आयुष्यातले सांगाती..... चला प्रारंभ तर करूया...
आयुष्यातले सांगाती.....
चला प्रारंभ तर करूया...
नमस्कार मंडळी...
आज २० मे २०२५. उद्या २१ मे २०२५ रोजी मी आयुष्याची सात दशके पूर्ण करीन. होय मंडळी.. उद्या मी वयाची ७० वर्ष पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण करीन.
या सात दशकांच्या आयुष्यातील बाल्य आणि किशोरवयाची पहिली पंधरा-सोळा वर्षे सोडली तर उर्वरित साडेपाच दशकांच्या आयुष्यात प्रत्येक पावलावर संघर्ष करतच मी जगलो आहे. या काळात मी वेगवेगळे प्रयोग केले. प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केले. तर फोटो स्टुडिओ सुद्धा चालवला. तब्बल अकरा वर्ष दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून देखील मी कार्यरत राहिलो. त्या काळात मुंबई दूरदर्शनच्या काही कार्यक्रमांच्या निर्मितीतही माझा सहभाग राहिला. *नागपूर दूरदर्शनच्या पहिल्या दिवशीच्या प्रसारणात प्रसारित झालेल्या वृत्तपत्राचे परिसर चित्रीकरण करण्याची संधी मला मिळाली होती. तसेच देशात सुरू असलेल्या झालेल्या राष्ट्रीय प्रसारणात पहिल्याच दिवशी प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये मी चित्रित केलेली वृत्तचित्रेही प्रक्षेपित झाली होती.* आकाशवाणीसाठी साप्ताहिक वृत्तपट निर्मितीसुद्धा मी केली. फिल्म्स् डिव्हिजन आणि महाराष्ट्र शासनाचा फिल्म प्रभाग यांच्यासाठी देखील चित्रीकरण केले. दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करावी आणि त्यासाठी नागपुरात स्वतंत्र युनिट उभारावे म्हणूनही मी अयशस्वी धडपड देखील केली. त्यात आयुष्यातील दहा वर्ष घालवली. काही काळ काही राजकीय मित्रांची प्रसिद्धी देखील सांभाळली. या काळात माझे लेखन आणि जमेल तशी पत्रकारिता तर सुरू होतीच. नंतर काही कारणाने पूर्णवेळ पत्रकारितेत आलो आणि महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रांसाठी काम देखील केले. तब्बल आठ वर्ष रामटेकच्या गडावरुन हा मराठी दिवाळी अंक काढला. तर दोन वर्ष याच नावाने एक साप्ताहिक देखील चालवले. दिवाळी अंकात पैसा किती कमावला हा प्रश्न तसा अडचणीचाच, मात्र या दिवाळी अंकांनी मला पंचवीस प्रतिष्ठित पुरस्कार मात्र मिळवून दिले. मधल्या काळात दोन पोर्टलचे संपादन देखील केले. त्यासोबतच एका यूट्यूब चॅनलवर विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले. शाळेत असताना चार ओळी लिहिणे कठीण असणारा म्हणून ओळखला जाणारा मी, पण मी आतापर्यंत १४ मराठी पुस्तके देखील लिहून प्रकाशित केली. या पुस्तकांनी देखील विविध प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. पंधरावे पुस्तक शह-काटशह हा राजकीय कथांचा संग्रह लवकरच प्रकाशनच्या वाटेवरही आहे. याच काळात मी विविध सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहिलो.प्रत्येक ठिकाणी संघर्ष तर अटळ होताच. मात्र या संघर्षमय प्रवासात कोणी ना कोणी मदत करणारे भेटतही होते, त्याचबरोबर काही विघ्नसंतोषी अडचणी निर्माण करणारे देखील भेटलेच.
या सात दशकांच्या कालखंडात भलेही मी पैसा कमावला नसेल, मात्र माणसे खूप कमावली. मला आठवते प्रसिद्ध लेखिका स्व. गिरीजाताई कीर यांच्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपुरात होता. त्यावेळी गिरीजाताईंची डॉ.मंगेश कश्यप यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच डॉ.कश्यप यांनी प्रश्न विचारला, "आपला जन्म कोल्हापूरचा, आपले आयुष्य मुंबईत गेले, मात्र आपले शंभरावे पुस्तक नागपुरात प्रकाशित होते आहे. याकडे आपण कसे बघता?" त्यावर गिरीजा ताईंनी तात्काळ उत्तर दिले "नागपूर माझे वांङमयीन माहेर आहे. त्यातही या शहरात माझे माहेर असणारी हक्काची दोन घरे आहेत. एक तर ख्यातनाम साहित्यिक वामनराव चोरघडे यांचे घर, त्यांनी मला आपली वाङमयीन मुलगीच मानले होते. आणि दुसरे घर पत्रकार अविनाश पाठकचे. तो माझा धाकटा भाऊच आहे. त्यामुळेच माझ्या या वाङमयीन माहेरी माझ्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन होते आहे याचा मला निश्चितच आनंद आहे." त्यांचे हे उत्तर ऐकून त्या सभागृहात मला ओळखणारे सर्वच चमकले. त्या रात्री अनेक पत्रकारमित्रांचा मला फोन आला." तू गिरीजाबाईंचा भाऊ कसा?" या त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरे देता देता माझी पुरेवाट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजाताई माझ्या घरी नाश्त्याला आल्या. तेव्हा अनेक पत्रकारांनी "आम्ही तुझ्या घरी येतो आणि त्यांची मुलाखत घेतो" असा प्रस्तावही ठेवला होता. असाच प्रकार ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार स्व. ह.मो.मराठे यांच्याबाबतही घडला होता. ते त्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे होते. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. त्यांच्या जाहीर व्याख्यानाचा एक कार्यक्रम मी आयोजित केला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते माझ्या घरी जेवायलाही होते. एका पत्रकाराचा मला फोन आला आणि त्याने मराठेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. काही कारणामुळे ते शक्य होणार नव्हते. त्यावेळी बोलता बोलता मी बोलून गेलो, "मी एक गरीब माणूस आहे". तर आमचे हे पत्रकार मित्र लगेच उत्तरले," तू कुठला गरीब? मोठमोठे साहित्यिक तुझ्या घरी जेवायला आणि नाश्त्याला येतात. ते तू गरीब आहेस म्हणून का?" खरे आहे वाचकहो... संपत्तीने नसेलही, पण माणसांच्या संबंधांबाबत मी निश्चितच श्रीमंत आहे.या साडेपाच दशकांच्या काळात अगदी मी राहतो त्या लक्ष्मी नगर चौकात सिग्नलवर झाडाखाली बसणाऱा विजू पंक्चरवाला, आठ रस्ता चौकातला अविनाश भाजीवाला, दीक्षाभूमी चौकात पूर्वी थांबणारा जयंत देशपांडे ऑटो रिक्षावाला यांच्यापासून तर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत सर्वांशीच कधी ना कधी माझा संबंध आला. काहींचा संबंध काही काळापुरताच आला. मात्र काहींचा संबंध दीर्घकाळ कायम राहीला. या वाटचालीत कुणाकुणाचा संबंध आला नसेल. अगदी स्वरासम्राज्ञी लता मंगेशकर, भारतरत्न बाबा आमटे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, यांच्यासह वसंतराव साठे, हंसराज अहिर, शांताराम पोटदुखे, विलास मुत्तेमवार, मोहिते, नितीन गडकरी, यांच्यासारखे अनेक केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष मनोहरपंत जोशी, राज्यपाल भगतसिंह कोशियारी, बनवारीलालजी पुरोहित, डॉ डी. वाय पाटील , डॉ. शंकरनारायणन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातले दिग्विजय खानविलकर, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, रामदास कदम, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे अनेक मंत्री, आमदार, खासदार मोठमोठे राजकीय नेते, प्रा. ना स फरांदे, वसंत डावखरे, प्रमोद शेंडे, डॉ. नीलम गो-हे यांच्यासारखे विधिमंडळातील पीठासीन अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, माध्यमकर्मी, प्रशासकीय अधिकारी, विविध संस्थांचे आणि संघटनांचे जनसंपर्क अधिकारी, अशा सर्वांशीच माझा संबंध आला. त्यातले काहीजण तर सहज एखाद्या मित्राकडे किंवा नातलगाकडे जावे, तसे माझ्या घरी डोकावून जायचे. त्यात काही मंत्री देखील होते. इतका स्नेह अनेकांनी माझ्याशी जपला. आधी म्हटल्याप्रमाणे काहींचे माझे संबंध काही काळापुरतेच राहिले. तर काहींचे माझे संबंध दीर्घकाळ टिकले. काही संबंधातल्या आठवणी या कायम गोडच राहिल्या आहेत. तर काही आठवणी या कटू देखील आहेत. या अनेक संबंधांच्या कडू गोड आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. यातील काही आठवणी मी गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज या माझ्या पूर्वप्रकाशित ललित लेखसंग्रहांमध्ये वाचकांशी शेअर केलेल्या आहेतच.
म्हणूनच उद्या माझ्या सत्तराव्या वाढदिवसापासून या आठवणी ताज्या करून मी आपणा सर्वांशी शेअर करायचा संकल्प मी केलाआहे. मी समाज माध्यमांवर सक्रिय तर आहेच. त्याचबरोबर काही वृत्तपत्रे आणि काही पोर्टल्सवर देखील मी नियमित लिहित असतो. या सर्व वृत्तपत्रे, पोर्टल्स आणि समाज माध्यमांवर मी आठवड्यातून दोन ते तीन दिवस अशा विविध व्यक्तींसोबत आलेल्या संबंधातल्या कटू आठवणी विसरून जात चांगल्या गोड आठवणीच मी "आयुष्यातले सांगाती" या माझ्या स्तंभातून आपल्याशी शेअर करायचे ठरवले आहे.* आपल्याला त्या आवडतील असा विश्वास आहे. या स्तंभातील लेखांसंदर्भात आपल्या प्रतिक्रियांचे स्वागतच होईल.
तर उद्याच आपण *"आयुष्यातले सांगाती"* या माझ्या नव्या स्तंभात वाचणार आहात *"माझा भावी पंतप्रधानांसोबत झालेला हेलिकॉप्टर प्रवास..."*
भेटूया तर....
आपला स्नेहांकित
अविनाश पाठक, नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment