कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार?

 कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार?

जागो ग्राहक जागो:-२

जागृत ग्राहक राजाशी चर्चेत मूल तालुका कृषी अधिकाऱ्यांची ग्वाही.

दीपक देशपांडे , जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष यांचे नेतृत्वात मूल तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांची मान्सूनच्या तोंडावर मूल तालुका पदाधिकारी यांनी एक औपचारिक भेट घेतली आणि देशाचा पालनहार बळीराजाची व्यथा आणि कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना व कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीत सर्वप्रथम कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना राबविण्यात येत आहे याबाबत चर्चा केली असता कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बी बियाणे यांची निवड व आपल्याजवळ उपलब्ध बी बियाणे यांचा वापर कसा करावा व उत्पादन वाढिसाठी खर्चात कपात कशी करता येईल यासाठी आजवर  मूल तालुक्यात जवळपास ३००ते३५०ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती त्यांनी शिष्टमंडळाला दिली.

 तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत  एवढे कार्यक्रम घेतले असताना देखील बऱ्याच गावात याबाबत जनजागृती झाली नसल्याचे स्पष्ट करीत कृषी सहायक यांचे कामाबाबत शंका निर्माण  होते परिणामी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर पदे आणि भरती बाबत माहिती विचारली असता मंडळ कृषी अधिकारी पदापासून तर शिपाई पदापर्यंत मंजूर ५० पदांच्या निम्मी पदे २५ रिक्त असल्याने कार्य करताना बऱ्याच अडचणी येत आहेत परिणामी एका सहाय्यकाकडे दोनदोन-तीनतीन गावांचा भार सोपवून काम सुरू असल्याचे कारडवार यांनी स्पष्ट केले.

बोगस बियाणे प्रकरणी विचारणा केली असता,  शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातून प्रमाणित बियाणे खरेदी करावी अथवा स्वतः:जवळची बियाणे प्रक्रिया करून वापरण्याचा व बियाणे खरेदी करताना बिल मागण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला, याशिवाय स्वस्त मिळते म्हणून बोगस बियाणे खरेदी करणे टाळावे व असा प्रकार सुरू असल्यास तातडीने यांबाबत माहिती देण्याची सुचनाही त्यांनी यानिमित्ताने केली.

सद्यस्थितीत मूल तालुक्यात एकुण ४९अधिकृत मंजूर कृषी केंद्र कार्यरत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. तर बी बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले.  यांत धान्याच्या श्री १०१या जातीच्या वाणांची मोठी मागणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर विशेष मोहीमेअंतर्गत पीकेव्हीतिलक अंतर्गत ५विभिन्न ठिकाणी प्रयत्न सुरू असून या योजनेअंतर्गत २५-२५शेतकऱ्यांना यात समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी दिली तसेच  सगळीकडे  बारीक तांदळा साठी श्री१०१ व श्रीराम या जातीचे बियाणे  वापरले जात असताना खोलगट व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत अधिक उत्पादनासाठी "सुवर्णा" या जातीचा  जाड धान लावण्याची व उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची शिफारसही त्यांनी केली

मूल तालुक्यातील लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्राबाबत विचारणा केली असता, खरीप हंगामात धानाचे(भात) अपेक्षित क्षेत्र २४१००हेक्टर,तूर लागवडीचे क्षेत्र ३४५हेक्टर, कापूस १८००हेक्टर, मिरची ७ हेक्टर ,सोयाबिन १०हेक्टर , तर भाजीपाला व इतर ६३हेक्टर अशी एकूण २६३२५हेक्टर जागेवर खरीपाची लागवड होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा वाढिव  उत्पादन खर्च आणि उपलब्ध बाजारभाव यांची सांगड घालून नफा वाढविण्यासाठी नेमके काय करावे?या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, उत्पादन वाढविण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी दर तीन वर्षांनी बियाणे बदलणे गरजेचे आहे,त्यात दुसरे बियाणे खरेदी करणे अथवा पेरणीपूर्वी बियाण्यास प्रक्रिया करून ते पेरणीसाठी वापरावे , रासायनिक खतांचा वापर कमी करावा, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, रोवणीऐवजी पेरणीचा ही मार्ग अवलंबला तरी खर्च कमी करता येईल, उगाच किंमत अधिक म्हणून अधिक कालावधीत तयार होणाऱ्या बियाण्यांऐवजी कमी कालावधीत तयार होणाऱ्या बियाण्यांचा वापर करावा ,व दूबार पिक घेण्याचा प्रयत्न करावा, केवळ बारीक तांदळासाठी उशिरा निघणाऱ्या वाणाचे बियाणे वापरण्याऐवजी जाड धानाचे कमी कालावधीत निघणारे बियाणे वापरले तर त्यावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो परिणामी उत्पादन वाढिस मदत होते त्यामुळे त्यांचा वापर करण्याचाही सल्ला यानिमित्ताने सुनील कारडवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कृषी सहाय्यक यांची संख्या कमी असली तरी  नेमून दिलेल्या गावात दर आठवड्यात भेट देणे शक्य होत नसेल तरी किमान दोन आठवड्यात त्या कृषी सहाय्यकांनी केवळ औपचारिक म्हणून  नाही तर आपले कर्तव्य समजून प्रत्येक  गावात भेट देऊन गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन गरजेनुसार मार्गदर्शन करावे ही आग्रही मागणी जागृत ग्राहक राजा चे वतीने तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांचेकडे केली.

 या भेटीत सर्वात शोषीत पिडित ग्राहक राजाच्या  अधिकारांसाठी लढा देणाऱ्या तालुक्यातील विविध कार्यक्रमांत जागृत ग्राहक राजा ला व शेतकरी  ग्राहकांना सहभागी करून घेण्याची व या देशाचा पालनहार बळीराजाची कथा आणि व्यथा समजून घेण्यासाठी योग्य सहकार्याची अपेक्षा जागृत ग्राहक राजाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. 

शेतकऱ्यांनी  बियाणे,खते, व कीडनाशके, खरेदी करताना पक्के बिल मागण्याची व ते बिल बियाण्याच्या थैली सह थोडेसे मुठभर धान्य ,खत नमुन्यांसह जपून ठेवण्याची आग्रही सुचना जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने समस्त शेतकरी बांधवांना करण्यात आली आहे, भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी तो महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो परिणामी ह्याची नितांत आवश्यकता आहे, असेही जागृत ग्राहक राजा ने स्पष्ट केले आहे.

या भेटीत दीपक देशपांडे, यांचे सोबत अशोक मैदमवार, उपाध्यक्ष रमेश डांगरे सचिव, डॉ आनंदराव कुळे, सुरेश झरकर,माजी सरपंच व प्रगतीशील शेतकरी मोरवाही आदी उपस्थित होते.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.