पटतंय का बघा... सर्व राजकारण्यांनीच याचा गांभीर्याने विचार करावा..

 पटतंय का बघा...

सर्व राजकारण्यांनीच याचा गांभीर्याने विचार करावा..

नुकत्याच घडलेल्या काही घटना बघता महाराष्ट्रातील सर्व आमदार माजले आहेत असा जनसामान्यांचा समज होतो आहे असे उद्विग्न उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत बोलताना काढले. दोन दिवसांपूर्वी विधान भवनात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, त्या रात्री आव्हाडांच्या एक कार्यकर्ता अटक करून देत असताना विधान भवन समोर पोलीस जीप अडवून जीपपुढे आडवे पडत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घातलेला गोंधळ, त्या रात्री आझाद मैदान पोलीस स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी केलेला आरडाओरडा, त्याआधी आमदार निवासाच्या उपहारगृहात आमदाराने तिथले मॅनेजर आणि वेटरला केलेली मारहाण या सर्व प्रकारामुळे त्रस्त असलेल्या फडणवीसांनी आपली खंत सभागृहातच बोलून दाखवली. 

ज्यावेळी आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या राडा प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय ऐकवायला आणि पडळकर आणि आव्हाड यांनी खेद व्यक्त करावा असे सुचवले, त्यावेळी पडळकर यांनी तर खेद व्यक्त केला. मात्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फडणवीस यांनी हस्तक्षेप करताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील उठून उभे राहिले आणि ते आव्हाडांची बाजू घेऊन बोलू लागले. त्यावेळी संतप्त होत फडणवीसांनी आपली खंत बोलून दाखवली. 

प्रश्न असा येतो की फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे खरोखर महाराष्ट्रातले आमदार माजले आहेत का? त्यांची खरोखरीच जनतेशी असलेली नाळ तुटली आहे का? त्यांना जनतेची परवाच नसल्यामुळे जनसामान्य त्यांच्यावर खरोखरी नाराज आहेत का? या सर्व प्रश्नांचे उत्तर नाईलाजाने हो असेच द्यावे लागते आणि फक्त आमदारच नाही तर एकूणच सर्व राजकारणी हेच माझे आहेत असा जनसामान्यांचा समज होतो आहे, आणि त्याला राजकारण्यांचेच वर्तन कारणीभूत आहे असे दिसून येते. 

कोणताही माणूस राजकारणात आला आणि त्यातही एखाद्या पदावर पोहोचला की तो सातव्या आसमानात पोहोचलेला असतो. त्याला जनसामान्यांशी काहीही देणेघेणे उरत नाही असे दिसून येते. वस्तूतः राजकारणात राहायचे त्यात निवडणूक लढवायची तर तुम्हाला लोकांचा पाठिंबा किती आहे हे तपासले जाते. आजकाल प्रत्येक पक्ष निवडणुकीआधी सर्वेक्षण करत असतात. जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा नसला तर कित्येकदा उमेदवारी देखील मिळत नाही. उमेदवारी मिळाली तरी तुम्ही लोकांना मत मागायला गेल्यावर लोक तुमचे आधीचे वर्तन विचारात घेतातच. त्यामुळे लोकांची असलेली नाळ जर तुटली तर तुम्हाला पुढे जाता येत नाही… तरीही निवडणुकीच्या वेळी खरी खोटी आश्वासने देऊन लोक निवडून येतात. त्यावेळी त्यांना प्रत्येक मतदार हा काका मामा नाहीतर दादा असतो त्या मतदार महिला असल्या तर काकू मावशी किंवा ताई असतात. मात्र निवडून आल्यावर हे आधी हाजी हाजी करणारे उमेदवार तुम्हाला विसरून गेलेले असतात. ते तुम्हाला ओळख दाखवायला सुद्धा तयार होत नाहीत. त्यांच्याकडे काही कामाने गेल्यास तुम्हाला तास ते तास बाहेर ताटकळत ठेवतात. तुमचा फोन देखील उचलत नाहीत. त्यामुळेच मग सामान्य माणसाचा या नगरसेवक आमदार किंवा खासदारावरचा राग वाढत जातो. 

त्यातच हे आमदार किंवा खासदार किंवा कोणीही राजकारणी राजकारणासाठी परस्परांशी एकेरीवर येऊन भांडतात, तेव्हा सर्वसामान्य माणूस असा कसा आमचा लोकप्रतिनिधी म्हणून नाक मुरडतात. महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्या पिढ्यांमध्ये सर्वच राजकारणी सुसंस्कृत होते. तिथे पक्षभेद आणि मतभेद असले तरी मनभेद राहत नव्हते. विरोधी पक्षाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या मतांचा देखील योग्य असा आदर केला जात होता. त्यामुळेच नागपूरच्या राजकारणात परस्परांचे विरोधक असलेले भाई बर्धन आणि सुमतीबाई सुकळीकर यांनी भावा बहिणीचे नाते जपले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नितीन गडकरींनी दिल्लीला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात जाऊन भाई बर्धन यांचे आशीर्वाद घेतले होते. त्या काळात असे व्यक्तिगत स्तरावर स्नेहबंध जपणारे खूप राजकारणी होते. राजकारणातही पक्षीय धोरणांवर टीका जरूर केली जात होती. मात्र व्यक्तिगत स्तरावर टीका कधीच केली जात नव्हती. कोणाचेही उणेदुणे काढले जात नव्हते. 

आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक राजकारणी तो समोरच्या राजकारण्याला आपला शत्रू समजत असतो. राजकारण करतानाही व्यक्तिगत पातळीवर उतरून कित्येकदा नको ती टीका केली जात असते. मग कोणी कोणाला मंगळसूत्र चोर म्हणतो, कुणी कुणाला मिंंधे म्हणतो, कोंबडी चोर, किंवा पेंग्विन म्हणतो, कोणी कोणाच्या मुलीवर तर कोणाच्या बायकोवर पातळी सोडून टीका करतो. आम्ही आरक्षणाच मागतो आहोत, मुख्यमंत्र्याची बायको नाही असे उद्गार जाहीर सभेत काढले जातात. तेव्हा सामान्य माणूस निश्चितच उद्विग्न होतो. 

त्यातच हे राजकारणी जेव्हा राजकारणासाठी हातघाईवर येतात. एकमेकांची डोकी फोडतात. सभागृहात तोडफोड करतात. तेव्हा तर मग सामान्य माणूस कपाळाला हात लावतो. मला आठवते काही वर्षांपूर्वी रोटरी तर्फे एका शाळेतील मुलांना मी विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज दाखवायला घेऊन गेलो होतो. त्यावेळी सभागृहात वारंवार गोंधळ होत दरवेळी पाच मिनिटांसाठी अध्यक्ष कामकाज तहकूब करत होते. यावेळी विधिमंडळात अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील सभागृहातील आमदारांना म्हणाले की गॅलरीत काही शाळकरी मुले बसली आहेत. ते विचारतात की जेव्हा आम्ही वर्गात गोंधळ करतो आणि शिक्षक येतात तेव्हा आम्ही शांत राहतो. मात्र इथे अध्यक्ष आल्यावरही गोंधळ सुरूच आहे. म्हणजे हे आमदार आमच्या पेक्षाही बेशिस्त आहेत का? वळसे पाटलांचा हा प्रश्न सर्वांनाच निरुत्तर करून जाणारा होता.

आमदार किंवा खासदार झाला म्हणजे कायदा हातात घेण्याचा परवानाच मिळाला आहे असे या लोकांना वाटते त्यामुळेच मग आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांची गाडी अडवली जाते आणि आरोपीला सोडा म्हणून पोलीस ठाण्यात पोलिसांनाच आवाज खाली असा दम भरला जातो सर्वसामान्य माणूस हे दूरचित्रवाणीवर पाहतो त्यावेळी असा कसा आपला लोकप्रतिनिधी हा प्रश्न निश्चितच विचारत असणार. 

गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खाली घसरत चालला आहे. त्यात आता कहरच झाला आहे. आमदार टॉवेल आणि बनियन वर जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. आमदारांचे समर्थक विधानभवनातच हाणामारी करतात. विधान भवनात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला आमदार तिथे झोडतात आणि पोलीस ठाण्यात पोलिसांनाच दमदाटी करतात. हे सर्व प्रकार बघितल्यावर हे राजकारणी असे माजलेलेच आहेत हा सर्वसामान्यांचा समज होणे सहाजिक आहे. सर्व राजकारण्यांनीच याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. 


अविनाश पाठक , नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

  1. सत्यच आहे पण ज्यांचे मुळे हे प्रकरण चालू झाले व संबधित भागाची शातंता आणखी वातावरण बिघडविणयाचे काम करणारे आमदार अजूनही मग्रुरीत तमाशा घालत छाती पुढे काढून चालत आहेत तरी यांचे मागचे पुढचे पोलीस रेकाॅर्ड काढून यांना आमदार पद काढून घेऊन परत यांना कोणतीही निवडणूक लढवता येऊ नये असा कायदाच व्हावा
    कि पुन्हा असे वाईट प्रकरणे न घडता सभागृह
    शांततेत कामे पार पडतील हे विचार मा मुख्यमंत्रीसो ;आणखी विधानसभा अध्यक्ष सो यांनी हा कायदा सभागृहात मंजूंर करून या राज्यपाल सो यांचे कडून मंजूर करून घेऊन तो कायदा अमलांत आणावा इतकेच नव्हे
    आमदार किंवा नगरसेवक यांचे सभागृहाचे बाहेर कुठेही ही असे वर्तन आढळल्यास बिना चोकशी आमदारांचे ससपेन्शन व परत कोणत्या निवडणूकीस कधीही ऊभे रहाता येणार नाही मग कशी आपोआप शांतता प्रस्थापीत होते ते बघा👏
    राजेंद्र दिवाण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.