कालचक्र... सावरकरप्रेमींच्या "या" मागण्या फडणवीसांनी पूर्ण कराव्यात
कालचक्र...
सावरकरप्रेमींच्या "या" मागण्या फडणवीसांनी पूर्ण कराव्यात
स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणार असलेली बॅरिस्टर ही पदवी त्यांच्या क्रांतिकारी कारवायामुळे तत्कालीन इंग्रज सरकारने परत घेतली होती. ही पदवी शासन स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्रात परत आणली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या समारंभात बोलताना केली आहे. त्यांच्या या घोषणेचे सावरकरप्रेमींनी स्वागत केलेले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग हा निश्चितच लक्षणीय म्हणावा लागेल. त्यांनी लंडनमध्ये शिकत असताना भारत भवनातून स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या क्रांतिकारी कारवाया लक्षात घेत तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांना अटक करून बोटीने भारतात आणण्याचे ठरवले होते. मात्र त्याच बोटीतून उडी घेत समुद्रातून पोहत ते फ्रान्सच्या किनाऱ्याला लागले होते. मात्र तिथेही त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन जन्मठेपेंची शिक्षा झाली होती.अंदमानच्या तुरुंगात त्यांचे किती हाल केले गेले याची माहिती त्यांनी "माझी जन्मठेप" या पुस्तकात दिलेली आहे. ती वाचतानाच अंगावर काटा येतो. अंदमानहून महाराष्ट्रात परत आल्यावर देखील ते गृहकैदेत दीर्घकाळ राहिले होते. त्यांच्यावर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची किंवा कोणत्याही राजकीय गतिविधित सहभागी होण्यास बंदी घातली होती. तरीही त्यांनी त्या परिस्थितीतही समाज सुधारणांचे मोलाचे काम त्या काळात केले.
असे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिताना तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांच्यावर अन्यायच केला. लोकांसमोर चुकीचा इतिहास मांडला गेला. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारी काही विशिष्ट घराणीच होती असे भासवत इतिहास तयार केला गेला, आणि सावरकरांना कायम दुर्लक्षितच ठेवले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीहत्येच्या प्रकरणातही त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना त्यासाठी काही काळ तुरुंगातही जावे लागले होते, नंतरही त्यांच्या फक्त मृत्यूपर्यंतच नव्हे तर मृत्यूनंतरही त्यांची उपेक्षाच केली गेली. आजही त्यांच्यावर खरे खोटे आरोप केले जातातच.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते. त्यामुळे काँग्रेसजनांना ते डोळ्यात सलत होते. अजूनही तेच सुरू आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत उलट सुलट आरोप केले जातात. हे आरोप इतर कोणी नाही, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधीच करत फिरतात, त्यासाठी त्यांच्यावर न्यायालयात खटले देखील भरण्यात आले आहेत. तरीही तोंडाला येईल ते आरोप करणे आज सुरूच आहे. राहुल गांधी बोलले की खालचा गल्लीतला कार्यकर्ता देखील तेच बोलतो, हे आपल्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
मात्र आज देशात सरकारे बदललेली आहेत. केंद्रात गत अकरा वर्षापासून नरेंद्र मोदींसारख्या राष्ट्रभक्त विचारांच्या व्यक्तीचे सरकार आहे. महाराष्ट्रातही सावरकर प्रेमींचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळेच सावरकर जयंती सरकारी स्तरावर साजरी होते आहे. आणि त्याच कार्यक्रमात फडणवीस यांनी त्यांची बॅरिस्टरची पदवी परत आणण्याची घोषणा केली आहे. त्याचे स्वागत व्हायलाच हवे.
मात्र त्याचबरोबर देशभरातल्या सावरकर प्रेमींच्या आणखी देखील काही अपेक्षा आहेत. त्या मागण्या सरकार दरबारी नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र त्याच्यावर अद्याप कारवाई नाही त्या संदर्भातही विचार व्हायला हवा. त्याबाबतच लक्ष वेधण्याचा या लेखात मी प्रयत्न करतो आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातील सावरकर सदन या त्यांच्या निवासस्थानी यहलोकीची यात्रा संपवली होती. त्यासाठी त्यांनी प्रायोपवेषण देखील केले होते. त्या ठिकाणाहूनच त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यांचे हे निवासस्थान महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्यावे आणि ते सावरकर स्मारक म्हणून विकसित करावे अशी सावरकर भक्तांची मागणी आहे. सध्या त्या इमारतीत सावरकरांच्या ८० वर्षे वयाच्या सुनबाई सुंदरबाई सावरकर या तिथे राहतात. ती इमारत पुनर्विकासासाठी प्रस्तावित असल्याचीही माहिती आहे. महाराष्ट्र शासनाने ती जागा अधिग्रहित करावी किंवा विकासकाला किंमत मोजून विकत घ्यावी आणि तिथे सावरकरांचे चिरंतन असे स्मारक उभे करावे अशी सावरकर प्रेमींची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करणे महाराष्ट्र सरकारला अशक्य नाही. त्यामुळे फडणवीस यांनी याबाबत तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली जाते आहे.
दुसरी मागणी अशी की ज्या लंडनस्थित भारत भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या उच्च शिक्षणादरम्यान मुक्कामी होते आणि जिथून त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी हालचाली सुरू केल्या, ती जागा देखील महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावी आणि तिथे सावरकरांचे उचित असे स्मारक व्हावे अशी सावरकरप्रेमींची मनोमन इच्छा आहे. यापूर्वी देखील काही महनियांच्या संदर्भात परदेशातील मालमत्ता विकत घेऊन महाराष्ट्र सरकारने तिथे स्मारक उभे केले आहे. त्याचप्रमाणे लंडन स्थित भारत भवन हे देखील विकत घेतले जावे, आणि तिथे सावरकरांचे उचित असे स्मारक व्हावे ही मागणी काही चुकीची ठरू नये.
त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बोटीतून भारतात परत आणत असताना फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ त्यांनी बोटीतून उडी मारली होती आणि पोहोत ते मार्सेलिस बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचले होते. तिथे त्यांना फ्रान्सच्या पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले होते. मात्र फ्रान्सच्या पोलिसांनी त्यांना ब्रिटिश सरकारच्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकले होते. त्यावेळी फ्रान्स सरकार आणि इंग्लंड सरकार यांच्यात शत्रुत्व होते. तरीही फ्रान्समध्ये पोहोचलेल्या व्यक्तीला इंग्रज सरकारच्या ताब्यात कसे दिले यावर फ्रान्समध्ये प्रचंड गोंधळ झाला होता, आणि त्या प्रकरणात तत्कालीन फ्रान्सच्या पंतप्रधानांना राजीनामा देखील द्यायला लावला होता. या मार्सेलिस बेटावर देखील सावरकरांचे स्मारक व्हावे अशी सावरकर भक्तांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी रामभाऊ बर्वे नामक मुंबईतील सावरकरप्रेमी नागरिकांने मार्सेलिसच्या तत्कालीन महापौरांशी पत्रव्यवहार देखील केला होता. त्यांनी भारत सरकारने पुढाकार घेतल्यास आम्ही इथे सावरकरांचे स्मारक तयार करण्यास तयार आहोत असे कळवले देखील होते. नंतर या प्रकरणात सावरकर भक्त १९९९ -२००० च्या दरम्यान केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन गेले होते. मात्र ते प्रकरण पुढे गेले नाही आणि अद्यापही या प्रकरणाची फाईल परराष्ट्र मंत्रालयाकडे धूळखात पडलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपले पंतप्रधानांकडे असलेले वजन खर्च करून या संदर्भात देखील पाठपुरावा करावा अशी सावरकर प्रेमींची आग्रहाची मागणी आहे.
त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट हे वारंवार सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्या ही मागणी रेटून धरत आहेत. वस्तुतः मुंबईतील सावरकर सदन हे सावरकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी मुंबईत एकाकाळी दबदबा असलेल्या शिवसेनेने पाठपुरावा करायला हवा होता. मात्र त्यांनी ते कधीच केले नाही. इतकेच काय पण केंद्रात सत्तेत सहभागी असताना देखील त्यांनी कधीच इतर मागण्यांसाठी देखील पाठपुरावा केला नाही. फक्त सावरकरांना भारतरत्न द्या हीच मागणी ते करत आहेत. वस्तुतः सावरकरांना भारतरत्न प्रदान केल्यास सावरकरांचा नव्हे तर भारतरत्न सन्मानाचाच सन्मान होईल इतके सावरकरांचे कार्य महान आहे. वस्तुतः केंद्र सरकारने सावरकरांच्या स्मृती प्रित्यर्थ एखाद्या राष्ट्रभक्त व्यक्तीला दरवर्षी एखादा सन्माननीय पुरस्कार प्रदान करावा ही मागणी शिवसेनेने करायला हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही आजही केंद्र सरकारने सावरकरांच्या नावे असा एखादा प्रतिष्ठित पुरस्कार दरवर्षी देणे सुरू करावे. तो सावरकरांचा उचित सन्मान ठरेल. फडणवीस यांनी या मागणीसाठी देखील पाठपुरावा करावा ही आमची सूचना आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देखील देशातील सर्वात मोठी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. आज देशात आणि राज्यात संघविचाराच्याच कार्यकर्त्यांचे सरकार सत्तारूढ आहे. त्यामुळे संघाने देखील या मागण्यांसाठी पुढाकार घ्यावा असे सुचवावेसे वाटते.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment