सहज सुचलं म्हणून.... दहावी बारावीचे निकाल आणि बघणाऱ्यांची धडपड.

 सहज सुचलं म्हणून....

दहावी बारावीचे निकाल आणि बघणाऱ्यांची धडपड.

दोन दोन दिवसांपूर्वी सी. आय. एस. इ. चा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या  दिविजा हिला ९२ टक्के गुण मिळाले ही बातमी दिविजाची आई अमृता फडणवीस यांनी समाज माध्यमांवर शेअर केली. वृत्तवाहिन्यांनी देखील ही बातमी दाखवली. 

ही बातमी वाचून डोक्यात आले की मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलगी या परीक्षेत पास झाली म्हणून हा निकाल लागला हे कळले तरी. अन्यथा आजकाल दहावी आणि बारावीचे निकाल कधी लागतात ते सामान्य माणसांना कळत देखील नाही. नाही म्हणायला दुसऱ्या दिवशी काही वृत्तपत्रांमध्ये काही गुणवंतांचे फोटो आणि मुलाखती येतात म्हणून काल निकाल लागला हे कळते तरी. अन्यथा कानो कानी काहीही खबर नसते. हा विचार करता करताच माझे मन ५५ वर्ष मागे गेले. 

मला आठवते त्यावेळी म्हणजे साधारणपणे १९७० ते ८० या कालखंडात दहावी आणि बारावीचे निकाल लागणे हा एक सामाजिक सण असायचा. त्यावेळी हे निकाल कळण्याचे एकमेव माध्यम हे स्थानिक वृत्तपत्र इतकेच होते. त्यामुळे त्या दिवशी निकाल असेल त्या दिवशी ज्यांच्याकडे कोणी परीक्षार्थी असेल ते आणि इतर सर्व संबंधित आतुरतेने वृत्तपत्र घरी कधी येईल याची वाट पाहायचे. नेमके त्यादिवशी वृत्तपत्र उशिरा येत असे. त्यामुळे मग घरच्या सर्वांचीच तगमग वाढत असे. शेवटी एकदाचे वृत्तपत्र आले की सर्वजण निकाल बघायला धावायचे. कधी वृत्तपत्रात नावे यायचीत तर कधी रोल नंबर द्यायचेत. मग ज्यांचे ज्यांचे रोल नंबर्स असतील ते बघितले जायचे. घरचा जो कोणी उमेदवार असेल तो बिचारा एका बाजूला देव पाण्यात ठेवून उभा असायचा. शेवटी त्याचा निकाल कळला की त्या उमेदवारासकट सर्वजण सुटकेचा श्वास सोडायचे. 

अर्थात ही निकालाच्या दिवशीची तगमग झाली. मात्र अनेकांना आपला निकाल काय लागतो हे आदल्याच दिवशी कळावे अशी धडपड असायची. त्यावेळी एज्युकेशन बोर्ड आपले निकाल पुस्तक रुपात प्रकाशित करत असे. त्याला गॅझेट असे म्हणायचे. हे गॅझेट साधारणपणे दोन दिवस आधी त्या विभागातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडे पोहोचत असे. निकालाच्या आदल्या दिवशी पहाटे सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना गॅझेटच्या प्रति सोपवल्या जायच्या. मग ज्यांची अशा अधिकाऱ्यांकडे ओळख असेल ते तिथे जाऊन आपला निकाल बघून यायचे. बाकी सर्व आदल्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून काही माहिती मिळते का याचा कानोसा घेत फिरायचे. माझी थोरली बहीण १९६८ मध्ये दहावी पास झाली तेव्हा निकालाच्या दोन दिवस आधीच तिच्या मैत्रिणीच्या घरी घराशेजारी राहत असलेल्या एका उच्च पोलीस अधिकाऱ्याकडे गॅझेट आले होते त्या मैत्रिणीचा निरोप येतात ही तिच्याकडे धावली आणि आपला निकाल पाहून आली. साधारणपणे वृत्तपत्राच्या मुख्य वार्ताहराकडे गॅझेटच्या प्रती यायच्या. त्याच्या घरी सकाळी सात पासूनच लोकांची गर्दी व्हायची. ती गर्दी आवरता आवरता त्या वार्ताहराला नाकी नऊ येत असत. 

ज्यांना वार्ताहरांच्या घरी जाणे जमत नसे, ते सकाळी दहा पासून वृत्तपत्राच्या दारावर गर्दी करायचे. त्या दिवशी वृत्तपत्राचा दरवाजा बंदच ठेवला जात असे. मग याची त्याची ओळख सांगून आज शिरायचे आणि निकाल बघता येईल का त्याची धडपड करायची. काही वेळा विचारणारा त्यात यशस्वी होत असे, तर काही वेळा काहीच हातात न लागता त्याला परत फिरावे लागत असे. माझं माझा दहावीचा निकाल १९७० मध्ये लागला. तेव्हा मी नागपुरच्या तरुण भारतात वडिलांचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका काकांचे नाव सांगून आत शिरलो होतो आणि त्यांच्याकडूनच आदल्या दिवशीच निकाल बघून आलो होतो. पुढे १९७५ मध्ये धाकट्या बहिणीचा निकाल बघायलाही असाच आत शिरलो होतो.

अर्थात वृत्तपत्रांमध्येही त्यांना ते सर्व निकाल दुसऱ्या दिवशीच्या अंकात छापायचे, यासाठी ते गॅझेट कंपोझिंगला द्यावे लागत असे. त्यामुळे त्यातून कोणीतरी जाऊन निकाल पाहून येणे हे शक्यही व्हायचे नाही. तरीही इच्छुक आणि उत्सुक दारावर गोळा झालेलेच असायचे. हा प्रकार वर्षानुवर्ष चालत होता. 

जो प्रकार दहावी बारावीचा होता, तोच प्रकार विद्यापीठ परीक्षांचाही होता. तेव्हा विद्यापीठाचे निकालही वृत्तपत्रात छापले जायचे. आदल्या दिवशी ते वृत्तपत्रांना पुरवले जायचे. बरेचदा आदल्या दिवशी संध्याकाळी विद्यापीठाच्या कार्यालयात नोटीस बोर्डवर हे निकाल लावलेही जायचे. मग तिथे निकाल बघणा-यांची गर्दी व्हायची. 

हळूहळू परिस्थिती बदलत गेली. साधारणतः २००० नंतर दहावी आणि बारावीचे निकाल इंटरनेटवर उपलब्ध होऊ लागले. मला आठवते त्यावेळी हे निकाल सकाळी दहा वाजता बोर्डाच्या कार्यालयात पत्रकारांना उपलब्ध करून दिले जात असत. तर चार नंतर ते इंटरनेटवर आणि शाळांमध्ये सुद्धा उपलब्ध होत असत. मात्र जनसामान्यांना तेवढाही धीर निघत नसे. मला आठवते त्या काळात दैनिक पुढारी चा विदर्भ प्रतिनिधी या नात्याने सकाळी दहा वाजता नागपूर बोर्डाच्या कार्यालयात मी देखील गॅझेट आणायला जात असे. त्यावेळी विदर्भातून कोण गुणवंत आहेत हे बघून त्यांच्याशी संपर्क करण्याची आम्हा पत्रकारांची घाई असायची. मात्र सामान्यांना त्याचे काही देणे घेणे नसायचे. अनेकदा बोर्डाच्या ऑफिसमधून मी गॅझेट घेऊन निघालो आणि स्कूटरला किक मारली की कोणीतरी परिचित तिथेच आडवा येत असे, आणि गॅझेट उघडून माझ्या मुलाचा निकाल काय ते सांगतो का म्हणून गळ घालायचे. असे रस्त्यात गॅझेट दाखवणे चुकीचे आहे असे मी या परिचिताला समजावत असे. मात्र तो ऐकायला तयार नसायचा. मग तो मला कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा, आणि तिथे चार भिंतींच्या आड गॅझेट उघडायला लावायचा. तिथे त्याचा मुलगा किंवा मुलगी हे उत्तीर्ण झाले आहेत हे कळले की त्या परिचिताचा जीव भांड्यात पडायचा. मग त्याच्याच खर्चाने तो मला थंडा पाजायचा आणि तिथून दुसरा कोणी पकडण्यापूर्वीच मला पळ काढावा लागायचा. 

मी गॅझेट घेऊन घरी पोहोचायचो, तेव्हा घरच्या समोरच्या व्हरांड्यात वीस पंचवीस तरी निकालोच्छुक गोळा झालेले असायचे. त्यात घरच्यांनी थोडी विभागणी केलेली असायची. जे परिचित किंवा कौटुंबिक मित्र असायचे त्यांना आतल्या खोलीत बसवले जायचे. बाकी सर्व व्हरांड्यात माझी वाट बघत बसायचे.मी घरी आल्याबरोबर सर्वजण माझ्या मागे लागत, की मला घोटभर पाणी प्यायलाही सवड घेऊ देत नसत. मग आधी आतल्या ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्यांचे नंबर पाहून झाले की मग बाहेरच्यांचे समाधान करणे हा कार्यक्रम मला जवळजवळ दुपारी दोन पर्यंत पुरत असे. अनेकांना मी समजावायचो की चार पर्यंत धीर का धरत नाही मात्र कोणीच समजण्याच्या मनस्थितीत नसायचे. या गोंधळात माझे जे मूळ काम बातमी देणे आहे त्याकडे आपल्यामुळे दुर्लक्ष होते आहे याची या कुणालाही परवा नसायची.

आता हळूहळू परिस्थिती बदलत गेलेली आहे. आता दुपारी बारा वाजताच स्टेट बोर्ड आणि सीबीएससी बोर्ड या दोघांचेही निकाल इंटरनेटवर अपलोड झालेले असतात. त्यात आता घरोघरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप तरी आहेतच. त्यामुळे लोक घरीच निकाल पाहतात आणि आपले समाधान करून घेतात. परिणामी आता अधिकारी, वृत्तपत्राचे कार्यालय आणि पत्रकाराचे घर इथली गर्दी संपलेली आहे. मात्र दुपारी १२ नंतर निकालाच्या दिवशी सर्व इंटरनेट लाइन्स ब्लॉक झालेल्या दिसतात. मग अनेकदा अनेकांच्या त्या साईट्स ओपनच होत नाहीत परिणामी त्यांनाही इकडे तिकडे धावावे लागते. अर्थात त्याला काहीच इलाज नसतो. 

उत्सुकता हा मानवी स्वभावाचा एक अतिविशिष्ट गुण आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. जी बाब एरवी आपल्याला दोन तासाने कळणारच आहे ती बाबही ताबडतोब कळावी अशी प्रत्येकाला घाई असते. त्यातूनच असे प्रकार घडत असतात. जो प्रकार दहावी बारावीच्या किंवा विद्यापीठाच्या निकालाबाबत असतो तोच प्रकार निवडणुकीच्या निकालाबाबतही असतो. निवडणुकांचे निकाल जेव्हा येणार असतात तेव्हा हजारो नागरिक मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभे असतात. मग आतून कोणीतरी येऊन काहीतरी माहिती देतो आणि कोणाचे चेहरे पडतात तर कोणी जिंदाबादच्या घोषणाही देऊ लागतात. अर्थात हे निकालही तासा तासाला पूर्वी रेडिओवर आणि आता टीव्हीवर सांगितले जात असतातच. पण आम्हाला तेवढी फुरसत नसते. अगदी नागपुरी भाषेत सांगायचे तर तरफडाच फार असतो. त्यासाठी आम्ही कुठेही धडपडत जायला तयार असतो. 

चालायचेच, हा मनुष्य स्वभाव आहे. त्याला आम्ही बदलू शकत नाही. प्रत्येक वेळी आम्हाला काय होणार हे उत्सुकता असतेच. मग घरची कोणीतरी मॅटरनिटी होम मध्ये सिजरिंग टेबलवर असते तेव्हाही काय झाले, मुलगा की मुलगी, म्हणून आम्ही वाट बघतो. तर त्यावेळी जन्माला येणाऱ्या मुलाचा दहावीचा निकाल काय लागतो यासाठी देखील आम्ही तेवढेच उत्सुक असतो. म्हणून तर आम्ही ज्योतिषाकडे कधी हात दाखवायला तर कधी कुंडली दाखवायला जातोच ना. चालायचेच. स्वभावाला औषध नाही. 

अविनाश पाठक , नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.