घ्या समजून राजेहो,गोदी मीडिया कथित पुरोगाम्यांनी निर्माण केलेली भ्रामक प्रतिमा.

 घ्या समजून राजेहो

गोदी मीडिया

कथित पुरोगाम्यांनी निर्माण केलेली भ्रामक  प्रतिमा.

दि. २६ एप्रिल २०२५

काल मला माझ्या एका समवयस्क स्नेह्याचा फोन आला. हे माझे स्नेही निवृत्त शासकीय अधिकारी असून ते प्राचीन भारतीय इतिहास तसेच वेदविद्या आणि बौद्ध धर्म यांचे अभ्यासक असल्याचा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात ते काहीसे डावीकडे झुकलेले विचारवंत आहेत. मात्र मी काहीसा उजवीकडे झुकलेला पत्रकार असूनही माझे समाजामध्ये माध्यमांवरील सर्व लेख हे स्नेही आवर्जून वाचतात आणि त्यावर बरी वाईट प्रतिक्रिया सुद्धा देत असतात. त्यामुळे बरेचदा आमचे संवादात्मक वादविवादही होतात माझ्या या स्नेह्यांनी मला सूचना केली की मी गोदी मीडियावर लिहावे. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट केले की मी उजव्या बाजूला झुकलेला लेखक असल्यामुळे मी त्या विषयावर लिहिले तरी तुम्हाला ते पटेल का? त्यावर त्याचे उत्तर होते की बरेचदा मी तथ्यांवर आधारित लेखन करतो. त्यामुळे मी या विषयावर लिहावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी आज या विषयावर लिहिण्याचे ठरवले आहे.

मुळात मी गोदी मीडियावर लिहायचे तर हे प्रकरण काय आहे हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. गोदी मीडिया हा शब्द साधारणपणे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर काही काळानंतर वापरला जाऊ लागला. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ लिहितात, किंवा बातम्या प्रसारित करतात, असे लोक म्हणजे गोदी मीडिया असे समजले जाऊ लागले. हा शब्दप्रयोग त्या काळात कथित पुरोगामी विचारवंतांनी रूढ केला होता. ज्या काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्या काळात अनेक प्रसिद्धी माध्यमांना त्यांची कार्यशैली पटली आणि त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदींची आणि पर्यायाने भारतीय जनता पक्ष सरकारची बाजू उचलून धरणे सुरू केले. हळूहळू सुरुवातीला अशी माध्यमे मोजकीच होती. मात्र हळूहळू ती संख्या वाढू लागली, आणि मोदी सरकारच्या समर्थनार्थ लिहिणारा किंवा बातम्या प्रसारित करणारा एक मोठा वर्ग प्रस्थापित होऊ लागला. 

आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी समाजातील काही लेखक पत्रकार आणि विचारवंत आपल्याजवळ ठेवले होते. त्यांचे काम इंग्रज सरकारची तळी उचलून धरणे हेच होते. त्या बदल्यात या मंडळींना इंग्रजांनी दिल्लीत सर्व सोयी सवलती देऊ केल्या होत्या, आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था ही दिल्लीतील ल्युटन्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका भागात केली होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या अशा कथित विचारवंतांना ल्युटियन्स या नावाने ओळखले जात होते. पुढे इंग्रज गेले आणि नेहरू सरकार देशात सत्तारूढ झाले. त्यांनी देखील हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. थोडक्यात त्यांनी देखील हे ल्युटियन्स अक्षरशः पोसले होते. त्यांना दिल्लीत सरकारी खर्चाने निवासस्थाने उपलब्ध करून दिली जात होती. त्यांना विविध शासकीय समित्यांवर घेऊन भरघोस मानधन मिळेल अशी व्यवस्था करून दिली जात होती. विविध सरकारी सन्मान दिले जात होते. पंतप्रधान राष्ट्रपती किंवा केंद्रीय मंत्र्यांबरोबर या कथित विचारवंतांना सरकारी खर्चाने परदेश दौराही करून दिला जात होता. देशभरात कुठेही गेले तरी त्यांना प्रवासात सवलती दिल्या जात होत्या आणि प्रत्येक ठिकाणी शासकीय विश्रामगृहे, प्रसंगी महागडी हॉटेले देखील सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जात होती. या बदल्यात या कथेत विचारवंतांनी सरकारची आणि सत्ताधारी पक्षाची तळी उचलायची हेच त्यांचे काम होते. 

नेहरूंनी चालू ठेवलेली हीच परंपरा पुढे त्यांची लेक इंदिरा गांधी यांनीही सुरू ठेवली. राजीव गांधी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे चालले. पी.व्ही. नरसिंहरावांच्या काळातही काही फरक पडला नाही. पुढे मनमोहन सिंग यांनीही तीच परंपरा चालवली. 

या ल्युटियन्स मंडळींचा एक कंपुच देशात तयार झाला होता. हा फक्त दिल्ली पुरताच मर्यादित नव्हता, तर देशाच्या प्रत्येक राज्याच्या राजधानीत आणि त्याचबरोबर लहान मोठ्या शहरातही सक्रिय झाला होता. जसे दिल्लीत नेहरू आणि इंदिरा गांधींनी हे कथित विचारवंत सांभाळले, तसेच महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, आणि नंतर शरद पवारांनी देखील असे कथित विचारवंत पोसले. त्यांचे एकच काम असायचे. त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून सर्व सवलती लाटायच्या आणि सत्ताधाऱ्यांची तळी उचलायची. आपली लेखणी आणि आपली वाणी इतकेच काय पण प्रसंगी आपली अक्कल देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे गहाण ठेवली होती. 

डावीकडे झुकलेला हा कथित विचारवंतांचा कंपू दीर्घकाळ देशाच्या वैचारिक क्षेत्रात सक्रिय होता नव्हे या क्षेत्रावर राज्यच करीत होता. इतकेच नव्हे तर देशातील वैचारिक क्षेत्रावर त्यांनी आपली पक्की पकड जमवली होती. त्यामुळे देशातील तटस्थ लेखक साहित्यिक आणि कलावंत तसेच उजवीकडे कललेले लेखक साहित्यिक आणि विचारवंत यांना देखील पुढे जायचे तर या कंपूचाच सहारा घ्यावा लागत होता. साहित्य क्षेत्र किंवा कलाक्षेत्र यात पुढे जायचे तर या डाव्या कथित पुरोगामी मंडळींचाच आधार घ्यावा लागत होता. शासकीय स्तरावर पुस्तके प्रकाशित करणे, प्रतिष्ठेचे पुरस्कार देणे हे सर्व याच मंडळींच्या हातात असायचे. विविध शासकीय संस्था आणि समित्यांवरही यांचेच वर्चस्व होते. त्यामुळे कथित तटस्थ मंडळी किंवा उजवीकडे कललेली मंडळी खुलेआम आपला विचार पुढे नेऊ शकत नव्हती. असा प्रयत्न करणारी मंडळी कायम दाबल्याच जात होती. अर्थात त्यावेळी देखील काही सन्माननीय पत्रकार लेखक आणि कलाकार मंडळी त्याला अपवादही होती. त्यांनी या डाव्या मंडळींशी संघर्ष करून आपले काम सुरूच ठेवले होते.

२०१४ मध्ये देशात खऱ्या अर्थाने सत्तांतर झाले. भारतीय जनता पक्षाला सर्वप्रथम २८२ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले होते. देशात १९८४ नंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, आणि गैर काँग्रेसी पक्ष स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येण्याची देखील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी १९७७ मध्ये इंदिरा गांधींना विरोध करून स्थापन झालेल्या जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र त्यातही बहुसंख्य काँग्रेसजनच सहभागी होते. तसाच प्रकार १९८९ मध्ये जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंह सरकार सत्तेत आले, तेव्हाही होता. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेत आले खरे. मात्र भारतीय जनता पक्षाला त्यावेळी देखील स्पष्ट बहुमत नव्हते. प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच त्यांचे सरकार टिकले होते. २०१४ मध्ये मात्र नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम ती परिस्थिती बदलली होती. 

मोदींनी सत्तेत येतात काँग्रेसच्या काळात असलेल्या जुन्या प्रथा परंपरांना हळूहळू फाटा द्यायला सुरुवात केली. त्यात या ल्युटियन्स मंडळींचे होत असलेले अवास्तव लाड देखील त्यांनी कमी केले. त्यामुळेच ही सर्व ल्युटियन्स मंडळी त्यांच्यावर खवळली. तसाही या मंडळींचा मोदी या व्यक्तीवर जसा राग होता,( गुजरात दंग्याच्या प्रकरण याच मंडळींनी मोदींना जगभरात बदनाम केले होते.) तसाच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही मंडळींचा राग होता. मोदींनी या मंडळींचे आधी होणारे लाड कमी करताच त्यांनी मोदीविरोधात प्रचार करणे सुरू केले. त्यात काही खराही होता तर काही अवास्तवही होता. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू त्या नाण्याची किंमत दाखवणारी असते, तर दुसरी बाजू त्या नाण्याची काहीही किंमत दाखवत नाही. या दुखावलेल्या मंडळींनी ही दुसरी बाजूच उचलून धरली आणि मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी यांची बदनामी सुरू केली. 

याच काळात त काही उजवीकडे कललेले माध्यमकर्मी आणि काही तटस्थ विचारवंतही कार्यरत होतेच. त्यांनी नाण्याची किंमत दिसणारी बाजू लोकांसमोर निरपेक्षपणे आणायला सुरुवात केली. त्यांचे असे करणे हे या डावीकडे कललेल्या कथित पुरोगामी विचारवंतांची गोची करणारे ठरले. अशावेळी या अशा वास्तव जनसामान्यांसमोर मांडणाऱ्या माध्यमकर्मींचे नाव या डाव्या मंडळींनी गोदी मीडिया असे ठेवले. गोदी मीडिया म्हणण्यामागे मोदी मीडिया म्हटले तर उगाच अडचणी नकोत म्हणून मोदींचे गोदी केले असा सर्वांचा समाज झाला. नंतर मात्र त्यातल्याच काही जणांनी असा खुलासा केला की गोदी म्हणजे "मोदीजी के गोदी मे बैठनेवाले" म्हणजेच मोदींच्या मांडीवर बसणारे माध्यमकर्मी आहेत. त्यातल्याच काही जणांनी असे वास्तव जनसामान्यांसमोर मांडणाऱ्यांना अंधभक्त किंवा भक्त पत्रकार म्हणणेही सुरू केले. त्यामुळे आजही गोदी मीडिया किंवा भक्त पत्रकार हे शब्दप्रयोग राजकीय आणि माध्यमांच्या वर्तुळात रूढ झालेले आहेत.

 काल मला फोन करून गोदी मीडिया नेमके  वास्तव मांडत नाही असा आरोप करणाऱ्या माझ्या या मित्रवर्यांनी याकडे लक्ष वेधले की काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात हिंदूच वेगळे करून मारले गेले हा दावा चुकीचा आहे. या हल्ल्यात २७ पैकी १५ मुस्लिमदेखील मारले गेले आहेत. त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ  त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली यादीच मला सादर केली. त्यावेळी एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेली २७ जणांची यादी मी त्यांना पाठवली,( त्यात २६ हिंदू आणि एक मुस्लिम व्यक्तीचे नाव होते) आणि माझ्या माहितीनुसार ती यादी शासनाने प्रसारित केलेली होती. त्यामुळे ती अधिकृत मानावी असा माझा आग्रह होता. मात्र त्यांचे म्हणणे होते की नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्व माध्यमे वास्तव दडवत आहेत. त्यांचा हा आरोप ऐकून मी त्यांना सुचवले की तुम्ही नेमके वास्तव लोकांसमोर यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करा, आणि या दोन्ही याद्यांमधील खरी यादी कोणती आहे आणि या दहशतवादी हल्ल्यात नेमके कोणत्या धर्माचे किती लोक मारले गेले आहेत हे वास्तव समोर येण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावे यासाठी तुम्ही आग्रह धरा. माझ्या या सूचनेवर मात्र ते थोडे गडबडले आणि मला या मुद्द्यावर विचार करू द्या असे सांगून ते मोकळे झाले. मात्र अशा प्रकारे न्यायालयात जाण्याचा त्यांचा इरादा मला त्यावेळी तरी जाणवला नाही.

अशाच प्रकारचा दावा महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे राजकीय चाणक्य शरद पवार यांनीही केल्याचे माध्यमांनी दाखवले होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील ज्या सहा व्यक्ती या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेल्या, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे कुटुंबीय माध्यमांवर सांगत होते की आम्हाला दहशतवाद्यांनी पहिले धर्म विचारला. जीव वाचवण्यासाठी आम्ही मुस्लिम आहे असे सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला कलमाही म्हणायला सांगितले. इतकेच काय तर पुरुषांना पॅन्ट काढून त्यांची सुंता केली आहे काय हे बघायलाही त्यांनी कमी केले नाही. शरद पवारांनी या कुटुंबीयांचे हे निवेदन ऐकून न ऐकल्यासारखे केले असावे. कारण असा पुरोगामी विचार मांडणे त्यांची राजकीय गरज होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांनी हे सर्व कुटुंबीयांचे वक्तव्य ऐकावे आणि मगच असे विधान करावे असे स्पष्ट शब्दात ठणकावले देखील. 

अशाच पुरोगामी विचारवंतांनी राजकारण्यांनी एका काळात नरेंद्र मोदींना पुरेसे बदनाम केले होते. ज्यावेळी गोधऱ्यात एका रेल्वेच्या बोगीवर काही धर्मांध मुसलमानांनी पेट्रोल टाकून त्यातील सर्व कारसेवकांना जाळले होते. त्यावेळी देखील त्या बोगीत सर्व हिंदूच होते कशावरून अशीही शंका या काही विचारवंतांनी व्यक्त केली होती. ती रेल्वेची आरक्षित बोगी होती. त्यावेळी या मंडळींनी रेल्वेची आरक्षण यादी का तपासली नाही आणि तपासली असेलही तर ते वास्तव जनसामान्यांसमोर का आणले नाही हाही प्रश्न निर्माण होतोच. ती यादी जनसामान्यांसमोर आली असती तर यांना मोदींना आणि पर्यायाने संघाला बदनाम करणे शक्य झाले नसते, हे देखील इथे नमूद करायलाच हवे.

आजही या डावीकडे झुकलेल्या कथित पुरोगामी विचारवंतांना लाडावणे मोदींनी बंद केले असले तरी अजूनही विरोधी पक्षात त्यांचे लाड करणारे कोणी ना कोणी आहेतच. त्यामुळेच हे सर्व ल्युटियन्स आजही नरेंद्र मोदींवर, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि हिंदुत्वावर खरी खोटी टीकाटीपणे करण्यातच धन्यता मानतात. त्याचवेळी नेमके वास्तव जनसामान्यांसमोर मांडणाऱ्या तटस्थ आणि प्रसंगी किंचित उजवीकडे झुकलेल्या माध्यमकर्मींवर गोदी मीडिया किंवा भक्त म्हणून तोंड भरून टिकाही करत असतात. यातूनच ही मंडळी समाजात आणि प्रसंगी मतदारांमध्ये फेक नॅरिटीव्ह देखील पसरवत असतात. काही वेळा ते यशस्वी देखील होतात. मात्र काही वेळा त्यांना अपयशही येत असते. 

आजही या मंडळींनी साहित्य आणि कलाक्षेत्रावर आपले वर्चस्व कसे कायम राहील हा प्रयत्न चालूच ठेवला आहे. गत ७० वर्षात त्यांनी व्यवस्थाच अशी लावून ठेवली आहे, की तिथे नव्या विचारसरणीचा किंवा प्रसंगी तटस्थ माणूस शिरूच नये. याचे एक साधे उदाहरण द्यायचे तर साहित्य अकादमीचे देता येईल. ही केंद्र शासनाचे अनुदान असलेली स्वायत्त संस्था आहे. यात डाव्या मंडळींनी त्यांच्या व्यतिरिक्त कोणी इतर विचारसरणीचा माणूस शिरूच नये अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे देशात मोदी सरकार घेऊन अकरा वर्षे झाली तरी साहित्य अकादमीवर या कथित पुरोगाम्यांचेच वर्चस्व आहे. तसाच प्रकार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचाही आहे. यांच्या अखत्यारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय हस्तीच ठरवत असते असे बोलले जाते. हीच हस्ती अनेक साहित्य संमेलनाची कधी स्वागताध्यक्ष तर कधी उद्घाटक असते. या या हस्तीने आपल्या सभोवती अनेक साहित्यिक कलाकार आणि पत्रकारांचे कोंडाळेही जमवून ठेवले आहे. यावरून नेमके वास्तव काय ते लक्षात यावे. 

असे असले तरी आज जनता शहाणी झालेली आहे. या कथित पुरोगामी विचारवंतांनी आज तटस्थपणे मोदी किंवा संघ किंवा हिंदुत्ववाद्यांची बाजू मांडणाऱ्यांवर गोदी मीडिया किंवा अंधभक्त म्हणून कितीही टीका केली, तरी जनता खरे काय आणि खोटे काय हे समजण्याइतपत सुज्ञ आहे. त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये आलेले आहेच. म्हणूनच पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी जनतेने नरेंद्र मोदींना दिलेली आहे. एकूणच आता या देशातील जनता या कथित पुरोगामी विचारवंतांचा बुरखा वाढण्यास सज्ज झालेली आहे. त्यामुळे गोदी मीडिया ही कथित पुरोगाम्यांनी उभी केलेली भ्रामक प्रतिमा आहे हे वास्तव आता जनतेसमोर येणार हे निश्चित झाले आहे.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे.....?

 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो... 

अविनाश पाठक , नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.