कृषि महाविद्यालय मूल, येथे नेत्रदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन

 कृषि महाविद्यालय मूल, येथे नेत्रदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन

मूल ०९ जुलै: दीपक देशपांडे 

कृषि महाविद्यालय मूल येथे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. व्ही. जी. अतकरे आणि डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या हे होते. नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे सन २०२५ चे ब्रीद वाक्य *“ Everyday Heroes”* हे आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावर *२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर* या कालावधीला नेत्रदान जागृती पंधरवाडा म्हणून संबोधले जाते. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. नागेश नवघरे यांनी प्रास्ताविक करतांना नेत्रदान म्हणजे काय? ते कधी केले जाते? डोळ्यांच्या  नेमके कोणत्या भागाचे प्रत्यार्पण केले जाते या विषयाची माहिती देत कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे महत्त्व समजून घेत महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री. अभिनव टाले व कु. ऋतुजा भैसारे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

डॉ. विशाखा डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक यांनी अवयवदान, नेत्रदान यांचे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे कि, एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात. मानवी शरीरात डोळे हे अतिशय महत्त्वाचे अंग असून काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत. सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही या व्यक्तींना नेत्र मिळाले तर ते सृष्टीचा आनंद घेऊ शकतील असेही त्या बोलत होत्या. 

तसेच डॉ. भूषण ठाकरे यांनी आपल्या मनोगतात नेत्रदान व रक्तदान याचे महत्व सांगत आपल्या मृत्यु नंतरही आपण कुणाची मदत करू शकत असलो तर ते चांगलेच आहे. त्यापासून आपल्याला काहीच नुकसान नाही हे पटवून दिले.

डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी नेत्राविशारद  डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्रदान दिवस साजरा केला जातो असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. त्याचबरोबर त्यांनी दृष्टी जाण्याचे काही उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले कि छोट्या छोट्या कारणाने आपण सजग नसल्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात. माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल. याचबरोबर नेत्रदान कोण करू शकतात व कोण करू शकत नाही याबद्दल विस्तृत माहिती दिली. नेत्रदान एक वर्षाच्या बालकांपासून वृध्दांपर्यंत कोणतीही व्यक्ती करू शकतात त्यासाठी फक्त एड्स, हिपेटेटीस- बी, सेप्टीसिमिया इत्यादी गंभीर आजार असले रुग्ण नेत्रदान करू शकत नाही याविषयी विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गास नेत्रदान अभियानात सहभागी होऊन सर्वांनी नेत्रदान करावे असे आवाहन केले. 

कार्यक्रमादरम्यान ७० उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांपैकी नेत्रदानासाठी  १३ प्राध्यापक व  १३ विद्यार्थी  यांनी सहमती दर्शविली व सोबतच त्याविषयीचे आवेदन पत्रक सुद्धा भरून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नागेश नवघरे यांनी केले  व कार्यक्रमाची सांगता डॉ. खुशाल राठोड यांनी महाविद्यालयीन जीवनात अशा कार्यक्रमात स्वतः स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामांचे अनुभव सांगत आभारप्रदर्शनाने केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी उत्फूर्तपणे हातभार लावला.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.      

                     9403285344  

              ✍️ Ddbatmi@M2M ✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.