पटतेय का बघा... लोकाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत.
पटतेय का बघा...
लोकाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत.
संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषा आहे. या भाषेला आज राजाश्रय मिळतो आहे. मात्र लोकाश्रय मिळत नाही. तो आता मिळायला हवा यासाठी प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले आहे.
नागपूर नजीक असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या डॉक्टर हेडगेवार शैक्षणिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचीन भारतात सर्वच शास्त्रांवर संशोधन झाले होते , आणि ते संस्कृत ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचे अध्ययन होणे देखील महत्त्वाचे असल्याचे भागवतांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
भागवतांनी व्यक्त केलेल्या विचारांशी या देशातील प्रत्येक सुजाण राष्ट्रप्रेमी नागरिक गांभीर्याने विचार करत सहमत होईल यात शंका नाही. भारत हा प्राचीन देश आहे आणि प्राचीन काळापासून इथली मूळ भाषा ही संस्कृतच असल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात. आपले सर्वच प्राचीन ग्रंथ वेद पुराणे हे संस्कृत मध्येच लिहिले गेलेले आहेत. आजही त्याचे प्राचीन दस्तावेज सापडतात. मात्र त्यावर पुढे संशोधन न झाल्यामुळे आम्ही पाश्चात्त्यांच्या नादी लागलो आणि जगात जी काही प्रगती केली ती पाश्चात्त्यांनी असे आम्ही म्हणू लागलो. जर्मनीच्या राईट बंधूंनी विमानांचा शोध लावला असे आम्हाला शिकवले गेले. मात्र आमचाच प्राचीन ग्रंथ असलेल्या रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आला आहे. तो आम्ही नाकारू शकत नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन सरकारने संस्कृतला अगदी मोडीतच टाकले होते, म्हटले तरी चालेल. तरीही काही संस्कृतचे अभ्यासक संस्कृतसाठी प्रयत्नशील होते. त्यामुळेच शालेय स्तरावर संस्कृत शिकवले जाऊ लागले. महाविद्यालयीन स्तरावर देखील संस्कृत हा विषय होता. मात्र संस्कृत शिकून पुढे नोकरी धंद्यासाठी काही स्कोप नाही म्हणून सामान्य विद्यार्थी संस्कृत पासून दूरच राहत होते. परिणामी संस्कृत भाषा ही अडगळीत पडल्यासारखी झाली होती. मधल्या काळात अनेक विद्वान संस्कृत ही मृत भाषा असल्याचे बोलू लागले होते.
आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये संस्कृत विद्यापीठे स्थापन झाली आहेत. केंद्रीय स्तरावर देखील एक संस्कृत विद्यापीठ आहे. तिथे मोठ्या प्रमाणात संशोधन होते आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्वच संशोधनांचे आणि प्रगतीचे श्रेय पाश्चात्त्यांना देतो. मात्र प्राचीन काळात आपल्या ऋषीमुनींनी बरेच संशोधन करून ठेवले आहे. त्याचे पुरावे त्या काळातील ग्रंथांमध्ये सापडतात. विशेषतः आयुर्वेदात चरक ऋषींनी जे संशोधन केले ते आज जगाला उपकारक ठरू शकते. मात्र त्या क्षेत्रात संशोधन होत नाही, आणि झाले तरी ते नोंदले जात नाही. त्यामुळेच हे क्षेत्र दुर्लक्षित राहते.
आज मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये लहान मुलांना घरात शिकवले जाणारे रामरक्षा, हनुमान स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि इतर स्तोत्रे, भगवद्गीतेचे अध्याय हे सर्व संस्कृत मध्येच आहेत. जर लहान वयापासूनच मुलांना संस्कृतची गोडी लावली आणि शालेय स्तरावर त्याला उत्तेजन दिले गेले तर पुढील पिढी संस्कृत मध्ये संभाषण देखील करू शकते. भारत विकास परिषद ही संघटना दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर संस्कृत मध्ये राष्ट्रीय समूहगीतांची स्पर्धा आयोजित करत असते. त्यासाठी राष्ट्रीय गीते सुद्धा संस्था उपलब्ध करून देते. असे प्रयोग जर होत राहिले तर हळूहळू संस्कृतची गोडी वाढू शकते.
आज सामान्य माणूस मात्र संस्कृतपासून दूर पळतो. त्याच्यामते संस्कृत हा फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षेत स्कोअरिंग सब्जेक्ट इतकाच उपयोग आहे. मात्र शास्त्रशुद्ध अभ्यास करून संस्कृत शिकणे वाचणे आणि प्रसंगी बोलणे हे प्रयत्न का होऊ नयेत? मला आठवते, नागपुरात संस्कृतचे प्राध्यापक असलेल्या एका कुटुंब प्रमुखाला कुणीतरी संस्कृती मृत भाषा आहे असा टोमणा दिला. तेव्हा त्याने जिद्दीने घरात पत्नी आणि मुलांना संस्कृत शिकवले. नंतर अनेक वर्ष हे कुटुंब घरात संस्कृत भाषेतच संवाद साधत होते. म्हणजेच संस्कृतचा व्यवहारात वापर कठीण असला तरी अशक्य नाही हे नक्की.
तरीही संस्कृत दुर्लक्षित आहे. ही परिस्थिती बदलायला प्रयत्न व्हायला हवेत यात कोणाचेही दुमत नाही. २०१७ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत संस्कृतमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या एका विद्यार्थिनीचे मोहन भागवत यांनी नागपूरच्या संघ कार्यालयात बोलावून कौतुक केले होते. त्यावेळी संस्कृत ही भाषा घराघरात पोहोचव असा हितोपदेश त्यांनी केला होता.
इथे फक्त एकाला सांगून होणार नाही. तर सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. संस्कृतला देशातील एक सन्माननीय भाषा तसेच व्यावहारिक भाषा म्हणून सन्मान कसा मिळेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आज व्यासपीठावर अस्खलित संस्कृत मध्ये भाषण करणारे काही मोजकेच विद्वान सापडतील. ही संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी संस्कृत वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यादेखील व्हायला हव्यात. काही वर्षांपूर्वी काही संस्था संस्कृत नाट्य स्पर्धा घेत होत्या. तसे प्रयोग पुन्हा व्हायला हवेत. काही वर्षांपूर्वी संघ परिवाराचीच संस्था असलेल्या हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेने संस्कृत वृत्तसेवा सुरू केली होती. आकाशवाणीवरही पूर्वी संस्कृत मध्ये बातम्या दिल्या जात होत्या. असे प्रयोग व्यापक स्तरावर व्हायला हवेत. त्याचबरोबर सामान्य माणूसही संस्कृतात अभ्यास कसा करेल, वाचन, लेखन, आणि बोलणे कसे करेल, यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या परिवारातील संस्कृत भारती या संघटनेच्या माध्यमातून असे विविध प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला व्यापक जन समर्थन कसे मिळेल हे प्रयत्न आता व्हायला हवेत. तसे झाले तरच संस्कृतला राजाश्रयासोबत लोकाश्रय देखील मिळू शकेल.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment