सहज सुचलं म्हणून... शाळांसमोर तंबाखू गुटखा सिगारेट विकण्यावर बंदी घालायलाच हवी.

 सहज सुचलं म्हणून...

शाळांसमोर तंबाखू गुटखा सिगारेट विकण्यावर बंदी घालायलाच हवी.



आज वृत्तपत्रांमध्ये एक बातमी वाचण्यात आली. सध्या शाळांसमोर तंबाखू, सिगारेट, गुटखा असे अपायकारक पदार्थ विकण्याचे स्टॉल्स लागले असून शाळेतील विद्यार्थी देखील तिथे मोठ्या प्रमाणात उपभोग घेत आहेत. त्याला जोडूनच आज एका वृत्तवाहिनीवर विधानसभेत एका आमदाराने शाळांसमोर गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असून अन्न आणि औषधी प्रशासन विभाग त्यावर कारवाई करत नसल्याची तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले. ही बाब अतिशय चिंताजनकच म्हणावी लागेल. 

वस्तुतः तंबाखू तपकीर सिगारेट, बिडी, गुटखा हे सर्व पदार्थ हे प्रकृतीला  अपायकारकच आहेत. शाळकरी मुलेच काय पण मोठ्या माणसांना देखील यामुळे आजार होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही वयात ही व्यसने करणे चुकीचेच आहे. ते जीवावर बेतू शकते. आज तंबाखू, सिगारेट, गुटखा यांच्या अतिरेकी सेवनामुळे अनेकांना कर्करोग आणि तत्सम आजार देखील झालेले आहेत. त्यामुळे अनेकांना अकाली मृत्यू देखील आलेले आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या एका राजकारणी व्यक्तीला सुमारे २१ वर्षांपूर्वी जबड्याचा कर्करोग झाला म्हणून त्याच्या जबड्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यापूर्वी सदर राजकारणी हा तंबाखू मिश्रित पान नियमितपणे खात असे. याला अनेक साक्षीदार आहेत. सुदैवाने ही राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती असल्यामुळे त्या व्यक्तीला वेळीच चांगले उपचार मिळाले, आणि थोडक्यात निभावले. बाकी सामान्य व्यक्तीला इतके प्रगत उपचार मिळू शकत नाहीत, आणि ते जीव देखील वाचवू शकत नाहीत. 

पूर्वी शाळांमध्ये मुलांना अशी वाईट व्यसने करणे कसे जीवावर भेटते याचे शिक्षण दिले जात असे. शाळांमध्ये किंवा शाळांच्या समोर कोणी अशा प्रकारे स्टॉल्स किंवा पान ठेले लावले तर त्याला देखील शाळा व्यवस्थापन आक्षेप घेत असे. मला आठवते मी शाळेत शिकत असताना आमच्या शाळेत स्विमिंग पूल होता. त्या स्विमिंग पूलवर नागपुरातीलच एका क्रीडा संघटनेने राज्यस्तरीय पोहण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला एका प्रसिद्ध सिगारेट कंपनीचे प्रायोजकत्व होते. त्यामुळे त्या कंपनीने स्विमिंग पूलच्या चारही बाजूने आपल्या सिगारेटची जाहिरात करणारे बॅनर्स लावले. त्यावेळी शाळेच्या प्राचार्यांनी आक्षेप घेत ते बॅनर्स काढायला लावले. ही स्पर्धा माझ्या शाळेचे  विद्यार्थी बघणार, त्यांच्यावर काय संस्कार होतील, असे सांगून प्राचार्यांनी त्या आयोजकांनाही दम भरला होता. 

त्या काळात शिक्षक देखील बऱ्यापैकी तत्त्वनिष्ठ होते. ते स्वतः कदाचित व्यसने करत असतीलही. पण आपली व्यसने विद्यार्थ्यांपासून ते दूर ठेवत होते. तोच प्रकार कुटुंबातही होता. वडील आपल्या व्यसनामुळे मुलांवर वाईट संस्कार होणार नाहीत याची काळजी घेत असत. 

आज मात्र परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. आज शिक्षक होऊ बघणारे विद्यार्थी महाविद्यालयात असताना पासूनच सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा व्यसनांच्या आहारी गेलेले असतात. मग शिक्षक झाल्यावर देखील त्यांची ती व्यसने सुटत नाहीत. असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार? शाळेसमोर हे पदार्थ सिगारेट तंबाखू गुटखा विकण्याचे जे स्टॉल्स लागलेले असतात, तिथे शिक्षक जाऊन जर सिगारेट, गुटखा घेणार असतील, आणि पानाच्या ठेल्यावर जाऊन तंबाखूचे पान खात शाळेत येणार असतील, तर ते मुलांवर काय संस्कार करणार? आणि "मुलांनो ही व्यसने वाईटच" असे कोणत्या नैतिक अधिकारात ते सांगणार? शाळेच्या समोर किंवा शाळेच्या परिसरात असे स्टॉल्स लावण्याची परवानगी देणारे प्राचार्य किंवा संस्थाचालक हे तरी कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात? ते देखील अनेकदा व्यसनाधीनच असतात. दिवसभर शाळेत शिकवणारे शिक्षक संध्याकाळी एखाद्या बार मधून झिंगत बाहेर पडलेले जेव्हा विद्यार्थी बघतात, तेव्हा अशा शिक्षकांचे उपदेशाचे डोस किती पचवायचे याचाही विचार विद्यार्थी करणारच. 

त्यामुळेच आज शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना देखील तंबाखू, गुटखा, सिगारेट अशी व्यसने लागलेली दिसतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर हे प्रमाण अधिकच वाढलेले दिसते. त्यात मुलेच काय पण मुली देखील आजकाल बाईकला टेकून उभ्या राहत हातात जळती सिगारेट घेऊन कश मारताना दिसतात. त्याही पुढे जाऊन आज महानगरांमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये ड्रग्स सुद्धा उपलब्ध केले जातात अशी माहिती आहे. आजची तरुणाई त्यामुळेच ड्रग्जच्या सुद्धा आहारी चाललेली आहे. ड्रग्सचे व्यसन तर तरुणाईला आयुष्यातूनच उठवत असते. त्यामुळे आजची ही तरुण पिढी जास्तीत जास्त व्यसनाधीन होते आहे, आणि त्याचा परिणाम या पिढीच्या आरोग्यावर देखील विपरीत असा होणार आहे हे नक्की. 

मुलांवर शिक्षक आणि पालक हेच संस्कार करत असतात. आज शिक्षक आणि पालक हेच अनेक कुटुंबात व्यसनाधीन दिसतात. त्यामुळे  खरी गरज संपूर्ण समाजात सामाजिक प्रबोधन केले जाण्याचीच आहे.

हे सामाजिक प्रबोधन व्हायचे तेव्हा होईलच. पण तोवर शाळेच्या आवारात किंवा शाळेसमोर तंबाखू सिगारेट, बिडी, गुटखा यांचे स्टॉल्स लावण्याची परवानगी देणे सर्वप्रथम बंद व्हायला हवे. आज असे स्टॉल्स लागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे. हे प्रकार कायद्याने बंद व्हायला हवे, आणि त्याचे कसोशीने पालन व्हायला हवे. त्यासाठी कायद्यात कोणतीही पळवाट असायला नको. मला आठवते पूर्वी शैक्षणिक संस्थांपासून  ५०० मीटर पासून अलीकडे दारूची दुकाने किंवा बार्स असू नयेत असा कायदा होता. त्यावेळी हे पाचशे मीटर कुठून मोजावे आणि ते रस्त्याचे अंतर मोजावे की हवाई अंतर मोजावे असे मुद्दे उपस्थित करून त्यातून पळवाटा  शोधल्या जात होत्या. या विषयांवर विधिमंडळात देखील गरमागरम चर्चा झाली होती. मग सरकारने त्यावेळी कायदा बदलण्याचे आश्वासन देखील दिले होते. अर्थात पुढे काय झाले ते माहित नाही.

उद्याचा भारत हा सक्षम सुदृढ आणि निरोगी घडवायचा असेल तर त्याची मुहूर्तमेढ आजच रोवली जायला हवी. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करून असे प्रकार थांबवायला हवेत. तरच उद्याचा सुदृढ निरोगी भारत निर्माण होऊ शकेल. 

अविनाश पाठक , नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.