पटतेय का बघा... सन्मान राखतांना या मुद्यांचाही विचार व्हावा...
पटतेय का बघा...
सन्मान राखतांना या मुद्यांचाही विचार व्हावा...
मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील फक्त राजकीयच नाही तर सामाजिक वातावरण देखील तापलेले दिसते आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेले शासन आदेश गेल्या आठवड्यातच रद्द करण्यात आले आहेत. आज त्या निमित्ताने शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्त मेळावा देखील पार पडला.
याच मुद्द्यावरून सध्या मराठी भाषिकांकडून विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या सैनिकांकडून परप्रांतीयांवर विशेषतः हिंदी भाषिकांवर मराठीत बोलण्याची सक्ती होत असून त्यासाठी त्यांना मारहाण आणि खळखट्याक सारखे प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द संपते की काय अशी भीती निर्माण होत आहे.
मराठी माणसांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राचे गठन झाले आहे. इथे बहुसंख्य मराठी नागरिक राहतात. असे असले तरी ज्यावेळी महाराष्ट्राचे गठन झाले त्यावेळी देखील महाराष्ट्रात, त्यातही विशेषतः मुंबई परिसरात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात आज कित्येक अमराठी कुटुंब पाच पाच पिढ्यांपासून इथे स्थायिक झालेले दिसतात. त्यातील अनेकांनी मराठी भाषा शिकली आहे. त्यांनी मराठीतच शिक्षण देखील घेतले आहे. त्यामुळे ते मराठीच झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अर्थात काही नव्याने आलेले अमराठी नागरिक अजूनही मराठी शिकलेले नाहीत. त्यातील काहीजणांना मराठी शिकण्याची इच्छा नसेलही. मात्र महाराष्ट्रात राहायचे इथे उद्योग व्यवसाय करायचे तर तुम्हाला इथली भाषा शिकावी लागणारच आहे. त्यात कोणाचेही दुमत असल्याचे कारण नाही.
तरीही अजूनही काही अमराठी नागरिक मराठी शिकलेले नाहीत, हे वास्तव नाकारता येत नाही. मग मराठी नागरिक त्यांच्याशी मराठीत बोलले तर वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशावेळी मग प्रकरण शिवसेना किंवा मनसे कडे जाते, आणि मग खळखट्याक आणि मारहाण असे प्रकार घडतात. पोलीस तक्रार होते आणि मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस खटले देखील भरतात. राज्यात अशी गुंडगिरी कोणी केली तर सरकार त्यांच्यावर कायद्याने कारवाई करणारच असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलाच आहे.
अशा हाणामारीमुळे अनेकदा इथे येणारे परप्रांतीय आपल्यापासून दुरावतात ही शक्यता देखील नाकारता येत नाही. कालच सुशील केडिया नामक उद्योगपतीने नाराजी व्यक्त करत आपण मराठी बोलणार नाही अशी घोषणा केली होती. आज मनसेच्या दणक्यानंतर त्याने माफी मागितली असल्याची माहिती आहे.
त्यापेक्षा शिवसेना उबा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणूसच जागा करायला हवा. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस किती मराठीचा सन्मान करतो याचाही विचार व्हायला हवा. किती मराठी कुटुंबातील मुले मराठी शाळेत शिकत आहेत याचेही वास्तव समोर यायला हवे. परवा एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुले देखील बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये शिकली असा दावा केला आहे. त्यावरून मग राजकारण देखील रंगले आहे. महाराष्ट्रातील सर्व परकीयांच्या शाळा बंद करून टाका असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. तर बॉम्बे स्कॉटिश स्कूलला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे ना असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात इतर देखील अनेक इंग्रजी माध्यमांची पब्लिक स्कूल सुरू झाली असून तिथे हजारो मराठी मुले शिक्षण घेत आहेत.
आम्हाला जर महाराष्ट्रात मराठीचा अभिमान जागवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मुलांना मराठी शाळेतच शिकवावे. त्यासाठी सरकारने काही विशेष सवलती जाहीर कराव्या असा देखील आग्रह धरला जायला हवा. उद्धव ठाकरेंची मुंबईत सत्ता असताना मुंबई महापालिकेच्या अनेक मराठी शाळा बंद पडल्या होत्या. त्या शाळा पुन्हा सुरू कशा होतील आणि तिथे जास्तीत जास्त मराठी मुले कशी शिकतील याचा विचार केला जायला हवा. जसे परप्रांतीय तुमच्याशी हिंदीत बोलतात तसाच तुम्ही देखील त्यांच्याशी आम्ही मराठीतच बोलू हा आग्रह धरायला हवा. महाराष्ट्रात व्यावसायिक परप्रांतीय व्यावसायिक मोठ्या संख्येत आहेत. त्यांच्या दुकानात गेल्यावर ते मराठीत बोलणार असले तरच त्यांच्याकडून आम्ही खरेदी करू अन्यथा करणार नाही असा आग्रह मराठी माणसाने करायला हवा. जे मराठीत बोलणार नाही त्यांच्या दुकानात जाऊ नये. अशा परप्रांतीय व्यावसायिकांशी संबंध ठेवू नये. आणि जे काही करायचे ते प्रेमानेच करावे खळखट्याक किंवा मारामारी करून नव्हे.तसेच झाले तरच मराठीचा महाराष्ट्रात सन्मान होईल. अन्यथा हे असेच सुरू राहील.
आज आम्ही परप्रांतीयांवर मराठीत बोलले नाही म्हणून हल्ले करतो. त्यांना मारहाण करतो आणि प्रसंगी त्यांना हुसकावून लावतो. आज आमची मराठी मुले देखील शिक्षणासाठी, नोकरी व्यवसायासाठी परप्रांतात जातात. उद्या तिथल्या नागरिकांनी आमच्या मुलांनाही असेच हुसकावून लावले तर त्यांची काय अवस्था होईल, याचाही विचार व्हायला हवा.
आपल्या देशात प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा आहे. प्रत्येकाला तिथल्या भाषेचा अभिमान आहे. त्यात वावगे काहीही नाही. मात्र हा अभिमानच असावा, दुराभिमान नसावा, आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही,आणि शेवटी देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचणार नाही याचा विचार देखील आम्ही सर्वांनीच करायला हवा. त्यातच सर्वांचे हित आहे शिवसेना उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्हीचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठीचा सन्मान राखण्यासाठी या मुद्द्यांवरही विचार करायला हवा.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment