आयुष्यातले सांगाती १७ राम खांडेकर

आयुष्यातील सांगाती.....१७.

राम खांडेकर.



आजवरच्या देशाच्या इतिहासात पंतप्रधानांचे खाजगी सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी अशा पदावर राहिलेली व्यक्ती एक तर राजकारणात सक्रिय होऊन राज्यसभेत सदस्य म्हणून तरी जाते किंवा निवृत्तीनंतर एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून तरी कार्यरत राहते. अशी व्यक्ती निवृत्तीनंतर दिल्लीतच आलिशान जीवन जगत उर्वरित आयुष्य काढत असते. 

मात्र देशाच्या पंतप्रधानांबरोबर पाच वर्ष विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेली आणि त्याआधी जवळजवळ पाच दशके भारतीय राजकारणातील चार महत्त्वपूर्ण व्यक्तींचे खाजगी सचिव म्हणून काम केलेली व्यक्ती निवृत्तीनंतर नागपूरच्या रस्त्यावरून हातात भाजीच्या पिशव्या घेऊन पायी फिरताना दिसली तर कोणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. आपल्या निवृत्तीनंतर अनेकांना असा आश्चर्याचा धक्का देणारी व्यक्ती होती माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले राम केशव खांडेकर. सुदैवाने अशा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्व घेऊन जगलेल्या व्यक्तीशी माझे कौटुंबिक संबंध होते हे इथे नमूद करायलाच हवे. 

जुन्या मध्य प्रांतात माहिती आणि जनसंपर्क खात्यात लघु लिपिक असलेले राम खांडेकर राज्य पुनर्रचना झाली त्यावेळी मुंबईत गेले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे या शुद्ध मराठीत टंकलेखन करणाऱ्या तरुण लघु लिपीकाकडे लक्ष गेले आणि त्यांनी खांडेकरांना आपल्या खाजगी स्टाफ मध्ये घेतले. चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले तेव्हा खांडेकरही त्यांच्यासोबत दिल्लीला गेले, आणि शेवटपर्यंत दिल्लीतच राहिले. आधी यशवंतराव चव्हाण, मग  मोहन धारिया, मग वसंत साठे आणि शेवटी पी व्ही नरसिंहराव असा प्रवास करत ते नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर त्यांचे विशेष कार्य अधिकारी बनले. नरसिंहरावांचे पंतप्रधान पद गेल्यावर देखील त्यांच्या अखेरपर्यंत खांडेकर त्यांच्या सोबतच राहिले. नरसिंहराव गेल्यानंतर मात्र ते आपले मूळ गाव नागपुरात स्थलांतरित झाले होते. 

माझा  खांडेकरांचा संबंध आला १९८० मध्ये. त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात कार्यरत होतो. वर्धेचे खासदार वसंतराव साठे हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्राचे जे अधिकारी होते त्यांनाच आपल्या खाजगी स्टाफ मध्ये घेतले होते. त्यात खांडेकर हे देखील एक होते. साठे मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नागपूरला आले तेव्हा मी त्यांच्यासोबत दौऱ्यात गेलो होतो. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रभाकर पाठक नामक खाजगी सचिव आले होते. त्यांच्याशी दूरदर्शन छायाचित्रकार म्हणून काम करताना येत असलेल्या विविध समस्यांबाबत मी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला दिल्लीत राम खांडेकर म्हणून अतिरिक्त खाजगी सचिव आहेत, त्यांच्याशी तू संपर्कात रहा असे सुचवले. 

घरी आल्यावर वडिलांना सांगितले तेव्हा या खांडेकर परिवाराशी आपले जुने संबंध आहेत असे त्यांनी सांगितले. पूर्वी आम्ही बर्डीला राहत असताना खांडेकर कुटुंब आमचे शेजारी होते आणि राम खांडेकरांच्या वडिलांशी चांगले संबंध आहेत असे वडिलांनी मला सांगितले. खांडेकरांची भेट झाली की माझा संदर्भ दे असेही वडिलांनी सुचवले.

महिनाभरातच वसंत साठेंचा पुन्हा नागपूर दौरा होता. त्यावेळी त्यांच्या समवेत राम खांडेकर देखील आले होते. त्या दौऱ्यात प्रभाकर पाठक यांनीच माझा खांडेकरांशी परिचय करून दिला. मग मी त्यांना बोलण्याच्या ओघात वडिलांनी सांगितलेले संदर्भ सांगितले. तर त्यांना खूप आनंद झालेला दिसला. योगायोगाने  लक्ष्मी नगरला मी राहत होतो त्याच्या बाजूलाच आता त्यांचे वडील आणि मोठे बंधू राहायला आले होते, साहेब आज रात्री दिल्लीला जातील, मात्र उद्या मी आहे, तेव्हा तू घरीच भेट असे त्यांनी सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी त्यांना घरी भेटायला गेलो. त्या भेटीत आज एका केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव असलेला हा माणूस अतिशय साधा आहे, आणि संबंध जपणारा आहे हे लक्षात आले. तिथूनच हळूहळू आमचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होऊ लागले. 

त्यानंतर साठेंच्या प्रत्येक दौऱ्यात माझी आणि खांडेकरांची भेट व्हायची. एव्हाना खांडेकर साहेब ऐवजी मी त्यांना रामभाऊ म्हणू लागलो होतो. साठेंच्या प्रत्येक दौऱ्यापूर्वी ते मला फोन करून दौऱ्याची माहिती कळवायचे. त्याचवेळी ते मुंबई दूरदर्शनच्या संचालकांना देखील दौऱ्याबद्दल कळवायचे आणि दौऱ्यात वृत्त संकलन करण्यासाठी माझी नेमणूक केली जायची. मग दरवेळी  दौऱ्यात मंत्र्यांच्या मागच्या गाडीत रामभाऊ आणि मी असे दोघेच असायचो. त्यावेळी गप्पांमध्ये हळूहळू रामभाऊंच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू मला कळू लागले. 

दरवेळी साठे साहेब दिल्लीला गेल्यानंतर रामभाऊ एखादा दिवस नागपुरात थांबायचे. त्यावेळी दौऱ्यात आलेली विविध निवेदने तपासून त्याची खातेनिहाय विभागणी करून संबंधित अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचे हवाली करायचे. मग त्याचा पाठपुरावा करणे हे देखील काम रामभाऊंचेच होते. साठे साहेब नागपुरात असताना सरकारी वाहनाने फिरणारे रामभाऊ नंतर मात्र चक्क सायकलने फिरायचे. एकदा त्यांना सायकलने जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना सायकलने का जाता? मला सांगायचे, मी स्कूटर ने घेउन जाईन असे सांगितले. तेव्हा त्यांचे उत्तर मला धक्का देणारे होते. अरे नागपुरातच काय मी दिल्लीत सुद्धा सायकलनेच फिरतो. मी राहतो त्या लोधी कॉलनीतल्या घरून मी साहेबांच्या बंगल्यावर  किंवा शास्त्री भवन च्या ऑफिसमध्ये मी सायकलनेच जातो. क्लास वन दर्जाचा हा अधिकारी आज दिल्लीतही सायकलनेच फिरतो हे ऐकल्यावर मला धक्काच बसला होता. त्यावेळी या गाडीतल्या प्रवासात बरेचदा मी माझ्या शासकीय स्तरावरील काही छोट्या मोठ्या समस्या त्यांच्या कानावर घालत असे. ते लगेचच दिल्लीला गेले की माझ्या समस्यांचा पाठपुरावा करायचे आणि काही दिवसातच माझे काम झाल्याचे कळायचे. त्या काळात माझ्या स्टुडिओत फोन नव्हता. तेव्हा फोनचे नवे कनेक्शन मिळायची फार मारामात होती. त्या दरम्यान नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू होणार हे निश्चित झाले होते. त्याचा फायदा घेत रामभाऊंनी तत्कालीन मंत्र्याच्या कार्यालयात पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे नागपूरच्या  जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितले. त्यामुळे एका महिन्यात मला टेलीफोन मिळाला होता.

नागपूरच्याच एका दौऱ्यात मंत्री महोदय  येण्याच्या एक दिवस आधीच रामभाऊ नागपुरात येऊन पोहोचले होते. त्या दिवशी सकाळी घरी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येतो असे सांगितले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास ते घरी आले आणि जवळजवळ दीड दोन तास माझ्या आई वडिलांशी छान गप्पा मारल्या. त्यामुळे आमचे कौटुंबिक स्नेहबंध अधिकच घट्ट झाले.

१९८२ मध्ये नागपूर दूरदर्शन केंद्र सुरू झाले आणि महिन्याच्या आतच केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे खाते बदलले. ते रसायन आणि उर्वरक मंत्रालयाचे मंत्री झाले. त्यामुळे रामभाऊ देखील त्याच खात्यात गेले. तरीही दिल्लीत त्यांचा संपर्क होताच. नंतरही वसंत साठेंच्या दौऱ्यात ते मला वृत्त संकलनासाठी सोबत येण्याचा आग्रह धरायचे. त्यासाठी मग दूरदर्शनच्या संचालकांनाही ते पत्र लिहायचे. 

त्याच दरम्यान भारतात आशियाई खेळ स्पर्धा होणार होत्या. या स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि दूरदर्शन छायाचित्रकार कंत्राटी पद्धतीने दिल्लीत ठेवणार होते. त्यासाठी मी प्रयत्न करतो होतो. जर संधी मिळाली तर दिल्लीत राहायला चांगले रेस्ट हाऊस किंवा हॉटेल कोणते आहे या दृष्टीने मी चौकशी करत होतो. जेव्हा रामभाऊंना कळले तेव्हा त्यांनी खांडेकरांचे घर आहे ना तुला, मग इकडे तिकडे कशाला जायचं, असे ठणकावले होते. 

या काळात नागपुरात रामभाऊंच्या पुतणीचे लग्न झाले. त्यावेळी रामभाऊंनी वहिनींसह घरी येऊन निमंत्रण दिले होते. लग्नाचे फोटो काढण्यासाठी त्यांनी मला सांगितले. मी सर्व फोटो त्यांना काढून दिले. सर्व फोटो तयार करून त्यांच्याकडे पोहोचवून दिल्यानंतर त्यांनी मला बिल विचारले. मी काहीच नको असे सांगितल्यावर ते मला रागवले, आणि किमान खर्चाचे पैसे त्यांनी मला घ्यायलाच लावले होते.

१९८४ मध्ये शेवटी शेवटी लोकसभेच्या निवडणुका होणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे त्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासूनच रामभाऊ नागपुरात मुक्कामी होते. त्या काळात वसंतराव साठेंकडे जनसामान्यांची जी प्रलंबित कामे होती तिचा पाठपुरावा करून निवडणुकीपूर्वीच मार्गी लावायचे म्हणून रामभाऊ नागपुरात मुक्काम ठोकून होते. त्या काळात मग नियमित भेटी व्हायच्या. याच दरम्यान दूरदर्शनची देशभरातून खाजगी दूरदर्शन निर्माते तयार करण्याची योजना होती. साठे साहेबांनी एका पत्र परिषदेतच याबाबत सांगितले आणि मला तू प्रयत्न कर मी तुला मदत करतो असे सांगितले. मी जरा विचारात पडलो तेव्हा रामभाऊंनीच मला सांगितले की तू प्रयत्न कर, मी तुला सगळी मदत करतो. त्यानुसार मी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अर्जही केला. रामभाऊंनी तिथे स्वतः लक्ष घालून देशभरातून निवडलेल्या शंभर निर्मात्यांमध्ये माझाही समावेश करून घेतला होता. 

१९८४ च्या शेवटी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला घघघवीत यश मिळाले. वसंत साठेंकडे खाण, कोळसा आणि पोलाद मंत्रालय आले. मात्र त्यावेळी वरूनच पोळी फिरवली गेली. रामभाऊ साठेंकडे न राहता विदर्भातूनच नव्याने निवडून आलेले केंद्रीय मंत्री पी व्ही नरसिंहराव यांचे खाजगी सचिव झाले. तरीही त्यांचा माझा संपर्क कायम राहिला. त्या काळात माझा हा खाजगी दूरदर्शन निर्मितीचा प्रकल्प पाईपलाईन मध्ये होता. त्यावेळी दिल्लीला सातत्याने जावे लागायचे. दरवेळी रामभाऊ घरीच उतरवून घ्यायचे. एकदा दिल्लीचे आरक्षण झाले. दुसऱ्या दिवशी मी निघणार, होतो अचानक आदल्या रात्री रामभाऊंचा मला फोन आला. सध्या दिल्लीत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत आहेत त्यामुळे तू तुझे येणे पुढे ढकल. मी कळविण्यात तेंव्हाच ये. त्यांच्या त्या वेळच्या बोलण्यात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. 

दरम्यानच्या काळात राजकीय उलथापालथी देखील बऱ्याच झाल्या. त्यामुळे काही काळ काँग्रेसचे सरकार गेले. तेव्हा दुसऱ्या कोणत्या मंत्र्याकडे न जाता काही काळ सुट्टी घेऊन रामभाऊ नरसिंहराव सोबतच राहिले. परिणामी पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले, आणि रामभाऊ त्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त झाले. पंतप्रधानांचा विशेष कार्य अधिकारी म्हणजे संपूर्ण देश चालवणाराच असे त्यावेळी बोलले जात होते. त्यामुळे आता रामभाऊंच्या पूर्वीसारख्या भेटी कमी झाल्या. तरीही दिल्लीला गेल्यावर शक्य असले तर ते कधी साउथ ब्लॉकच्या पंतप्रधान कार्यालयात तर कधी ७ रेस कोर्स रोडला पंतप्रधानांच्या बंगल्यात भेटायला बोलावूनच घ्यायचे. रामभाऊंमुळे पंतप्रधानांचे कार्यालय आणि पंतप्रधानांचे निवासस्थान दोन-तीनदा बघण्याची संधी मला मिळाली. 

रामभाऊ पंतप्रधानांकडे असतानाच त्यांचा मुलगा मुकुलचे नागपुरात लग्न झाले. वस्तुतः पंतप्रधानांचे विशेष कार्य अधिकारी असल्याने ते लग्न मोठ्या थाटामाटात होईल असे सर्वांनाच वाटले होते. मात्र रामभाऊंनी अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा आटोपला. उगाच कोणताही वाद नको असे त्यांचे म्हणणे होते. दिल्लीत झालेल्या स्वागत समारंभाला त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले नव्हते. कारण पंतप्रधानांना निमंत्रित केले म्हणजे तिथे सुरक्षा व्यवस्था येणार आणि सर्वांचीच गैरसोय होणार, म्हणून त्यांनी ते टाळले. मात्र दुसऱ्या दिवशी नव्या जोडप्याला घेऊन ते नरसिंहरांवांच्या घरी जाऊन आले होते.

१९९६ मध्ये नरसिंहराव पंतप्रधानपदावरून पाय उतार झाले. तोवर रामभाऊ सुद्धा वयाची साठ वर्षे पूर्ण करून सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. मात्र निवृत्त पंतप्रधानांकडे अखेरपर्यंत प्रथम श्रेणी दर्जाचा एक अधिकारी ठेवता येतो आणि त्याला सर्व शासकीय सवलती मिळतात. त्यामुळे नरसिंहराव साहेबांनी रामभाऊंना अखेरपर्यंत आपल्याकडेच ठेवून घेतले होते. रामभाऊ पंतप्रधानांकडे असतानाच हर्षद मेहता चे ६५ लाखाची बॅग देण्याचे प्रकरण पुढे आले होते. ती  बॅग रामभाउंजवळच दिली असा त्याचा आरोप होता. त्या काळात अधून मधून त्यांचे माझे फोनवर बोलणे व्हायचे. मात्र ते निर्धास्त होते. नरसिंहरावांचे पंतप्रधान पद गेल्यावर त्यांच्या मागे लखुभाई पाठक डायरीचे प्रकरण लागले होते. त्यातही रामभाऊ नरसिंहरावांच्याच जोडीने सर्व आघाड्यांवर संघर्ष करत होते. 

त्या काळातही दिल्लीला गेल्यावर मी रामभाऊंच्या लोधी कॉलनीच्या कॉर्टर वर जात असे. वस्तूतः पंतप्रधानांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांना दिल्लीत चांगला मोठा बंगला मिळाला असता. मात्र घरात दोनच माणसं मोठा बंगला काय करायचा म्हणून रामभाऊ जुन्या क्वार्टर मध्ये राहत होते. मात्र पंतप्रधानांकडे गेल्यापासून त्यांची सायकल सुटली होती. आता दिल्लीत ते बस किंवा मग ऑटो रिक्षाने फिरायचे. 

याच काळात मी रामटेक च्या गडावरून या नावाने एक दिवाळी अंक प्रकाशित करू लागलो. रामभाऊ जवळ विविध अनुभवांचा खजिनाच होता. मग त्यांना दरवर्षी एक विषय देऊन त्यांच्याकडून मी लेख घेऊ लागलो. लेख प्रकाशित झाल्यावर अंक घेऊन त्यांच्याकडे जायचो. अंक ते दरवेळी ठेवून घ्यायचे. मात्र मानधन त्यांनी माझ्याकडून कधीच घेतले नाही.

२००५ मध्ये नरसिंहरावंसे निधन झाले. त्यानंतर रामभाऊंनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांचा स्वतःचा एक फ्लॅट होता तो त्यांनी विकला आणि नागपुरात एक फ्लॅट घेतला.२००६ मध्ये ते नागपुरात राहायला आले. २००५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली, तेव्हा त्यांचे पत्र आले होते. नागपुरात आल्यावर २००६ मध्ये आईचे निधन झाले तेव्हा ते उभयता घरी भेटायलाही आले. 

२००६ पासून अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे २०२१ पर्यंत त्यांचा मुक्काम नागपूरातच राहिला. नागपुरात ते जमेल तेवढे सक्रिय राहिले. कोणतीही जबाबदारी त्यांनी आपल्याकडे ठेवली नाही. संध्याकाळी दोघेही पायी पायीच फिरायला निघायचे. मग खूपदा संध्याकाळी माझ्या घरी चक्कर मारायचे. त्यावेळी आले की सांगायचे  आम्ही आज अनुरूपाच्या (माझी पत्नी )हातची कॉफी प्यायला आलो आहोत. मग कॉफी सोबत गप्पा देखील व्हायच्या .खूप जुने किस्से ते सांगायचे. एकदा घरी एका धार्मिक कार्यक्रमात त्या उभयातांना मेहुण म्हणून आम्ही बोलावले होते. ते दोघेही आनंदाने आले. आमच्या घरी होणाऱ्या बहुतेक सर्व धार्मिक कार्यक्रमात ते आवर्जून यायचे. 

२००९ मध्ये मी आणि माझ्या दोन बहिणींनी आई-वडिलांच्या नावे एक प्रतिष्ठान रजिस्टर केले, आणि त्या बॅनरखाली आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करू लागलो. प्रत्येक कार्यक्रमाला रामभाऊ आणि वहिनी आवर्जून यायचे. एका कार्यक्रमात त्यांच्या लक्षात आले की व्यासपीठावर आम्ही एक जुनाच टेबल क्लाथ टाकतो. आणि त्यावर आई-बाबांचे फोटो ठेवतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रामभाऊ घरी आले. त्यांच्या हातात एक छोटी बॅग होती. ती बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाले यात एक चांगली शाल आहे. यानंतर कोणत्याही कार्यक्रमात ही शाल टेबलवर टाकायची, आणि त्यावर हे फोटो ठेवायचे आणि ही शाल आणि फोटो ठेवण्यासाठी ही बॅग सुद्धा माझ्याकडून तुमच्या प्रतिष्ठानला भेट म्हणून देतो आहे. 

२०१२ मध्ये मी एका रोटरी क्लबचा  सेक्रेटरी झालो. माझ्या पदग्रहण समारंभाला माझे पाहुणे म्हणून मी रामभाऊंना निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते कार्यक्रमाला आले. दोन दिवसांनी रामभाऊ अचानक घरी आले. आणि त्यांनी हातातली एक पिशवी माझ्या हातात दिली. हे काय म्हणून विचारताच, हे सुटाच कापड आहे असे त्यांनी सांगितले. आता तू रोटरीचा सेक्रेटरी झालास. आता लवकरच प्रेसिडेंट सुद्धा होशील मग तुझ्याजवळ चांगला सूट असायला हवा. त्यासाठी हा माझ्या कडला स्वतःचा कपडा तुला देतो आहे. याचा चांगला सूट शिव असे त्यांनी फर्मान काढले. त्यावेळी मी नुकताच सेक्रेटरी झालो म्हणून एक नवा सूट शिवलाच होता. तेव्हा आता अजून एका सूटची गरज काय असे मी विचारले. तर रामभाऊ म्हणाले तो साधा सूट होता. हा तू जोधपुरी सूट शिव आणि सूट शिवला की मला दाखवशील असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार २०१४ मध्ये जेव्हा रोटरीचा अध्यक्ष झालो, तेव्हा नवा जोधपुरी सूट सूट शिवला होता. त्यावेळी देखील पदग्रहण समारंभाला रामभाऊ आवर्जून आले होते.

२०१५-१६ च्या दरम्यान वहिनींचे निधन झाले. त्यावेळी मध्यरात्री मला रामभाऊंचा फोन आला. वहिनी गेल्याची बातमी कळताच  त्यांना मी स्वतःच घरी येतो असे म्हणालो. तर त्यांनी तसे न करता तू सकाळी फक्त लवकर ये. कारण इथे मुकुलही नाही. तो अकरा पर्यंत येऊन पोहोचेल. तेव्हा बंडूला (रामभाउंचा धाकटा भाऊ) मदत करायला तू राहा असे त्यांनी मला सांगितले होते. त्यानुसार मी सकाळी सात वाजताच पोहोचलो. अकराच्या विमानाने मुकुल सहकुटुंब आल्यावर वहिनींचा अंत्यसंस्कार पार पडला होता. 

वहिनी गेल्यापासून रामभाऊ जरा एकटे पडले होते. अर्थात मग अधून मधून मुंबईत असलेल्या मुकुल कडे ते जाऊन यायचे. नागपूरला आले की मी त्यांच्याकडे चक्कर मारत असे. बरेचदा तेही संध्याकाळचे घरी येऊन जायचे. दै. लोकसत्ताने त्यांना सत्तेच्या पडछायेत ही लेखमालिका लिहिण्याचा आग्रह धरला होता. ही लेखमालिका म्हणजे रामभाऊंचे आत्मचरित्र होते. त्यावेळी त्यांना होकार कळवण्यापूर्वी ते माझ्याकडे आले. मग माझ्याच कारने आम्ही दोघेही विंग कमांडर अशोक मोटेंकडे गेलो आणि तिथे चर्चा करून त्यांनी लोकसत्ताला होकार कळवला. त्यानंतर वर्षभर ती लेखमालिका सुरू राहिली. राजहंस प्रकाशननी त्याचे पुस्तक काढायचे ठरवले तेव्हाही रामभाऊंनी मी आणि अशोक मोटेंशी चर्चा केली होती. मगच त्यांनी राजहंसला होकार दिला होता. लवकरच ते पुस्तक प्रकाशितही झाले. 

२०२० मध्ये कोरोना सुरू झाला. त्यामुळे लोकांचे बाहेर फिरणे बंदच झाले होते. माझ्याजवळ अधिस्वीकृती धारक पत्रकार असल्याचे कार्ड असल्यामुळे मी बाहेर फिरू शकत होतो. त्याचा फायदा घेऊन मी अधून मधून रामभाऊंकडे चक्कर मारत असे. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडू लागली. मग मुकुल आणि सुनबाई दीर्घकाळ येथे येऊनही राहिले. मात्र त्यांची प्रकृती खचतच गेली. 

२०२१ च्या जून महिन्यात एका सकाळी उठल्यावर सहज मोबाईल बघितला तर मध्यरात्री रामभाऊ खांडेकरांच्या फोनवरून मिस्ड कॉल दिसला. मी लगेच फोन लावला. तेव्हा मुकुलनेच मला बातमी दिली, काका बाबा मध्यरात्रीच गेले मी तुम्हाला कळवायला फोन लावला. पण मग इतक्या रात्री कशाला उठवा म्हणून मी फोन कट करून टाकला. त्या काळात कोरोनाची जबरदस्त लाट होती. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी पंधरा माणसांच्या वर जाता येत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील जाऊ शकलो नाही. मग घरी मुकुलला जाऊन भेटून आलो. आता मुकुल मुंबईलाच मुक्कामी असतो. येता जाता लक्ष्मी नगरात सारस अपार्टमेंट वरून गेलो की हमखास रामभाऊंची आठवण येते. त्यांच्या आठवणी कायम मनात साठवलेल्या राहणार आहेत. 


       अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.