पटतेय का बघा.... बॅकबेंचर उद्धवपंत.

 पटतेय का बघा....

बॅकबेंचर उद्धवपंत

दोन-चार दिवसांपूर्वी दिल्लीत इंडी आघाडीची एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत म्हणे शिवसेना शिल्लक पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांना सहाव्या ओळीत बसवण्यात आले होते. हे दृश्य उभ्या महाराष्ट्राने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बघितले. त्यावरून आता महाराष्ट्रात नवा राजाकीय वाद सुरू झाला आहे. 

उद्धव ठाकरेंना इतके मागे ढकलले हे बघून त्यांच्या सर्वच राजकीय विरोधकांना जोर आलेला दिसतो आहे. त्यात एकनाथ शिंदे तर आघाडीवर आहेतच, पण भारतीय जनता पक्ष देखील कंबर कसून मैदानात उतरला आहे. उद्धव ठाकरेंना इतके मागे बसवणे हा त्यांना कदाचित तापमान वाटत नसेलही, मात्र आमच्या दृष्टीने हा त्यांचा  नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे असे विधान भाजपचे नेते आणि राज्यमंत्री मंडळातील मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल शिवाजी पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जाऊन बाळासाहेब उद्धवजींना माफ करा अशा घोषणा देत उद्धवजींची अक्षरशः खिल्ली उडवलेली दिसून आली. शिंदे यांच्या शिवसेनेच्या एक नेत्या आमदार डॉ.

 मनीषा  कायंदे या कार्यक्रमाचे नेतृत्व करताना दिसून आल्या. याशिवाय नरेश मस्के चंद्रशेखर बावनकुळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वांनीच या मुद्द्यावरून उद्धवपंतांवर टीकेची झोड उठवलेली दिसून आली आहे. 

काही जणांना अशी टीका हे कदाचित राजकारण वाटेलही, मात्र जे काही झाले ते महाराष्ट्राच्या,  शिवसेनेच्या, आणि ठाकरे परिवाराच्या इज्जतीला शोभणारे झालेले नाही असे म्हणता येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक दरारा होता. बाळासाहेब कधीही मातोश्री सोडून कोणाला भेटायला गेले नाहीत. अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी त्यांना भेटायला मातोश्रीवर जायचे. इतकेच काय पण प्रतिभा पाटील जेव्हा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार  म्हणून घोषित झाल्या , तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या उमेदवार म्हणून शिवसेनेने पाठिंबा द्यावा ही भूमिका घेऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा स्वतः मातोश्रीवर गेले होते. सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून उभ्या झाल्या तेव्हा त्यांना अविरोध निवडून आणण्यासाठी शरद पवार स्वतः मातोश्रीवर गेले होते. बाळासाहेबांनी आपले तत्व कधी सोडले नाही आणि कधीही सत्तेसाठी कुणाच्या दारी गेले नाहीत. ज्यांना यायचे त्यांनी मातोश्रीवर यावे, मी पाठिंबा द्यायचा की नाही हा विचार करीन, ही बाळासाहेबांच्या कामाची पद्धत होती, आणि त्यांचा तेवढा दराराही होता.

मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा हाच दरारा कधीच कायम राखला नाही. २०१९ मध्ये भाजपाला धोका देऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मैत्री करत सत्ता मिळवायची,  त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे सिल्वर ओक वर शरद पवारांकडे चकरा मारत होते. इतकेच काय पण ज्या सोनिया गांधींची बाळासाहेबांनी सतत टिंगल टवाळी केली, तिच्याकडे देखील उद्धवपंत पाठिंबा मागायला गेले होते अशी माहिती आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मात्र ते मातोश्रीत बसून कारभार हाकलत राहिले. त्यामुळे एकनाथ शिंदे बंड करायला प्रवृत्त झाले आणि पुढला इतिहास वाचकांना माहितच आहे. 

तरीही शहाणपण न आल्यामुळे आमचच खरं  अशी मुजोरी करत राहिल्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धवपंतांचे अक्षरशः तीन तेरा वाजले हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. ज्या काँग्रेस सोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर वैर केले, त्याच काँग्रेसची हात मिळवणी करत उद्धव पंतांनी निवडणूक लढवली. परिणामी ८० वरून वीस जागांवर ते येऊन पोहोचले आणि आता अजून किती खाली घसरणार त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. 

भरीस भर म्हणजे उद्धव पंतांचे हीच मास्टर सॉइस हीज मास्टर्स व्हॉइस असलेले संजय राऊत दररोज सकाळी नरेंद्र मोदींना शिव्या घालतात आणि काँग्रेसची तरफदारी करत असतात. हे उद्धव पंतांचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य होईल काय? 

त्याचेच पर्यावसान इंडी आघाडीच्या बैठकीत उद्धवपंतांना बॅकबेंचर बनवण्यात झाले आहे. उद्धवपंत म्हणतात की महाराष्ट्र म्हणजेच शिवसेना आहे, शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे. जर असे असेल तर शिल्लक शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला इतके मागे बसवले हा खरोखरीच महाराष्ट्राचा अपमान म्हणायला हवा. मात्र संजय राऊत त्या मागे बसवण्याचे समर्थन करत फिरत आहेत. आता याला काय म्हणावे? 

चालायचेच.... तत्व सोडून सत्तेच्या मागे लागलात म्हणजे असेच होणार. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव पंतांनी आपली धोरणे बदलली, तर आजही महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, आणि ते म्हणतात त्याप्रमाणे शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र हे शब्द वास्तवात आणता येतील. 


       अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

  1. इलेक्शन कमिशन, वोट चोरी वर सुद्धा लिहून पत्रकारितेचा विश्वास कायम ठेवावा.
    किशोर राऊत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.