गोगाव येथे RAWE अंतर्गत बीजपात्र तयारीवर कृषिदूतांचे व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
गोगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत बीजपात्र तयारीवर कृषिदूतांचे व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न (गोगाव, ता. आरमोरी, जि. गडचिरोली)
दीपक देशपांडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, मूल-मारोडा येथील बी.एस्सी. (कृषी) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत गोगाव गावात "बीजपात्र (Seedbed) तयारी" या विषयावर एक विशेष जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बी बियाणे पेरणीपूर्व मृदाची शास्त्रीय तयारी कशी करावी याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन देणे आणि उत्पादनाचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक गोष्टी समजावून सांगणे हा होता.
कृषिदूतांनी प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना सांगितले की, बीजपात्र तयारी ही पीक उत्पादनाची अत्यंत महत्त्वाची व प्रारंभिक पायरी आहे. योग्यप्रकारे तयार केलेली बीजपात्र जमीन भुसभुशीत, समतल, उपजाऊ, रोगमुक्त आणि पुरेशी आर्द्रता युक्त असते. यामुळे बियाण्यांना अंकुरणासाठी आदर्श परिस्थिती प्राप्त होते. परिणामी उगमशक्ती वाढते, रोपांची प्रारंभिक वाढ सशक्त होते आणि एकूण उत्पादनात मोठी वाढ होते. बीजपात्र तयारीमध्ये खोल नांगरणी, दोन-तीन वेळा कुळवणी, समतल पाटा फिरवणे, सेंद्रिय खतांचा समावेश, माती परीक्षणानंतर योग्य खतांचा वापर, pH संतुलन राखणे, नमी व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पाण्याचा योग्य निचरा यांचा समावेश अत्यावश्यक असतो.
प्रशिक्षणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष तांत्रिक प्रात्यक्षिक सादर केले. शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न समजावले व उत्तरं दिली. त्यांनी असेही स्पष्ट केले की जर बियाण्यांची योग्य खोली व योग्य अंतर राखून पेरणी केली, तर उगम एकसमान होतो व रोगप्रवणता कमी होते.
या कार्यक्रमात कृषीदूत ओमप्रकाश वाकडे, राहुल चिखलोंढे, आयुष अंभोरे, विशाल तोंडफोडे, त्रिकोण रंदये, कृषी सहाय्यक तसेच गोगाव गावातील इतर स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचे कौतुक करत असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी महाविद्यालयाचे सह अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे, कृषी संशोधन केंद्र, सोनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. युवराज खोबरागडे, कृषी शास्त्र विषयतज्ज्ञ प्रा. मोहिनी पुनसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. रामकांत गजभिये आणि डॉ. अश्विनी गायधनी यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे शक्य झाली. त्यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन उपाय सुचवण्याचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
RAWE कार्यक्रमामुळे विद्यार्थी प्रयोगशाळेच्या बाहेर येऊन थेट शेतांमध्ये काम करतात व आपले शैक्षणिक ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणतात. असे कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त नाहीत तर ग्रामीण भागात वैज्ञानिक शेतीच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करत आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment