या गाड्यांवरचा फार कमी होईल हे निश्चित. मात्र मात्र रेल्वेने आता संध्याकाळी आणि रात्री नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर अशा आणखी दोन दुरंतोच्या धरतीवर सुपरफास्ट गाड्या सोडाव्या
जेणेकरून या पुण्यात रोजगारासाठी जाणाऱ्या तरुण-तरुणींना सुलभतेने प्रवास करता येईल आणि त्यांची योग्य ती सोय होईल. रेल्वे प्रशासन याबाबतीत सकारात्मक विचार करेल आणि त्याच वेळी विदर्भातील लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनावर यासाठी दबाव आणतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment