घ्या समजून राजेहो... भगवद्गीतेबाबत सुरेश द्वादशिवारांचा दावा आणि वास्तव.
घ्या समजून राजेहो...
भगवद्गीतेबाबत सुरेश द्वादशिवारांचा दावा आणि वास्तव
वेगवेगळ्या अभ्यासकांनी काळानुसार गीता महात्म्य सांगितले असले तरी मूळ महाभारतात आणि विष्णुपुराणात भगवद्गीतेबाबत एकही ओळ नाही असा दावा ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी "श्रीमद् भगवद्गीता, एक चिकित्सा" या विषयावर व्याख्यान देताना केला आहे.
कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धामधुमीत इतकी मोठी १८ अध्यायांची भगवद्गीता अर्जुनाला सांगणे श्रीकृष्णाला शक्य झाले नसते. मूळ महाभारतापासून उपनिषदे तसेच वेदांमध्येही गीतेचा उल्लेख नाही. सध्या वापरात असलेली ही गीता आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यासाठी निवडलेल्या श्लोकांची आहे. ती महाभारताचे युद्ध झाल्यानंतर ३१०० वर्षांनी लिहिलेली आहे. त्यामुळे गीतेचा कालावधी हा सातव्या शतकाच्या मागे नेता येत नाही, असेही प्रतिपादन द्वादशीवार यांनी यावेळी केलेले आहे.
जे लोक समाजाची निष्काम सेवा करतात त्यांनाच लोक ईश्वर मानतात. श्रीकृष्ण हा त्यांच्यापैकी एक आहे असे पाणिनीने म्हटले आहे. म्हणजेच इसवी सनाच्या ८०० वर्षांपूर्वी श्रीकृष्ण हा माणूस होता हे पाणीनीला माहीत होते. त्याच्या अष्टाध्यायीतही गीतेचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या पाचशे वर्षांपूर्वीही तो नव्हता. इसवीसनाच्या पाचव्या शतकामध्ये सुप्त काळात कोणीतरी विद्वानाने लिहून गीतेचा समावेश महाभारतात केला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, असा ठोस दावाही त्यांनी या व्याख्यानात केला आहे.
द्वादशिवारांचे हे प्रतिपादन निश्चितच एका नव्या वादाला तोंड फोडणारे ठरणार आहे, यात शंका नाही. कारण भगवद्गीता हा हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ म्हणून मानला जातो. हजारो वर्षांपासून जनसामान्यांची या ग्रंथावर श्रद्धा आहे. या ग्रंथावर अभ्यास करून आजवर अनेकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, आणि त्यावर विद्वानांच्या चर्चा देखील झाल्या आहेत. गीतेचे महत्व जाणूनच मूळ संस्कृत मध्ये असलेला हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांना अभ्यासता यावा म्हणून प्राकृतात उपलब्ध केला आहे. आज विसाव्या शतकात सर्वोदयी संत विनोबा भावेंनी देखील गीताई रचून जनसामान्यांना ती उपलब्ध करून दिली आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेचा अभ्यास करून गीतारहस्य हा ग्रंथ जनसामान्यांसाठी उपलब्ध केला आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या ग्रंथाचा अभ्यास करून दैनंदिन जीवनात गीतेतील तत्त्वाप्रमाणेच आचरणही केले होते. हे बघता भगवद्गीतेचे अनन्य साधारण महत्त्व नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे गीता ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात सांगितली होती हाच जनसामान्यांचा समज आहे, नव्हे ती श्रद्धा आहे, आणि महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत या ग्रंथातच ही गीता नमूद केलेली आहे अशीही श्रद्धा आहे. त्यामुळे द्वादशीवारांचे हे प्रतिपादन जनसामान्यांच्या श्रद्धेला कुठेतरी धक्का देणारे ठरणार आहे हे निश्चित.
इथे वाचकांना एक बाब मला स्पष्ट करायची आहे, की मी प्राचीन वेदविद्या, महाभारत, भागवत, गीता, पुराण इत्यादींचा अभ्यासक नाही. त्यामुळे या मुद्द्यावर अधिकारवाणीने बोलणे मला शक्य नाही. प्रा. द्वादशीवारांबाबत माझ्या मनात नितांत आदर आहे. एक पत्रकार आणि साहित्यिक म्हणून त्यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन देखील मिळाले आहे. माझ्या एका पुस्तकाला त्यांची प्रस्तावना देखील आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिपादन खोडत त्यांचा अवमान करण्याचा माझा हेतू निश्चितच नाही. मात्र काही जाणकारांशी चर्चा केल्यावर नेमके वास्तव काय असू शकेल यावर सकस चर्चा व्हावी, आणि दुसरी बाजू देखील जनसामान्यांसमोर यावी या हेतूनेच मी माझी मते मांडत आहे.
भगवान श्रीकृष्ण हा ईश्वर होता का, याचे उत्तर नाही असेच मिळते. कारण सर्वच ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख ईश्वरी अवतार असाच केलेला आहे. म्हणजेच श्रीकृष्ण हा मुळात माणूस होता. मात्र त्याच्यातील सद्गुणांमुळे आणि दैवी शक्तीमुळे तो ईश्वरी अवतार मानला गेला. हाच प्रकार रामायणातील प्रभू रामचंद्राबाबतही आहे. प्रभू राम हा देखील ईश्वर नसून ईश्वरी अवतारच मानला गेला आहे. त्यामुळे कृष्ण हा जरी ईश्वर नव्हता तरी त्याच्यातील गुणांमुळे आणि शक्तीमुळे त्याला जनसामान्यांनी त्याला ईश्वर मानले आणि त्यातूनच त्याने भागवत गीता सांगितली हा निष्कर्ष नाकारता येत नाही.
द्वादशीवार म्हणतात त्याप्रमाणे मूळ महाभारतात भगवद्गीता नाही. मात्र जाणकारांच्या मते व्यासांच्या महाभारतातील भीष्म पर्वात भगवद्गीता नमूद आहे. त्यानंतर द्वादशीवारांनी असेही म्हटले आहे की कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धामधुमीत श्रीकृष्णाला अर्जुनाला गीता सांगायला वेळ तरी कुठे झाला असावा? जाणकारांच्या मते यालाही उत्तर आहे. ज्यावेळी महाभारतातील हे युद्ध झाले ते धर्मयुद्ध म्हणून लढले गेले होते. त्यावेळी युद्धासाठी रणभूमीत दोन्ही बाजूचे सैन्य येऊन उभे ठाकले तरी जोवर दोन्ही बाजूचे सेनापती शंखनाद करणार नाहीत तोवर युद्धाला सुरुवात केली जात नसे, आणि समोरची बाजू जोवर सज्ज दिसत आहे तोवर दुसऱ्या बाजूचा सेनापती शंखानात करीत नसे. आणि महाभारतात नमूद केल्याप्रमाणे त्या रणभूमीवर जमा झालेल्या एकत्रित केलेल्या सैन्याची संख्या इतकी विशाल होती की तिचे नियोजन करणे हे देखील एक स्वतंत्र काम होते. त्यासाठी देखील वेळ जात होता.
ज्यावेळी अर्जुनाचा रथ रणभूमीवर आला आणि त्याने समोर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य असे सर्व गुरूतुल्य व्यक्तिमत्व उभे पाहिले, त्यावेळी तो मानसिक दृष्ट्या कुठेतरी गडबडला, आणि त्याचे मन कच खाऊ लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. आज गीतेचे १८ अध्याय ज्याला मुखोद्गत आहेत, त्याने सलग अठरा अध्याय म्हटले तर त्याला सव्वा ते दीड तासाच्या वर वेळ लागत नाही. रणभूमीवर सैन्याचे नियोजन व्हायला इतका वेळ जरूर लागत असणार. त्या वेळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा उपदेश करून त्याचे मनोधैर्य वाढवले असू शकते. कदाचित तो उपदेश हा पद्यात नसेलही. श्रीकृष्णाने गद्यातच समजावले असेल. नंतर व्यासांनी महाभारत लिहिताना त्या उपदेशाचे श्लोकांमध्ये रूपांतर केलेले असू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही असाही दावा काही तज्ञांनी बोलताना केला आहे.
एका जाणकाराकडून अशीही माहिती मिळाली की आधी हा ग्रंथ जय इतिहास या नावाने प्रसारित झाला होता. भारतात मुद्रण कला आल्यावर जय इतिहास या नावानेच आधी महाभारत हा ग्रंथ छापला गेला होता. आणि आजही त्या काळातील प्रति उपलब्ध आहेत. त्यात देखील भगवद्गीतेचा उल्लेख असल्याची माहिती मिळते.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेता भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारतातील युद्धाच्या वेळी अर्जुन भांबावलेल्या अवस्थेत असताना केलेला उपदेशच आहे असा निष्कर्ष काढता येतो. आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीता पहिल्यांदा प्रकाशात आणली असा दावा काही अभ्यासक करतात. हा दावा खरा मानला तर भगवद्गीता आधी अस्तित्वात होती म्हणूनच शंकराचार्य ती प्रकाशात आणू शकले हे वास्तवही मान्य करावेच लागते. अर्थात तरीही बुद्धिभेद करण्यासाठी असे वेगवेगळे दावे केले जातात.
असे दावे करून सश्रद्ध हिंदूंना विचलित करणे हा आपल्या देशातील सर्वच कथित पुरोगामी मंडळींचा आवडता छंद आहे. द्वादशीवार सर हे देखील अशाच पुरोगामी मंडळींपैकी एक आहेत. त्यांचा आजवरचा व्यासंग कुठेतरी डावीकडे झुकलेला आहे असे जाणवते. आज या देशात हिंदूंची असंख्य श्रद्धास्थाने आहेत. असंख्य श्रद्धा ग्रंथ सुद्धा आहेत. मात्र त्या संदर्भात वाद निर्माण करणे आणि जनसामान्यांची बुद्धि भ्रमित करणे हेच यांचे उद्योग असतात. अयोध्येत राममंदिराचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा देखील राम हे काल्पनिक पात्र आहे आणि अयोध्येत राम मंदिर नव्हतेच असाच दावा करण्यात आला होता. त्याचवेळी दक्षिणेतील रामसेतूच्या बाबतही असाच वाद निर्माण करण्यात आला होता. अजूनही असे वेगवेगळे वाद निर्माण करून हिंदूंच्या श्रद्धांना धक्का पोहोचवण्याचा उद्योग केला जातो. असे प्रकार गत चाळीस-पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेगावचे श्री संत गजानन महाराज हे देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गजानन महाराज हे अवतार घेण्यापूर्वी स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे होते असा दावा एका इतिहास संशोधकाने केला होता. अर्थात त्याचा काहीही फायदा झाला नाही. आज देखील शेगावला सर्व भक्त मंडळी तितक्याच मोठ्या संख्येने जातात. त्याचबरोबर तात्या टोपे यांचे नाव घेतल्यावर प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमीचे मान आदरानेच खाली झुकते. तरीही बुद्धिभेद हा होतच असतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात जी सरकारे सत्तेत आली, त्या सर्व सरकारांनी निधर्मिकतेच्या नावावर हिंदूंच्या श्रद्धांचा कायम उपहासच केला. मात्र गत १० वर्षात परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे सर्वच कथित पुरोगामी मंडळी अस्वस्थ आहेत, आणि ही मंडळी असे नवे नवे फोकनाड शोध लावून नवे विमर्श (नॅरेटिव) प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतात. विशेष म्हणजे असे निष्कर्ष काढून आपण कथित पुरोगामी आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करणारे हे सर्व फोकनाड अभ्यासक हिंदूच आहेत आणि आपल्याच श्रद्धांना धक्का देण्याचे काम ते निष्ठेने करत असतात. आपल्या देशातील नव्हे संपूर्ण जगातीलच हिंदू हा अतिशय सहिष्णू आहे. त्यामुळेच या मंडळींचे असे प्रयोग काही अंशी सफल देखील होतात. अशा प्रकारचे कोणतेही वादग्रस्त विधान कोणत्याही अभ्यासकाने बायबल किंवा कुराणाबाबत केले असते तर जगभर वातावरण पेटवले गेले असते. मात्र हिंदू सहिष्णू असल्याने तसे होत नाही. त्यामुळेच या पुरोगामीयांचे फावते. गीतेबाबत देखील वेगवेगळ्या विद्वानांनी गीतेचे महात्म्य सांगताना वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत. मात्र हिंदू सहिष्णू असल्याने ते वैविध्य असल्याचे मान्य करत हे सर्व निष्कर्ष मान्य करतो. असे असले तरी हिंदूंच्या श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होईलच असे नाही. अयोध्येत प्रभू रामचंद्राचा जन्म झालाच नव्हता असा दावा अनेकांनी केला मात्र राम मंदिर उभे झाल्यावर लाखोंनी रामभक्त तिथे जात आहेत. त्यामुळेच भगवद्गीतेबाबत असे कितीही निष्कर्ष सांगितले तरी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रातील युद्धप्रसंगी केलेला हा उपदेश आहे यावरच सर्व सश्रद्ध हिंदूंची श्रद्धा आचंद्रसूर्य कायम राहणार आहे हे नक्की.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे......?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो....
वाचकहो हा लेख आपल्याला कसा वाटला, याबाबतची आपली मते अवश्य कळवा. त्याचे स्वागतच होईल.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment