कथा प्राणवायू प्रदानकर्त्याच्या पूजनाची :- वटपौर्णिमेची

                 कथा प्राणवायू प्रदानकर्त्याच्या पूजनाची    

                 वटपौर्णिमेची



संकलन:-अभय बक्षी नागपूर.

             आजचा दिवस हा महिलांचा. आज लहान खेडेगाव असो वा महानगर, रस्त्यारस्त्यावर सर्वत्र महिला राज. भारतीय परंपरेचा मंगल वेश अर्थात भरजरी शालू.. पैठणी.. लुगडी नेसून सौभाग्यलंकाराने नटून थटून, गजरे माळून, हातात पूजेचे ताट.. फुले.. कलशात पाणी   घेऊन त्या घोळक्याने निघाल्या तरी कुठे.. आज त्या निघाल्या आहेत वड वृक्षाच्या पूजेला.

       भारतीय संस्कृती ही निसर्गप्रेमी विज्ञानाधिष्टीत प्रथा.. परंपरा व्दारे या सृष्टीवर प्रेम करायला लावणारी.. सृष्टीचे संरक्षण करणारी. जीवनात आनंद निर्माण करणारी. प्राणवायूचे महत्त्व जगाने फार उशिरा जाणले. पण भारतीय संस्कृतीने प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखून प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी.. वृक्ष वनस्पतींशी मैत्री करायला शिकविले.

        जगदगुरु संत तुकोबांनी तर वृक्षवेलींना सोयरे मानून घरोबाच शिकवला. मग निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.

        असाच एक वृक्ष म्हणजे वड. हा औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनात उपकारक. वड हा तर मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. या वृक्षाच्या पारंब्यातून अखंड पाणी टपकते. या वृक्षाच्या खाली जमीन सदैव ओलसर.. थंड राहते. मनुष्य जीवन या विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सावलीत.. सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगत आहे.

        भारतीय संस्कृतीत आदर्श कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांच्या जीवनात पती हा संसाराचा प्राण. मग यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणाऱ्या भार्येची.. वटसावित्रीची ही पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला सात जन्माचे दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.

        सात जन्म. विज्ञान सांगते की शरीरातील पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या पेशी नष्ट होत नविन निर्माण होतात. संपूर्णपणे नविन पेशी निर्माण होण्याचा काळ १२ वर्षाचा.. म्हणजेच पेशींचा पुनर्जन्मच. असे पेशींचे सात जन्म.. म्हणजे ८४ वर्षे. पूर्वी मुलींचे १६ व्यावर्षी लग्न व्हायचे. मग पतीला असे सात जन्म.. १०० वर्षे आयुष्य मागितले जाते.

        सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता. तिने प्रत्यक्ष यमाशी वादविवाद करुन.. प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासू सासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय.

        अत्यंत श्रद्धेने आपल्या पतीच्या वडवृक्षाप्रमाणे दिर्घायू निरामय जीवनाची कामना करतात. वडवृक्षाप्रमाणेच परिवाराचा विस्तार व्हावा ही प्रार्थना करतात. वडवृक्षाची फळे ही पक्ष्यांची आवडती अशी फळे. या वटवृक्षाला मधूर आम्रफळे.. फुले अर्पण करुन वृक्षाचे पूजन आज महिला करणार. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड.

        सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना.. !!

  

  *वटपौर्णिमा आली गं,*

  *ओटी आंब्यांन भरूया*

  *सण वर्षाचा आज,*

  *पूजा वडाची करूया  llधृ ll*


  *पतिव्रतेचा हा वसा गं,*

  *सुवासिनींचे हे वाण*

  *नारीजातीने करावा,*

  *भोळ्या भ्रताराचा मान*

  *हाथ जोडुनी देवाला,*

  *प्रदक्षिणेला फिरूया*


  *सात जन्माचा सोबती,*

  *धनी माझा पतीदेव*

  *माझ्या संसाराच्या मंदिरी,*

  *लाख मोलाची ही ठेव*

  *काया वाचा मने,* 

  *मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया*


  *सावित्रीच्या कुंकुवाला,*

  *सत्यवानाचा गं रंग*

  *औक्ष उदंड मिळावं,*

  *भाव फिरे धाग्यासंग*

  *भाव सात जन्माचं,* 

  *आशा मनात धरूया*


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.