साहित्यिकांचे माहेरघर प्राचार्य डॉ.सिंधुताई मांडवकर.
साहित्यिकांचे माहेरघर :-
प्राचार्य डॉ.सिंधुताई मांडवकर
ते घर आमचे नव्हते. पण आम्ही त्या घरात राहत होतो. ते घर आमचे नव्हते पण त्या घरात आम्ही नियमित जेवत होतो. ते घर आमचे नव्हते. पण आम्ही आमच्या पाहुण्यांना तिथेच बोलावत होतो. आमच्या साहित्य संगम या साहित्यिक संस्थेच्या सभा तिथेच व्हायच्या.
लहान सहान कार्यक्रम कोजागिरी आमच्या तिथेच व्हायच्या. ते आमचे घर नसले तरी आमचेच होते. कारण त्या घरात डॉक्टर भाऊ मांडवकर आणि आणि सिंधुताई मांडवकर हे आमचे पितृ तुल्य मार्गदर्शक येथे राहत होते. त्यांच्यामुळेच आमचे जीवन घडले. त्यांनी आम्हाला चांगले खतपाणी घातले आणि आमच्या अंकुराला वाढविले.
डॉ.भाऊसाहेब मांडवकर तेव्हा अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये प्राचार्य होते .तर त्यांच्या सौभाग्यवती सिंधुताई मांडवकर या त्याच महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या .साहित्य संगम हा आमच्या साहित्यिक संस्थेमुळे भाऊसाहेब आमच्या जवळ आले त्याहीपेक्षा सिंधुताई मांडवकर ह्या आईच्या ठिकाणी आल्या.
आमचा अमरावती शहरातील वेळ सिंधुताईसाहेबांकडे जायचा .त्याला कारणही तशीच होती. त्यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्याच बंगल्याच्या परिसरात जय सेवा वाचनालय होते .या जय सेवा वाचनालयामध्ये आम्हाला लागलेली सगळी पुस्तके होती आणि आम्ही कितीही पुस्तके न्यावी याला काही मर्यादा नव्हती. बऱ्याच वेळा मी ग्रंथालयामध्येच वाचत बसला असायचा. ग्रंथालयामध्ये आमच्या साहित्य संगमच्या मिटींग व्हायच्या. भाऊ साहेबांचे आणि सिंधुताईंचे घर हे शहराच्या मध्यवस्तीत म्हणजे अमरावतीच्या एसटी स्टँडच्या समोर असलेल्या विजय कॉलनीमध्ये.
मी शहरापासून तीन चार किलोमीटर दूर असलेल्या पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवन ह्या कुष्ठधाममध्ये राहत होतो. माझी मिसेस सौ विद्या तपोवन या महामना मालवीय शाळेमध्ये विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि मी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयमध्ये कार्यरत होतो.. माझे महाविद्यालयातील कामकाज संपले म्हणजे नगर वाचनालय आणि भाऊसाहेब मांडवकरांचे घर हे आमचे बसण्याचे ठिकाण होते.
भाऊ साहेबांकडे जाणे येणे जास्त यासाठी असायचे की त्यांच्या आणि सिंधुताई यांच्या वागण्यामध्ये आत्मियता होती जिव्हाळा होता प्रेम होते. मी आणि सुभाष खंडारे आम्ही दोघेजण भाऊ साहेबांचे आणि सिंधुताईंचे मानसपुत्र आहोत आणि खऱ्या अर्थाने सिंधुताईंनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केले .मला आठवत नाही की इतके वेळ मी त्यांच्याकडे असायचा तरी माझ्या खाण्यापिण्याची चहापाण्याची अल्पोपहाराची त्या व्यवस्था करायच्या.मी जेवण करून आलो तरी आग्रहाने काहीतरी खाऊ घालायच्या. त्या नेहमी म्हणायचे तू सतत फिरत राहतोस. सतत काम करीत राहतोस .जेवणाकडे दुर्लक्ष करतो .मी निमूटपणे ते ऐकायचा .त्यांना तो अधिकार होता.
भाऊ साहेबांचे घर मोठे होते आणि मनही मोठे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं गृह व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सिंधुताई या मातृहृदयी होत्या. एसटी स्टँड जवळ असल्यामुळे माझ्या बऱ्याचशा पाहुण्यांना मी भाऊसाहेबांकडेच बोलवायचा. भाऊ साहेबांच्या व्हरांड्यामध्ये एक बंगई ठेवलेली असायची आणि सोफासेट आणि खुर्च्या असायच्या. भाऊसाहेब आणि सिंधुताई कुलूप लावून बाहेर जरी गेले तरी व्हरांडा मोकळाच आणि उघडाच असायचा. ते आमचे हक्काचे घर होते.
भाऊसाहेबांमुळे आणि सिंधुताईमुळे मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो.
डॉ. मोतीलाल राठी बाबासाहेब सोमवंशी यांनी मला आधार दिलाच. पण माझे शैक्षणिक आयुष्य तयार केले ते भाऊसाहेब आणि सिंधुताईंनीच .माझी पीएच.डी. देखील झाली ती त्यांच्याच मार्गदर्शनामुळे.
सिंधुताईंची मुले युगंधर ललाम पवन ही तेव्हा लहान होते. शालेय शिक्षण घेत होते .भाऊ साहेबांचा पाय एका ठिकाणी नसायचा .आम्ही घरी असलो म्हणजे सिंधुताईंना तेवढाच आधार वाटायचा .त्या हक्काने आम्हाला कामही सांगत होत्या आणि आम्ही ते प्रेमाने करीत होतो .त्यामध्ये आम्हाला काही कमीपणा वाटत नव्हता .
सिंधुताईंनी आमच्याप्रमाणेच खूप लोकांना लहान्याचे मोठे केले .त्यामध्ये प्राचार्य धरमकर प्राचार्य राईकवार. त्यांच्याकडे असलेले ग्रंथपाल . ते ग्रंथपाल त्या घराचे घटकच होते. ग्रंथपालाची देखील सिंधुताई काळजी घ्यायच्या.
सिंधुताईच्या प्रेमाखाली मायेच्या पदराखाली आम्ही लहानाचे मोठे झालो आणि चांगल्या नोकरीला लागलो आणि साहित्याच्या प्रांतामध्ये व ज्या ज्या प्रांतामध्ये आज आमचा नाव लौकिक आहे ते घडले ते याच घरात. पण या घराने आम्हाला घरपण दिले की आम्ही अजूनही ते विसरून गेलो नाही .
सिंधुताई आज ९३ वर्षाच्या होत आहेत. रोज सकाळी लवकर उठणे .व्यायाम करणे. योगासन करणे .यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे. शिवाय काळजी घ्यायला चिरंजीव पवन व सुनबाई वीरा आहेतच. सिंधुताईंच्या चालतं बोलतं व्यक्तिमत्व याही वयात आहे .उत्तम ऐकायला येते. उत्तम बोलायला येते आणि सगळ्यात महत्त्वाचं चालायला येते .खरं म्हणजे 93 हे आयुष्याचा खऱ्या अर्थाने उत्तरार्धात असतं .या उत्तरार्धामध्ये बऱ्याच व्यक्ती या अंथरुणावर पडून असतात. पण सिंधुताईंनी समाजावर इतके उपकार करून ठेवले आहेत की त्यामुळे सिंधुताई ९३ व्या वर्षीही ठणठणीत आहेत.ही फार जमेची बाजू आहे .
त्यांची मुले आता मोठी झालेली आहेत.पवन इंदिरा महाविद्यालय कळंबचा प्राचार्य झालेला आहे . त्याने कॉलेज नाव रूपाला आणले आहे.युगंधर अनेक वर्षापासून एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये समाजकार्य शाखा सांभाळतो आहे .ललाम देखील पुण्याला स्थायिक
झालेला आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सिंधुताईंना भेटतो. त्या आता यवतमाळला पवन कडे राहतात. परवा असाच यवतमाळला गेलो. आमच्या आय.ए.एस.झालेल्या मुलांचा सत्कार होता .पवन मांडवकर त्यांच्याकडे गेलो. सिंधुताईंना खूपच आनंद झाला .जसा आईला मुलगा भेटल्यानंतर होतो तसाच.
सिंधुताईंनी खूप मुलं घडवलीत. त्यांना लहानाचे मोठे केले .त्यांचे सगळे लाड केले .सिंधुताईंच्या ठिकाणी हा आपला हा परका हा भेदभाव नव्हता. खऱ्या अर्थाने सबके लिए खुला है मंदिर हमारा हा मंत्र त्यांनी आत्मसात केला होता .
त्यांचे आणि भाऊसाहेबांचे लग्न देखील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळच्या मोझरीच्या आश्रमात झाला होता आणि तोही राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत झाला होता.
आज सिंधूताईंचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा .त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत आणि पुढे चालवत राहू ही ग्वाही त्यांना आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो आणि थांबतो.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक,मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️ Ddbatmi-m2M ✍️

Comments
Post a Comment