पटतेय का बघा.... पार्किंग समस्येवर तातडीने तोडगा काढायलाच हवा.
पटतेय का बघा....
पार्किंग समस्येवर तातडीने तोडगा काढायलाच हवा.
दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पार्किंगच्या वादावरून तलवारी निघाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली. रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेवर वाहन पार्क केले म्हणून तिथे फुटपाथवर धंदा करणाऱ्यांनी वाहनचालकावर तलवार उभारली होती. विशेष म्हणजे पार्किंग करू नको म्हणून तलवार उभारणारे तिथल्याच एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात होते.
सध्या हा प्रकार फक्त ठाण्यातच नाही तर सर्वत्र सुरू असल्याचे कानावर येत आहे. नुकताच म्हणजे ११ जुलै रोजी नागपुरातही एक असाच प्रकार घडला. त्यात मर्चंट नेव्हीत इंजिनियर असलेल्या एका तरुणाला आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत असे सांगणाऱ्या दोन वकिलांनी दांडुक्याने मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा डोळा तर फुटलाच, पण डोक्यालाही इजा झाली होती.
११ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडवर चौधरी लाईफ स्टाईल या मॉलच्या बाजूला मोकळ्या जागेत सौरभ सुरंगळीकर नामक मर्चंट नेव्हीतील तरुण इंजिनियर आपली कार पार्क करायला गेला. त्यावेळी बाजूलाच वकिलाचे कार्यालय असलेल्या कार्यालयातून अमित भोयर आणि तुषार घागरे हे दोन वकील आणि त्यांचे काही सहकारी समोर आले, आणि सौरभला कार पार्क का केली म्हणून वाद घालायला सुरुवात केली. ही मोकळी जागा आहे त्यामुळे इथे पार्किंग करता येईल असे सौरभने सांगताच त्या वकिलांच्या सोबतच्या एका माणसाने सौरभ ला पकडले आणि दुसऱ्याने त्याच्या डोक्यावर दांडुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटून सौरभ चौधरी लाईफ स्टाईल मध्ये पळाला आणि तिथून त्याने पोलिसांना फोन केला. तसेच आपल्या मित्रांनाही फोन केला. तिथे पोलीस आल्यावर या दोन वकिलांनी उलटा चोर कोतवाल को डाटे या न्यायाने सौरभविरुद्धच तक्रार करायला सुरुवात केली सौरभच्या मित्राने त्याला आधी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. सौरभची तक्रार असतानाही या प्रकरणात पोलीस घटनास्थळी येऊनही गुन्हा मात्र तब्बल तीन दिवसांनी नोंदवला गेला. सदर प्रकरणातील आरोपी असणारे दोनही वकील नंतर फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाही दरम्यानच्या काळात त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. आता ते दोन्ही वकील राजकीय दबाव आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
पार्किंग वरून भांडणे होणे आणि प्रकरण हात घाई वर येणे हा आता नित्याचा प्रकार झाला आहे. गेल्या पन्नास वर्षात देशात दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पूर्वी एका गल्लीत एखादी दुचाकी दिसायची. बाकी सर्व सायकलनेच फिरायचे. चार चाकी तर एखाद्या वस्तीत असली तर असायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे प्रत्येक घरात किमान दोन तरी दुचाकी वाहने झालेली आहेत. त्याशिवाय उच्च मध्यमवर्गीयांकडे कार असणे हा स्टेटस सिम्बॉल राहिला नाही, तर ती गरज झाली आहे.
मात्र या वाहनांच्या पार्किंगची योग्य अशी सोय कुठेच झालेली नाही. नागपुरात मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. नगर रचना विभागाच्या नियमानुसार प्रत्येक इमारतीत तळमजल्यावर पुरेशी पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तशी पार्किंगची व्यवस्था केली जाते. मात्र अनेक ठिकाणी तिचा व्यावसायिक दुरुपयोग होत असतो. काही ठिकाणी पार्किंग दिलेले असते. मात्र तिथे फक्त इमारतीतील रहिवाशांसाठीच पार्किंगची व्यवस्था केलेली असते. इमारतीत राहणाऱ्यांकडे कोणी अभ्यागत आले तर त्यांना आपली वाहने रस्त्यावरच ठेवावी लागतात. मग रस्त्यावर वाहने ठेवण्यावरून अशी भांडणे होतात.
प्रत्येक इमारत व्यावसायिक असो, की निवासी असो, तिथे समोर काही जागा मोकळी ठेवणे गरजेचे असते. तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहने उभी केली जाऊ शकतात. मात्र आज अशा जागांवर बेकायदेशीर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत, आणि तेच अशी दादागिरी करतात. वस्तूतः त्यांचे दुकान हे अवैधच असते. मात्र त्याच्यासमोर कोणी वाहन लावले तर ते हमरी तुमरीवर येतात. अशा व्यावसायिकांची चार माणसेही तिथे उभी असतात. वाहन पार्क करणारा मात्र एकटाच असतो. मग भीक नको पण कुत्रा आवर म्हणून पार्किंग करणारा दुसरीकडे कुठेतरी वाहन नेऊन ठेवतो. रामदास पेठेत सेंटर पॉईंट हॉटेल समोर कार पार्क करता येत नाही. ती कार मागे दगडी पार्कपाशी नेऊन ठेवावी लागते. मग तिथून तुम्हाला पायी यावे लागते. हा प्रकार गैरसोयीचाच नाही काय?
त्यातही रस्त्यावर कुठे मोकळी जागा पाहून वाहन पार्क केलेच, तर तितक्यात हवालदार येऊन चलान फाडून जातो किंवा मग पोलिसांचे वाहन येऊन तुमची स्कूटर उचलून जाते, किंवा कारला फरफटत घेऊन जाते. त्यात वाहनांचे तर नुकसान होतेच पण पोलीस दंडही वसूल करतात. आता नागपूर पोलिसांनी अशी वाहने उचलण्याचा ठेका खाजगी व्यक्तींना दिला आहे. त्यामुळे बरेचदा चुकीचे पार्किंग न केलेली वाहनेही ते लोक उचलून देतात. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे मग वाहन चालक निमुटपणे पाघशे हजार रुपयांचा भुर्दंड सोसून घरी जात असतो.
या सर्व प्रकारामुळे जन असंतोष वाढणार आहे याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी. आज पार्किंगच्या भांडणामुळे एका सौरभ सुरंगळीकरला इजा झाली. अशी अनेकांना होत असेल. लोक किती काळ सहन करणार? एखादा दिवस या असंतोषाचा भडका उडेल आणि ती आग विझवणे कठीण जाईल याची जाणीव राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने ठेवायलाच हवी.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment