*विशेष लेख...*देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधानपदाची पाऊलवाट सुकर होईल?


आज दि.१ मे २०२५,हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून तर महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने  विशेष लेख...

देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधानपदाची पाऊलवाट सुकर होईल?



एका काळात महाराष्ट्रातील मराठ्यांनी आपले घोडे अटकेपार नेले होते. मात्र दिल्लीवर स्वारी करून महाराष्ट्र दिल्ली ताब्यात घेण्याचे आणि तिथे राज्य करण्याचे मराठ्यांचे स्वप्न कधीच साकार झाले नाही. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजवर अनेक मराठी नेत्यांची नावे पंतप्रधान पदासाठी घेतली गेली. मात्र आजवर दिल्लीतही देशाचा पंतप्रधान म्हणून एकही मराठी माणूस येऊ शकलेला नाही. 

अशा स्थितीत आज नाही पण पुढील काही वर्षात दिल्लीच्या तख्तावर विराजमान होऊन देशाचा पंतप्रधान म्हणून राज्यकारभार करण्याची संधी मिळू शकेल असे एक मराठी नाव वारंवार घेतले जाते आहे, ते म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. 

होय... देवेंद्र फडणवीस हे भविष्यात देशाचे पंतप्रधान निश्चित होऊ शकतात तेवढे कर्तृत्व त्यांनी आजवर सिद्ध केलेले आहे.हे फक्त माझेच मत आहे असे नाही तर देशातील अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी देखील हे भाकित केलेले आहे.एक अभ्यासू आणि आपण जनसंपर्काचा धनी असलेला लोकनेता, एक अभ्यासू लोकप्रतिनिधी, राजकारणाची जाण असलेला चाणक्य, आणि राजकारणात योग्य ती रणनीती आखून कोणालाही शिंगावर घेण्याची हिंमत ठेवणारा धाडसी नेता अशी ओळख असलेला हा विदर्भातील मातीत पुढे आलेला एकमेव असा देवेंद्र फडणवीसच आहे हे नाकारता येत नाही. 

देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्र दिनाच्या अंकासाठी लेख हवा आहे असा संपादकांचा फोन येताच माझ्या डोळ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील विविध टप्पे उभे राहिले. १९७३- ७४ या कालखंडात गंगाधरराव फडणवीस यांच्या घरी कामाने गेल्यावर समोर येणारा लहानगा देवू, पुढे जाऊन धरमपेठेत मित्रांबरोबर खेळणारा देवेन, महाविद्यालयीन जीवनात अभ्यासासोबत राजकारणातही आघाडीवर असलेला देवेंद्र, राजकारणात येऊन लोकप्रतिनिधी बनल्यावर झालेला देवेंद्रजी, नंतर बनलेले फडणवीस साहेब, आणि आताचे सीएम सर या सर्व टप्प्यावरचा देवेंद्र मी जवळून पाहिलेला आहे. या काळातल्या त्याच्या कर्तृत्वासोबत त्याच्या प्रगल्भतेचे आणि धाडसी स्वभावाचे अनेक अनुभव मी वेळोवेळी घेतलेले आहेत. राजकारण करताना लोकसेवा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे याचे भान ठेवून कोणालाही न दुखावता शांतपणे समजून घेणारा लोकनेता अशी त्याची ख्याती झालेली आहे. 

मला आठवते १९६९ साली गंगाधरराव फडणवीस आमच्या लक्ष्मी नगर वार्डाचे नगरसेवक बनले. त्यावेळी माझे वडील लक्ष्मी नगरच्या सायंटिफिक सोसायटीचे सहसचिव होते, तर बाजूच्याच अत्रेलेआउट सोसायटीतही ते पदाधिकारी होते. त्यामुळे काही ना काही कामाने गंगाधरराव वडिलांकडे यायचे. तासचे तास गप्पाही चालायच्या. गंगाधरराव हे दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे मोठ्यांमध्ये मोठे तर लहानांमध्ये लहान होऊन वागणारे होते. त्यामुळे बाबांइतकीच मैत्री त्यांनी माझ्याशीही केली होती. मग काही काम पडले की त्यांच्या धरमपेठच्या घरी जायचो. त्यावेळी लहानगा देवू मी बघितलेला तर आहेच, पण कधीमधी त्यांच्याबरोबर गप्पाही केल्या आहेत. 

आज देवेंद्रवर लेख लिहिताना त्याचे विविध किस्से इथे आठवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म १९७० चा, मी वयाने त्यांच्यापेक्षा जवळजवळ पंधरा वर्षांनी ज्येष्ठ, त्यामुळे ठरवूनही अनेकदा एकेरीत उल्लेख केला जातो. तसाच या लेखातही होतो आहे. वाचक समजून घेतील अशी अपेक्षा आहे. तो मुख्यमंत्री होईपर्यंत मी त्याला एकेरीत ए देवेन् म्हणूनच हाक मारायचो. मात्र देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यावर मी त्याला चारचौघात कटाक्षाने देवेंद्रजी अशीच हाक मारण्याची सवय केली आहे.

मला आठवते १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागली. त्यावेळी गंगाधरराव भारतीय जनसंघाचे नगरसेवक तर होतेच, पण नागपूरचे उपमहापौर देखील होते. आणिबाणी लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी गंगाधर रावांना अटक झाली. त्याच दरम्यान देवेंद्र सहा वर्षाचा झाला म्हणून त्याला इंदिरा कॉन्व्हेंट मध्ये टाकायचे ठरले. मात्र लहान देवेंद्रने इंदिरा कॉन्व्हेंट मध्ये जायला विरोध केला. त्याचे म्हणणे एकच होते की माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले आहे. मग त्यांच्या नावाच्या शाळेत मी जाणार नाही. शेवटी त्याच्या मातोश्री म्हणजेच सरिता वहिनींनी देवेंद्रला सरस्वती  विद्यालयात दाखल केले. पहिली ते दहावीपर्यंत तिथेच त्याचे शिक्षण झाले. 

ओजानेवारी १९७७ मध्ये आणीबाणी शिथिल झाली. जे राजकीय कैदी होते त्यांना सोडायला सुरुवात झाली. गंगाधर रावांचीही सुटका झाली. गंगाधररावांची नागपूरच्या सेंट्रल जेल पासून तर धरमपेठेतल्या त्यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक निघाली. त्यावेळी उघड्या जीप वर पूर्ण वेळ देवेंद्र बाबांसोबत उभा होता. त्याचे त्यावेळचे फोटो आजही उपलब्ध होतील. 

धरमपेठेत फडणवीसांच्या घराच्या दोन गल्ल्यापलीकडे काही काळ मी फोटो स्टुडिओ सुरू केला होता. तिथे शोकेसमध्ये गंगाधररावांचे एक मोठे पोर्ट्रेट लावले होते. अनेकदा देवेंद्र आपल्या मित्रांसोबत तिथे माझ्या स्टुडिओकडे यायचा, आणि हा माझ्या बाबांचा फोटो आहे असे सगळ्यांना कौतुकाने दाखवायचा. (गंगाधररावांचे ते पोर्ट्रेट आजही रंगीत स्वरूपात देवेंद्रच्या नागपुरातील ऑफिसमध्ये लावण्यात आले आहे.)त्यावेळी धरमपेठेत सायकल शिकल्यावर तिथल्या गल्ल्यांमध्ये सायकल चालवणारा देवेंद्र आम्ही बघितला आहे. पुढे अकरावीत गेल्यावर परीक्षेसाठी लागणाऱ्या पासपोर्ट फोटोसाठी सुद्धा देवेंद्र माझ्याकडे आल्याचे आठवते. 

बारावी पास झाल्यावर देवेंद्रने नागपूरच्या लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षीय एलएलबी ला ऍडमिशन घेतली. तिथून त्याच्या राजकारणाची खरी सुरुवात झाली. तिथे असतानाच त्याने समविचारी मित्रांचे पॅनल तयार करून निवडणूक ही लढवली होती. त्यावेळी श्रीकांत जिचकार सारख्या नागपूर विद्यापीठात एक ताकद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीलाही शिंगावर घेण्याची हिंमत त्याने दाखवली होती. हीच हिम्मत दाखवत देवेंद्र पुढे गेला आणि गेल्या पाच सात वर्षात त्याने शरद पवारांसारख्या दिग्गजालाही अंगावर घेण्याचीही पद दाखवली आणि त्यात तो यशस्वी ही झाला, हे कोणीच नाकारू शकत नाही. 

लॉ च्या अंतिम वर्षाला असतानाच देवेंद्रला भारतीय जनता पक्षाने धरमपेठ वार्डातून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. त्यावेळी राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याच्या देवेंद्र मानसिकतेत नव्हता. त्याला लॉ चे शिक्षण पूर्ण केल्यावर खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून जायचे होते. मात्र त्यावेळी संघाच्याच अधिकाऱ्यांनी त्याला समजावले आणि सरिता वहिनींनी देखील त्याची समजूत घातली, आणि देवेंद्रनेही निवडणूक लढवली. वयाच्या बाविसाव्या वर्षीच तो नगरसेवक म्हणून निवडून आला. पाच वर्ष यशस्वी कारकीर्द पूर्ण करून १९९७ मध्ये पुन्हा एकदा तो नगरसेवक बनला. लगेचच तो नागपूरचा महापौरही बनला. वयाच्या २७ व्या वर्षीच त्याला महापौर पदाची संधी मिळाली होती. या संधीचेही त्याने सोने केले. 

त्यामुळेच की काय, पण १९९९ मध्ये भारतीय जनता पक्षाने त्याला पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडणुकीला उभे केले. यावेळीही तो दणदणीत बहुमताने निवडून आला. आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये दुसऱ्याच वर्षी त्याला उत्कृष्ट संसद पटू म्हणून सन्मानही प्राप्त झाला. कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून आणि विधिमंडळ कायद्यांचा सखोल अभ्यास करून त्याने अल्पावधीतच सभागृहात आपले स्थान निर्माण केले होते. 

जसे देवेंद्रने अल्पावधीत सभागृहात स्थान निर्माण केले होते, तसेच पक्ष संघटनेतही त्याने आपला दबदबा निर्माण केला होता. परिणामी २००५ मध्ये तो भाजपाचा प्रदेश सरचिटणीस बनला. याच काळात देवेंद्रजींच्या आयुष्यात अमृताचा शिडकावाही झाला. म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कुमारी अमृता रानडे या सौभाग्यवती अमृता देवेंद्र फडणवीस झाल्या. तिथून त्याच्या संसारी आयुष्यालाही सुरुवात झाली. 

१९९९ नंतर २००४ आणि २००९ मध्ये देवेंद्र विरोधकांना चारी मुंड्या चित करत विधानसभेत निवडून जात होता. पक्ष संघटनेतही त्याचे काम लक्षणीय होते. त्यामुळे एप्रिल २०१३ मध्ये त्याला भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. लगेचच २०१४ च्या लोकसभा निवडणुका होत्या. यावेळी देवेंद्रने रात्रीचा दिवस करत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि शिवसेना-भाजप युतीच्या ४८ पैकी ४२ जागांवर विजय मिळवला. 

त्यानंतर लगेचच चार महिन्यात विधानसभा निवडणुका होत्या. यावेळी बदलत्या परिस्थितीत भाजप शिवसेना युतीत भाजपाला काही जागा वाढवून मिळाव्या अशी आग्रही मागणी केली जात होती. मात्र शिवसेना नेते ऐकायला तयार नव्हते. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून युती तोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वबळावर निवडणूक लढवून महाराष्ट्रात प्रथमच भाजपला विधानसभेत १२२ जागा मिळवून दिल्या.त्यावेळी सहाजिकच नव्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले. 

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवे मंत्रिमंडळ तर गठीत केले, पण ते काही काळ अल्पमतातच होते. त्या काळात शिवसेनेची पुन्हा नव्याने युती करून सरकार स्थिर केले आणि संपूर्ण पाच वर्ष सरकार चालवले. यापूर्वी महाराष्ट्रात सलग पाच वर्ष सरकार चालवण्याचा विक्रम फक्त वसंतराव नाईक यांच्याच नावे नोंदला गेला होता. नंतर सतत पाच वर्ष सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले. या काळात त्यांनी विविध लोकोपयोगी योजना कार्यान्वित केल्या. शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळ्यांची योजना सुरू केली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. विशेष म्हणजे श्रमिक पत्रकारांसाठी त्यांनी प्रथमच पेन्शन योजना सुरू केली. अनेक ज्येष्ठ पत्रकारांना त्याचा लाभ मिळाला. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने युती करून लढवल्या. त्याचा फायदाही झाला. नंतर विधानसभा निवडणुकातही दोन्ही पक्षांची युती होती. मात्र निवडणुकीत काही जागांवर शिवसेनेने धोकेबाजी केली. परिणामी भाजपच्या काही जागा पडल्या भाजप फक्त १०५ जागांवर विजयी झाला. निकाल लागताच देवेंद्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी सरड्यासारखा रंग बदलला. त्यांनी बाळासाहेबांच्या खोलीत कधीही न दिलेल्या वचनाचा आधार देत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली. ही मागणी देखील थेट भाजपकडे न करता पत्र परिषदेच्या माध्यमातून केली आणि लगेचच राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून मोकळे झाले. परिणामी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आले. भाजपला हा जोरदार धक्का होता, त्याचबरोबर मतदारांशीही गद्दारी होती.मात्र देवेंद्र फडणवीस या धक्क्याने डगमगले नाहीत. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम सुरू केले आणि सत्ताधारी पक्षाला अक्षरशः जेरीस आणले. याच काळात कोरोनाची लाट आली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे हे मातोश्रीत बसून फेसबुक लाईव्ह करत होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात फिरून रोग्यांना दिलासा देत होते, त्यांच्या गरजा पूर्ण करत होते. 

उद्धव ठाकरे सरकार जेमतेम २७ महिने टिकले. अचानक एक दिवस त्यांच्याच पक्षातले ४० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे आधी गुजराथेत आणि नंतर आसाम मध्ये रवाना झाले. देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संधान बांधून होते. महाराष्ट्रात यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे प्रमुख सूत्रधार असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरेही अक्षरशः हादरले. शिंदेनसह ५० च्या वर आमदार आसाम मध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत आले, आणि देवेंद्रजींसोबत त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामुळे हादरलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असा कारभार सुरू झाला. या काळातही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रशासन कौशल्याची चुणूक दाखवून दिली होतीच. 

उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून खाली खेचून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक धक्का तर दिला होताच.

दुसरा जोरदार धक्का त्यांनी वर्षभराने दिला. त्यावेळी शरद पवारांचे पुतणे आणि विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांनाच चाळीस आमदारांसह त्यांनी पक्षाबाहेर काढले, आणि या चाळीस आमदारांसह आपले मंत्रिमंडळ अधिकच मजबूत केले. शरद पवारांना हात चोळत बसण्यापलीकडे काहीही करता आले नाही. 

वर्षभरातच २०२४ च्या लोकसभा निवडणुका आल्या. यावेळी काँग्रेसने फेक नॅरेटिव्हज् पसरवून काही जागा जिंकल्या. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप समर्थित महायुती पिछाडीवर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लगेच हालचाली करून विधानसभा निवडणुकांची तयारी केली. धडाकून प्रचार केला. परिणामी विधानसभेत भाजपला १३२ जागा मिळाल्या तर महायुतीला २३२ जागा मिळाल्या. बदल्यात शिवसेनेला फक्त वीस जागा, तर काँग्रेसला फक्त १६ जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या. शरद पवारांना हा जबरदस्त धक्का होता. मला वाटते अद्यापही पवार साहेब या धक्क्यातून सावरलेले नसावे. 

आपल्या ३३ वर्षाच्या राजकीय आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांनी आपण एक कुशल प्रशासक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी आहोत, हे तर दाखवून दिले आहेच,पण त्याचबरोबर कोणालाही न डगमगता अंगावर घेऊ शकणारा एक धाडसी लोकनेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. आज महाराष्ट्रात ते महायुतीचे सरकार पुढे नेत आहेत. महायुतीच्या काळात अनेक नवे नवे कायदे त्यांनी केले, तर अनेक नवे प्रकल्पही राबवले. आज त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र उद्योगधंद्यांबाबतही संपन्न होताना दिसतो आहे. 

आधी नमूद केल्याप्रमाणे आतापर्यंत महाराष्ट्रात दिल्लीत पंतप्रधान होऊ शकणारे काही प्रमुख नेते होऊन गेले. त्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर भाजपचे प्रमोद महाजन आणि मग नितीन गडकरी हे देखील पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जात होते. १९९१ मध्ये शरद पवारही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले होते. नंतरही त्यांनी बरेच प्रयत्न केले त्यासाठी अगदी कालपरवापर्यंत त्यांनी विरोधकांची एकत्र मोट बांधून आपल्याला पंतप्रधान कसे होता येईल याची चाचपणी केली. मात्र त्यांचे ते स्वप्न आतापर्यंत तरी पूर्ण झाले नाही, आणि भविष्यात ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही दिसत नाही. 

त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने चांगले फासे पडतील आणि त्यांची पंतप्रधान पदाची वाट सुकर होईल अशी चिन्ह दिसत आहेत. सध्या भाजपमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांना अजून एक टर्म मिळेल असे चिन्ह दिसत आहे. त्यानंतर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर या दोघांचे काही कारणाने नाव बाजूला गेले तर तिसरे नाव देवेंद्र फडणवीस यांचे घेतले जात आहे. 

आज मोदी नंतर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस तरुण आहेत. त्यांचे वय जेमतेम ५४ वर्षाचे आहे. जसे ते एक अभ्यासू लोकनेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत, तसेच परिणामांची पर्वा न करता धडाडीने पुढे जाणारे आणि कोणालाही अंगावर घेणारे असे नेते म्हणून ते ओळखले गेले आहेत. 

भारतीय जनता पक्षावर त्यांची मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाचेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही वर्चस्व आहेच. साधारणपणे अशी महत्त्वाची पदे निश्चित करताना भाजप संघाला विश्वासात घेत असते. आज देवेंद्र फडणवीस यांचे संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे अजून दहा वर्षांनी त्यांची पंतप्रधान पदाची वाट सुकर झालेली असेल आणि मोदी नंतर देशाचे पुढचे पंतप्रधान ते बनलेले असतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

"दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा" असे एका महाराष्ट्रगीतात नमूद केलेले आहे. मात्र आजवर हे दिल्लीचे पंतप्रधानपदाचे तख्त राखण्याची संधी एकाही मराठी माणसाला मिळालेली नाही हे वास्तवही नाकारता येत नाही. असे असले तरी भविष्यात ती संधी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या निमित्ताने मिळू शकते हे निश्चित. तसेच झाले तर प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावलेली असेल यात शंका नाही. 

त्यासाठी आपण सर्वच मिळून देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा देऊ या.

अविनाश पाठक, नागपूर.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.