कालचक्र पुण्यातल्या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई सहभागी.

 कालचक्र


पुण्यातल्या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई सहभागी

पुण्याच्या खराडी परिसरात एका उच्चभ्रू इमारतीत सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून एकुण सात जणांना अटक केली असल्याची माहिती माध्यमांवर येते आहे. विशेष म्हणजे त्या सात जणांमध्ये महाराष्ट्र विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते, युती सरकारमधील माजी मंत्री, भाजपचे माजी नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खेवलकरांच्या नावानिशी वृत्त प्रसारित होताच राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 

प्रस्तुत छाप्यात या आरोपींसह फक्त मद्याच्या बाटल्याच नाही, तर कोकेन, गांजा यासारखे मादक पदार्थ, हुक्का इत्यादी साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात आपला जावई खरोखरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, आपण काहीही हस्तक्षेप करणार नाही असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी यामागे राजकीय कट कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. 

साधारणपणे कुठेही अशा प्रकारची कारवाई झाली आणि त्यात एखादा राजकीय नेता किंवा त्याचा नातेवाईक पकडला गेला आणि त्यातही तो विरोधी पक्षाचा असला तर राजकीय सोडा बुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप केला जातो. इथे सुद्धा हा प्रांजल खेवलकरांना पकडण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला होता असा आरोप केला गेला आहे. तसेच याबाबत आधी देखील माहिती मिळाली होती असाही दावा केला गेला आहे. त्याच वेळी एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक आणि फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन यांनी ट्रॅप होणार माहित होते तर प्रांजल खेवलकर गेलेच कशाला? ते काही लहान बाळ नाही की कोणीतरी कडेवर नेऊन सोडले? असा प्रश्न विचारला आहे. एकूणच राजकीय सवाल-जबाब आता रंगात येताना दिसतील हे नक्की. 

पुण्यातल्या जाणकारांच्या मते अशा प्रकारच्या रेव्ह पार्टी पुण्यात दररोज शेकडो ठिकाणी चालत असतात. एखाद्याच पार्टीवर अशी धाड पडते आणि ते पकडले जातात. तिथेही कोणीतरी टीप दिलेली असते, आणि मग अशी धाड होते. प्रस्तुत प्रकरणातही पोलिसांनी आम्हाला गुप्त स्त्रोताकडून माहिती मिळाल्याची कबुली दिली आहे. 

हे लक्षात घेता खडसेंच्या राजकीय विरोधकांपैकी कोणी अशी पोलिसांना टीप दिली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या सुमारे बारा वर्षांपासून एकनाथ खडसे हे व्यक्तिमत्व राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरले आहे. २००९ ते २०१४ या कालखंडात ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत राहिले. त्यामुळे जर भाजपची सत्ता आली तर आपल्याला संधी मिळेल असे त्यांना वाटत होते. २०१३-१४ या कालखंडात देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्या काळात त्यांनी पक्षाला जे घवघवीत यश मिळवून दिले, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान दिला. परिणामी खडसे नाराज होते. नंतरच्या काळात त्यांच्या पुण्यातील फ्लॅटचे काही प्रकरण वर आले आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते अज्ञातवासातच होते म्हटले तरी चालेल. परिणामी २०१९ मध्ये त्यांना पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारी देखील दिली नाही. त्यामुळेच मग ते पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली. जळगाव जिल्ह्यात त्यांचे आणि भाजपमधलेच दुसरे नेते गिरीश महाजन यांचे हाडवैर आहे. त्यामुळे महाजन आणि फडणवीस हे दोघेही खडसेंच्या निशाण्यावर असतात. लोकसभा निवडणुकीनंतर खडसे परत भाजपमध्ये येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र कुठे माशी शिंकली ते त्यांना आणि फडणवीस यांनाच माहीत .परिणामी खडसे आजही शरद पवारांसोबतच आहेत. त्यांची मुलगी रोहिणी ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची आघाडीची नेता आहे. मात्र त्याचवेळी त्यांची सून रक्षा खडसे ही भाजपची उमेदवार म्हणून लोकसभा लढली आणि विजयी झाल्यावर केंद्रात मंत्री देखील झाली आहे. 

खडसेंचे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी असलेले वैर लक्षात घेता त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठी कोणीतरी ट्रॅप केला ही शक्यता देखील नाकारता येत नाही. कारण शेवटी ते राजकारण आहे. मात्र कोणी ट्रॅप ठेवला तरी त्यात आपण कितपत फसायचे किंवा आपल्या माणसाला कितपत फसू द्यायचे याचेही तारतम्य बाळगावे लागते. इथे खडसे, रोहिणी, आणि तिचे पती प्रांजल हे सर्वच ते तारतम्य विसरले आणि त्यामुळेच हा प्रकार घडला असे म्हणता येईल. आता या विषयावर राजकारण काही दिवस तरी चालणारच आहे. याला आता खडसे परिवार कसा सामोरा जातो ते बघायचे आहे. 


      अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.