आठवलं ते सांगितलं मेजर कृष्णराव खोत: अभिष्टचिंतन
आठवलं ते सांगितलं
मेजर कृष्णराव खोत: अभिष्टचिंतन
दि.०४ मे २०२५
रोटरी चळवळीतील महिलांची विंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इनर व्हीलच्या नाशिक शाखेच्या पदग्रहण समारंभातील ही घटना आहे. पदग्रहण आटोपल्यावर उपस्थितांचा परिचय करून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. उपस्थितांमध्ये एक ज्येष्ठ रोटेरीयन उपस्थित होते. हे रोटेरियन समाजातही प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांची परिचयाची वेळ आली तेव्हा ते उठून उभे राहिले आणि शांतपणे आपली ओळख करून दिली. मी मेजर कृष्णा खोत. आज या इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी पदग्रहण केले, त्यांचा मी सासरा.
त्यांनी करून दिलेल्या या ओळखीने उपस्थित सर्वच जण चांगलेच चक्रावले. वस्तुतः मेजर कृष्णराव खोत यांचे समाजात एक वेगळे स्थान होते. मात्र आपली सर्व प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांनी मी प्रेसिडेंट विभा खोतचा सासरा ही साधी ओळख करून दिली होती.
वस्तूतः स्वकर्तृत्वावर मोठे झालेल्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा आणि मोठेपणाचा सार्थ अभिमान असतो. अशावेळी आपण आपल्याच नावाने ओळखले गेले पाहिजे. आपल्या मुला-मुलींच्या किंवा सून जावयांच्या कर्तृत्वावर आपली ओळख नको अशी यातल्या अनेकांची भावना असते. तशी ओळख व्हायला लागली तर अशी कर्तृत्ववान माणसं अस्वस्थ होतात. मात्र ही भावना बाजूला ठेवून जिला आपण आपल्या मुलीसमान मानले त्या सुनेच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी मेजर खोत आपले सामाजिक स्थान विसरून त्या दिवशी उभे झाले होते.
मेजर कृष्णराव खोत हे माझे महाविद्यालयीन जीवनातील शिक्षक. नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात मी प्रवेश घेतला तेव्हा साधारणपणे १९७०-७१ च्या दरम्यान त्यांचा माझा संबंध आला. आधी शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून असलेला संबंध हळूहळू कौटुंबिक कसा झाला ते दोघांनाही कळले नाही. मात्र आज ५५ वर्षानंतर आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले कौटुंबिक मित्र झालो आहोत.
या ५५ वर्षांच्या कालखंडात मेजर खोतांची अनेक रूपे मी बघितली आहेत. त्यातलेच हे एक पितृत्वाचे प्रतीक असणारे आपल्या सुनेचे कौतुक करणारे आणि मोठेपण मान्य करणारे एक रूप. त्याशिवाय एक चांगला शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक, कुशल संघटक, एक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता, एक सर्वांना झोकून देऊन मदत करणारा माणूस आणि कोणाचेही कौतुक करून कोणावरही प्रेम करायला आणि कोणालाही मदत करायला तयार असणारा आणि आणि सर्वांशी मैत्री जपून सर्वांच्याच उपयोगी पडणारा ८८ वर्षाचा उत्साही तरुण अशी त्यांची अनेक रूपे डोळ्यासमोर तरळून जातात.
मला आठवते तो तरीच रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदासाठी खोत सरांचे नाशिकचे मित्र दादा देशमुख निवडणूक लढवत होते. त्यावर्षी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स नागपुरात असल्यामुळे ही निवडणूक नागपुरातच होणार होती. त्यावेळी मी नाशिकच्या दैनिक गावकरीचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच खोत सरांनी मला सांगितले. "अव्या, दादा निवडून येणार हे नक्की आहे. ते निवडून आले की उद्याच्या गावकरीत त्यांच्या मुलाखतीसह बातमी यायला हवी." योगायोगाने खोत सरांचे शब्द खरे ठरले आणि दादा देशमुख डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून विजयी झाले. ठरल्याप्रमाणे मी दादांची मुलाखत घेतली आणि गावकरीच्या संपादकांना फोन करून उद्याच्या अंकात ही मुलाखत येऊ द्या अशी विनंती केली. गावकरीचे संपादक मुलाखत छापायला तर तयार झाले, मात्र त्यांच्याकडे दादांचा फोटो नव्हता. खोत सरांना हे कळताच त्यांनी नाशिकमध्ये फोन करून दादांचा फोटो गावकरीच्या ऑफिसमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. फोटो तिथे पोहोचल्याचे कन्फर्म केले. मगच सर पुढच्या कामाला लागले.
तोच प्रकार दादांच्या पदग्रहण समारंभाच्या वेळेसही झाला. ज्या दिवशी पदग्रहण समारंभ होता, त्याच दिवशी दादांवर गावकरीत एक लेख छापून यावा असा सरांचा आग्रह होता. त्यासाठी महिनाभर आधीपासून ते माझ्या मागे पडले होते. मग मी दादांशी बोलून त्यांची माहिती घेतली आणि एक सविस्तर लेख तयार केला. तो गावकरीला पाठवला आणि त्या दिवशीच यावा अशी विनंती केली. सरांनी त्यादिवशी तो लेख येईल अशी खात्री करून घेतली आणि स्वतःच्या खर्चाने त्या दिवशी गावकरीचे पाचशे अंक विकत घेऊन पदग्रहण समारंभात वाटण्याची व्यवस्थाही केली. त्यावर्षी रोटरीच्या एका क्लबचा मी अध्यक्ष देखील होतो. त्यामुळे मी देखील पदग्रहण समारंभाला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर सर्व उपस्थितांना आजचा दादांवरचा लेख यांनीच लिहिला आहे असे कौतुकाने खोत सर प्रत्येकाला सांगतही होते.
रोटरीचा वार्षिक पुरस्कार समारोह त्यावर्षी नाशिकला होता. त्यामुळे मी देखील तिथे गेलो होतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एका रोटरी क्लबच्या मीटिंगमध्ये मलाही बोलावले होते. मीटिंगनंतर भोजनाच्या वेळी गप्पा सुरू होत्या. त्यावर्षी लगेचच भारतीय पंचांगानुसार अधिक महिना लागणार होता. त्या क्लबच्या काही महिला सदस्य नागपूरच्या माहेरवाशीणी होत्या. रोटरीचे एक पदाधिकारी सुनील सौंदंणकर थट्टेत म्हणाले की यंदा अधिकाचा महिना आहे. या माहेरवाशींणींना नागपूरला जाणे होते की नाही माहित नाही. त्यामुळे नागपूरकर म्हणून खोतकाकांनाच या सगळ्यांना अधिकाचे वाण द्यावे अशी माझी सूचना आहे. खोत सरांनी ही सूचना त्या दिवशी आनंदाने मान्य केली आणि सर्व माहेरवाशींणींना अधिकाचे वाण देण्याची व्यवस्थाही केली होती.
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांनी अक्षरशः घडवले. त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झालेले एनसीसीचे विद्यार्थी आज लष्करात वरच्या पदावर कार्यरत आहेत. एनसीसी ऑफिसर म्हणून त्यांनी जी वाटचाल सुरू केली तिच्यात त्यांची कार्यतत्परता पाहून एनसीसीने त्यांना मेजर ही रँक प्रदान केली होती. मेजर ही पदवी ते आजही अभिमानाने मिरवतात. एखादा विद्यार्थी काही वेगळे करणारा असला तर त्याचे कौतुक करायला सर कायम तत्पर असायचे. त्याचप्रमाणे एखाद्याला एखाद्या कामात काही अडचण आली तर मदत करायलाही ते धावायचे. मला आठवते दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत असताना एकदा मला कबड्डीच्या मॅचचे चित्रीकरण करण्याची वेळ आली. दूरदर्शन साठी चित्रीकरण पाठवताना प्रत्येक शॉटची तांत्रिक माहिती देखील द्यावी लागत असे. मला कबड्डीची तांत्रिक माहिती काहीच नव्हती. त्यादिवशी खोत सर पूर्ण वेळ माझ्याबरोबर ग्राउंडवर बसले होते आणि मी घेतलेल्या प्रत्येक शॉटची नोंद करून त्याची तांत्रिक माहिती सर नोंदवत होते. खरे तर त्यावेळी एनसीसीचे मेजर आणि प्राध्यापक म्हणून सरांचा सामाजिक दर्जा वेगळा होता. मात्र ते सर्व विसरून सर मला मदत करायला तिथे धावले होते.
वयाच्या साठीनंतर नियमाप्रमाणे खोत सर प्राध्यापकाच्या नोकरीतून निवृत्त झाले. मात्र त्यांचे सामाजिक काम सुरू होते. निवृत्तीनंतर जवळजवळ बारा वर्षांनी कौटुंबिक कारणामुळे ते नागपूर आतून नाशिकला स्थलांतरित झाले. नागपूरात जसे त्यांनी आपले जनसंपर्काचे वलय तयार केले होते तसेच वलय त्यांनी नाशिकमध्ये देखील तयार केले. रोटरीच्या चळवळीत तिथेही ते सक्रिय झाले. मधल्या काळात त्यांचा थोरला मुलगा नितीन आणि नंतर त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी श्यामला वहिनी त्यांना सोडून गेल्या. मात्र त्या धक्क्यातून सावरत त्यांनी पुन्हा समाजसेवेत स्वतःला झोकून दिले. आज वयाच्या ८८ व्या वर्षी ते समाजसेवेत सक्रिय आहेत. ऐ
खोत सर जसे सुनेच्या बाबतीत काळजी घेणारे आहेत, तितकेच आपल्या दोन नातींच्या बाबतीतही हळवे आहेत. शेवटी दुधापेक्षा दुधावरची साय हीच जास्त महत्त्वाची असते असे म्हणतात. खोत सरांनी देखील हे मर्म जाणले आहे. आज आपल्या दोन्ही नातींच्या बाबत हे अतिशय काळजी घेतात. त्यांची एक नात क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी दररोज जाते. तिथे ती थोडीही थकली तरी सर अस्वस्थ होतात. मी देखील मैदानावर अनेक विद्यार्थी घडवले, पण इतके थकवले नाही, असे प्रसंगी त्या नातीच्या कोचला देखील ठणकावायला तयार असतात.
असे हे मेजर कृष्णराव खोत नुकतेच वयाची ८८ वर्षे पूर्ण करून ८९ व्या वर्षात पदार्पण करते झाले आहेत. आज नाशिक मध्ये त्यांची स्नेहीमंडळी एकत्रितपणे त्यांचा ८८ वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
या निमित्ताने खोत सरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी वयाची शंभरी पूर्ण करावी आणि त्यासाठी परमेश्वराने त्यांना दीर्घायुरारोग्य प्रदान करावे हीच प्रभूचरणी प्रार्थना.
अविनाश पाठक , नागपूर.
धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात शिकत असताना याच मान.खोत सरांच्या सहकार्यामुळे मलाही हाॅकीत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होण्याची व खेळण्याची संधी प्राप्त झाली होती ,हे मी कधीच विसरू शकत नाही.खोत सरांना खूप खूप शुभेच्छा,व दिर्घायुष्याची कामना.
दीपक देशपांडे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment