आनंदी पहाट ,सोनियाच्या दिनाची आज आषाढी एकादशी

 आनंदी पहाट ,सोनियाच्या दिनाची

  आज आषाढी एकादशी



         संकलन -अभय बक्षी नागपूर.

            चला हो पंढरी जाऊ

        वारी सौख्य शांती मार्गाची

             वेढा वेढा रे पंढरी ।

           मोर्चे लावा भीमातीरी ।

        *चला चला संतजन ।*

        *करू देवासी भांडण ।*

        *लुटा लुटा पंढरपूर ।*

        *धारा रखुमाईचा वर ।*

        *तुका म्हणे चला चला ।*

        *घाव निशाणी घातका ॥*

        *आज आषाढी एकादशी.. पंढरपूरला संत आणि भक्तांनी खरोखर वेढा घातलाय. हा असा एकमेव वेढा ज्याचा आनंद जगातील समस्त विवेकी, शांतताप्रिय जनतेला होतो. इथे लुट करायची ती विठ्ठल नामाची. या विशाल सेनेला ना सत्ता हवी, ना संपत्ती, ना कुणावर अधिपत्य गाजवायचे. भक्तीने जगात शांतता सदभावना जागवायचीय.* 

        *आज पंढरपूरला भूवर वैकुंठ अवतरलेय तसेच  गावोगाव पंढरपूर. पृथ्वीवरील या पवित्र ठिकाणी.. संतांच्या माहेरी भक्ती सागर उसळलाय. सर्वत्र भगव्या पताकांचेच राज्य. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष सुरू आहे. सर्वत्र आनंदी आनंद आहे. उन.. वारा पाऊस अंगावर घेत, शेकडो किमी पायी मजल दरमजल करीत अखेर आज भक्तांना विठुरायाचे.. मंदिराच्या कळसाचे दर्शन होणार. जीवन सार्थक झाल्याचा आनंद होणार. मग आठवण होते ती हा अभंग सार्थ ठरला याची..*

        *संत कृपा झाली ।*

        *इमारत फळा आली ।*

        *ज्ञानदेवे रचिला पाया ।*

        *भारिले देवालया ।*

        *नामा तयाचा किंकर ।*

        *तेणे विस्तरिले आवार ।*

        *जनी जनार्दन एकनाथ ।*

        *स्तंभ दिला भागवत ।*

        *तुका झालासे कळस ।*

        *भजन करा सावकाश ।*

        *बहिणा फडकती ध्वजा ।*

        *तेणे रूप केले ओजा ॥*

        *.... संत बहिणाबाई*...

        *पंढरपूर विठ्ठलाने आपल्या भक्तांना प्रेमाने जिंकलेय. यामुळेच हे संत म्हणतात..* 

        *भुलूं नका या संसारीं ।*

        *हरी उच्चारी उच्चारी ॥* 

        *सर्व जायाचें जायाचें ।*

        *हरि नाम हेंचि साचें ॥*

        *विठोबा रक्षिल शेवटीं ।*

        *उभा कर दोन्ही कटीं ॥*

        *नरहरी जाणूनि शेवटीं ।*

        *संतचरणा घाली मिठी ॥*

        *.... संत नरहरी सोनार* 

        *पंढरपूर हे संत नरहरी सोनार यांचे जन्म स्थान. वारकरी संत मांदियाळीतील सर्वाधिक जीवन लाभलेले हे संत (९२वर्षे). सारे जग विठ्ठल दर्शनासाठी पंढरीस आले पण संत नरहरी मात्र दृष्टान्तापर्यंत मंदिराकडे वळलेही नाहीत.*

        *मानवी मनाने व्यक्तीमध्येच काय देवतांमध्ये पण भेदभाव निर्माण केला. शैव.. वैष्णव वाद समाजात उफाळला.. भक्तांमध्ये दूरावा वाढला. यामुळे परमेश्वर इच्छेप्रमाणे नरहरी सोनार यांचा जन्म झाला.*

        *कलाकुसरीसाठी निष्णात सुवर्णकार ही नरहरी यांची सर्वत्र ख्याती. एका सावकाराने त्यांना विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी करायला सांगितली. पण नरहरी हे तर शैव. कट्टर शिवभक्त. शिवाला नित्य बेलफुले वाहून आराधना करणारे. ते विठ्ठलाचे मुखदर्शनासही तयार नव्हते. तेव्हा त्यांना माप आणून देण्यात आले. पण अनेकदा मापापेक्षा सोनसाखळी कमी जास्त व्हायची. अखेर मोठ्या विनवणीनंतर डोळ्यावर पट्टी बांधून ते विठ्ठलाचे माप घेण्यासाठी आले.*

        *विठ्ठलाच्या कमरेचे माप घेताना हाताला व्याघ्रचर्मे लागली.. गळ्यात शेषनाग जाणवला. हे तर आपले दैवत म्हणून नरहरींनी आनंदाने डोळे उघडले. तर समोर विठ्ठल प्रकटले. व्दैत संपले. मग परब्रह्म स्वरुप मग ते विठ्ठल असो वा शंकर एकच आहे, हे जाणताच त्यांचे डोळे उघडले. संत नरहरी यांनी शिवासोबतच श्रीविठ्ठल भक्ती प्रसारासाठी जीवन खर्च केले.*

        *संत नरहरी यांचे भागवत धर्मात एवढे मोठे स्थान होते की त्यांच्या समाधीवेळी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव.. नामदेव.. चोखामेळा इ. संतमंडळी आवर्जून उपस्थित होती.*

        *सर्वच संत मंडळींच्या पालखी बघून वारकरी आनंदाने त्या त्या पालखीचा इतिहास उत्साहानं एकमेकांना सांगत आहेत. ते बघा, ही मुक्ताबाईंची पालखी.. शेगावचे संत गजानन महाराजही आलेत. आणि कौतुकाने बघतात ती रुख्मिणी मातेची पालखी. ही त्यांच्या माहेरुन अर्थात अमरावती जवळच्या कौडिंण्यपूरहून आलीय. ४० मुक्काम होतात या पालखीचे.*

        *विठ्ठल दर्शनाचा दिवस म्हणजे माऊली म्हणतात "अजि सोनियाचा दिनू.." हे सुखाचे आगरच आज सापडलेय. तर तुकोबा म्हणतात "आनंदाचे डोही आनंद तरंग.." देव म्हणजे अंतकरणातील पवित्र भाव. या संकल्पनतेवर अतूट विश्वास असणे ही तर पुर्वजन्माची पुण्याई, असे माऊलींना वाटते. सश्रद्ध भक्त हे पापभीरु असतात. हा विठ्ठल चराचरातही आहे म्हणून त्याची ही भेट हा सोनियाचा दिन.*

        *वारकऱ्यांना आपल्या आराध्याविषयी प्रचंड आस्था आहे. दर्शनासाठी मन व्याकुळ झालेय. जे कष्ट झेलले आहेत.. ते कष्ट परावर्तीत होणार विठ्ठलाच्या दर्शनात.. विठ्ठल मंदिर कळसाच्या दर्शनात. त्यांचे आनंदाश्रू ही आगळी अनुभूती. आज वैष्णवांची दिवाळीच.*

        *असे भक्ताना निर्मळ, पापभीरु हृदयी, सश्रद्ध सुखी जीवन प्रदान करणाऱ्या विठुरायाची आपणावरही कृपादृष्टी राहो.*

  

  *अजि सोनियाचा दिनु ।*

  *वर्षे अमृताचा घनु ॥१॥*

  *हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।*

  *सबाह्याभ्यंतरी*

  *अवघा व्यापक मुरारी ॥२॥*

   *दृढ विटे मन मुळी ।*

   *विराजित वनमाळी ॥३॥*

    *बरवा संतसमागमु ।*

    *प्रगटला आत्मारामु ॥४॥*

     *कृपासिंधु करुणाकरू ।*

     *बाप रखमादेविवरू ॥५॥*


  *रचना : संत ज्ञानेश्वर महाराज*  ✍

    *आनंदी आनंद भरला*

   *अवघा दाही दिशा कोंदला* 

    *संत सज्जनांचा मेळा*

    *भक्तीरंगाने रंगला* 

    *विठ्ठल नामाचा गजर* 

    *पंढरी वैकुंठ भुवर*

    *टाळ मृदुंग वीणा वाजे* 

    *पुण्य सोहळा हा गाजे*


       *॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥*

       *॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥*

       *॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥*

         ‼ *जय जय रामकृष्ण हरी* ‼

        🌹🙏 *सुमंगल प्रभात* 🙏🌹

                ०६.०७.२०२५

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

          9403285344.                 ✍️ Ddbatmi-m2M ✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.