कालचक्र राहुल गांधींचे बेजबाबदार विधान आणि सर्वोच्च न्यायालयाची टिपणी
कालचक्र
राहुल गांधींचे बेजबाबदार विधान आणि सर्वोच्च न्यायालयाची टिपणीस्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची अशी थट्टा करणे चुकीचेच आहे, नव्हे हा बेजबाबदारपणाच आहे,अशा शब्दात समज देत भविष्यात असा प्रकार घडल्यास आम्हाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे ही टिपणी निश्चितच स्वागतार्हच म्हणावी लागेल. शेवटी सोनारालाच कान टोचावे लागले असे याबाबतीत म्हणता येईल.
नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध फौजदारी दावा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात त्यांना समन्सही जारी झाले आहे. हे समन्स रद्द व्हावे यासाठी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर केलेल्या अपिलात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राहुल गांधी यांना खडे बोल सुनावत इतिहासाचा अभ्यास करा असा सल्लाही दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलेली समज ही फक्त त्यांनाच नसून समस्त काँग्रेसजनांनाही दिलेली समज म्हणता येईल. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कायम तोंडी लावणे ठरलेले आहे. कोणीही उठावे आणि सावरकरांवर मनाला येईल तशी टीका करावी असा प्रकार गेली काही वर्षे सुरू असलेला आपण बघतो आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी देशभक्त होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चक्क जहाजातून समुद्रात उडीही घेतली होती. त्यांना विविध आरोपांवरून इंग्रज सरकारने काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ती किती कठोर होती याचे वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या माझी जन्मठेप या पुस्तकात स्पष्ट झालेले आहे. अशा कठोर शिक्षेच्या काळातही या विद्वान अभ्यासकाने भिंतीवर खिळ्याने करून काव्यरचना केल्या होत्या, आणि त्यांना कधीही चुना लावला जाईल हे लक्षात घेत त्या काव्यरचना त्यांनी कंठस्थ केल्या होत्या.
अंदमान निकोबार बेटावर शिक्षेसाठी मुक्कामी असलेल्या सावरकरांचा देशाशी पूर्णतः संपर्क तुटला होता. त्यामुळे देशात परत येऊन अप्रत्यक्षरीत्यातरी स्वातंत्र्यासाठी काही करता येईल या हेतूने त्यांनी इंग्रजांशी तडजोड करून ते महाराष्ट्रात रत्नागिरीला येऊन राहिले होते. त्या काळात त्यांना स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष भाग घेता येत नव्हता तरीही ते समाजसेवेच्या माध्यमातून जनजागरण करत होतेच. त्या काळात त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात पंडित नेहरूंची सत्ता आली. त्यांनी पद्धतशीरपणे अनेक स्वातंत्र्यवीरांना कायम दुर्लक्षित कसे ठेवता येईल असाच प्रयत्न केला. त्यात सरदार वल्लभभाई पटेल होते, तसेच नेताजी सुभाष चंद्र बोसही होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील त्यातलेच एक होते. सावरकरांना त्यांनी फक्त दुर्लक्षितच ठेवले असे नाही, तर महात्मा गांधींच्या हत्येच्या प्रकरणातही त्यांना गोवले होते. त्यावेळी काही काळ ते अटकेतही होते. मात्र नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. तरीही हे काँग्रेसवाले त्यांच्यावर आरोप करतच होते. त्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पुन्हा एक निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. त्यातही सावरकर हे गांधी हत्येच्या कटात कुठेही नव्हते असा निर्वाळा देण्यात आला होता.
तरीही काँग्रेसवाले काही ना काही मुद्दे काढून सावरकरांना बदनाम कसे करता येईल हा प्रयत्न सातत्याने करत असतात. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान ज्यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांनी देखील सावरकरांवर टीका करत तोंडसुख घेतले. त्यामुळेच त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यातील कारवाईला जरी सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना चांगलेच सुनावले आहे.
अंदमान निकोबारच्या जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट मिळून आपल्याला महाराष्ट्रात परत येता यावे यासाठी सावरकरांनी इंग्रज सरकारशी जो पत्रव्यवहार केला, त्यात त्यांनी खाली सही करताना आपला विश्वासू सेवक असा उल्लेख केला आहे याकडे राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी महात्मा गांधी सुद्धा इंग्रजांशी पत्रव्यवहार करताना आपला विश्वासू सेवक असाच उल्लेख करायचे याकडे असे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने सप्रमाण स्पष्ट केले आहे. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी याही पंतप्रधान असताना त्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवच केला होता, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा उज्वल असा इतिहास आहे. त्याचा आधी नीट अभ्यास करा आणि मगच बोला, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले आहे. स्वातंत्र्यवीरांचा अवमान व्हायला नको, तसा झाला तर आम्ही ते सहन करणार नाही. पुढल्यावेळी तुम्ही असे काही केले तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ आणि तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल. अशी समज देखील सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हे जे काही निरीक्षण नोंदवले हे निश्चितच लक्षणीय म्हणावे लागेल. वर नमूद केल्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात फक्त गांधी आणि नेहरू घराण्याचाच त्याग होता असे आजवरच्या नव्या इतिहासात नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर लिहिल्या गेलेल्या या इतिहासात अनेक स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख हेतूतः टाळला गेला आहे. वस्तूतः देशात गांधीयुग सुरू होण्यापूर्वी लोकमान्य टिळकांनीच देशभर जनजागृती केली होती. त्याच काळात गोपाळ गणेश आगरकर हे समाज सुधारक सुद्धा कार्यरत झाले होते. त्याही आधी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे या स्वातंत्र्यवीरांचाही उल्लेख लक्षणीय ठरतो. टिळक आणि आगरकर यांनी शांततामय मार्गाने संघर्ष केला. मात्र कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून संघर्ष उभा केला, आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यात महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख करता येईल. हे स्वातंत्र्य सैनिक फक्त महाराष्ट्रातच सक्रिय होते असे नाही, तर संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या स्वातंत्र्यवीरांनी संघर्ष उभा केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी समांतर आझाद हिंद फौजच उभी केली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर लिहिल्या गेलेल्या इतिहासात या सर्वच स्वातंत्र्यवीरांना दुर्लक्षित ठेवले गेले होते. इतकेच काय तर त्यांच्यापैकी अनेकांवर टीकाटिपणीही झाली होती. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या जयोस्तुते या स्वातंत्र्यलक्षमीच्या गीताला आणि त्यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गीताला संगीतबद्ध करून त्याचे ध्वनिमुद्रण आकाशवाणीवर वाजवण्याचा निर्णय घेतला म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नेहरूंच्या काळात आपली आकाशवाणीतील संगीतकारपदाची नोकरीही गमवावी लागली होती. इतका सावरकर विरोध त्यावेळी काँग्रेसी मंडळींनी केला होता. आजही तो विरोध कायमच आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी अशी बेजबाबदार विधाने केली आहेत.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना फटकारले हे फार चांगले झाले. यातून तरी राहुल गांधी शहाणपण शिकतील अशी अपेक्षा आहे. अर्थात ते शहाणपण शिकले नाही तर जनता त्यांना आपली जागा दाखवतेच. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपली जागा दाखवून दिलीच आहे. आता राहुल गांधी जगभर ओरडत फिरत आहेत की हा ईव्हीएम घोटाळा आहे. मात्र जनता शहाणी आहे. ती या ओरडण्याकडे दुर्लक्ष करेल हे नक्की.
सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपणीनंतर आता तरी काँग्रेसी नेते आणि कार्यकर्ते शहाणे होतील आणि यापुढे अभ्यास करून बोलतील अशी अपेक्षा करूया.
अविनाश पाठक
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment