एक चुटकी सिंदूर की किमत...

 एक चुटकी सिंदूर की किमत...



दिनांक सात मे बुधवार पहाट उजाडली ती "घुसकर" मारल्याच्या बातमीने. भारतीय वायूसेनेच्या शूर सैनिकांनी  मध्यरात्री नंतर आणि पहाटेपूर्वी पाक व्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात नऊ ठिकाणी जोरदार हल्ला केल्याची बातमी जगभर प्रसिद्ध झाली आहे. पाकिस्तानातील भारत विरोधी कारवाया करणारी ठिकाण उध्वस्त करून जिहादी दहशतवादाविरुद्ध युद्ध असेच लढावे लागते असा संदेश जगाला दिला आहे. या हवाई हल्ल्याचे नाव "ऑपरेशन सिंदूर" ठेवून देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूना नेमका इशारा दिलेला आहे. 

कपाळावर लावल्या जाणाऱ्या कुंकू, टिकलीचे अनन्य साधारण महत्व घुसून नऊ ठिकाणी हल्ले चढवून अधोरेखित केले आहे. पहेलगाम येथे पर्यटक म्हणून नव्हे हिंदू म्हणून गोळया मारून ठार करून कुंकू पुसले होते. ज्या हिंदू भगिनींचे कुंकू पुसले त्यांना "मोदींना जाऊन सांगा" असे सांगितले होते. दिनांक बावीस एप्रिल रोजी जिहादी हल्ला करून भारताला आव्हान दिले होते. दिनांक सात मे च्या पहाटे सुमारे शंभर किलोमीटर घुसून त्या आव्हानाला जोरदार प्रत्यत्तर दिले आहे. कुंकवाचे मोल पाकिस्तानसह जगाच्या लक्षात आणून दिले आहे. 

सौभाग्यलंकार असलेले कुंकू ही हिंदूपणाची ओळख आहे. साजशृंगारत स्थान असलेल्या कुंकू ही अस्मिता आहे. त्या कुंकवार प्रहार करून "जो कर सकते हो करो, उखाड लो" असे सांगणाऱ्या जिहादला कुंकू कायमचे लक्षात राहिल असा तडाखा दिला आहे. 

जबरदस्त उत्तर देण्यासाठी केलेल्या हल्ल्याचे "सिंदूर" असे केलेले नामकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. अर्थात, उद्या अग्रलेख आणि आज काही वेळात समाज माध्यमातून व्यक्त होणारे पुरोगामी, सेक्युलर, लिबरल, न्यू -लेफ्ट, वोक माध्यमकर्मी, कलाकार, साहित्यिक  आणि त्यांच्या नादी लागलेले या "सिंदूर" नावाची टिंगल करतील हे नक्की. युद्धसदृश्य हल्ल्याचे असे नाव असू शकते हे त्यांच्या बुद्धीला न झेपणारे आणि त्यांच्या विचारांना न पटणारे असल्यामुळे ते सिंदूर, कुंकू, टिकली याची खिल्ली उडवतील. पण, पहाटेच्या बातमीने सुखावलेले देशबांधव ऑपरेशन सिंदूरची उपयुक्तता जाणून आहेत. 

आपली प्रतिक, आपल्या अस्मिता, आपले भावविश्व याचे मोल जाणणारे ऑपरेशन "सिंदूर"चे स्वागत करून त्या सहव्वीस जणांच्या सांडलेल्या रक्ताची बूज राखतील. ऑपरेशन सिंदूर हा युद्धज्वर नाही. ऑपरेशन सिंदूर हे पहेलगाम हल्ल्याने अस्वस्थ, दुःखी आणि संतापलेल्या संपूर्ण देशाच्या भावनांचे नियोजनबद्ध, संयमी आणि पिनपॉईंटेड असे प्रकटीकरण आहे. 

संपूर्ण जगाला, सर्व माध्यमांना आणि देशालाही मॉक ड्रिल च्या बातमीत दंगवून ठेवून, कुठलीही पुसटशी शंका येऊ न देता "ऑपरेशन सिंदूर" यशस्वी करून दाखवले आहे. ज्या यंत्रणेला, व्यवस्थेला पहेलगामसाठी जबाबदार धरले, इंटलीजन्स फेल्यूर म्हणून टिका केली बहुतांश त्याच यंत्रणानी समन्वय साधून आत घुसून मारले आहे. अर्थात यातून पाकिस्तान धडा शिकेल असे होणार नाही. तसे असते तर फाळणी किंवा 1971 पाकिस्तानने कारवाया थांबवल्या असत्या. मात्र, ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तानसह पाक समर्थक देश ज्यात चीन आहे त्यांनाही सूचित केले आहे. 

या सगळ्यातून पुढे काय होणार ? हे पहावे लागेल. याचे परिणाम केवळ आशिया खंडापुरते मर्यादित रहाणार नाहीत. जगाला या ऑपरेशन सिंदूर चा अर्थ समजून घेऊन भारताने जिहादी दहशतवादाविरुद्ध मानवकल्याणासाठी दीर्घकाळ चालवलेल्या युद्धात सहभागी व्हावे लागेल. जगात शांतता, मानवता, विविधता, लोकशाही आणि प्रत्येकाची आपली प्रतिक, अस्मिता, मानचिन्ह टिकवायची असतील तर "ऑपरेशन सिंदूर" चे पूर्ण समर्थन याला पर्याय नाही. 

 "एक चुटकी सिंदूर की किमत" आता नऊ ठिकाणच्या हल्ल्या नंतर लक्षात आली असेल. कुंकू, टिकली चा आकार लहान असला तरी, त्यात शक्ती आहे याचा प्रत्यय आला असेल. 

अर्थात, अखंड सावधान हवी. आपला परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी यथाशक्ती पुढाकार हवा. सीमेवर लढणारे आणि घुसून मारणारे यांचे मनोबल उंचवण्याच्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा हवा. 

साभार.......

_ मकरंद मुळे ©️ 

पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक, विविध विचारांचे अभ्यासक 

दि. ७ मे २०२५

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.