१३जुलै.... ८३ व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री कमलताई गवई :-जशा दिसल्या तशा
१३जुलै.... ८३ व्या वाढदिवसानिमित्त
मातोश्री कमलताई गवई :-जशा दिसल्या तशा
गेल्या दोन वर्षापासून मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई या मिशन आयएएसमध्ये सक्रिय सहभागी झाल्या आहेत. खरं म्हणजे त्यांना आमचे हे मिशन आय ए एस आवडलं. रोजच्या पाच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा आमचा संकल्प आहे. पण कमलताईंचे म्हणणे आहे यांची संख्या अजून वाढवा. मग आम्ही समाज कल्याणचे वस्तीगृह आदिवासी वस्तीगृह यामध्ये शाळा सुटल्यानंतर देखील कार्यक्रम घ्यायला लागलो. एवढे कार्यक्रम घेऊनही त्या थकत नाहीत. खरं म्हणजे आज त्यांचे वय ८३ आहे. याशिवाय त्यांच्या पायांचे ऑपरेशन देखील झालेलं आहे. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नातीच्या लग्नाला त्या मुंबईला गेल्या होत्या. आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरच त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या. ऑपरेशन्स करावे लागले. पण त्यांचा आत्मविश्वास प्रचंड असल्यामुळे त्या लवकरच ठणठणीत झाल्या. आजही वयाच्या मानाने त्या ठणठणीतच आहेत. त्याचे श्रेय मी विपश्यनेला देतो .त्यांच्या परोपकाराला देतो ,त्यांच्या सकारात्मक विचारसरणीला देतो. त्यांच्या मंगल मैत्रीला देतो..
३६५ दिवसांपैकी किमान १०० दिवस आम्ही सोबत असतो. कार्यक्रम कुठेही असो. सोलापूरला असो की परभणीला असो. की गडचिरोलीला .निमंत्रण आलं की ताई नाही म्हणत नाहीत. परवा त्यांना बेंगलोर आणि चेन्नईच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आलं.. ते कार्यक्रम चार आणि पाच जुलैला होते आणि मला सहा तारखेला जीवनगौरव पुरस्कार अमरावतीला मिळणार होता. त्यानिमित्त आमच्या शोभाताईंनी परिवर्तन प्रबोधिनीतर्फे विचारवेध साहित्य संमेलनामध्ये त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शोभाताईंनी कमलताईंची तारीख अगोदरच घेतली होती. चेन्नईचे निमंत्रण आल्यानंतर चेन्नईवाल्यांचे असे म्हणणे होते की ताई तुम्ही या इकडे येत आहात तर दोन-तीन दिवस राहा .पण त्यांनी चक्क नकार दिला .त्या म्हणाल्या मी सहा जुलै ही तारीख अमरावतीला दिलेली आहे. मी दिलेली तारीख टाळू शकत नाही आणि धावत पळत त्या विमानाने आमच्या कार्यक्रमासाठी चेन्नईवरून अमरावतीला आल्या. वाटेत बंगलोर विमानतळावर त्या खुर्चीवरून पडल्या. हाताला दुखापत झाली. पण लगेच ड्रेसिंग करून त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
ताई मला त्यांचा मानसपुत्र मानतात. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट झाली. आमचा परिचय पन्नास वर्षे जुना आहे.. दादासाहेब गवई यांच्यामुळे तो झाला. पुढे माझी बहीण निर्मला त्यांच्याच महाविद्यालयामध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून रुजू झाली. म्हणजे काय त्यांनीच तिला लावून घेतले. त्यावेळेस आमची परिस्थिती चांगली नव्हती. ताईंना मी शब्द टाकला आणि त्यांनी तो पाळला.
त्यांनी या ८३ वर्षात जे काम केले त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होऊ शकतो.. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्या सतत काम करीत असतात. आम्ही थकतो. पण त्या थकत नाहीत .त्याला कारण विपश्यनाच आहे.
रोज पाच झाडे लावायचा हा संकल्प त्यांनी केलेला आहे.. काँग्रेसनगरमधील आपल्या घराच्या डिव्हायडर पासून त्यांनी सुरुवात केली. आज तुम्ही जर काँग्रेसनगरमधील त्यांच्या कमलपुष्प या निवासस्थानी गेले तर तुम्हाला इथून तिथपर्यंत झाडे लावलेली दिसतील. उन्हाळ्यातील या झाडांना जगविण्याचे काम कमलताईनी केलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे की आपण वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केले नाही तर कोरोना यायला वेळ लागणार नाही. त्यापासून बचाव करायचा असेल तर आपण झाडे लावली पाहिजेत .पण या कामाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे.
इगतपुरीचे विपश्यना केंद्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गोयनका गुरुजींनी या जगाला एक आगळीवेगळी अमूल्य भेट दिलेली आहे. ताईंनी या केंद्राची शाखा छत्रीतलाव भानखेड भागातील मोगरा येथे केलेली आहे. या विपश्यना केंद्रात बाराही महिने विपश्यनेची शिबिरे सुरू असतात. विपश्यना शिबिराला शुल्क नसते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटेल ते दान तुम्ही देऊ शकता. नाही दिले तरी कोणी काही म्हणत नाही. आपल्या विदर्भातील लोकांची देण्याची प्रवृत्ती थोडी नाजूकच आहे. प्रत्येक शिबिरामध्ये तूट येते आणि कमलताई ती तूट स्वतः भरून काढतात.. शिबिराच्या शेवटच्या दिवशी ताई आवर्जून जातात .सर्व पेमेंट करतात.विपश्यनेला त्यांनी जे वाहून घेतले आहे ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचा उत्साह त्यांची काम करण्याची प्रवृत्ती त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा आत्मविश्वास याही वयात कायम आहे आणि तो कायमही राहणार आहे..
दादासाहेबांना समर्थपणे साथ कमलताईंनी दिली आहे. दादासाहेब राजकारण पाहायचे .शैक्षणिक संस्था घरदार नातेवाईक कार्यकर्ते कमलताई सांभाळायच्या. सुरुवातीला परिस्थिती चांगली नव्हती. पण त्याही परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे योग्य आदरतिथ्य केले आहे. आजही त्यांच्याकडे तुम्ही केव्हाही गेले तर ताई जे आदरतिथ्य करतात ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.
गवई परिवारामध्ये एक चांगला पायंडा ताईने पाडलेला आहे. दादासाहेबांबरोबर किंवा त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांबरोबर सर्वांची तर त्या काळजी घेतातच. पण त्यांच्या बरोबर आलेल्या चालकाचे देखील आदरतिथ्य झाले की नाही याचीही त्या आवर्जून चौकशी करतात.. दादासाहेबांबरोबर आलेले पोलीस जेवले की नाही तेही ताई स्वतः पाहतात. नाहीतर अनेक लोकप्रतिनिधीकडे पोलिसांच्या वाट्याला उपासमारच येते. ताई जर बाहेर असल्या आणि त्यांना चालक दिसला तर ताईंचा हात पर्सकडे जातो. त्यातून त्या एक नोट काढतात आणि चालकाच्या हातात देतात .
ताईंचा आणि आमच्या दौरा सकाळी साडेसहाला सुरू होतो. त्या वेळेचे तंतोतंत पालन करतात .एक मिनिट पण लेट होत नाहीत .आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो. मी स्पर्धा परीक्षा व आयएएसबद्दल सांगतो. ताई त्यांचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई हे कसे घडले. याविषयी विद्यार्थ्यांना सांगतात. एक शाळा संपली की दुसरी. दुसरी संपली की तिसरी. अशा किमान पाच शाळांना आम्ही रोज भेटी देतो .तिथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतो. जेवण मात्र कुठेच करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जेवण करण्यात एक तास घालविण्यापेक्षा त्यापेक्षा त्या वेळात एक शाळा जास्त होते. आम्ही उपाशी राहू नये म्हणून त्यांच्या गाडीमध्ये जेवणासाठी अल्पोपहारासाठी आवश्यक ते साहित्य सदैव असते..
आज त्यांचे सुपुत्र न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश झाले आहेत. दादासाहेबांना तर राजकारणामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण ते काम समर्थपणे ताईंनी केले. भूषण सर अमरावतीला सर्वसामान्य महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले. ती शाळा अमरावतीच्या फ्रेजरपुरा या भागातील होती. ते मराठी माध्यमातूनच शिकले. पण त्यांना लहानपणापासून ताईंनी वाचनाची आवड लावली. त्यामुळे त्यांनी शालेय जीवनातच स्वतःचे ग्रंथालय तयार केले. त्यांच्यावर ताईंनी योग्य संस्कार केले. त्यामुळे आज भारताच्या एवढ्या मोठ्या उच्च पदावर भूषण सर विराजमान झालेले आहेत. ताईंची विनम्रता त्यांचे आदरतितथ्य ताईंची कोमलता त्यांच्या ठिकाणी सातत्याने दिसून येते. त्यामुळे अल्पावधीमध्ये त्यांनी भारतभर लोकप्रियता मिळविली आहे. याचे गुपित म्हणजे त्यांनी भूषणसरांवर केलेले योग्य संस्कारच आहेत. म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. या म्हणीप्रमाणे ताईंनी काम केले आहे आणि ते आज समाजासमोर आहे.
त्यांच्याकडे जे पाहुणे येतात त्यांचे आदररतिथ्य करण्याची त्यांची आगळी वेगळी पद्धत आहे. पद्धत अशी आहे की तो माणूस ती आयुष्यभर विसरू शकत नाही. ताईंकडे जेव्हा पाहुणे येतात. तेव्हा ताई प्रवेशद्वारापासून तर स्व. दादासाहेब गवई यांच्या घरातील स्मारकापर्यंत वाटेवर फुलांचा गालिचा करून ठेवतात. पाहुण्यांनी जसा प्रवेशद्वारांवर प्रवेश केला की त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या उधळण्यात येतात. सुरुवात ताईपासून होते आणि स्मारकापर्यंत जाईपर्यंत त्यांचे सहकारी ते मग स्त्री असो की पुरुष पाहुण्यांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत असतात. स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर तिथे ताई पाहुण्यांची आरती करतात आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करतात. पाहुणे जर पुरुष असले तर त्यांचे सत्कार करण्याचा मान मला प्राप्त होतो. तत्पूर्वी महात्मा गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्व. दादासाहेब गवई यांच्या छोटेखानी पुतळ्यासमोर प्रार्थना होते आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा गालीचा तयार करणे. तुमच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या उधळणे. त्यांना आरतीने ओवाळून त्यांचे स्वागत करणे व प्रत्येकाला शाल देणे ही गोष्ट मला वाटते अमरावती शहरात फार कमी ठिकाणी आहे.जवळजवळ नाहीच आहे. पण ताईने तो एक चांगला पायंडा पाळलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला माणूस त्यांचे आदरतिथ्य आयुष्यभर विसरत नाही
ताईंचा आज ८३ वा वाढदिवस. वयाचे ८३ वर्ष आटोपल्यानंतरही त्यांचा उत्साह अजूनही कायम आहे. सतत कार्यक्रमांना जातात .कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात .सर्वांना मंगल मैत्री देतात. वृक्षारोपण वृक्ष संवर्धन विपश्यना याचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करतात. आणि एवढे करूनही त्या थकत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं. या आमच्या आईसाहेबांना चांगले सुखी संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच मनोमन प्रार्थना .
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक,मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
.

Comments
Post a Comment