सहज सुचलं म्हणून.... भिकाऱ्यांची समस्या
सहज सुचलं म्हणून....
भिकाऱ्यांची समस्या.
मध्यप्रदेशातील इंदोर शहरात आता महापालिकेच्या पुढाकाराने सर्व भिकाऱ्यांचे उच्चाटन करण्यात आले असून त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, अशी बातमी माध्यमांवर दाखवली जात आहे. देशातील इतरही महानगरांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे.
रस्त्यावर किंवा घरोघरी भीक मागणारे भिकारी ही काही आजची समस्या नाही, तर शतकांपासून सुरू असलेले समस्या आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुळात भीक कोण मागतो, आणि का मागतो, याचाही विचार व्हायला हवा. इंदोरमध्ये शहरातील सर्व भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्याच्याबाबत महापालिकेने पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. त्यांचे पुनर्वसन होणार असेल आणि ते भीक मागणे बंद करून कोणत्यातरी कामधंद्याला लागले असतील तर ते चांगलेच आहे असे म्हणावे लागेल, आणि त्याचे
स्वागतच करावे लागेल. तरीही भीक मागण्यामागे नेमकी कारणे काय आहेत हे शोधून काढणे आज गरजेचे आहे. तरच या प्रकाराचे समूळ उच्चाटन होऊ शकेल हे नक्की.
सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीची काम करून चार पैसे कमावण्याची आणि आपले तसेच आपल्या परिवाराचे पोट भरण्याची मानसिकता असते. काही वेळा परिस्थितीच अशी येते की काम करून पोट भरणे अशक्य होते. तेव्हाच माणूस भीक मागायला सुरुवात करतो. अर्थात काही लोक असेही असतात की ज्यांना काम करायचेच नसते, आणि आळसातच आयुष्य घालवायचे असते. अशावेळी मग इतरांकडून भीक मागून आयुष्य जगणे हे त्यांच्या करिता क्रमप्राप्त ठरते.
साधारणपणे जे लोक अपंग आहेत, त्यांना डोळे नाहीत किंवा हातपाय नाहीत अशा लोकांना भीक मागून जगण्याखेरीज पर्याय नसतो. अर्थात अशा अपंगांचेही पुनर्वसन करणाऱ्या आज अनेक संस्था जगभरात कार्यरत आहेत. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती कुष्ठरोगाने पीडित असतात, त्यांचे हातपाय झडतात, अशावेळी त्यांना खुरडत खुरडत दारोदार फिरायचे आणि भीक मागायची याखेरीज पर्याय नसतो. मात्र बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन यांच्यासारख्या समाजसेवी व्यक्तींनी त्यावरही उपाय शोधले. त्यांनी अशा कुष्ठरोग्यांना एकत्र करून त्यांच्यावर उपचार केले. त्यांना तिथेच काम करता येईल आणि चार पैसे कमावता येतील अशी व्यवस्थाही केली. असे कुष्ठरोगी दुरुस्त झाले तरीही त्यांना समाज स्वीकारेलच असे नाही. त्यामुळेच बाबा आमटे आणि शिवाजीराव पटवर्धन यांनी त्यांच्या या कुष्ठरोग्यांच्या आश्रमातच या कुष्ठरोग्यांना काम मिळेल अशी व्यवस्था केली. बाबा आमटेंनी तर आनंदवन नामक कुष्ठरोग्यांचे गावच वसवले आहे. तिथे हे कुष्ठरोगी निवासाला आहेत. त्यांची कुष्ठरोगी मुलींशी लग्नही करून दिली आहेत. त्यांच्यासाठी विविध उद्योग सुरू केले आहेत. या कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या वस्तू आज बाजारात विकल्या जातात. तिथल्या अंध व्यक्ती देखील काही ना काही काम करतात आणि उत्पन्न कमावतात. तिथल्या अंध आणि अपंग कलावंतांचा स्वरावनंदन नामक ऑर्केस्ट्रा ठीकठिकाणी गाण्याचे प्रयोग सादर करतो, आणि हे सर्व गायक वादक त्यायोगे चार पैसे कमवतात.
जसे आनंदवनात आहे तसेच इतरत्रही आहे. ठिकठिकाणी अंध अपंग आणि दुर्बल मनस्कांसाठी निवासी शाळा सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी हे अंध, अपंग आणि दुर्बल मनस्क शिकतात आणि आपल्या ज्ञानाचा दुसऱ्यांनाही उपयोग करून देतात. मी बघितलेली एक अंध व्यक्ती एलएलबी आणि एल एल एम पर्यंत शिकली आणि नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर विधी विभागाची विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाली, काही अपंग अगदी व्हीलचेअरवर बसून नोकरीच्या ठिकाणी जातात आणि काम करून पैसे कमावतात.अशीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येक अपंग हा भीक मागण्यालायकच असतो असे नाही. त्याचे योग्य पुनर्वसन झाले तर तो स्वतःच्या पायावर उभा देखील राहू शकतो.
मात्र तरीही भीक मागणाऱ्यांची आज संख्या फार मोठी आहे. आज मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला तुमचे वाहन थांबले की लहान मुले येऊन तुमच्यासमोर हात पसरलेले दिसतील. त्यांचे मळके कपडे त्यांचा अवतार आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून आपण नाईलाजाने खिशात हात घालतो आणि दोन पाच रुपये त्यांच्या हातावर टिकवतो. अशा लहान मुलांकडे प्रशासनाचेही लक्ष नसते. खरे तर या मुलांना पकडून त्यांना बाल सुधारगृहात टाकून त्यांचा व्यवस्थित विकास कसा केला जाईल हे बघायला हवे.
महानगरांमध्ये अशा चौका चौकात भीक मागणाऱ्या मुलांच्या टोळ्याच असतात. असे म्हणतात की या टोळ्यांच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे दादा सक्रिय असतात. ते गरिबाघरची मुले पळवतात आणि त्यांना भीक मागण्याच्या धंद्यात लावतात. या संदर्भात अनेक कथा कादंबऱ्या देखील आल्या आहेत. मात्र अजूनही अशा टोळ्या सक्रिय आहेतच. या मुलांना ही दादा लोक दररोज ठरलेल्या चौकात नेऊन सोडतात आणि संध्याकाळी परत घेऊन जातात. त्यांनी दिवसभरात जमवलेली रक्कम हे दादाच ठेवून घेत असतात, आणि या मुलांना दोन वेळच्या कदान्नावर ते पोसत असतात. एकूणच हा प्रकार भयानकच म्हणावा लागेल.
आज रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे प्रवासात देखील अनेक भिकारी आपल्याला दिसतात. मला आठवते पूर्वी कलकत्ता मेलने नागपूरहून मुंबईला जाताना पुलगाव स्टेशनवर एक बाई लहान मुलाला घेऊन गाडीत चढायची, आणि ती प्रत्येक बोगीत जाऊन गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देंगा, असे गाणे म्हणत प्रत्येकाकडे भीक मागायची. ती पुढल्या धामणगाव किंवा बडनेरा स्टेशन पर्यंत प्रवास करायची. तिथे ती उतरून पुढली एखादी परतीची गाडी पकडायची आणि असेच गाणे म्हणत भीक मागत प्रवास करायची. कधीतरी प्रवासात सोबत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने माहिती दिली की ही बाई जो पैसा कमावते त्यातून काही हिस्सा स्टेशनवरच्या चेकिंग स्टाफला देखील जात असतो. तेव्हाच या बाईला विदाऊट तिकीट प्रवास करण्याची परवानगी मिळते, आणि राजरोस भीकही मागता येते.
रेल्वेत आणि रस्त्यावर सुद्धा लोकांना अडवून भीक मागणारे तृतीय पंथी देखील मोठ्या संख्येत आहेत. हे तृतीय पंथी तर अनेकदा अगदी निर्लज्जपणे वागतात आणि लोकांकडून पैसा गोळा करतात. जनसामान्य देखील भीक नको पण कुत्रा आवर या न्यायाने ते मागतील तो पैसा देऊन मोकळे होतात. मुंबईला लोकलमध्ये हे प्रकार खूप पाहायला मिळतात. आता पोलीस त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसत आहेत. मात्र ही कारवाई नियमितपणे चालायला हवी. वस्तूतः तृतीयपंथी सुद्धा जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते सामान्य माणसासारखे जीवन जगू शकतात. मध्यंतरी काही तृतीयपंथीयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लढवल्या होत्या. त्यांचा योग्य रीतीने केल्यास शैक्षणिक विकास देखील होऊ शकतो. यासाठी देखील शासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
हे भीक मागणारे फक्त अपंग किंवा तृतीयपंथीच असतात असे नाही, तर देवाच्या किंवा धर्माच्या नावाने भीक मागणारे देखील खूप असतात. वस्तूतः देव किंवा अल्ला कधीच कोणाला भीक मागायला लावत नाही. त्यांच्या नावाने तर कधीच नाही. मात्र देवाच्या किंवा अल्लाच्या नावाने दारोदार फिरून भीक मागणारे तसेच कोणत्यातरी देवाची चादर घेऊन दारोदार फिरणारे आणि त्यासाठी पैसा मागणारे देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. अर्थात असे भीक मागणारे सर्वच धडधाकट असतात, हे देखील इथे नमूद करायलाच हवे.
तसे पाहिले तर आपल्या देशात अशा प्रकारे भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही भीक मागणे सर्रास सुरू आहे. खरे तर अशा लोकांना पकडून त्यांच्या सुधारणा कशी होईल हा प्रयत्न व्हायला हवा. आज ज्यांचे वय झाले आहे त्यांची सोय देखील शासकीय किंवा समाजसेवी संस्थांच्या वृद्धाश्रमात लावता येऊ शकते. जे तरुण आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाला लावले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीला काही कारणाने तुरुंगवास झाला, तर तुरुंगात त्याला कोणते ना कोणते काम करावेच लागते ना. तसेच अशा रस्त्यावर किंवा गावात भीक मागणा-यांना पकडून त्यांना कामाला लावलेच पाहिजे. जर त्यांना काम येत नसेल तर त्यांना कोणते तरी काम शिकवले पाहिजे. आज चौकाचौकात कोणत्यातरी दादाच्या दबावात उभी असलेली लहान मुले सर्वप्रथम पकडून त्यांच्या शिक्षणाची आणि पुनर्वसनाची सोय व्हायला हवी. जर लहान वयातच ही मुले शिकली तर पुढे जाऊन काहीतरी काम करून चार पैसे कमावतील आणि स्वतःचे पोट भरू शकतील. त्यासाठी त्यांना लहान वयातच श्रमाचे महत्त्व पटवून द्यायला हवे.
हे काम फक्त सरकारनेच करायला हवे ही अपेक्षा चुकीची ठरेल. त्यासाठी सामाजिक संघटनांनी देखील पुढे यायला हवे. आज ठिकठिकाणी अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम चालवले जातातच ना. तसेच या भिकाऱ्यांसाठी देखील सामाजिक संघटनांनी पुढे येऊन काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत. सरकार आणि समाज यांनी एकत्रित येऊन जर काही काम केले तर ही समस्या सुटू शकेल.
शेवटी सर्वात महत्त्वाचे, आपणही अनेकदा समोरच्या भिकाऱ्याची दया येऊन पटकन खिशात हात घालतो आणि त्याच्यासमोर दोन पाच रुपयाचे नाणे टाकून मोकळे होतो. तसा प्रकार आपण बंद करायला हवा. मी स्वतः रस्त्यात जर एखादा लहान मुलगा किंवा गरीब माणूस काही वस्तू विकत असेल तर ती विकत घेईल. मात्र भिकाऱ्याला भीक द्यायची नाही असे ठरवून टाकले आहे. त्यामुळे सिग्नल वर गाडी थांबवल्यावर अशा भिकाऱ्यांनी काचेवर कितीही ठोकले तरी मी खिडकी उघडत नाही. असाच निर्णय प्रत्येक सुजाण नागरिकाने घ्यायला हवा. जर आम्ही भीक देणेच बंद केले तर हे भिकारी नाईलाजाने का होईना पण काहीतरी काम करायला लागतील, आणि मेहनतीने चार पैसे कमावण्याचा विचार तरी करायला लागतील. असा आम्ही निर्णय घेतला तरच कदाचित ही भिकाऱ्यांची समस्या सुटू शकेल.
अविनाश पाठक नागपूर....
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M
Comments
Post a Comment