कृषी महाविद्यालय, मूलचे वतीने टेकाडी येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकतीसावी बैठक संपन्न.

 कृषी महाविद्यालय, मूलचे वतीने टेकाडी येथेशेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकतीसावी बैठक संपन्न

मूल २९: दीपक देशपांडे 

 कृषी महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित एकतीसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ जुलै, २०२५ रोजी ग्राम टेकाडी ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे , प्रगतशील शेतकरी श्री मनोज चौधरी, श्री सुनील गेडाम, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “खरीप पिकांमधील आंतरमशागतीचे नियोजन” या विषयावर चर्चा करण्यात आली. 

 महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, उत्पादनवाढीसाठी खरीप पिकांमधील आंतरमशागत करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना  पटवून दिले. तसेच शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय जसे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय करणे सुद्धा महत्वाचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यापीठाचे तंत्रज्ञान असलेली कृषिसंवादिनी शेतकऱ्यांना माहितीकरिता ठेवावी अशी विनंती याप्रसंगी केली.

 महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा उद्यानविद्या विषयतज्ञ डॉ. आर. पी. गजभिये , यांनी शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांसाठी कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येणाऱ्या लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये मिरची, वांगी, टमाटर आणि भेंडी पिकांकरीता आंतरमशागतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले.

  सहाय्यक प्राध्यापक डॉ. अक्षय इंगोले,  मृदा विज्ञान विषयतज्ञ यांनी शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, गांडूळखत आणि गांडूळखतअर्क यांचा वापर केल्यास शेतीला होणाऱ्या फायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. 

सहाय्यक प्राध्यापक डॉ. भूषण अ. ठाकरे,  कीटकशास्त्र विषयतज्ञ यांनी धान पिकावरील तुडतुडे, खोडकिडा, गादमाशी, ईत्यादींच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे, ट्रायकोकार्ड इत्यादींचा वापर करण्यास सांगितले आणि कपाशी पिकावरील रस शोषक किडे व गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशक वापरून एकात्मिक कीड नियंत्रण करण्यास सांगितले. 

सहाय्यक प्राध्यापिका डॉ. गितांशु डिंकवार वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ यांनी धान पिकांवरील सुरवातीच्या काळातील करपा, मानमोडी व कडा-करपा रोगांच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच भाजीपाला पीकावर येणाऱ्या मर व मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या परोपजीवी जैविक बुरशीनाशकाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

सदर कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या सर्व शास्त्रज्ञांनी  श्री सुनील गेडाम यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडे असलेले विविध उपक्रम  जसे कुक्कुटपालन, शेततळे, धान, कापुस लागवड ईत्यादी पिकांबाबत चर्चा  व मार्गदर्शन केले. सदर  शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीस शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. 

सहाय्यक प्राध्यापिका *कु. मनीषा द. लवणकर* यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषी संवादिनी  व विकसित तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सदर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.  सदर कार्यक्रमास एकुण २५ शेतकरी  व ०६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्राध्यापिका कु. मनीषा लवणकर यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे व कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ यांचे आभार मानत केली. 


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.