दिनविशेष. नाग देवता पूजन आणि मंगळागौर पूजन.
दिनविशेष.
नाग देवता पूजन आणि मंगळागौर पूजन
आज श्रावणातील असा दिवस ज्याची वाट सर्वजण बघतात. आज नवविवाहितां पहिल्या मंगळागौर पूजनासाठी आतुर आहेत. तर आजच श्रावणातील पहिला मोठा सण नागपंचमी पण आहे. हा योग येणे हे भाग्यच.
भारतीय संस्कृतीच्या चालीरीती.. रुढी.. परंपरांचा उद्देश कुटुंबात.. समाजात एकोपा नांदावा हा आहे. आपल्या संस्कृतीत वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो तो विधीवत लग्नाने. लग्नानंतर या नवदांपत्यांचे जीवन सुखी.. समृद्ध.. आनंदी व्हावे म्हणून सणासोबत आदर्शासाठी कथांचा आधार घेतला गेलाय.
संसारातील असेच प्रेमळ आदर्श जोडपे म्हणजे शंकर पार्वती. प्रेमाची परीक्षा होते ती कष्ट.. त्याग, तपश्चर्येत. याच उमाशंकराचे प्रेम नवदांपत्याला प्राप्त व्हावे म्हणून आहे हे मंगळागौर पूजन.
नवविवाहिता पतीला हृदयाच्या देव्हाऱ्यात ठेवून प्राणज्योतींनी मी आरती करीन असं म्हणत.. त्यासाठी मला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आशिर्वाद देण्याचं साकडे या मंगळागौर पूजेत देवीला घालणार.
'वसुधैव कुटुम्बकम्' हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र. आमचे चराचरा विषयीचे प्रेम.. हे बुद्धीवादी, दृष्टिकोन हा पर्यावरण पूरक आहे. सृष्टीत प्रत्येक जीवाचे जीवन हे महत्त्वाचे. प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार आहे.
ही सृष्टी येथील प्रत्येक जीवाच्या अस्तित्वामुळेच सुरक्षित आहे. सृष्टी सुरक्षित तरच मानवी जीवन सुरक्षित. सृष्टीतील प्रत्येक जीवाविषयी प्रेम वाढावे म्हणून त्याला धार्मिक भावनेची जोड देण्यात आली. यामुळेच देशात हजारो वर्षे आदर्श निसर्ग संवर्धन.. संगोपन सुरू आहे.
सृष्टीत लाखो जीव जगतात. चौऱ्यांशी लक्ष् योनींतून जन्म मरणाचा प्रत्येक मानवाचा प्रवास होतो ही आमच्या संस्कृतीची धारणा. या प्रत्येक जीवात परमात्मा आहे हे आम्ही मानतो. समोरच्या प्रत्येक जीवाला तसा सन्मान देतो. पशु.. पक्षी.. प्राणी यांचे पूजनही करतो. आज होणार नागदेवतेची पूजा.
ज्या नागदेवतेवर बसून प्रत्यक्ष परमात्मा पुरुषोत्तम विश्रांती घेतोय, त्या नागदेवाला आज दुध-लाह्या देत नमन करायचे. पूजा साहित्यासह नागदेवतेच्या घरी.. वारुळाजवळ जायचे. या देवतेजवळ मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची विनंती करायची. धन्याला उदंड आयुष्याची मागणी करायची. नागदेवतेला अपायकारक ठरु शकणाऱ्या सर्व वस्तूचा वापर आज टाळायचा.
सृष्टीतील सगळेच जीव वाचले, तरच मानवी जीवन सुखी होईल. नाग हा तर मानवाचा मित्र. नागाचे संरक्षण व्हावे.. त्याला इजा पोहोचू नये, कुणी मुद्दाम त्याच्या वाटेला जात त्रास देवू नये म्हणून आज मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. साप नाग पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देत त्यांचे संरक्षण करणाऱ्या सर्पमित्राची संख्या प्रत्येक गावात वाढतेय. स्थानिक प्रशासन त्यांचे फोन नंबर जनतेला उपलब्ध करून देत आहे. त्यांच्या या सेवेचा सन्मान होत आहे.
नागपंचमी आनंदाची. या सणाला सासुरवाशिणी माहेरी येतात.. मैत्रिणींसह झोपाळ्यावर झुलत स्वच्छंदपणे पारंपरिक आनंदी गाणी गातात. घरोघरी उकडीच्या पदार्थांच्या नैवेद्यासह हा सण साजरा केला जाणार.
1️⃣
*चल गं सये वारुळाला,*
*वारुळाला, वारुळाला ग*
*नागोबाला पूजायला,*
*पूजायला, पूजायला ग*
*नागोबाचे अंथरूण*
*निजले वरी नारायण*
*साती फडा उभारुन*
*धरती धरा सावरुन*
*दूध लाह्या वाहू त्याला,*
*वाहू त्याला, नागोबाला*
*बारा घरच्या बारा जणी,*
*बारा जणी, बारा जणी*
*रूपवंती, कुंवारिणी, कुंवारिणी*
*नागोबाची पूजू फणी,*
*कुंकवाचा मागू धनी*
*राजपद मागू त्याला,*
*मागू त्याला, नागोबाला*
*बाळपण त्याला वाहू,*
*त्याला वाहू, त्याला वाहू ग*
*नागिणीचा रंग घेऊ,*
*रंग घेऊ, रंग घेऊ ग*
*नागोबाला फुलं वाहू,*
*लालमणी माथी लेवू ग*
*औक्ष मागू कुंकवाला,*
*कुंकवाला, बाई कुंकवाला*
2️⃣
*जय देवी मंगळागौरी*
*सुवासीन मी तुला पुजिते ॥धृ॥*
*कुंकुम तिलक माझ्या ललाटी*
*मंगल मणी हे शोभत कंठी*
*रत्न पाचूचा चुडा मनगटी*
*स्त्रीजन्माचे अहीव लेणे*
*तुझ्या कृपेने मला लाभते*
*जय देवी मंगळागौरी*
*सुवासिन मी तुला पुजिते ॥१॥*
*शीवशंकराहुनी प्रेमळ भोळा*
*दिधलासी पती तू भाग्यवतीला*
*देहाच्या देव्हारी पूजीन त्याला*
*हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती*
*अमृत तेजाळ प्रीत जळते*
*जय देवी मंगळागौरी*
*सुवासिन मी तुला पुजिते ॥२॥*
*२९.०७.२०२५*
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment