दिनविशेष! आज गुरू पौर्णिमा अर्थात व्यास पूजन !

       दिनविशेष!

              आज गुरू पौर्णिमा अर्थात  व्यास पूजन !

         


        *मज हृदयीं सद्‌गुरु ।*

        *जेणें तारिलों हा संसारपूरु ।*

        *म्हणौनि विशेषें अत्यादरु ।*

        *विवेकावरी ॥*

        *ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत. म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे.*  

        *जगात नित्य शोध लागतात. भौतीक विकास होतोय. मनुष्य जीवनाचे कोडे सोडविणारे आध्यत्मिक ज्ञान केवळ भारतीय गुरुकडे आहे.*

        *आज गुरुपौर्णिमा. आज पौर्णिमेचे तेज हे गुरुंचे आशीर्वाद आणि शिकवण वाढवते, आध्यात्मिक साधना, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी एक आदर्श वातावरण तयार करते. तेजस्वी ज्ञान, स्पष्टता आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठीची ही योग्य वेळ.*

        *आज गुरु पौर्णिमा. महाभारताचे रचियेते.. जीवनाचे भाष्यकार.. प्रतिभेचे कळस गुरु महर्षी व्यास यांच्या पूजनाचा दिवस. जगात त्यांच्या एवढा प्रतिभावंत होणेच अशक्य. जगात जो गीता ग्रंथाचा सन्मान होतो, ती गीता या महाभारत ग्रंथाचाच एक भाग.*

        *आजही 'व्यासपीठ' शब्दाचा सन्मान होतो. व्यासांच्या सन्मानार्थ व्यासपिठावरुन निंदा.. खोटी स्तुती.. असत्य बोलणे हे अक्षम्य पाप मानले जाते.* 

        *गुरु हे शिष्याचे जीवन अंधारातून बाहेर काढून प्रकाशमय करतात. आमुलाग्र परिवर्तताने ज्ञानाच्या.. आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाचा प्रारंभ करतात. त्यासाठी मार्गदर्शन करतात. मोक्ष मार्ग दाखवतात. गुरु आपल्या शिष्यालाही गुरू पदापर्यंत पोहोचवतात. ही गुरुशिष्य परंपरा कायम ठेवतात. भारतात ही ऋषी.. मुनी.. संत अशी परंपरा कायम सुरु आहे.*

        *गुरु शिष्य हे परस्पराविषयी अत्यंत विश्वासाचे.. पवित्र.. अपार श्रद्धेचे.. परमआदराचे नाते. गुरु हे चल.. समाधीस्त.. पुतळारुपही असू शकतात. एकलव्याने पुतळ्याला गुरु मानले.* 

        *जीवनात उत्तरच सापडत नाहीत तेव्हा प्रारब्धाकडे बोट दाखवले जाते. प्रारब्ध हे गत.. सद्य आणि भविष्यातील कर्माचे फळ देते. परिणाम करते. प्रारब्ध गती सुख दुःख निर्माण करते. सर्वच सुखदु:खाची कारणे.. पूर्वजन्मापासूनचा परिपाठ गुरु जाणतात. त्याप्रमाणे ते सन्मार्गाचा उपदेश करतात. सुखदुःखाकडे बघण्याची दृष्टी देतात.*      

        *आमच्याच घरी मतीमंद.. अपंग.. अंध बालकाचा जन्म का म्हणून एकाने गुरुंना हे दुःख सांगितले. तेव्हा त्या आत्म्याने जन्म घेण्यासाठी तुमची निवड केली. याचे कारण तुमचेच घर त्याची सेवा करेल हे त्याला ठाऊक होते. तेव्हा हा तुमचा सन्मान समजून सेवा करा म्हणून गुरुंनी सांगताच त्या कुटुंबाचे दुःख पळाले अन् ते आनंदाने सेवा सुरू झाली. अशी दृष्टी केवळ गुरुच देवू शकतात.*

        *आज अशा दृष्टी देणाऱ्या गुरुंमुळेच लाखो संसार आनंदाने सुरू आहेत. दत्तगुरुंचे अवतार "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ, शंकर महाराज, रामदास स्वामी, नाथ संप्रदायाचे माधवनाथ, बाळू मामा, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, गोंदवलेकर महाराज, वासुदेवानंद सरस्वती, गगनगिरी महाराज अशी ही न संपणारी गुरूंची यादी.*

        *सगळेच संत.. गुरु हे समानच. दासगणु म्हणतात.. "संत अधिकारे समान, तेथे न काही अधिक न्यून" ते आमची जन्मोजन्मीची काळजी घेणारे ज्ञान ते देतात. योग्य कर्माचा.. भक्तीचा मार्ग दाखवतात.*

        *आमच्या सगळ्या संत मंडळीनीही गुरु केलेत. मग ते ज्ञानोबा असोत वा तुकोबा. गुरु हे जीवनाचे भाष्यकार.. तत्वज्ञ आणि मार्गदर्शक आहेत. गुरु शिव तत्व जागृत करतात. जीवनाला अहंकारासह आम्हांला दोषमुक्त करतात. ते भक्तांचे पूर्व.. सद्य कर्म जाणतात. परिस होत ज्ञान देत जीवनच सोन्यासारखे करतात. भक्ती मार्गाचा मंत्र देत जीवन सुख.. शांती.. आनंद निर्माण करतात.*

        *बालवयात बोट धरुन चालविणाऱ्या मातेकडूनचा हा प्रवास पूढे सरकतो. पूढे जीवन सुगम होण्यासाठी मार्गदर्शन  करणारे.. अध्यात्म ज्ञान देणारे गुरु भेटतात. या गुरुकृपा प्राप्त ज्ञानोबा, तुकोबा सह सर्वच संत मंडळींनी परमात्मा दर्शन घडविलेय. आज या संत.. गुरुवर्यांचे श्रद्धेने पूजन केले जाते. या सद्गुरुंशिवाय जीवन जगणेच अशक्य. जगात ज्ञानाचे अनेक पर्याय असलेतरी जीवनावश्यक खरेज्ञान देतात ते सद्गुरुच.*

        *जो गुरुविषयी आजन्म कृतज्ञ असतो तोच खरा शिष्य हे भारतीय संस्कृती शिकवते. गुरु हे ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे पालक, महादेवाप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहेत. हे जीव शिवाचे मिलन करणारे गुरु म्हणजे साक्षात परब्रह्मसमानच.*

        *प्रत्येक क्षेत्रात गुरू हवेतच. मग ते अध्यात्म.. कला.. शिक्षण.. क्रिडा.. राजकारण वा कोणतेही असो तरच लवकर यश प्राप्त होते.*

        *समाजाला दिशा मिळावी.. गुरुमहात्म्य प्रस्थापित व्हावे म्हणून परमेश्वराने मानवी अवतारात गुरु केले. श्रीकृष्णानं सांदिपनी तर रामाचे विश्वामित्र.. वशिष्ठ होते. जे कुणालाच गुरु मानत नाहीत त्यांचा गुरु असतो तो मधुसुदन, म्हणुन म्हणतात.. "कृष्णं वंदे जगद्गुरु".*

        *ज्ञानप्रकाशाने जीवाला शिव करुन ते उजळविणाऱ्या गुरुंचे काया.. वाचा.. मने पूजन करुया.. मग जगात आम्हांला भयमुक्त.. चिंतामुक्त होत गुरुंवर श्रद्धा ठेवत.. गुरूंच्या उपासनेत.. नामस्मरणात.. आनंदाने जीवन जगता येते.*

    *श्रीगुरुसारिखा असता पाठीराखा*

    *इतरांचा लेखा कोण करी*


  *गुरु परमात्मा परेशु ।*

  *ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥*

  *देव तयाचा अंकिला ।*

  *स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥*

   *एका जनार्दनी गुरुदेव ।*

  *येथें नाहीं बा संशय ॥३॥*

                *श्री गुरवे नमः* 

                *१०.०७.२०२५*

संकलन:-अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.      

                     9403285344  

 ✍️ddbatmi-m2m.blogspot.com ✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.