कालचक्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म. वि. आ. तील घटक पक्ष एकत्र नांदतील का?
कालचक्र
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म. वि. आ. तील घटक पक्ष एकत्र नांदतील का?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा महाआघाडी तील सर्व घटक पक्ष एकत्र नांदणार का यावर अटकळी बांधणे सुरू झाले आहे. बाहेरच्यांचे तर सोडा पण महाआघाडीतील पक्षांचे नेतेच आता याबाबत शंका व्यक्त करताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता तशी शंका व्यक्त केली आहे. दैनिक सामनाला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी महाआघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या चुकांमुळे लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असतानाही त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो याची खंत व्यक्त केली आहे. आणि असे चालू राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एकत्र राहायचे किंवा नाही याचाही विचार करण्याचे संकेत दिले आहेत.
शिवसेना एकसंघ असताना १९९५ मध्ये शिवसेनेला विधानसभेत घसघेशित यश मिळाले होते त्यानंतर १९९९ मध्ये त्यांचा आलेख घसरला. याच काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. त्यानंतर शिवसेनेला दोन मोठे झटके बसले. एक तर नारायण राणे शिवसेनेपासून वेगळे झाले आणि त्या पाठोपाठ घरातलाच माणूस असलेल्या राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली. परिणामी २००९ मध्ये शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेते पद सुद्धा राहिले नव्हते.
मात्र परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता न आल्यामुळे २०१४ विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी अडवणुकीचे धोरण स्वीकारले. परिणामी भाजपने त्यांच्यासोबतची युती तोडली. ऐनवेळी स्वबळावर लढवताना त्यांना आपली पुरेशी ताकद सिद्ध करता आली नाही. मग नाक मुठीत धरून भाजपसोबत सत्तेत जावे लागले होते. तशाही परिस्थितीत २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा भाजपसोबत मुजोरी केली आणि त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याशिवाय त्यांना मुंबई महापालिकेतील सत्ता राखणे सुद्धा कठीण झाले होते. तरीही त्यांनी २०१९ मध्ये एकत्र निवडणुका लढवून ऐनवेळी भाजपला धोका देत सत्तेसाठी युती पुन्हा एकदा तोडली. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनाच फुटली. आमदारांचा मोठा गट सोबत घेऊन एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि भाजपसोबत सरकार बनवले. नंतर खरी शिवसेना आमचीच हे शिंदेंनी आज तरी कागदोपत्री सिद्ध केलेले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर महाविकास आघाडीत एकत्रितपणे निवडणुका लढवून सुद्धा महाआघाडीची देखील दाणादाण उडाली, तर शिवसेनेचे पुरते पानदान वाजलेले आहे.जेमतेम वीस आमदार त्यांच्या खात्यावर राहिले आहेत. अशावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरे जायचे आहे.
बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा आधार शोधत आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही आज फारसा जनाधार असल्याचे दिसत नाही. विधानसभेत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. तरीही दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार घडेल हा विश्वास (अंधविश्वास) उद्धव ठाकरे बाळगून आहेत. अर्थात राज ठाकरेंनी अजूनही त्यांना हिरवी झेंडी दाखवलेली नाही.
मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जायला तयार नाहीत. काँग्रेसने तर जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात परप्रांतीयांना विरोध करते त्यांच्यासोबत आम्ही कसे जाणार असा प्रश्न विचारला आहे. त्याचवेळी शिवसेनेचे हीज मास्टर्स व्हॉइस संजय राऊत हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मतानुसारच युती आणि आघाडी करायची असते असे सांगत आहेत. त्यामुळे एकंदरीतच स्थानिक विकास स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कितपत एकत्र राहतील हा प्रश्नच आहे.
नेमके याचवेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार ठरवण्यालाच खूप वेळ केला, त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही आणि आम्ही जागा गमावल्या असा दावा केला आहे. उद्धव ठाकरे देखील हाच राग आळवताना दिसत आहेत. आघाडीमुळे अनेक आमच्या हमखास निवडून येणाऱ्या जागा मित्र पक्षांना द्याव्या लागल्या आणि त्या जागा गमावल्या असा दावा केला आहे. हे बघता आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर सोडायला सुरुवात करणार आणि तेच निमित्त साधून एकमेकांपासून वेगळे होतील हे भविष्य सांगायला आता कोणत्याही ज्योतिष्याची गरज उरलेली नाही. विशेष म्हणजे तीनही पक्षांमध्ये एक एक तरी बोलबच्चन नेता आहेच. त्यामुळे तिघांमध्येही भांडणे लागत राहणार. त्यात जागा वाटपाचे वेळी तीनही पक्षांमध्ये त्यातही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये प्रचंड तणातणी होणार. त्यावेळी शरद पवार बाजूला बसून गंमत पाहणार. परिणामी प्रत्येक जण स्वबळावर लढणार आणि महायुतीसाठी रस्ता मोकळा करून देईल ही शक्यता नाकारता येत नाही. अर्थात राजकारणात काहीही निश्चित नसते. आज सकाळचे चित्र संध्याकाळपर्यंत केव्हाही बदलू शकते. तसे झाले तरच काही शक्य आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेचीच पुनरावृत्ती होईल अशी चिन्ह दिसत आहेत.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment