सहज सुचलं म्हणून बकऱ्यांची कुर्बानी आणि नितेश राणेंचे वक्तव्य
सहज सुचलं म्हणून
बकऱ्यांची कुर्बानी आणि नितेश राणेंचे वक्तव्य
बकरी ईद हा मुसलमानांचा एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी मुस्लिम नागरिक आपल्या ऐपतीनुसार अल्लाला बकऱ्याची कुर्बानी देतात. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
यंदा मात्र या परंपरेमुळे वाद निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली आहे. निमित्त झाले आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे. बकऱ्यांच्या कुर्बानीमुळे अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ही प्रथा बंद व्हावी आणि व्हर्चुअल पद्धतीने कुर्बानीचा विधी केला जावा अशी सूचना नितेश राणे यांनी केली आहे. त्याला राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी लगेच तितक्याच कडक शब्दात उत्तर देखील दिले आहे.त्यावरून वाद होणार की काय अशी चिन्ह दिसत आहेत.
वस्तुतः बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा का पडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काही मुस्लिम जाणकारांकडून माहिती मिळाली की, समस्त मुस्लिमांचे दैवत असलेल्या अल्लाच्या मनात त्याचा निस्सिम भक्त असलेल्या हजरत इब्राहिम ची परीक्षा घेण्याचे आले. अल्लाने इब्राहिमला तो खरा भक्त असेल तर त्याने आपल्या पोटच्या मुलाची मला कुर्बानी द्यावी अशी मागणी केली. इब्राहिमने अल्लावर असलेल्या श्रद्धेपोटी पोटाच्या मुलाची कुर्बानी देण्याची तयारी केली. मुलाला त्याने समोर ठेवून त्याची मान छाटण्याची तयारी केली, आणि अचानक त्याने बघितले तर त्याच्या मुलाच्या जागी एक बकरा उभा होता. मग इब्राहिमने त्या बकऱ्याची कुर्बानी दिली आणि त्यायोगे अल्लानेच इब्राहिमच्या मुलाचे प्राण वाचवले. या प्रसंगाचे स्मरण म्हणून दरवर्षी त्या विशिष्ट दिवशी सर्व मुस्लिम अल्लाला बकऱ्याची कुर्बानी देतात अशी माहिती मिळाली.
आपल्या दैवताला पशु पक्ष्यांचे बळी देण्याची प्रथा हिंदू धर्मात देखील होती. आपल्यात विशेषतः आदिवासी समाजात नरबळी देण्याची देखील प्रथा होती. मात्र अशा प्रथांवर कायद्याने बंदी घालण्यात आली. तेव्हापासून नरबळी देण्याची प्रथा तर पूर्णतः बंद झाली आहे, आणि त्याचबरोबर पशूंचे किंवा पक्ष्यांचे बळी देण्याची प्रथा सुद्धा हळूहळू कमी होत गेलेली आहे. मात्र आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने मुस्लिमांवर अशा प्रकारची कोणतीही बंदी घातलेली नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये भारतातही अजूनही बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अल्लाला मुस्लिमांनी कुर्बानी द्यावी अशी प्रथा निश्चित आहे. मात्र ज्यांची ऐपत आहे अशांनीच ही कुरबानी द्यावी असेही नमूद केलेले आहे. गरिबांना या प्रथेतून सूट आहे असेही सांगण्यात आले. अशाच ज्याची ऐपत आहे अशाच मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची ही कुर्बानी द्यावी. कुर्बानी दिलेल्या बकऱ्याच्या मासाचे तीन भाग केले जावे. त्यातील एक भाग कुर्बानी देणाऱ्याने आपल्या कुटुंबीयांसाठी ठेवावा. एक भाग नातेवाईक आणि इष्टमित्रांमध्ये वाटावा, तर एक भाग गोरगरिबांना वाटून टाकावा, अशीही प्रथा आहे. त्यामुळे जे गोरगरीब एरवी परिस्थितीमुळे मांसाहार करू शकत नाहीत, त्यांना वर्षातून एकदा तरी असा बकऱ्याचा मांसाहार करायला मिळावा ही त्या मागची संकल्पना असल्याचेही सांगण्यात आले. ही कुर्बानी दिल्यानंतर सर्व जागा स्वच्छ केली जावी आणि अनावश्यक भाग पुरून टाकला जावा. जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, असाही नियम असल्याची माहिती आहे. मात्र हा नियम पाळला जात नाही अशी जनसामान्यांची तक्रार आहे.
मुस्लिम समाजातील जाणकारांच्या मते अशा कुर्बानी मागे फक्त धार्मिक भावना आहे असे नाही, तर त्यामागे आर्थिक चक्र सुरू राहावे ही देखील भावना आहे. कुर्बानीच्याय निमित्ताने धनगराकडून किंवा शेतकऱ्याकडून मुस्लिम बकरा किंवा बकरी विकत घेतात. त्यामुळे त्या धनगराच्या कुटुंबाची त्यादरम्यान का होईना पण क्रयशक्ती वाढते आणि त्यायोगे अर्थ चक्र सुरू राहते.
मात्र हे अर्थचक्र सुरू ठेवताना निरपराध बकऱ्यांची मात्र मान छाटली जाते. मुळात एक बकरा किंवा एक बकरी कापली तर त्यावेळी त्या पशुचे मांस सगळ्यांना खायला मिळते. मात्र ज्या शेतकऱ्याकडून तो पशु विकत घेतलेला असतो त्याचा तत्कालीक फायदा होत असला तरी दीर्घ मुदती नुकसानच होत असते. इथे काही पशुवैद्यकांशी चर्चा केल्यानंतर सांगण्यात आले की बकरी किंवा बकरा जन्माला आल्यानंतर साधारणपणे १४ ते १५ वर्ष जगतो. हा प्राणी जन्माला आल्यावर वर्षभरातच कुर्बानीलायक झालेला असतो. मात्र एक बकरी जगली तर तिचे वर्षातून किमान दोनदा प्रजनन होते. तिला दरवेळी किमान दोन तरी पिल्ले होतात. म्हणजे वर्षाला किमान चार नव्या बकऱ्या किंवा बकरे तयार होत असतात. या हिशोबाने जर त्या बकरीची जननक्षमता दहा वर्षाची पकडली तरी त्यातून ४० नवे पशु तयार होतात. परिणामी त्या बकरी मालकाची श्रीमंती देखील वाढते. जर ती मादी बकरी असली तर ती किमान ४० नव्या पशुंना जन्म देते आणि एक नर पशु म्हणजेच बकरा असला तर तो देखील एका वेळी दोन ते तीन बकऱ्यांना गर्भधारणा होईल इतका सक्षम असतो. त्यामुळेच आज विविध सरकारी योजनांमध्ये शेतकऱ्यांना जेव्हा शेळ्या दिल्या जातात तेव्हा चार शेळ्या आणि एक बोकड दिला जातो. जेणेकरून या चार शेळ्यांची संख्या एका बोकडाच्या मदतीने हळूहळू वाढत जाते.
आज एक बकरी कापली तर काही दिवस तिचे मांस भक्षण करण्याचा आनंद जरूर मिळेल. मात्र तीच बकरी जगली तर पुढली काही वर्ष नवीन बकऱ्यांना जन्म देते. त्याच दरम्यान तिचे जे दूध निघते त्यातही वैद्यकीय गुणधर्म आहेत. त्यामुळे लहान मुले आणि पोटाचे विकार असणारे ज्येष्ठ नागरिक यांना हे दूध उपयोगाचे ठरते. त्यामुळे पुढली दहा ते बारा वर्ष तो धनगर किंवा शेतकरी ते दूध विकून पैसा कमावू शकतो. बकरीच्या दुधातील गुणधर्मामुळेच महात्मा गांधी हे बकरीचेच दूध प्राशन करायचे असे नमूद केलेले आहे.
त्याचप्रमाणे बकऱ्यांच्या विष्ठेपासून बनणारे खत हे कृषी उत्पादनासाठी उत्कृष्ट मानले जाते. आज काही ऑरगॅनिक खते बनवणाऱ्या कंपन्या अशा प्रकारे शेळ्या पाळून खत निर्मिती करतात. शेतकरी या शेळ्या आपल्या शेतात ठेवून आपली शेती अधिक सकस कशी होईल हा प्रयत्न निश्चित करू शकतात. त्याचबरोबर हे खत विकूनही पैसा कमावू शकतात. नंतर शेळी वृद्ध होऊन मेल्यानंतर देखील तिचे चामडे वापरून त्यापासून काही वस्तू निर्माण केल्या जाऊ शकतात. हे बघता एक बकरा किंवा बकरी संपूर्ण आयुष्य जगली तर त्याचा दीर्घमुदती फायदा होऊ शकतो. नंतर या प्राण्यांची जननक्षमता संपल्यानंतर मग त्यांना मारून त्यांचे मांस विकता येऊ शकते. हे बघता एक अगदी वर्षाची किंवा दोन वर्षांची बकरी किंवा बकरा कापण्यापेक्षा त्याला दहा-बारा वर्षे जगवले तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो, आणि त्यातून अर्थचक्र फिरते राहायला अधिक मोलाची मदत होऊ शकते. हा मुद्दा देखील नाकारता येत नाही.
इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो. आपल्या देशात पूर्वी राजे महाराजे आणि सरदारांची शिकार करण्याची प्रथा होती. आदिवासी मंडळी देखील अशी शिकार करायचे. वन्यप्राणी हे त्यांचे अन्नच होते, असे म्हटले तरी चालेल. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू या पद्धती बंद झाल्या. आज वन्यप्राण्यांची शिकार करण्याला देखील बंदी आहे. तो कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. वन्य प्राणी जरी मानवावर चालून आले तरी देखील त्यांची हत्या करू नये असे पशु प्रेमी आवर्जून म्हणत असतात. मागे यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या एका वाघिणीची वनखात्यातील अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यावेळी त्या परिसरातील नागरिकांनी जरी सुटकेचा श्वास टाकला, तरी या पशुप्रेमी संघटनांनी सरकारला आणि तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते. आज शहरी पाळीव प्राण्यांना सुद्धा किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस प्राण्यांना देखील आपल्याला मारता येत नाही. कित्येकदा रस्त्यावरील बेवारस कुत्री येणाऱ्या जाणाऱ्यांना किंवा लहान मुलांना चावे घेतात. त्यांना रक्तबंबाळ करतात, आणि प्रसंगी त्यांचा जीवही घेतात. मात्र अशा बेवारस कुत्र्यांना जर एखाद्याने मारले तर त्याच्यावर पोलीस लगेच गुन्हा दाखल करतात. जर असा गुन्हा दाखल झाला नाही तर हे भूतदया मंडळवाले कार्यकर्ते जाऊन पोलिसांना भंडावून सोडतात. त्यावेळी याचा विचार कोणीच करत नाही की तो कुत्रा जनसामान्यांना किती त्रासदायक ठरला होता.
असाच प्रकार वन्य प्राण्यांबाबतही आहे. वर मी एका वाघिणीचा प्रकार सांगितलाच आहे. त्याचप्रमाणे आज शहरीकरण वाढत असल्याने जंगलांचा आकार छोटा होतो आहे. परिणामी हरणे, हत्ती, रानडुकरे, जंगली गवे, अस्वले, नीलगाई असे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतावर हल्ले करतात आणि त्यांचे उभे पीक नष्ट करतात. अशावेळी त्या शेतकऱ्याने जर शेताभोवती कुंपण टाकले आणि त्यात हलका जरी विद्युत प्रवाह सोडला तर त्याच्यावर कारवाई होते. मात्र वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानाची कोणतीही भरपाई मिळत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी हे प्राणी मित्र कधीच गळे काढत नाहीत.
एकूणच प्राण्यांना जगवा यासाठी हे भूतदया मंडळ वाले मोठ्या प्रमाणात देशभर सक्रिय आहेत. त्यांच्यातल्याच एक मनेका गांधी जेव्हा केंद्रात मंत्री होत्या तेव्हा त्यांनी असे कायदे देखील करून घेतले आहेत. मात्र हे प्राणी मित्र आज बकरी ईदच्या दिवशी शेकडो बकऱ्यांची मान कापली जाते तेव्हा का बोलत नाहीत हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक जनसामान्यांना कायम भेडसावत असतो.
नितेश राणे आणि प्यारे खान यांच्यातल्या वादा बाबत बोलताना भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येकाने आपापल्या धर्मा नुसार करावे असे मत व्यक्त केले आहे. मग अशावेळी दिवाळीला प्रदूषण होते म्हणून फटाके फोडू नका आणि इको फ्रेंडली होळी खेळा असा आग्रह धरला जातो, तेव्हा रवींद्र चव्हाण सारखे नेते का बोलत नाहीत हा देखील प्रश्नच आहे. म्हणजे सर्व काही निर्बंध एका समाजाला असाच या देशातील सर्व नेत्यांचा न्याय आहे काय असा प्रश्न जनसामान्यांना पडतो.
या पार्श्वभूमीवर सर्वच समाजातील धुरिणांनी समोर येऊन सामंजस्याने मार्ग काढायला हवा. इथे निरपराध बकऱ्यांची आकारण कत्तल थांबायला हवी. त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान देखील कमी व्हायला हवे. त्यातच सर्वांचे हित आहे.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment