दिनविशेष, श्रीकृष्ण जयंती , आज दहीहंडी.. गोपालकाला.
दिनविशेष.
श्रीकृष्ण जयंती.
आज दहीहंडी.. गोपालकाला
श्रीकृष्ण म्हणजे विरपुरुषांचा कौस्तुभमणी, यशस्वी, मुत्सद्दी, धर्मसाम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल- भक्ताभिमानी, ज्ञानियांची - जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण....
प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे... भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली व महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता, प्रकांडपंडित आणि धार्मिक जगाचा नेता आहे. महाभारताचे कृष्ण हे लोकनायक, दुष्टांचा सर्वनाश करणारे, निरपराधाचे रक्षक आहे. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे दश अवतारातील आठवा पूर्ण अवतार आहे.....
आनंदनिधान, दुष्टजनांचा कर्दनकाळ, आदिमायेचा मूलाधार, अनंतरूपी विराट पुरुष, साम्यवादाचा आद्य जनक, महाभारताचा मूलाधार... तथापी बालगोपाल कृष्णाचे अपार वेड, अनिवार आकर्षक जनतेला आहे. कन्हैयाची ही विविध रूपे मनःचक्षूसमोर तरळायला लागतात.....
बाळकृष्णाला अंगाखाद्यावर खेळविण्याचे रिझविण्याचे, गोड कौतुक करण्याचे भाग्य लाभलेली यशोदा माता, साधेभोळे, निरागस, निष्पाप गोकुळवासी, वेदांनाही ज्याचा थांगपत्ता लागलेला नाही तो गोकुळातील गौळणीकडून बोबडे बोल शिकतो... त्याच्या वचनांचा मर्म त्याच्या मातापित्यांना तर कळलाच नाही. पण ज्ञानवंतांना सुध्दा आकलन झालेले नाही. गोपाळासंगे नाचण्या बागडण्याचा श्रीकृष्णाला भारीच हव्यास. ते नाचणे बागडणे, पशुंमागे धावणे, गवळणीच्या वाटा अडवून दूध, दही मागणे, न दिल्यास दगड मारून माठ फोडणे, वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्धपान करू देणे, दूध-दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्याच्या पोरासोरांना मनसोक्त खाऊपिऊ घालणे, नानापरीचे क्रीडा, कौतुके यामुळे लहान- थोरांना अपार आनंदाचे भरते येई.....
सर्व व्याप सांभाळून उपाधीत अडकून न पडता, निरूपाधिकपणे प्रपंचात कसे वागावे याचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिले आहे... प्रपंच परमार्थात ऐक्य असावे, अद्वैत असावे त्यात कदापि विसंवाद असू नये. यामुळे माणसाला हे जग सत्य वाटायला लागते. वास्तविक जग हे सत्य नाही, असत्यही नाही. तर सत्य- असत्याचे मिश्रण आहे. मायातीत असणारा हा पुरुष खरा ज्ञानी व सिध्द पुरुष आहे.....
कुरूक्षेत्रावर किंकर्तव्यमूढ आणि गलितगात्र झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली... अर्जुनाची योग्यता तशीच होती. त्याचा अधिकारही तसाच होता. त्याचे श्रीकृष्णाशी परम सख्य होते. पराकोटीचा विश्वास होता. अर्जुनाच्या ठिकाणी माझे रुप पहा, माझे अस्तित्व जाणा असे भगवंतांनी सांगितले. प्रेम किती वेडे होऊ शकते याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. अर्जुनाचे पूर्वजन्मीचे काहीतरी सुकृत असल्यामुळे त्याला हे देवदुर्लभ भाग्य लाभले आणि तो परमसुखाचा वाटेकरी झाला...
अशीच एक कथा नव्हे सत्य घटना...
देवकीने प्रसादाचा द्रोण कान्हापुढे धरला... त्याने तो द्रोण उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी त्याच्या थरथरत्या हातांनी सारा प्रसाद सांडला. तिने तो पटकन उचलला.... मंदिरातल्या लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा झेलत कान्हाला उचलून व्हीलचेअर मध्ये बसवले आणि घरी निघाली...... मागच्या आठ वर्षांपासुन प्रयत्न करत होती ती, पण अजूनही तिच्या प्रयत्नाला यश काही येत नव्हते.
जन्माष्टमीच्या दिवशी घरात बाळाचा जन्म झाला.. म्हणुन हौसेने त्याचे नाव कान्हा ठेवले... देवकीला शोभेल असा कान्हा! आता घरात गोकुळ नांदणार, त्याच्या बाललीलांनी घर आनंदाने न्हाऊन निघणार, छुम-छुम पैंजण वाजवत तो घरात दुडू-दुडू धावणार.... अशी स्वप्ने पहात एकेक दिवस पुढे सरकत होता. पण ही स्वप्नं सत्यात उतरणार नाहीत हे जेव्हा डॉक्टरांनी देवकी आणि अमरला सांगितले..... तेव्हा निराशेच्या खोल खाईत आपल्याला कोणी तरी लोटून दिले आहे असे त्यांना वाटले..... सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चक्काचूर झाला. कान्हाला स्नायूंचा असा आजार होता की, त्याच्यासाठी चालणे, धावणे, बोलणे, वस्तू उचलणे सर्वच खूप अवघड असणार होते.... त्याचे स्नायू खूपच कमकुवत होते. फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी , मसाज आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अथक प्रयत्न यामुळे काही सुधारणा होण्याची शक्यता होती.... तीही धूसर!
अमरने तर आशाच सोडली... त्याने स्वतःला आपल्या कामात गुंतवून घेतले. देवकी आधी खूप रडली.... दैवाला दोष देत बसली..... पण जेव्हा जेव्हा कान्हाचा तो गोंडस चेहरा तिच्यासमोर येई... ती सगळे दुःख विसरून जाई. त्याला जवळ घेऊन पटापट त्याचे पापे घेऊ लागे.... बाळ कसेही असले तरी आईची माया कमी थोडीच होणार होती? उलट आता प्रेमा बरोबर तिला जबाबदारीचीही जाणीव झाली.
" श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात घडते , तीचं काही तरी प्रयोजन असतं, माझ्या बाबतीतही असेच असणार! देवाला माझी परिक्षा घ्यायची असेल.....मी खरंच माझ्या कान्हाची देवकी आहे ना,एक चांगली आई आहे ना? हे बघायचे असेल..... यातून नक्कीच काही तरी चांगले होणार असेल..... मी रडणार नाही. आजपासून माझे प्रयत्न सुरू! "
आता देवकीचा सगळा वेळ फक्त कान्हासाठी होता..... त्याचा मसाज, दवाखान्याचे सेशन्स, वेगवेगळ्या डॉक्टरांच्या अपाॅइंटमेंट्स आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आसपासच्या लोकांशी लढा सुरू झाला.
" अरेरे, कसे होणार या मुलाचे? किती दुर्दैवी आई वडील आहेत! देव देतो तरी कशाला अशी मुले....." अशा विचारांशी खरा लढा सुरू झाला.
ती त्याला खूप गोष्टी सांगे... हावभाव करून अभिनयासहित ती त्याला त्या गोष्टी जिवंत करून दाखवी. कान्हाला कृष्णाच्या गोष्टी खूप आवडत.. तो मन लावून त्या ऐके.... विशेषतः कृष्ण गोपींना कसा सतावायचा ... दही लोणी कसं पळवायचा.... राक्षसांचा कसा वध करायचा.. या गोष्टी ऐकताना त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलत जात.... त्याचे हात, आई दाखवते तशा कृती करण्यासाठी शिवशिवत... एकेक शब्द तो उच्चारायचा प्रयत्न करी.... बरेचसे शब्द अस्पष्टपणे तो बोलू लागला होता. आधाराने चालूही लागला होता.... पण हातात तितके बळ अजून नव्हते... त्याला आवडते म्हणुन बासरी आणली होती देवकीने, पण तीही त्याला नीट पकडता येत नव्हती......
एकदा देवकी त्याला कृष्ण कसा दहीहंडी फोडतो याची गोष्ट सांगत होती..... ती गोष्ट ऐकताना त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक यायची ..... तो तिला परत परत ती गोष्ट सांगायला लावी आणि कृष्णाने दहीहंडी फोडली की आनंदाने खूप हसू लागे.... त्याला असे बघून देवकीच्या मनात एक कल्पना आली.... तिने एक मडके थोड्या उंचीवर लटकवले .... त्याच्या हातात काठी दिली आणि परत गोष्ट सुरू केली.....
" कृष्णाच्या मित्रांनी एकावर एक थर रचले..... कृष्ण वर वर चढत गेला....पण हंडीपर्यंत हात जाईना.... त्याने एक काठी उचलली आणि दहीहंडी फोडली..."
असे ती सांगत असतानाच कान्हाने पण इकडे काठी उचलली... जमिनीपासून थोडी वर गेलीच होती की, त्याच्या हातातून ती पडली. देवकीला उपाय मिळाला होता.... आता रोज ती हा प्रयोग करू लागली.... त्या गोष्टीच्या प्रभावामुळे कान्हा काठी उचलण्याचा आटोकाट प्रयत्न करी.... हळूहळू तो भिंतीला धरून उभा राहू लागला...त्याची काठी त्या मडक्यापर्यंत पोहोचायला लागली... पण हातात इतकी ताकद अजूनही नव्हती की, काठी मारून ती हंडी फुटेल.... पण प्रयत्न चालू होते..... दोघांचेही!
आज कान्हाचा वाढदिवस! देवकीने त्याला कृष्णाची वेषभूषा केली... एक मोरपीसही त्याच्या मुकुटाला चिकटवला.... तिच्या कान्हाचे ते गोजिरे रूप बघून तिला किती भरून आले..... वाढदिवसाला सर्व मुले बोलावली..... केक कापायचाच होता. तोच कान्हाचे लक्ष टीव्हीकडे गेले... दहीहंडी फोडायचे प्रक्षेपण सुरू होते.... एक मुलगा गोविंदाच्या अनेक थरांवरून वर चढला..... आणि क्षणात त्याने दहीहंडी फोडली.... सगळे टाळ्या वाजवू लागले...... कान्हा हळूच खुर्चीवरून उठला..... भिंतीचा आधार घेत घरात लटकवलेल्या हंडीपर्यंत पोहोचला.... काठी उचलली...... हळू हळू हात वर जाऊ लागला.... मुलांचा एकच गलका सुरू झाला.... " कान्हा.. कान्हा..." त्या प्रोत्साहनामुळे कान्हा हुरळून गेला... त्याने काठी वर उचलली... सगळी ताकत एकवटून हंडीवर प्रहार केला..... आणि क्षणात हंडीचे तुकडे झाले.... अमरने कॅमेऱ्यात तो क्षण टिपला.... देवकीच्या कान्हाने दहीहंडी फोडली होती..... इतक्या दिवसांच्या प्रयत्नाला यश मिळाले होते..... देवकी आता मागे वळून पाहणार नव्हती... प्रयत्न चालूच ठेवणार होती... .... दहीहंडी तर एक सुरुवात होती.......तिच्या कान्हाला अजून बरंच काही करायचं होतं. उशिरा का होईना त्यांचे आयुष्य कान्हाच्या बाललीलांनी भरून जाणार होतं !
आज दहीहंडी.. गोपालकाला
*भारतीयच नाही तर जगाला श्रीकृष्ण चरित्राची महती कळलीय. श्रीकृष्णाच्या जन्मापासून संपूर्ण चरित्र जीवनात किती आवश्यक.. पथदर्शक आहे हे समजलेय. यामुळेच जगभर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे.*
श्रीकृष्णाच्या आधी बलरामाचा जन्म रोहिणीच्या पोटी झाला. बलराम हे अंनतशेष अवतार तर श्रीकृष्ण विष्णू अवतार. श्रीकृष्णानं माता देवकीच्या पोटी जन्म घेतला तर यशोदा मातेकडून संगोपन.. लाड करुन तिला मातृवात्सल्याचा आनंद दिला.
श्रीकृष्णाला नंदराजाकडे सुखात ऐष आरामात जगता आले असते. पण मित्र निवडले ते सामान्य घरचे. या सवंगड्यांच्या माताभगिनी गोपिकांसोबत बालपण व्यतित केले. सामान्य मुलांच्या भावनाशी समरस झाला.
श्रीकृष्ण चरित्रच सदैव प्रेरणादायी. गोकुळातील मित्रांचे दुःख ओळखले. पोटापुरते ठीक पण येथील लोक अतिरिक्त गरजा भागवायला जेव्हा पोटच्या मुलांच्या तोंडचे दही.. दुध.. लोणी मथुरेला बाजारात विकायला नेऊ लागले तेव्हा बाळकृष्णाने अडवले. त्यांच्या घरची वर टांगलेली दही.. लोण्याची मातीची हंडी फोडली. सगळे दही.. लोणी मित्रांसोबत मजेत वाटून खाल्ले. हाच तो दहीहंडीचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय.
श्रीकृष्ण सामान्य मित्रांसोबत गायींना चरायला न्यायचा. ही मुले गरीब. मग सगळ्या मित्रांच्या शिदोरीतील पदार्थ एकत्र करुन सगळे खायचे. हाच तो गोपालकाला. श्रीकृष्ण जन्माच्या प्रसाद म्हणजे दहीहंडीतील लोणी आणि हा एकात्मतेचा गोपालकाला.
कदाचित भविष्यकाळात भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या श्रीकृष्णाच्या लाडक्या देशी गायी देशात कमी होतील. देशी गायींचे दुध.. दही.. तुप याच्या कमतरतेने आरोग्य प्रश्न निर्माण होतील हे ठाऊक असावे. त्यामुळेच दहीहंडी उत्सवाचे खरे मानकरी स्वतः देशी गायींचे संगोपन करणारे गो-पालक आहेत.
दहीहंडीमध्ये देशी गायीचेच दही.. लोणी असते. दहीहंडीवेळी सर्वत्र या देशी गायी पाळणाऱ्या श्रीकृष्णाच्या लाडक्या सवंगड्याचा.. गो-पालकांचा सन्मान काही मंडळात केला जातो.. पण तो सर्वांनीच करावा.
*आला रे आला गोविंदा*
*गोविंदा गोविंदा गोविंदा*
*गोकुळाष्टमीचा सण आनंदाचा*
*चला खेळूया गोपालकाला*
*आला रे आला, हंडी हा फोडण्या*
*मोहन मुरलीवाला*
*गोविंदा आला रे आला*
*हंडी हा फोडण्या आला*
*सवंगड्यांना घेऊन आला*
*वाजत गाजत हा गोविंदा आला*
*गोकुळचा चोर हा*
*नंदाचा पोर हा*
*दही दूध लोणी लुटण्या आला*
*गोप थरारती, कान्हा चढे वरती*
*पाणी टाकुनी भिजवा त्याला*
*आला रे आला, हंडी हा फोडण्या*
*मोहन मुरलीवाला*
*गोविंदा आला रे आला*
*हंडी हा फोडण्या आला*
*साऱ्यांचा लाडका हा कान्होबा*
*यशोदेचा बाई हा लाडोबा*
*मोहन चोर हा, लई शिरजोर हा*
*उंचावरी तुम्ही हंडी बांधा*
*असा हा श्रीहरी,*
*मटकी फोडी शिरी*
*त्याने काल्याचा आनंद लुटला*
*आला रे आला, हंडी हा फोडण्या*
*मोहन मुरलीवाला*
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment