आयुष्यातले सांगाती २५ विकास सिरपुरकर
आयुष्यातले सांगाती २५
न्याय.विकास सिरपुरकर
वाचकहो माझ्या आयुष्यात असा प्रसंग घडला तेव्हा मला भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला होता, आणि माझी अशी ओळख करून देणारे मान्यवर व्यक्ति होते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर.
न्या. विकास सिरपूरकर यांचा आणि माझा परिचय १९७९-८० या कालखंडातला आहे. त्यावेळी सिरपूरकर सर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एडवोकेट म्हणून प्रॅक्टिस करत होते. १९७९ च्या डिसेंबर महिन्यात माझ्या वडिलांची अकोल्याला बदली झाल्यामुळे त्यांची एक केस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली होती. ज्येष्ठ विधिज्ञ एड. के. एच. देशपांडे या केस मध्ये युक्तिवाद करणार होते. त्याशिवाय बाबांचे जवळचे मित्र एड. बबनराव मुन्शी हे बाकी सर्व कामकाज बघत होते. बाबा अकोल्याला गेलेले असल्यामुळे मग मी तारखेवर हायकोर्टात जात असे. तिथे बाररुममध्ये मुन्शी काका जिथे बसायचे, तिथेच बाजूला सिरपूरकर सर देखील बसायचे. त्यावेळी ते जरी वयाने तरुण असले तरी एक अभ्यासू आणि आक्रमक वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. तिथेच मुन्शी काकांकडे त्यांचा माझा परिचय झाला. सिरपूरकर सर बल्लू या टोपण नावाने ओळखले जात होते. मुन्शी काका त्यांना बल्ला म्हणूनच बोलवायचे. इतरही त्यांचे समवयस्क आणि ज्येष्ठ सुद्धा त्यांना बल्ला म्हणूनच हाक मारायचे.
कालांतराने बाबांच्या दोन्ही केसेस संपल्या. त्यांची नागपूरला बदली देखील झाली. त्यामुळे माझे हायकोर्टात जाणे कमी झाले. तरीही कधीमधी कामाने तिकडे गेलो की सिरपूरकर सरांची हमखास भेट व्हायची. गावात इतरही कार्यक्रमांमध्ये कधीमधी ते भेटायचे. भेटले की आवर्जून चौकशी करायचे. त्या काळात एक वकील म्हणून त्यांचे नाव चांगलेच गाजत होते. फौजदारी आणि दिवाणी दोन्ही प्रकारच्या खटल्यासाठी ते निष्णात वकील म्हणूनच ओळखले जात होते.
१९९२ मध्ये सिरपूरकर सर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून राष्ट्रपतींकडून नेमले गेले. त्यांच्या कामाची सुरुवात माझ्या आठवणीनुसार नागपूर खंडपीठातूनच झाली होती. त्या काळात मी इलेक्ट्रॉनिक मीडियातून प्रिंट मीडियामध्ये कार्यरत झालो होतो. तेव्हा मी नागपूर बाहेरच्याच वृत्तपत्रांससाठी वृत्त संकलन करत होतो. त्यामुळे मग महत्त्वाच्या खटल्यांच्या बातमीसाठी गेलो की ओझरती भेट होत असे.
दरम्यानच्या काळात त्यांची बदली मद्रास उच्च न्यायालयात झाली. मग त्यांचा मुक्काम चेन्नईला असायचा. मात्र अधून मधून नागपूरची चक्कर होतच असे. मला आठवते १९९८ मध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विद्वान संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्या दिवशी नागपुरात असलेले सिरपूरकर साहेब आले असताना तिथे आमची भेट झाली होती. तिथे त्यांनी नागपूरच्या पत्रकारांशी बऱ्याच गप्पाही मारल्या होत्या. नागपूरची वृत्तपत्रे चेन्नईला कशी मिळतील याची व्यवस्था करण्याची त्यांनी सगळ्यांनाच सूचना केली होती.
२००२ पासून मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. २००३ च्या दिवाळी अंकात मी "यशस्वी स्त्री मागचा कर्तबगार पुरुष" असा जरा हटके परिसंवाद घेतला होता. त्यात नवरा आणि बायको दोघेही यशस्वी आहेत अशा जोडप्याच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यादरम्यान सिरपूरकर दांपत्याचे नाव समोर आले. सिरपूरकर सरांच्या पत्नी एड. कुमकुम शिरपूरकर यादेखील नामवंत वकील आहेत. त्यावेळी त्या नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणूनही निवडल्या गेल्या होत्या. एरवी देखील निष्णात महिला वकील म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. त्यामुळे या दांपत्याला मुलाखतीसाठी विचारायचे ठरवले. मी आधी कुमकुम वहिनींकडे गेलो आणि त्यांना भेटून मुलाखतीसाठी विनंती केली. त्याचवेळी त्यांना सरांची देखील मुलाखत हवी आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनी सिरपूरकर सरांचा चेन्नई येथील टेलिफोन नंबर दिला. "तू त्यांना रात्री फोन कर मी कानावर घालून ठेवीन" असे वहिनींनी मला सांगितले. त्यानुसार त्यादिवशी रात्री मी फोन केला. तर सरांनी मला फोनवरच प्रदीर्घ अशी मुलाखत दिली होती. यथावकाश तो दिवाळी अंक प्रकाशित झाला. मात्र अंक दिवाळीत मला सिरपूरकरांच्या घरी पोहोचवता आला नाही. मग दिवाळीनंतर त्यांच्या नागपूरच्या घरी गेलो आणि वहिनींना अंकाची एक प्रत दिली. मग मी सिरपूरकर साहेबांचा चेन्नईचा पत्ता घेतला आणि त्यांना देखील अंकाची एक प्रत पाठवली होती. प्रत मिळाल्यावर लगेचच त्यांनी अंक पूर्ण पाहून मला अभिनंदनचा फोन देखील केला होता. वर्षभराने आम्हा दोघांचेही कॉमन मित्र एड. सतीश देशपांडे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझी आणि शिरपूरकर साहेबांची भेट झाली. त्यावेळी आवर्जून चौकशी करत आता पुढला दिवाळी अंक सुद्धा मला पाठव असे त्यांनी आग्रहाने मला सांगितले होते. त्याच दरम्यान त्यांनी एक दिवस घरी भेटायला बोलावले. जवळजवळ तासभर झालेल्या गप्पांमध्ये एक लक्षात आले की एक विख्यात विधीज्ञ असलेले हे गृहस्थ फक्त कायद्याबद्दलच माहिती ठेवतात असे नाही तर साहित्य, नाट्य, चित्रपट, राजकारण या सर्वांबाबत त्यांच्याजवळ सविस्तर माहिती असते, आणि या सर्व बाबींमध्ये त्यांना रस देखील आहे. त्यामुळे आमच्यातील जवळीक थोडी जास्तच वाढली.
दरम्यानच्या काळात त्यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून बदली झाली. मग काही काळ ते तिकडेच होते. २००७ मध्ये सिरपूरकर साहेब सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून गेले. त्यावेळी ते नागपूरला आले असताना त्यांना आवर्जून भेटायला मी गेलो होतो.
रामटेकच्या गडावरून च्या २००८ दिवाळी अंकासाठी मी "गेले व्हायचे राहून" या शीर्षकाचा एक परिसंवाद घेतला होता. त्यात मान्यवरांच्या आयुष्यात त्यांना करता न आलेल्या गोष्टींबाबत लिहायला विनंती केली होती. त्यात सिरपूरकर सर देखील एक होते. त्यांना दिल्लीच्या पत्त्यावर मी पत्र पाठवले आणि मग फोन केला. तेव्हा त्यांनी मला सांगितले "अविनाश इथून लेख लिहायला माझी थोडी अडचण आहे, इथे मला मराठी स्टेनोग्राफर मिळत नाही, मी नागपूरला आल्यावर तुझे काम कसे करायचे ते बघतो, मी या या तारखेला नागपुरात येतो आ.हे त्यावेळी तू मला भेट." मग ते नागपुरात येताच मी त्यांच्याशी संपर्क केला. मी त्यांना स्पष्ट केले की "इथेही तुम्ही स्टेनोग्राफर शोधायच्या भानगडीत पडू नका. मी येतो, तुम्ही मलाच तुमचा लेख डिक्टेट करा." ही सूचना त्यांनी तत्काळ मान्य केली. मग ठरल्यावेळी मी त्यांना घरी जाऊन भेटलो आणि त्यांनी जवळजवळ तासभर मला त्यांचा लेख डीक्टेट केला होता. यात सुधारणा करून मी तुम्हाला आणून दाखवतो असे सांगताच त्याची काही गरज नाही तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे सांगून त्यांनी मला रवाना केले. तो अंक प्रकाशित झाल्यावर मी त्यांना दिल्लीला पाठवला होता. तेव्हाही त्यांचा मला वाचल्यावर फोन आला होता.
२००८ मध्ये झी सा रे ग म प चे कलाकार नागपुरात आले असताना त्यांचा एक कार्यक्रम रामनगरच्या मैदानात झाला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिरपूरकर सर आले होते. त्या कार्यक्रमाला आम्ही सहकुटुंब उपस्थित होतो. माझी मुलगी दिव्येशा तेव्हा जेमतेम दहा वर्षांची होती. तिला अशा सेलिब्रेटीजचे ऑटोग्राफ घ्यायची हौस होती. तिथे मग वैशाली भैसने माडे, अनिरुद्ध जोशी, अतुल परचुरे या कलावंतांचे ऑटोग्राफ घ्यायला तिला घेऊन गेलो. दरम्यान बाहेर सिरपूरकर सर आणि वहिनी देखील बाहेर बसले होते.त्यांच्याही कडे घेऊन चला असा आग्रह दिव्येशाने धरला. मग त्यांच्याकडेही घेऊन गेलो.' ही माझी मुलगी दिव्येशा, हिला तुमचा फोटोग्राफ हवा आहे. असे सांगताच त्यांनी लगेच दिव्येशाची डायरी हातात घेतली आणि ऑटोग्राफ दिला. मग तिची चौकशी देखील केली. तू काय शिकतेस? पुढे जाऊन कोण होणार? बाबांसारखी पत्रकार होणार का? असे आपुलकीचे प्रश्न विचारत तू खूप मोठी होणार असा आशीर्वादही त्यांनी दिव्येशाला दिला.
२०११ मध्ये माझे मागोवा घटितांचा आणि काल प्रवाहाच्या वळणांवरून असे दोन वैचारिक लेखांचे संग्रह प्रकाशित होणार होते. त्याच्या प्रकाशनाचा समारंभ करावा असे डोक्यात आले. त्यानुसार प्रमुख अतिथी कोणाला बोलवावे असा विचार करताना अचानक सिरपूरकर सरांचे नाव डोळ्यासमोर आले. त्यांना दिल्लीलाच फोन केला. तेव्हा "पुढच्याच आठवड्यात मी नागपूरला येतो आहे, त्यावेळी तू भेट. आपण ठरवूया." असे आश्वासन त्यांनी दिले..
सिरपूरकर सर नागपूरात आल्यावर त्यांना भेटलो. आमची चर्चा झाली आणि २३ एप्रिल २०११ ला पुस्तकांचे प्रकाशन करायचे ठरवले. पुस्तके छापून आली की मला दिल्लीच्या पत्त्यावर पाठव, असेही त्यांनी सुचवले. त्यानुसार त्यांना दिल्लीला पुस्तके देखील पाठवली आणि आम्ही सर्वच कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. नागपूरच्या सायंटिफिक लॉन्स वर कार्यक्रम ठरवला होता. सिरपूरकर सरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर भाष्य करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी आणि अध्यक्षस्थानी दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे (डिम्ड युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा असा कार्यक्रम ठरला. सायंटिफिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याच दरम्यान दोन-तीनदा सिरपूरकर सरांच्या घरी जाण्याचा योग आला. एकदा मी बसलो असतानाच नागपूरच्या भोसले राजघराण्यातील एक जोडपे यांना भेटायला आले. ते येताच मी उठायला लागलो, तर मलाही बसवून घेतले आणि माझी ओळख करून देताना "अविनाश हा माझा जुना मित्र आहे" असे कौतुकाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती मला मित्र मानतो हे बघूनच मी भरावलो होतो.
ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला सिरपूरकर सर आले. पुस्तक प्रकाशन झाले, नंतर सर्व मान्यवरांची भाषणे झाली. सिरपूरकर सरांच्या भाषणात पदोपदी जाणवत होते की त्यांनी दोन्ही पुस्तके पूर्णपणे वाचलेली आहेत. त्या दिवशी माझी तुलना त्यांनी महाभारतातल्या संजय यासोबत करून टाकली. प्रत्येक लेखाचा परामर्श घेत त्यांनी दोन्ही पुस्तकांवर भाष्य केले होते. सर्वच उपस्थित त्यामुळे खूपच भारावले होते. कार्यक्रम संपल्यावर चहापानाच्या वेळी मी त्यांना सहज विचारले "तुम्ही दोन्ही पुस्तके पूर्ण वाचली होती का?" तर त्यांनी उत्तर दिले "काल सकाळी भंडाऱ्याला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. जाताना आणि येताना कारमध्ये तुझी दोन्ही पुस्तके मी वाचली आणि काय बोलायचं ते निश्चित केले होते." एकूणच त्यांचा अभ्यासू स्वभाव यातून लक्षात येतं होता.
याच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मी सिरपूरकरांच्या घरी बसलो असताना भोसले दांपत्याला माझी जुना मित्र म्हणून ओळख करून दिली, त्यामुळे मला भारतरत्न मिळाल्यासारखा आनंद झाला होता, असे बोललो होतो. आपल्या भाषणात सिरपूरकर सरांनी "अविनाशची ही फालतू फोकनाड आहे" असे म्हणून माझे म्हणणे हसण्यावारी नेले होते.
या कार्यक्रमाला वडिलांचे एक समवयस्क मित्र उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते घरी आले आणि मला विचारू लागले "अविनाश या सुप्रीम कोर्ट च्या जजची तुझी इतकी खास ओळख कशी?" मग त्यांना समजावून सांगता सांगता माझी पुरेवाट झाली होती.
२०१२ मध्ये सिरपूरकर सर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले. तिथून मग ते नागपुरातच स्थायिक झाले. असे असले तरी सरकारच्या वेगवेगळ्या चौकशी समित्यांवर त्यांची नियुक्ती होतच होती. त्यात ते व्यस्त असायचे. मात्र त्यातूनही माझ्यासारख्या मित्रांसाठी ते कायम वेळ काढायला तयार असायचे. बरेचदा लेखन करताना एखाद्या कायदेशीर बाबीबाबत खुलासा हवा असला तर हमखास सिरपूरकर सरांना फोन करावा, आपल्याला शंभर टक्के मार्गदर्शन मिळेल, ही मला खात्री होती. अनेकदा ही खात्री प्रत्यक्षात देखील उतरली. मग कधीतरी भेटले की "काय पत्रकार झाला का तुमचा लेख तयार? कुठे छापून आला? मला कॉपी पाठवा." म्हणून आवर्जून विचारणा देखील व्हायची.
२०१४ मध्ये मी रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटचाअध्यक्ष होतो. त्यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे २०१४-१५ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नाशिकचे दादा देशमुख हे पदग्रहण करणार होते. दादांच्या पदग्रहणाला मी नाशिकला गेलो होतो. तिथे प्रमुख अतिधी म्हणून सिरपूरकर सरच आले होते. सभागृहात येऊन पोहोचल्यावर जेव्हा मी समोर दिसलो तेव्हा "अरे वा अविनाश तू इथे देखील येऊन पोहोचला का?" असे म्हणत त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर थाप मारली. तेव्हा दादा देशमुख यांनी "अविनाश एका नव्या क्लबचा अध्यक्ष आहे. त्याने फार थोड्या वेळात नवा क्लब उभा केला आणि चांगले काम करतो आहे" अशी माहिती देताच शेवटी "अविनाश नागपूरकर आहे" म्हणून त्यांनी माझे कौतुकही केले.
२०१४-१५ मध्ये हिंदुस्तान समाचार या राष्ट्रीय वृत्तसंस्थेतर्फे जुन्या कालबाह्य झालेल्या कायद्यांमध्ये कशी सुधारणा करता येईल यावर एक राष्ट्रीय चर्चासत्र घ्यायचे घाटत होते. त्यावेळी हिंदुस्तान समाचारचा मी नागपूर विदर्भाचा ब्युरो चीफ होतो. मग आयोजनासाठी कायदे क्षेत्रातील सगळ्या जाणकारांना एकत्र आणून चर्चा सुरू केली. त्यात सिरपूरकर साहेबांना विचारावे असे ठरले. मग मी आणि एड. राजेंद्र राठी सरांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी जवळजवळ दीड तास आम्हाला जुने कायदे आणि त्यातल्या नवीन सुधारणा याच्यावर प्रदीर्घ मार्गदर्शन केले होते. मात्र दुर्दैवाने ते चर्चासत्र आयोजित होऊ शकले नाही.
अनेकदा बोलण्यामध्ये असे लक्षात आले होते की आपल्या देशात असलेली उजवी विचारसरणी सिरपूरकर सरांना फारशी रुचत नाही. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे चंद्रकांत लाखे माझ्याकडे आले आणि तुमचे आणि सिरपूरकर साहेबांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे आमच्या सावरकर स्मृती पुरस्कार वितरणाला त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यासाठी तुम्ही मदत करा, अशी मला गळ घातली. त्यांचे विचार बघता मी थोडा घाबरतच या मंडळींना घेऊन सिरपूरकर सरांकडे गेलो. त्यावेळी बोलताना त्यांनी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, त्यामुळे कार्यक्रमाला आम्ही नक्की येणार, असे सांगितल्यामुळे मला जरा धक्का बसला. एकूणच सिरपूरकर सरांचे विचार एकांगी नाहीत, तर सर्वसमावेशक आहेत. आणि जिथे जे चांगले असेल ते घ्यायचे या निर क्षीर विवेक बुद्धीने काम करणारे हे गृहस्थ आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
माझे एक जुने मित्र विंग कमांडर अशोक मोटे आणि न्या.विकास सिरपूरकर हे दोघेही जुने मित्र, त्यामुळे त्यांच्यामार्फत देखील बरेचदा भेट होत असे. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. द. भी. कुलकर्णी पुण्याहून नागपुरात आले की एक दिवस अशोक मोटे एक गप्पांची मैफिल आयोजित करत असत. एखाद्या हॉटेलमध्ये दुपारचे जेवण आणि गप्पा असा कार्यक्रम असायचा. त्यात द.भी. सर, अशोक मोटे, मी सिरपूरकर सर, डॉ. प्रमोद कोलवाडकर, प्रकाशक विनोद लोकरे. हितवादचे संपादक विजय फणशीकर असे सर्व एकत्र जमायचो. मग प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातले किस्से सांगत असे. दोन अडीच तास कसे जायचे ते कळायचेही नाही. आता द.भि. सरही नाहीत आणि अशोक मोटेही नाहीत. त्यामुळे गप्पांची ही मिळतील बंदच झाली आहे.
भारत विकास परिषद या सामाजिक संघटनेचा मी अध्यक्ष असताना संघटनेतर्फे आम्ही नागपुरात राष्ट्रीय समूहगान स्पर्धा आयोजित केली होती. ती सकाळपासूनच चालणार होती आणि दुपारी चार वाजता तिचा पुरस्कार वितरण समारंभ ठरला होता. त्यासाठी मी सिरपूरकर साहेबांना निमंत्रित केले होते. मात्र त्या दिवशी काही स्पर्धक शाळा कमी आल्या. त्यामुळे कार्यक्रम दुपारी पावणेतीन वाजताच संपला. मग मुलांना चार वाजेस्तवर अडवणे शक्य होणार नव्हते. अशावेळी मग मी सिरपूरकर सरांना फोन केला आणि अडचण सांगितली. त्यावेळी त्यांचे उत्तर मिळाले "अविनाश मी तर घरी आहे, पण आता माझा ड्रायव्हर नाही, त्यामुळे जरा अडचण आहे." मग मी प्रस्ताव ठेवला "मी माझी कार घेऊन येतो, तुम्ही माझ्याबरोबर या." त्याला ते लगेच तयार झाले. मी लगेच खुलासा केला "माझी छोटी मारुती एट हंड्रेड गाडी आहे." त्यावर सर मिश्किलपणे उत्तरले "तुझ्या कार्यक्रमाला येण्यासाठी मी तुझ्या स्कूटरवर सुद्धा डबल सिट यायला तयार आहे" मग मी लगेच गेलो आणि त्यांना कारने घेऊन आलो. कार्यक्रमात ते पूर्णवेळ थांबले. त्यावेळी सावनेरच्या मूकबधिर विद्यालयाच्या शाळेतील मूकबधिर विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले होते. गीत शिक्षकांनी म्हटले आणि या मुलांनी अभिनय करून त्या गीतातील भाव लोकांपर्यंत पोहोचवले होते. त्या लहान लहान दिव्यांग मुलांचे कौशल्य बघून शिरपूरकर सर इतके सुखावले की लगेच त्यांनी खिशातून पाकीट काढत त्यातून २१०० रुपये काढले आणि त्या मुलांच्या शिक्षकांजवळ देऊन सांगितले की आज माझ्यातर्फे या मुलांना तुम्ही खाऊ द्या. उपस्थित त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्यांच्या या गुणग्राहकतेला दाद दिली होती.
सिरपूरकर सरांना कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र यात प्रचंड रस आहे हे मी आधीच सांगितले आहे. २०२३ च्या जानेवारीमध्ये राम गणेश गडकरी जयंतीनिमित्त आम्ही गडकरींच्या नाटकातील प्रसंग आणि त्यांची नाट्यगीते यावर आधारित एक दोन तासाचा कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रात वाचून आणि त्या बातमीत माझे नाव वाचून सिरपूरकर सरांचा लगेच मला फोन आला." अविनाश मला या कार्यक्रमाला यायला आवडेल, मी किती वाजता पोहोचू?". आणि ठरल्या वेळेवर सिरपूरकर दांपत्य तिथे उपस्थित झाले. मी त्यांना प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर बोलावून त्यांचा सत्कार करण्याचेही ठरवले होते. मात्र त्यांनी ते नाकारले. मी इथे एक रसिक म्हणून आलो आहे त्यामुळे मी रसिक म्हणूनच बसणार, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही मग आम्ही गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले होते. पूर्ण वेळ ते कार्यक्रमात थांबले आणि कार्यक्रम संपल्यावर सर्व कलाकारांना भेटून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.
सुमारे दीड पावणेदोन वर्षांपूर्वी नागपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वास सहस्रभोजने यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठान विश्वास कन्स्ट्रक्शन ला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी एक स्नेह भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे मला निमंत्रण होते. कार्यक्रमाला पोहोचल्यावर तिथे सिरपूरकर सर आणि नागपुरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सतीश सुळे एकत्रितपणे भेटले. तिथे मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. डोळ्यात होणाऱ्या मोतीबिंदूवरून विषय निघाला आणि सरांनी सहज मला विचारले "अविनाश तुझं वय आता किती आहे?" मी सांगितलं यावर्षी मी 69 पूर्ण करेल तर लगेच ते डॉ. सुळेंना म्हणाले "अरे सतीश हा तर आपल्यासमोर अगदीच बच्चा आहे." मग मी लगेच खुलासा केला की डॉक्टर सुळे यांच्या धाकट्या भावाचा मित्र म्हणून मी त्यांच्या घरात पोहोचलो आहे, आणि त्यांच्या धाकट्या भावापेक्षाही मी लहान आहे त्यामुळे तुमच्या समोर मी बच्चाच राहणार. त्यावर सगळ्यांनीच हसून दाद दिली होती.
या कार्यक्रमानंतर माझ्या आठवणीनुसार मे महिन्यात सावरकर जयंतीच्या कार्यक्रमात आम्ही भेटलो होतो. त्यानंतर गेले संपूर्ण वर्ष माझे आजारपणातच गेले. परिणामी कुठेच कार्यक्रमात आमची भेट झाली नाही. मात्र मध्ये एकदा फोनवर बोलणे झाले होते.
असे असले तरी पुन्हा एकदा लवकरच सिरपूरकर सरांना भेटायची खूप इच्छा आहे. ते वयाने ज्ञानाने आणि मानाने देखील माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. तरीही ते भेटले की एखाद्या जवळच्या मित्राशी गप्पा माराव्या तितक्या सहजतेने ते बोलतात, आणि खूप वेगवेगळी माहिती देऊन जातात. त्यांच्याशी भेटणे आणि बोलणे हा एक वेगळाच आनंद असतो.
आधी बोलल्याप्रमाणे आजही देशाच्या प्रोटोकॉल नुसार पहिल्या दहा मान्यवर व्यक्तींमध्ये असलेल्या न्यायमूर्ती सिरपूरकरांशी माझे स्नेहबंध आहेत, हे बहुदा पूर्वजांनीचे सुकृतच असावे.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment