कृषी महाविद्यालय मूल....शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तिसावी बैठक संपन्न
कृषी महाविद्यालय मूल....
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तिसावी बैठक संपन्न
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत, कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *तिसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २४ जून, २०२५ रोजी ग्राम चितेगांव ता. मूल जि. चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी चितेगांव येथील गावाचे उपसरपंच श्री हरिदास गोहणे, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती.
या बैठकीत मुख्यत्वे करून “ *धान, तूर व भाजीपाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान* ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे *उद्यानविद्या विषयतज्ञ* *डॉ. आर. पी. गजभिये* यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व खरीप हंगामात चालू झालेल्या धान, तूर व भाजीपाला पिकांसाठी कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे असे याप्रसंगी सांगितले. तसेच भाजीपाला पिकांमध्ये मिरची आणि वांगी लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर *कृषिविद्या विषयतज्ञ* सहाय्यक प्राध्यापिका *मोहिनी पुनसे* यांनी धान पिकामधे ३ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रकिया केल्यास होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती दिली. निरोगी रोपवाटिका कशी तयार करावी, व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि नत्राच्या पूर्ततेसाठी चिखलणीच्या वेळी गिरिपुष्प व हिरवळीची खते देणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तसेच खत व तण व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
*डॉ. प्रविणा बरडे* , *वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ* यांनी धान पिकांवरील सुरवातीच्या काळातील करपा, मानमोडी व कडा-करपा, या योगांच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. भाजीपाला पीकावर येणाऱ्या मर व मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या परोपजीवी जैविक बुरशीनाशकाचे महत्त्व शेतकर्यांना पटवून दिले. तसेच शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा, जैविक खते व बुरशीनाशके यांचा वापर करून लागवड खर्च कमी करावा आणि उत्पन्न व उत्पादनात वाढ करावी असे याप्रसंगी सांगितले.
महाविद्यालयाच्या *कृषी विस्तार शिक्षण विषयतज्ञ* सहाय्यक प्राध्यापिका *मनीषा लवणकर* यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या व तंत्रज्ञान विकसित असलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमास एकुण ४० शेतकरी उपस्थित होते. यामध्ये महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार स. प्रा. *मनीषा लवणकर* यांनी मानले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️ Ddbatmi-m2M ✍️

Comments
Post a Comment