७/१२ उताऱ्यासंदर्भात मोठी बातमी! १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार!
७/१२ उताऱ्यासंदर्भात मोठी बातमी! १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार!
दीपक देशपांडे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी भूमी अभिलेख विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
१ ऑगस्ट २०२५ पासून राज्यभरात नागरिकांना ७/१२ उतारा, ८अ उतारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड यांसारखी महत्त्वाची जमीनसंबंधी कागदपत्रे थेट मोबाईलवर व्हाटस् अप च्या माध्यमातून मिळणार आहेत.
ही सेवा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात, अधिकृत आणि अत्यल्प शुल्कात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता सेतू केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे किंवा दलाल मंडळींवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार असून, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यापूर्वी अनेक शेतकरी जमीन कागदपत्र मिळवण्यासाठी खासगी एजंट किंवा खाजगी सायबर कॅफेवर जात असत, जिथे त्यांना अधिक पैसे द्यावे लागत असत. काही वेळा दस्तऐवजांची प्रत पेनड्राइव्ह किंवा इतर स्वरूपात दिली जात असे, ज्यामुळे त्याच्या दुरुपयोगाची शक्यता होती. आता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, सरकारी आणि थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे, हे या निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
ही सेवा मिळवण्यासाठी नागरिकांनी प्रथम राज्याच्या अधिकृत भूमी अभिलेख पोर्टलवर म्हणजेच https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे. नोंदणी करताना नागरिकाने आपली मालकी जमीन असल्याचा पुरावा, जसे की जुना ७/१२उतारा, खाते क्रमांक किंवा मिळकत क्रमांक देणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर OTP द्वारे पडताळून नोंदणी पूर्ण केल्यावर, नागरिकांना व्हाटस् अप वरून थेट सेवा मिळू लागेल. नोंदणीसाठी केवळ एकदाच ५० रुपयांचे शुल्क लागणार असून, यानंतर प्रत्येक कागदपत्र मिळवण्यासाठी केवळ १५ रुपये आकारले जाणार आहेत.
या सेवेअंतर्गत तीन प्रकारच्या मुख्य सेवा दिल्या जातील. पहिली म्हणजे माहिती सेवा, ज्यामध्ये नागरिकांना जमीनसंबंधी कायदे, फेरफार प्रक्रियेची माहिती, दस्तऐवजांचा उपयोग अशा बाबींबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन मिळेल. दुसरी म्हणजे सुविधा सेवा, ज्यामध्ये शेतकरी आणि नागरिक ७/१२, ८अ, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड यांचे डिजिटल आणि प्रमाणित स्वरूपात उतारे व्हाटस् अप वरून थेट मिळवू शकतील. तिसरी सेवा म्हणजे सूचना सेवा, ज्यात तुमच्या जमिनीच्या नोंदीत काही बदल झाला, जसे की खरेदी-विक्री, फेरफार, नाव बदल इत्यादी, तर त्याची थेट माहिती मोबाईलवर मिळेल. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल आणि मालकी हक्काचे संरक्षण अधिक मजबूत होईल.
ही संपूर्ण सेवा सरकारी अधिकृत प्रणालीद्वारे चालवली जाणार असून, त्यामुळे दस्तऐवजांची विश्वासार्हता वाढणार आहे. दलाल आणि एजंटांची गरज संपल्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येणार आहे. ही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांकडे आता स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. व्हाटस् अप वापरण्याचे ज्ञान सर्वसामान्यांना असल्यामुळे ही सेवा वापरणे अतिशय सोपे होणार आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment