सहज सुचलं म्हणून अवहेलना थांबवण्यासाठी हे व्हायलाच हवे..

 सहज सुचलं म्हणून

 अवहेलना थांबवण्यासाठी हे व्हायलाच हवे..




विधान भवनात काल आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जी हाणामारी झाली तिचे कोणीच समर्थन करणार नाही. आतापर्यंत सभागृहात हाणामारी झाली. मात्र काही वेळा ती आमदारा- आमदारांमध्येच होती. तर काही वेळा आमदारांनी इतर कुणाला तरी झोडपले होते. इथे मात्र आमदार नसणारे कार्यकर्ते आत मध्ये येतात आणि विधान भवनाच्या इमारतीत राडे करतात. हा प्रकार खरोखरीच चिंता करण्याजोगाच आहे. 

एक पत्रकार म्हणून मी जवळजवळ गेली ३५ वर्ष विधिमंडळात वृत्त संकलन करीत आहे. आधी म्हटल्यानुसार एकदा विधान परिषदेत एका विरोधी आमदाराने सभापतींच्या आसना समोरील संविधानाची प्रत पळवण्याचा प्रयत्न केला म्हणून एका मंत्र्याने त्याला ठोकले होते. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाल्याच्या संतापात शिवसेना आमदारांनी सभागृहात अध्यक्षांच्या आसना सकट व्यासपीठाचीही तोडफोड केली होती. प्रेक्षक गॅलरीतून एका अभ्यागताने सभागृहात उडी मारली म्हणून काही सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी त्याला ठोकले होते. तर मराठीत शपथ घेत नाही म्हटल्यामुळे समाजवादी पक्षाच्या आमदाराला मनसेच्या आमदारांनी मुस्कटात हाणली होती. आपल्याला रस्त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने अडवले म्हणून विधानभवनात तो दिसताच त्याला तिथे ठोकण्याचा प्रकारही मी बघितला आहे. मात्र इथे मारणारे आमदारच होते. काल मात्र सभागृहाचे सदस्य नसणारे कार्यकर्तेच परस्परांमध्ये भिडले आणि विधान भवनाचे रूपांतर  रणांगणात झालेले दिसले होते.

वस्तुतः अधिवेशन सुरू असताना विधान भवनात मंत्री आमदार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच वृत्त संकलन करणारे अधिकृत पत्रकार यांच्याशिवाय इतर कोणी यावे यासाठी नियम आहेत. या अधिकृत व्यक्तींशिवाय कोणालाही अभ्यागत म्हणून आत यायचे असेल तर कोणीतरी आमदाराचे शिफारस पत्र त्याला घ्यावे लागते. प्रत्येक आमदाराने एकावेळी किती सदस्यांना प्रवेश द्यावा याबाबतही काही नियम आहेत. मात्र ते पाळले जातात असे दिसत नाही. त्यामुळे अधिवेशन मग ते नागपूरचे असो किंवा मुंबईचे तिथे अभ्यागतांची प्रचंड गर्दी झालेली दिसते. कित्येकदा त्या गर्दीतून मंत्री किंवा अधिकाऱ्यांना वाट काढणे देखील कठीण होते अशी परिस्थिती दिसते. काही वर्षांपूर्वी माझ्या आठवणीप्रमाणे बाबासाहेब कुपेकर विधानसभेचे अध्यक्ष असताना विधान भवनातील या गर्दीचा प्रश्न चर्चेला आला होता.अभ्यागतांची अवास्तव गर्दी झाल्यामुळे विधान भवनात असलेल्या दोन्ही तिन्ही उपाहारगृहातील अन्नासाठा संपुष्टात येऊन आमदारांसाठीच काही उरत नाही अशा प्रकारची एक तक्रार अध्यक्षांकडे गेली होती. त्यावेळी कुपेकरांनी त्यावर रोख लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा ती गर्दी तशीच वाढती आहे. कित्येकदा तर आमदार मंडळी आपल्याजवळ आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे रीतसर पासेस न घेताच त्यांना  विधान भवन परिसरात सोडण्याचा आग्रह धरतात. काही वेळा सुरक्षारक्षकांचाही नाइलाज होतो. कित्येकदा विधान भवनातील अधिकाऱ्यांशी असलेले संबंध वापरून अनेक अभ्यागत आत शिरत असतात. विधान भवनात अधिवेशन सुरू असताना मंत्री आमदार आणि अधिकारी एकत्रितपणे भेटतात. त्यामुळे अनेक हितसंबंधीयांना आपली कामे सलटवून घ्यायची असतात. त्यासाठी कसेही करून त्यांना विधान भवन परिसरात शिरायचे असते. मग त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेतील छिद्रे शोधून किंवा त्यांचे वीक पॉईंट्स शोधून प्रसंगी किंमत मोजून लोक विधानभवनात प्रवेश घेतात. हे बघता विधानभवनात येण्यासाठी प्रवेशिकांचा देखील काळाबाजार होतो का अशी शंका घेण्यास वाव आहे. हे जर खरे असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. काल झालेल्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात त्यावर भाष्य केले. त्यावेळी यानंतर कोणत्याही  अभ्यागताला सभागृहात प्रवेश देऊ नये असे आदेश त्यांनी काढले आहेत. मात्र लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. 

अभ्यागत तर जाऊ द्या पण सभागृहात किंवा विधानभवनात वृत्त संकलन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांची देखील किती गर्दी होते याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. अधिवेशनाचे वृत्त सर्व दूर जायला हवे. त्याबद्दल कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. मात्र कित्येकदा अस्तित्वातच नसलेल्या किंवा अस्तित्वात असले तरी कधीतरी  वर्ष सहा महिन्यांनी एकदा प्रकाशित होणाऱ्या एखाद्या वृत्तपत्राच्या नावावर विधानभवनात प्रवेश घेणारेही अनेक हौसे गवसे नवसे पत्रकार दिसतात. वस्तूतः अधिवेशनात वृत्त संकलन केल्यावर ते वृत्त प्रकाशित झाले किंवा नाही याची कात्रणे संबंधित यंत्रणेकडे सोपवले जाणे गरजेचे असते. मात्र हे कधीच तपासले जात नाही. आणि अक्षरशः शेकड्याने पत्रकार  असल्याची  झूल पांघरून अनेक लोक विधान भवन परिसरात अधिवेशन काळात फिरत असतात. काही वर्षांपासून हिवाळी अधिवेशनात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वतीने वृत्त संकलन करणाऱ्या नागपूर आणि मुंबईच्या पत्रकारांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जात होती. तिथे वृत्त संकलन न करणारे पत्रकारच गोळा होऊ लागल्याने शेवटी पत्रकारांनाही भोजनाचे पासेस देण्याची वेळ आली होती. यावरून किती  निरर्थक गर्दी गोळा होत असेल याची कल्पना यावी.

आज समाजात अनेकांचे व्यक्तिगत प्रश्न असतात तर अनेकांचे सामाजिक प्रश्न देखील असतात. ते सोडवून घेण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन ही त्यांना योग्य जागा वाटते. कारण तिथे परिचित आमदार संबंधित मंत्री आणि अधिकारी हे एकत्र भेटू शकतात. त्यामुळे जनसामान्यांना तिथे येऊन आपल्या समस्या सोडवून घेण्याची धडपड करावीशी वाटते. ही बाब लक्षात घेत अधिवेशन काळात प्रवेश देताना तावून-सुलाखून तपासूनच प्रवेश दिला जावा. कोणीही कार्यकर्ता आहे म्हणून त्याला प्रवेश दिला जाऊ नये. म्हणजे असे राडे टाळता येतील. 

विधान भवन परिसरात हाणामारी  मग ती आमदारांची असो किंवा कार्यकर्त्यांची ती चुकीचीच आहे. आमदारांनी असे वर्तन करू नये यासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्याबद्दल विचार केला जाईल असे आज अध्यक्षांनी घोषित केले आहे. त्याचबरोबर विधान भवन परिसरात येणाऱ्या अभ्यागाथांबाबतही विशेष काळजी घेतली गेली तर असे प्रकार थांबतील आणि लोकशाहीची होणारी अवहेलनाही कुठेतरी थांबेल इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते. 


अविनाश पाठक , नागपूर.

 दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.