लोकनेते नितीन गडकरी
*आज दि. २७ मे २०२५ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख*
लोकनेते नितीन गडकरी
कोणताही राजकीय पक्ष स्थापन करायचा आणि तो मोठा करायचा तर तिथे जशी व्यापक जनाधार असलेल्या लोकनेत्यांची गरज असते, तशीच कुशल संघटक आणि ज्यांना थिंक टॅंक म्हणता येईल अशी सुपीक डोके असलेल्या कार्यकर्त्यांची गरज असते. पक्षाजवळ या तीनही बाबी सांभाळणारे कार्यकर्ते असले तर तो पक्ष वाढायला आणि प्रसंगी सत्तेचा दावेदार व्हायला वेळ लागत नाही.
मात्र लोकनेता, संघटक आणि थिंक टॅंक या तिन्हींचा एकत्र संयोग जुळून येणे फार कठीण असते. अशावेळी पक्ष नेतृत्वाला या तिन्ही घटकांना सांभाळून घेत पुढे वाटचाल करावी लागते. तरच पक्ष पुढे जाऊ शकतो.
मात्र हे तीनही गुण असलेला एकच नेता जर एखाद्या पक्षाला मिळाला तर तो त्या पक्षासाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागतो. असा नेता स्वतःचे कर्तृत्व तर सिद्ध करतोच, पण पक्षालाही पुढे नेतो.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी हे असेच या तीनही गुणांचा संयोग असलेले नेते म्हणता येतील. गडकरी भाजपमध्ये पुढे आले ते एक संघटक म्हणून. अगदी बालवयापासून ते संस्कारात वाढले त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषद, नंतर भारतीय जनता युवा मोर्चा आणि मग भारतीय जनता पक्ष या तीनहीमध्ये ते संघटक म्हणूनच पुढे आले. मला आठवते १९७७ मध्ये नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते अवघ्या दोन मतांनी हरले होते. त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी त्यांचा पराभव केला होता. नंतर १९८५ मध्ये ते विधानसभेची निवडणूक पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून लढले होते आणि तिथेही पराभूत झाले होते. या काळात ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतच जास्त गुंतलेले असायचे. त्यामुळे मग १९८९ मध्ये पक्षाने त्यांना नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवले. त्यानंतर १९९०, १९९६, २००२ आणि २००८ असे दरवेळी ते पदवीधर मतदारसंघातूनच निवडून येत होते. या काळात ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले. नंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते बनले. नंतर ते आधी महाराष्ट्र भाजपाचे आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही बनले. यावेळी त्यांच्यावर गडकरी लोकनेते नाहीत असा आरोप केला जात होता. कारण गडकरी जनतेतून निवडणूक कधीच लढवत नाहीत. ते विधान परिषदेत मागच्या दाराने जातात अशी त्यांच्यावर टिका केली जात होती. एकदा एका खाजगी वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांना खुले आव्हानच दिले होते. तुम्ही लोकनेते आहात हे सिद्ध करण्यासाठी खुली निवडणूक लढवून दाखवा आणि निवडून या.गडकरींनी देखील ते आव्हान स्वीकारले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा क्षेत्रातून ते उभे राहिले आणि काँग्रेस पक्षातल्या विलास मुत्तेमवार सारख्या दिग्गजाला पराभूत करून ते २ लाख ८४ हजाराच्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाले होते. आपण लोकनेते देखील आहोत हे त्यांनी यावेळी सिद्ध करून दाखवले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत ते पक्षाचे स्टार प्रचारक देखील होते. त्यामुळे मतदारसंघाबाहेर देशभर ते पक्षाचा प्रचार करत देखील फिरले होते. त्यामुळे मतदार संघात त्यांना फार कमी वेळ देता आला होता.
गडकरी लोकनेते नाहीत हा आरोप आधीपासूनच पक्षात आणि पक्षाबाहेर केला जात होता. त्यामुळे २००८ नंतर आता यानंतर निवडणूक जनतेतूनच लढवायची आणि विजयी व्हायचे असे त्यांनी ठरवून टाकले होते. डिसेंबर २००९ मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. अध्यक्ष बनण्याच्या तिसऱ्याच दिवशी ते दिल्लीहून नागपूरात आले. नागपूर विमानतळापासून तर महालातील त्यांच्या वाड्यापर्यंत त्यांची भव्य रॅली निघाली. रॅली संपवून ते घरात आले असता आम्ही पत्रकारांनी त्यांना गाठले आणि पत्रपरिषदेचा आग्रह केला. त्या पत्र परिषदेत मीच त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची आठवण करून देत आता पुढची निवडणूक जनतेतून लढणार का असा प्रश्न केला होता.त्यावेळी आता पुढली निवडणूक मी खुल्या लोकांमधूनच लढवणार आणि विजयी होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. पत्र परिषद आटोपून आम्ही पत्रकार निघालो तेव्हा आम्हाला सोडायला आलेले नितीनजी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला म्हणाले,"अविनाश पुढल्या निवडणुकीत मी उभा राहणार, आणि माझ्या प्रचाराचे लेख तुलाच लिहायचे आहेत." मी देखील हसत हसत त्यांना प्रतिसाद दिला होता आणि त्यांचा निरोप घेतला होता. त्यांचा शब्द त्यांनी २०१४ मध्ये खरा करून दाखवला. आपण पक्षाची थिंक टॅंक आहोत, संघटकही आहोत, तसाच आपल्याला जनतेतूनही पाठिंबा आहे, हे त्यांनी सिद्ध केले होते. त्या दिवशी निखिल वागळेंनी त्यांना फोनवर बोलून अभिनंदन केले होते, आणि तुम्ही पैज जिंकलात हे त्यांनी मान्य केले होते.
असे नितीनजी गडकरी आज गेली अकरा वर्षे केंद्रात मंत्री म्हणून सक्रिय आहेत, आणि आपल्या कामाचा ठसा फक्त आपल्या मंत्रालयावरच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांवर उमटवून आहेत. त्यांनी आपले कर्तृत्व स्वकष्टाने सिद्ध केले आहे, हे नाकारता येत नाही.
नितीनजींचा माझा संबंध महाविद्यालयीन जीवनापासूनच आला आहे. त्या काळात मी देखील संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. माझ्या आठवणीनुसार नितीनजी मला दोन वर्ष ज्युनियर होते. १९७५ मध्ये मी शिक्षणातून आटोपून उद्योग धंद्याला लागलो तेव्हा नीतीनजी महाविद्यालयीन राजकारणातच सक्रिय होते. नंतर ते आधी तत्कालीन जनता पक्षाच्या जनता युवा मोर्चात, आणि मग भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत झाले. त्या काळात संघटना बांधणे हे त्यांचे प्रमुख काम होते. शिक्षण आटोपल्यावर नाही म्हणायला त्यांनी नागपुरात भागीदारीत फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र ते जास्त वेळ भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर तर कधी मोर्चा, धरणे, आंदोलने यातच सक्रिय दिसायचे.
१९८८ मध्ये नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आमदार असलेले गंगाधरराव फडणवीस यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी पक्षाने नितीनजींना उमेदवारी दिली आणि नितीनजी निवडून आले. आल्या आल्या जो वर्ष दीड वर्षाचा कालखंड मिळाला त्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा सभागृहात आणि सभागृहाबाहेर उमटवला. त्यामुळे लगेचच १९९० मध्ये क्षणी पक्षाने त्यांना पुन्हा पदवीधर मतदारसंघातूनच उमेदवारी दिली आणि तेव्हाही ते विजयी झाले.
त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा तरुण नितीन गडकरी आपल्या अभ्यासू शैलीने विधान परिषदेत सरकार पक्षाला हैराण करून सोडायचे. दस्तूरखुद्द शरद पवारांनीच याची कबुली दिली होती.
१९९५ मध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले. यावेळी गडकरींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले ते सर्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री बनले. आपल्या धडाकेबाज आणि अभ्यासू कार्यशैलीने त्यांनी अल्पावधीतच आपल्या खात्यावर पकड जमवली आणि आपल्या कामाचा प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागात जास्तीत जास्त कामे कंत्राटदारांमार्फतच केली जात होती. त्यात कंत्राटदार आणि अधिकारी मिळून पैसा कमवायचे. गडकरींनी याला पायबंद कसा घालता येईल यावर विचार केला. ज्यावेळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बनवण्याचा प्रस्ताव निश्चित झाला. त्यावेळी निविदा मागवल्या गेल्या. सर्वात कमी निविदा ४००० कोटीची होती. गडकरींनी आपल्या अभ्यासू प्रवृत्तीनुसार सखोल अभ्यास केला. एक दिवस त्यांनी आपल्या मुंबईतल्या बंगल्यावर रात्री आठ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी बोलावले. त्यांना सांगितले की हे काम इतक्या जास्त दरात करणे मला मान्य नाही. आपण हे काम खात्यामार्फत करूया खात्यामार्फत केले तर खर्च बराच कमी येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले मात्र अधिकारी त्याला तयार नव्हते. खात्यामार्फत केले तर पैसा कुठून आणायचा हा प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तेव्हा आपण त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून रस्ते विकास महामंडळ स्थापन करू आणि खाजगीकरणातून पैसा आणू असे गडकरींनी स्पष्ट केले. या कामावर १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा लागणार नाही असाही त्यांचा दावा होता. रात्री आठ वाजता सुरू झालेली ही चर्चा पहाटे चार वाजेपर्यंत चालली आणि शेवटी खाजगीकरणाद्वारे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्याचा प्रस्ताव निश्चित करूनच गडकरी आणि सर्व अधिकारी उठले. नंतर हा प्रस्ताव गडकरींनी मंत्रिमंडळातून देखील मान्य करून घेतला.
त्यावेळी निविदा भरणारे धीरूभाई अंबानी हे देखील एक होते. जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी नितीनजींना फोन केला आणि तुमचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही असा दावा केला. तेव्हा मी यशस्वी होणारच असे नितीनजींनी ठासून सांगितले. ठरल्यानुसार खाजगीकरणातून पैसा उभा करून रस्ते विकास महामंडळाने १८०० कोटी रुपयात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. एक अव्वल दर्जाचा महामार्ग म्हणून तो पुढे आला. नंतर एक दिवस धीरूभाईंनी फोन करून "नितीनजी तुम्ही जिंकलात मी हरलो" हे मान्य केले. तेव्हापासून नितीन गडकरी आणि धीरूभाई अंबानी हे चांगले मित्र बनले.
खाजगीकरणाच्या प्रयोगातून सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते बांधणी करणारे नितीन गडकरी विविध आघाड्यांवर आपली कल्पकता दाखवून ती सिद्धही करत होते. खात्यातील जुन्या प्रस्थापित कंत्राटदारांचा एकाधिकार संपवण्याच्या दृष्टीने त्यांनी पदवी घेतलेल्या पदवीधरांना विनानिविदा पाच लाखापर्यंतचे काम देण्यात यावे असे आदेशही काढले होते. त्या काळात मी विधानपरिषदेतच वृत्त संकलन करत असे. ज्यावेळी पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे खाजगी टॅक्सी आणि रिक्षाचे भाव वाढणार या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा व्हायची, त्यावेळी नितीनजी शेतीतील कचऱ्यापासून बायोगॅस आणि इथेनॉल निर्मिती याची संकल्पना मांडायचे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आपल्या देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर सुरू झाला. असेच अनेक कल्पक उपक्रम त्यांनी राबवले आणि त्याचा फायदा देशाला मिळाला. त्यांच्या या प्रयोगाशीलतेला दाद देत देशातील सहा विद्यापीठांनी त्यांना मानद डिलीट ही पदवी प्रदान केलेली आहे.
तसा विचार करता नितीन गडकरींच्या परिवाराला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. नागपूर जिल्ह्यातील सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांचे वडील गेले. त्यांची आई भानूताई गडकरी या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या होत्या. गडकरींमध्ये सामाजिक कार्याची आवड तिथूनच निर्माण झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद, जनता पक्ष आणि मग भारतीय जनता पक्ष असा प्रवास करताना त्यांनी व्यापक जनसंपर्कावर कायम भर दिला. हा जनसंपर्कच त्यांना कायम उपयोगी पडला. आज समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचा संपर्क आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावाने ओळखतात. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना माहित आहे. त्यातूनच ते पक्षाची बांधणी करत गेले आणि पक्षाला तसेच स्वतःला पुढे नेत गेले. समोर येणाऱ्या प्रत्येकाचे जमेल तसे काम करून त्याला मदत करायची हे त्यांचे धोरण आजही कायम आहे मात्र ते करत असताना आपला स्पष्टवक्ता स्वभाव त्यांनी कायम ठेवला आहे. जे काम जमणार नसेल ते स्पष्टपणे जमणार नाही असेच ते सांगतात. उगाच खोटी आश्वासने ते देत नाहीत. प्रसंगी आपल्या फटकळ स्वभावानुसार समोरच्याला चार गोष्टी सुनावयालाही ते मागेपुढे बघत नाहीत. मात्र असे करताना समोरचा दुखावणार नाही याची काळजी ते घेत असतात.
फक्त स्वतःच्याच पक्षात नाही तर इतर सर्व पक्षांमध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भाई अर्धेंदू भूषण बर्धन हे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. ते मूळचे नागपूरचेच कार्यकर्ते होते. गडकरी तरुण राजकीय कार्यकर्ते म्हणून पुढे येत असताना बर्धन हे माकपचे राष्ट्रीय नेते झालेले होते. तरीही त्यांचे आणि गडकरींचे स्नेहपूर्ण संबंध होते. गडकरी ज्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळी बर्धन दिल्लीच स्थायिक झाले होते. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर दुसऱ्याच दिवशी गडकरी माकप च्या कार्यालयात पोहोचले.सहाजिकच माध्यमांच्या भुवया उंचावल्या. नितीनजी तिथे जाऊन भाई बर्धन यांना भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तिथे फक्त व्यक्तिगत प्रेम संबंध आणि ज्येष्ठांचा आदर हाच मुद्दा होता. बाकी भिन्न विचारधारा राजकीय विरोध हे मुद्दे गौण होते.
असेच संबंध गडकरींनी सर्वच पक्षात जपले होते. काँग्रेसचे नेते दत्ता मेघे आणि गिरीश गांधी यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत मैत्र आहे. मला आठवते गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आणि रविवारी ते नागपुरात आले त्यावेळी नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. सोमवारी दुपारी गडकरी विधान परिषदेत पोहोचले. ते सभागृहात येताच भाजपसह शिवसेना सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे विधान परिषदेचे नेते होते. आधी भुजबळ गृहमंत्री असताना तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणात गडकरींनी वेगवेगळे पुरावे आणून भुजबळांना अगदी हैराण करून सोडले होते. मात्र तरीही त्यांनी भुजबळांशी संबंध कायम जपले. त्यामुळेच त्या दिवशी गडकरी सभागृहात येताच सभागृहाचे नेते असलेले भुजबळ उठून उभे राहिले आणि सभागृहाच्या सभापतींना विनंती केली की आपल्या सभागृहातील माजी विरोधी पक्षनेते आणि जेष्ठ सदस्य नितीन गडकरी हे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचे आमचे वैचारिक मतभेद असले तरी ते आमचे मित्र आहेत.ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळ बाजूला ठेवून सभागृहात नितीन गडकरींच्या अभिनंदनचा प्रस्ताव मांडला जावा, आणि त्यांचे अभिनंदन केले जावे. सभापतींनी परवानगी देताच स्वतः भुजबळांनी स्वतः गडकरींच्या अभिनंदनचा ठराव मांडला आणि सत्ताधारी तसेच विरोधक सर्वांनी गडकरींच्या सन्मानार्थ आपले विचार व्यक्त केले. नंतर सभागृहाने एकमताने गडकरींच्या अभिनंदनचा प्रस्ताव पारित केला होता. हे सर्व गडकरींनी सर्व पक्षात व्यक्तिगत संबंध जपल्यामुळेच शक्य झाले होते.
गडकरींनी आपल्या राजकीय वाटचालीत ज्याप्रमाणे राज्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला त्याचप्रमाणे त्यांनी केंद्रात आणि पर्यायाने देशातही आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यामुळेच आज देशातील पहिल्या पाच राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. सर्व पक्षांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. इतकेच काय तर समाजाच्या सर्वच स्तरावर सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना आदरानेच वागवले जाते.
राजकीय नेत्याने फक्त राजकारणच केले पाहिजे असे नाही, तर त्याने समाजकारण देखील करणे गरजेचे असते. गडकरींनी हे सुरुवातीपासूनच ताडले. मला आठवते अगदी सुरुवातीला १९९२-९३ च्या दरम्यान त्यांनी नागपूर जवळच्या हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सर्व मित्रांकडून गुंतवणूक करून घेत एक पॉलिसॅक इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी या नावाने सहकारी कारखाना सुरू केला होता. नंतरच्या काळात त्यांनी नागपुरात पूर्ती सुपर मार्केट सुरू केले. मग पूर्ती साखर कारखाना त्याला जोडून कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारा कारखाना अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यातून स्थानिकांना रोजगार देणे त्यांनी सुरू केले. एखाद्या भागाचं विकास करायचा असेल तर सर्वप्रथम त्या भागाचे दरडोई उत्पन्न वाढवले पाहिजे, हे त्यांचे ठाम मत आहे. त्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योग सुरू करून रोजगार निर्माण केले पाहिजेत. विदर्भात त्यांनी तोच प्रयोग यशस्वीरित्या राबवला. यातूनच ते माणसं जोडत गेले.
सर्वांगीण विकासासाठी फक्त रोजगार देऊन कामाचे नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक विकास व्हायला हवा हे त्यांचे मत आहे. त्यामुळेच ते खासदार झाल्यावर त्यांनी नागपूरला खासदार सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना राबवणे सुरू केले. त्यानंतर खासदार क्रीडा महोत्सव देखील सुरू झाला. दरवर्षी ते या दोन उपक्रमांसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करत असतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी ते नागपुरात ऍग्रो व्हिजन हे कृषी प्रदर्शन आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत असतात. नागपूर महापालिकेत त्यांनी भाजपची सत्ता आणली आणि मग शहराला २४ तास पाणीपुरवठा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले. शहरातल्या सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध पाणी राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महानिर्मितीला कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रांसाठी पुरवण्याची व्यवस्था केली. त्यातून महापालिकेला देखील पैसा मिळू लागला. असे विविध प्रयोग ते राबवत असतात. हे फक्त नागपूर स्तरावरच नाही तर राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर देखील ते राबवतात.
असे लोकनेते संघटक आणि कल्पक व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले नितीनजी गडकरी आज २७ मे २०२५ रोजी वयाची ६८ वर्षे पूर्ण करून ६९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने त्यांना ,"Ddbatmi-m2M" परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच अखंड देशसेवा घडावी यासाठी परमेश्वराने त्यांना दीर्घायुरारोग्य प्रदान करावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
अविनाश पाठक, नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment