सहज सुचलं म्हणून... नद्यांमधील प्रदूषण थांबवायलाच हवे...!
सहज सुचलं म्हणून...
नद्यांमधील प्रदूषण थांबवायलाच हवे...
नदी म्हटली की मला दिल्लीला जाताना रेल्वेतून हुशंगाबादजवळ पाहिलेली नर्मदा आठवते, तर कधी दिल्लीतून नोएडाला जाताना बघितलेली यमुनाही आठवते. कधी भंडाऱ्यात बघितलेली वैनगंगा आठवते, तर कधी नाशिकला बघितलेली गोदावरी आठवते. कधी कोल्हापूरनजिक असलेल्या नरसोबाच्या वाडीजवळ झालेला पाच नद्यांचा संगम आठवतो, तर कधी पुरात खवळलेली अकोल्याची मोरणा नदी आठवते. या ठिकठिकाणी बघितलेल्या विविध नद्यांची कधी संथ वाहणारी तर कधी खवळलेली रुपे मी आजवरच्या आयुष्यात अनेकदा बघितलेली आहेत.
देशभरात पसरलेल्या आणि देशातील करोडो नागरिकांची जीवनदायिनी असलेल्या या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न सध्या संपूर्ण देशभरात ऐरणीवर आलेला दिसतो आहे. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे पवित्र गंगा आणि यमुनेचा संगम आहे, तिथे नुकताच महाकुंभमेळा पार पडला. या वेळी ६४ कोटी हिंदू नागरिकांनी भेट दिली आणि संगमावर स्नान केले. त्यामुळे या नद्यांचे प्रदूषण वाढले असा दावा काही कथित पुरोगामी मंडळी करताना दिसत आहेत.
महाकुंभमेळा हे तर एक निमित्त झाले. मात्र नद्यांचे प्रदूषण हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. यमुना नदीत झालेले प्रदूषण हा नुकत्याच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरला होता. मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण हे नेहमी चर्चेत असते. नागपूरच्या नाग नदीतील प्रदूषण हटवून तिथले पाणी पूर्वीसारखे शुद्ध स्वच्छ आणि नितळ करण्यासाठी सरकारकडून काही कोटी रुपये मंजूर झाल्याची बातमी आजच वृत्तपत्रात वाचण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी अनिल सोले नागपूर महानगरपालिकेचे महापौर असताना लोकसहभागातून त्यांनी नाग नदी स्वच्छ करण्याचा विडा उचलला होता. मात्र वर्षभरातच त्यांच्यासह जनसामान्यांचाही उत्साह संपलेला दिसला. एकूणच हा फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय विषय बनला आहे असे म्हटल्यास व वावगे ठरू नये.
असे असले तरी या नद्यांचे प्रदूषण का होते, नव्हे आजच हे प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढते आहे, आणि हा सार्वत्रिक चर्चेचा विषय का होतो आहे, याचा कधीतरी विचार झाला आहे का? याचे उत्तर शोधायला गेल्यास ते नकारार्थीच मिळते. मात्र त्याच मुद्द्यावर आज या लेखात चर्चा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
तलाव किंवा सरोवरातील किंवा विहिरीतील पाणी हे स्थिर असते. मात्र नदीचे पाणी हे प्रवाही असते. ते एका जागी स्थिर राहत नाही, तर अगदी गंगोत्रीतून निघून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यामुळे या वाहत्या प्रवाहात या नदीत जमणारा काडीकचरा दगडगोटे हे तळाशी जातात आणि स्वच्छ नितळ पाणीच वर दिसते. त्यामुळेच नदीचे पाणी हे शुद्ध असते असे मानले जाते. परिणामी कित्येक परिसरांमध्ये गावालगत नदी असलेल्या गावांमध्ये नदीचे पाणीच प्यायला घरात स्वयंपाकाला आंघोळीला, कपडे आणि भांडी धुण्याला वापरले जात होते. नदी ही प्रवाही असल्यामुळे गाळ खाली बसून शुद्ध पाणीच वर राहत होते. हे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी देखील वापरले जात होते. नदीचा प्रवाह वाहता असतानाच काही पाणी हे जमिनीतही झिरपायचे आणि त्यामुळेच नदीच्या आसपासची जमीन सुपीक होऊन जात असे. परिणामी तिथे ओलीताची शेती फायद्याची राहत असे.
याच नदीत जलचर सुद्धा मोठ्या प्रमाणात वास्तव्याला राहायचे. मग नदीकाठी गोड्या पाण्यातले मासे पकडून त्याचा व्यापारही चालत होता. असंख्य कोळी बांधव दररोज असे मासे गोळा करायचे आणि त्यावर आपली उपजीविका चालवायचे. मात्र कोळ्यांनी दररोज कितीही मासे पकडले तरी नदीत दररोज नवे नवे मासे जन्माला येत होते आणि ते मोठेही होत होते. त्यातून शेकडो परिवारांचे पोटही भरत होते.
मात्र गेल्या शंभर सव्वाशे वर्षात जागतिकीकरणाच्या रेट्यात खूप काही बदल झाले. लोकसंख्या वाढू लागली तसे लोकांचे नवी घरे बांधणे सुरू झाले. आधी एका भूखंडावर एकच परिवार राहत असे. आता त्याच भूकंडावर बहुमजली इमारती होऊन तिथे दहा-बारा परिवार एकत्र राहू लागले. या सगळ्या परिवारांचे सांडपाणी नदीलाच जोडले जाऊ लागले. नदीकाठी झोपडपट्ट्या देखील वाढल्या. मग झोपडपट्ट्यांमधला कचरा नदीतच फेकला जाऊ लागला. इतकेच काय पण गावातील घनकचरा देखील नष्ट न करता नदीतच फेकला जाऊ लागला. गावात मोठमोठे उद्योग उभे राहू लागले. त्या उद्योगांमधील रसायने नदीतच टाकली जाऊ लागली. कित्येक ठिकाणी नदीचे पात्र अरुंद करून प्रसंगी त्यात भर टाकून नदीकाठीच झोपड्या उभारल्या जाऊ लागल्या. नदीचे पात्र छोटे होते आहे किंवा त्यातील पाणी अडवले जाऊ शकते हे लक्षात न घेता ही नदीत बांधकाम केले जाऊ लागले. या सर्वच प्रकारांमुळे नदीत प्रदूषण वाढू लागले. नदीत फेकला गेलेला कचरा नदीच्या तळाशी जाऊन बसू लागला. त्यामुळे मग वरचे पाणी तर दूषित होऊ लागलेच पण पाणी प्रवाही राहण्यासाठी जागा देखील कमी झाली. त्यामुळेच मग थोडा पाऊस जरी आला तरी नदी दुधडी भरून वाहू लागते आणि त्यातूनच पूरस्थिती निर्माण होते. नदीतला हा गाळ काढण्यासाठी दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्था करोडो रुपयांची उधळपट्टी करतात. मात्र तो गाळ कधीच साफ होत नाही. मुंबईतील मिठी नदी च्या प्रवाहातील गाळ काढणे ही सध्या एक ऐतिहासिक समस्या झाली आहे. विरोधी पक्ष त्या मुद्द्यावर दरवर्षी ओरडत असतात, मात्र हाती काहीच लागत नाही. या सर्व प्रकारामुळेच नद्यांमधील प्रदूषण वाढते आहे. मग तो निवडणुकीतील मुद्दा केला जातो आणि प्रसंगी सरकारही पाडले जाते. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार पराभूत होण्यामागे जी विविध कारणे आहेत त्यात यमुना नदीतील प्रदूषण हे प्रमुख कारण मानले जाते.
तसेही दिल्लीत प्रदूषण ही फार मोठी समस्या बनली आहे. तिथे यमुनेच्या पाण्याने तर प्रदूषण केले आहेच, पण त्याचबरोबर हवेतही प्रदूषण निर्माण झाले आहे. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके विक्रीलाही बंदी घातली आहे. तिथे दररोज नवीन बांधकामे केली जातात त्यामुळेही प्रदूषण वाढल्याचा दवा केला जातो. रस्त्याने धावणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या हजारो वाहनांनी देखील प्रदूषण केले जाते त्यासाठी आता ई व्हेईकलचा पर्याय शोधला जातो आहे.
नद्यांचे हे प्रदूषण ही आता सार्वत्रिक समस्या बनली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या समस्येवर उपाय व्हायलाच हवा. सध्या बहुतेक सर्व नदीकाठच्या गावांमध्ये गावातील सांडपाणी आणि मलमूत्रमिश्रित पाणी नदीतच सोडले जाते. हा प्रकारही बंद व्हायला हवा. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून निघालेले शुद्ध पाणी नागपूर नजीक कोराडी येथे असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला विकण्याचा प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न देखील वाढले आहे. असे प्रयोग जिथे नदी आहे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी का करू नये? तसेच कारखान्यांमधील रसायन युक्त पाणी देखील नदीत सोडणे बंद करावे. अनेकदा या रसायनाचा परिणाम होऊन नदीतील जलचर मृत्युमुखी पडतात. ही देखील पर्यावरणाची हानीच मानावी लागेल. त्यामुळे या रसायनयुक्त पाण्यावरही प्रक्रिया व्हायला हवी. नदीकाठी असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या देखील हटवून नदीत कचरा टाकणे बंद व्हायला हवे. नदीवर कोणतेही बांधकाम करण्याला परवानगी दिली जाऊ नये. असे अनेक कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावे लागणार आहेत. तरच देशातील नद्यांमध्ये होत असलेले प्रदूषण थांबू शकेल आणि नदीमध्ये पूर्वीसारखेच स्वच्छ शुद्ध आणि नितळ पाणी प्रवाही होऊ शकेल. त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती हवी. ती प्रशासन दाखवणार नसेल तर तुम्हा आम्हालाच पावले उचलावी लागणार आहेत. नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी हाच योग्य उपाय ठरणार आहे.
अविनाश पाठक, नागपूर
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment