आज 'भारतरत्न' निष्काम कर्मयोगी ,महर्षी कर्वे यांची जयंती
आज 'भारतरत्न' निष्काम कर्मयोगी ,महर्षी कर्वे यांची जयंती
महर्षी अर्थात महान ऋषी. माझ्या आत्म्यापेक्षा माझे प्रेम हे माझ्या संस्थांवर आहे असे म्हणत स्त्रियांना प्रगतीचे दरवाजे.. भारतात पहिले महिला विद्यापीठ उघडणारे शतायुषी ऋषी म्हणजे महर्षी कर्वे. त्यांच्या कार्यामुळेच आज लाखो महिलांनी सर्वच कार्यक्षेत्रात गगन भरारी घेतलीय.
'संस्कृता स्त्री पराशक्ती' हे तर आमचे ब्रीद होते, पण सततच्या परकीय आक्रमकांच्या जुलूमाने स्त्रियांना घरात डांबले गेले होते. मग या स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी आदर्श सुरवात स्वतःपासून केली. त्यांची जगात ओळख 'भारतरत्न' महर्षी धोंडो केशव कर्वे आहे (१८५८-१९६२).
मुरुड.. ता. दापोली जि. रत्नागिरी हे त्यांचे जन्मगाव. अण्णा या नावाने त्यांची ओळख. तिथे रत्नागिरीत अण्णांनी प्राथमिक शिक्षण घेत पूढे मुंबईतून पदवीधर झाले. घरची परिस्थिती गरीबीची. पण जिद्द ठेवून शिकले.
लोकमान्य टिळकांना राजकीय जीवनाने वेळ मिळेना. त्यांची गणित शिक्षकाची जागा रिक्त झाली होती, तेंव्हा महात्मा गांधींचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यासाठी कर्वे यांची निवड केली. एवढे ज्ञानी होते महर्षी कर्वे.
कर्वेंची वाटचाल ही संघर्षमय होती. तेव्हा संपुर्ण जगातच स्वार्थी मनोवृत्तीने दडपशाही आरंभली होती. जगभरात धर्माचे चूकीचे अर्थ लावून अमानुष अन्यायाचे समर्थनही होत होते. काही देशात तर गुलामगीरी लादली गेली होती. तर कुठे जातीयवादाने कळस गाठला होता. स्त्रियांचे तर समाजव्यवस्थेत हाल होत होते.
स्त्रियांच्या उन्नतीसाठी आपल्या प्रत्येक कृतीने कर्वेंनी आदर्श ठेवला. पत्नीच्या निधनानंतर १८९१ मधे विधवाश्रमातील गोदू नामक विधवेशी विवाह करुन विधवा विवाहाचा नवा पायंडा रचला. त्यांच्या लग्न पत्रिकेवर आगरकर टिळक यांच्या सह्या होत्या. १८९३ ला त्यांनी 'विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळ' हे स्थापले. १८९९ ला त्यांनी 'अनाथ बालिकाश्रम' काढले. कर्वेनी केशवपन.. बालविवाह विरोधी मोहिम आरंभली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन करुन विधवांच्या लग्नांना उत्तेजन दिले.
एका झोपडीतून सन १९०० मधे हिंगणे (पुणे) येथे स्त्री शिक्षणाचा शुभारंभ केला. समाजातील अंत्यजाना आणि स्त्रियांना दुर्बल समजून विद्येपासून वंचित असलेल्या सर्वाना प्रवेश दिला. बालिकाश्रम काढला. हे उदात्त कार्य पाहून यासाठी रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी कर्वे यांना त्याकाळात सातशे पन्नास रुपये आणि हिंगणे येथील आपली सहा एकर जमीन दान केली.
सन१९१० मध्ये संस्थेला त्यागी शिक्षक.. कार्यकर्ते मिळावे म्हणून निष्काम कर्ममठ या संस्कारपीठाची स्थापना केली, १९१५ मध्ये अ. भा. सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. स्वतः पायी फिरुन देणगी प्राप्त करणाऱ्या, स्त्रियांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या निष्काम कर्मयोगी कर्वें विषयी कालांतराने सर्वांनाच आदर निर्माण झाला होता.
महर्षी कर्वे यांनी जपानचे महिला विद्यापीठ बघून आपणही तसेच महिला विद्यापीठ प्रारंभ करण्याचे ठरविले. दानशूर ठाकरसींच्या मदतीने १९१६ मधे पहिले महिला विद्यापीठ (S.N.D.T. University) सुरु केले. त्याकाळात ठाकरसींनी १५ लाखाची देणगी दिली होती. महिलांनी सबल.. स्वावलंबी व्हावे म्हणून उद्यमशीलतेचे शिक्षण दिले. या कार्यात त्यांच्या पत्नी आनंदी उर्फ बाया यांनी मोलाची साथ दिली. आज बाया यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही तेवढाच मोलाचा आहे.
सन १९५८ मध्ये महर्षी कर्वे यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. अण्णा कर्वेंच्या रघुनाथ, भास्कर, दिनकर, शंकर या चारही पुत्रांनी विविध क्षेत्रात कार्य केलेय. यापैकी रघुनाथ कर्वे यांनी समाजिक विरोध पत्करुन संतती नियमनासाठी केलेल्या कार्याचे मोल आज समजतेय.
अण्णांनी लावलेला स्त्री शिक्षणाचा वेलू हा आज महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या रुपात विशाल वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्रात अनेक शहरात कर्वेंच्या संस्था कार्यरत आहे. स्त्रियांना शिक्षणासोबत लहान व्यवसायाचे प्रशिक्षण देत आत्मनिर्भर करुन शंभर वर्षाहून अधिक काळ सुरु आहे. महर्षी कर्वे संस्था लाखो स्त्रियांच्या जीवनाचे हे प्रेमळ माहेरघर ठरलेय. लाखो स्त्रियांना उच्चशिक्षित, उद्यमी.. स्वावलंबी केलेय ते कर्वे संस्थेने.
सामाजिक सुधारणेसाठी शिक्षणाचा ज्ञानरूपी वसा देणाऱ्या, वंचितांच्या जीवनात 'आनंदी पहाट' आणण्यास सूर्य ठरलेल्या, शतायुषी अश्या 'भारतरत्न' महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शतशः अभिवादन.
*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली*
*तुम्ही कल्पवृक्षातली सावली*
*तुम्ही सुर्य आम्हा दिला कवडसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*जिथे काल अंकुर बिजातले*
*तिथे आज वेलीवरी हि फुले*
*फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*शिकू धीरता शूरता , विरता*
*धरू थोर विद्येसावे नम्रता*
*मनी ध्यास हा एक लागो असा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*जरी दृष्ट कोणी करू शासन*
*गुणी सजनांचे करू पालन*
*मनी मानसी हाच आहे ठसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*तुझी त्याग-सेवा, फळा ये अशी*
*तुझी कीर्ती राहील दाही दिशी*
*अगा पुण्यवंता,भल्या माणसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
संकलन:-अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment