सहज सुचलं म्हणून आता समाजानेच पुढाकार घेऊन विपुल दुशिंग मानसिकतेचा बंदोबस्त करावा.
सहज सुचलं म्हणून...
आता समाजानेच पुढाकार घेऊन विपुल दुशिंग मानसिकतेचा बंदोबस्त करावा
एखाद्या वेळी पतीने रागाच्या भरात पत्नीला चार कानाखाली मारणे हा कौटुंबिक हिंसाचार होत नाही, असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचे दाखले देत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींचे वकील एड. विपुल दुशिंग यांनी केला असल्याचे वृत्त माध्यमातून दाखवले जात आहे. त्याचबरोबर या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर देखील शंका घेतल्याचे वृत्त आहे. सहाजिकच त्यांच्या या युक्तीवादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल संतापाची लाट पसरली आहे. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्र परिषद घेऊन माझी मुलगी तर गेली, पण आता तिच्यावर चिखलफेक करू नका, असे आवाहनही केले आहे.
प्रस्तुत खटल्यातील आरोपीचे वकील विपुल दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः मृत व्यक्ती बाबत कोणत्याही खऱ्या खोट्या टीका टिपणी करू नये अशी आपली परंपरा आहे. मात्र या वकील महाशयांनी ती परंपरा देखील टांगून ठेवलेली दिसते आहे. त्याचबरोबर वैष्णवीच्या नवऱ्याने तिला मारले याचे लटके समर्थन देखील केले आहे
त्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या काही निवाड्यांचे दाखले देखील दिले असून हे विधान हे वकील महाशय कॅमेरासमोर करतांनाही माध्यमांनी दाखवले आहे.
वस्तूतः कौटुंबिक हिंसाचार म्हणजे फक्त मारहाण करणे आहे का? त्यातही दूशिंग यांच्या मते एखाद्या दिवशी चार कानाखाली वाजवल्या तर तो हिंसाचार होणार नाही. म्हणजे दररोज ढोरासारखे पत्नीला झोडपून काढायचे आणि त्यात तिचा जीव घ्यायचा म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार होईल काय, याचे उत्तरही जनतेने या वकील महाशयांना मागायला हवे.
कौटुंबिक हिंसाचार याची आपल्या कायद्यात माझ्या माहितीनुसार व्याख्या स्पष्ट आहे. पत्नीला कोणत्याही प्रकारची मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचारच होतो. म्हणजे पाच बोटांची एक थापड जरी मारली तरी देखील तो प्रकार हिंसाचारात गणला जातो. इतकेच काय तर तिचा मानसिक छळ करणे हा देखील कौटुंबिक हिंसाचारातच मोडतो. मानसिक छळात टोमणे मारणे, सतत बोलत राहून अपमानित करणे, प्रसंगी उपाशी ठेवणे,घराबाहेर काढणे, वारंवार धमक्या देणे हे सर्वच प्रकार मानसिक छळात मोडतात. त्यामुळे एड. विपुल दुशिंग यांचा एखाद्या दिवशी चार कानाखाली मारल्या तर तो कौटुंबिक हिंसाचार होत नाही असा केलेला दावा हा तद्दन फालतू तर ठरतोच, पण पुरुषी मानसिकतेचा मुजोरपणा दाखवणाराही ठरतो.
आपल्या देशात सुरुवातीच्या काळात म्हणजेच प्राचीन पुराणकाळात स्त्रीला सुद्धा समाजात मान होता. मात्र मधल्या काळात स्त्री ही भोगदासी ठरवली गेली, आणि तिला हवे तसे वापरायचे आणि गरज संपली की सोडून द्यायचे. जोवर ती आपल्या सोबत आहे तोवर मनाला येईल तसा तिचा छळ करायचा, असे प्रकार वारंवार घडत. अशावेळी नवऱ्याने सोडून दिलेली स्त्री ही समाजाची सार्वजनिक मालमत्ता आहे असेच वर्तन काहींकडून त्यावेळी होत होते
मात्र गेल्या शंभर वर्षात चित्र बदलले आहे. स्त्रीला शिक्षणाची दारे आज मोकळी झाली आहेत. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त शिकते आहे. सर्वच स्तरात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. भारतापुरते बोलायचे झाल्यास देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्षपद, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पद, राष्ट्रीयीकृत बँकांचे अध्यक्षपद, अशा महत्त्वाच्या पदांसह इतर अनेक महत्त्वपूर्ण पदावर महिला आरुढ होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. देशात लष्कराचे प्रशिक्षण देणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी तून १७ महिला प्रथमच पदवीपरिक्षा उत्तिर्ण करत प्रशिक्षित होऊन आज बाहेर पडल्या असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील दोन महिला अधिकाऱ्यांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे. म्हणजेच महिला आज अबला राहिल्या नाहीत, तर त्या देखील सबला आहेत हे काळाने आणि महिलांनी देखील सिद्ध केले आहे. तरीही महिलांच्या पतीराजांनी त्यांच्या कानाखाली चार वाजल्या तर ते गैर नाही असे विधान जर एखादा वकील न्यायालयासमोर करत असेल तर त्याची दखल समाजाने आणि प्रशासनाने देखील घ्यायलाच हवी. बार कौन्सिल ऑफ इंडियाने अशा वकिलांची खरेतर सनदच रद्द करायला हवी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशा आशयाची मागणी केल्याचीही बातमी आहे.
आज कायद्याने पतीने पत्नीलाच काय पण कुणीही कोणालाही मारहाण करणे किंवा त्याच्या अंगाला हात लावणे हा गुन्हाच आहे. पूर्वी आई वडील मुलांना त्यांनी ऐकले नाही की चार दणके द्यायचे. मात्र आज जर त्याचा अतिरेक झाला आणि कोणी पोलिसात तक्रार दाखल केली तर अशा आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. परदेशात तर याबाबतीत अधिकच कडक कायदे आहेत असे म्हणतात. दोघा सख्या भावांमध्ये सुद्धा जर भांडण होऊन मारामारी झाली तर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात. शाळेत शिक्षकांना सुद्धा आज नाठाळ विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिलेले नाही. एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली तर पोलीस कोठडीत असताना जर पोलिसांनी त्याला अतिरेकी मारहाण केली तर अशा प्रकारात पोलिसांवर देखील कारवाई केली जाऊ शकते. अशावेळी पतीने पत्नीला चार खानाखाली मारण्याचे समर्थन कसे केले जाऊ शकते?
प्रस्तुत प्रकरणातील युक्तीवादात एड. विपुल दुशिंग यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही निवाडयांचे दाखले दिले आहेत. जर हे खरे असेल तर न्यायव्यवस्थेने आणि प्रशासनाने देखील याची दखल घेतली पाहिजे, आणि अशा प्रकारच्या निवाड्यांबाबत फेरविचार करण्यासाठी फेरविचार याचीका सरकारतर्फे दाखल केली जायला हवी. कारण तत्कालीन प्रकरणांमध्ये तत्कालीन न्यायमूर्ती काही विशिष्ट परिस्थितीत अशा प्रकारचे निरीक्षण नोंदवले असेलही. मात्र तो कायदा म्हणजेच लीगल लँग्वेज मध्ये केस लॉ बनवू नये याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. म्हणजेच असा कोणीतरी विपुल दुशिंग अशा निवाड्यांचा आधार घेऊन एखाद्या वैष्णवीचा छळ करणाऱ्या नवरा सासू नणंद सासरा आणि दिराच्या राक्षसी कृतीचे समर्थन करू शकणार नाही. यासाठी समाजानेही प्रशासनावर दबाव आणायला हवा.
आज आज २१व्या शतकात आम्ही पोहोचलो असतानाही वैष्णवी हगवणेसारख्या नवविवाहितेला आत्महत्या करावी लागते, ही प्रगत समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणीच बाब म्हणावी लागेल. दुर्दैवाने आज वैष्णवी ही काही एकच केस नाही, तर अशा अनेक वैष्णवी सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक हिंसाचार सहन करत आहेत. प्रस्तुत लेख लिहीत असतानाच एका वृत्तवाहिनीवर बातमी दाखवली जाते आहे की पुण्यातील पोलीस खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या भरवसा सेल मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अशा पीडित महिलांनी गर्दी केलेली आहे. तिथल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या पूर्ण वर्षात अशा प्रकारच्या ७००० हून अधिक तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. प्रगत समाजाच्या दृष्टीने हा आकडा हे एक लांच्छनच म्हणावे लागेल.
त्यामुळेच समाजाने आता पुढे येऊन अशा छळवादी मानसिकतेचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊले उचलावी आणि विपुल दुशिंगसारख्या पुरुषी मानसिकतेच्या मुजोर वकिलांना धडा शिकवून त्यांचा बंदोबस्त करावा इतकेच सहज सुचले म्हणून सुचवावेसे वाटते
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment