आनंदी पहाट:-निरामय आरोग्याची जागतिक आरोग्य दिन
आनंदी पहाट:-निरामय आरोग्याची, जागतिक आरोग्य दिन
संकलन:-अभय बक्षी, नागपूर.
जगात समस्त मानव एक आहे. तो कितीही देश.. धर्म.. पंथ.. भाषा..यामध्ये विभागला गेला तरीही पण जगभर त्याच्या आरोग्य समस्या, बहुतांश व्याधी एकच असतात. जगभरात मनुष्य असो वा प्राणी यांना जगताना काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित व्याधीं विकारांचा सामना करावा लागतो.
मग याचा सामना करायला.. आरोग्य विषयक जन जागृती करायला सारे जग एक झाले. पहिला 'जागतिक आरोग्य दिन' ७ एप्रिल १९५० ला साजरा झाला. दरवर्षी ७ एप्रिल जगभरात 'आरोग्य दिन' म्हणून साजरा होतो.आज जागतिक आरोग्य संघटनेत १९३ देश एकत्र आहेत.
जगापासून कोणत्याही देशाला वेगळे राहताच येत नाही. एक रोग एका देशातील कोपऱ्यात आला तरीही तो लगेचच जगभर पसरू शकतो. नित्य होणाऱ्या प्रगतीसोबतच नवनव्या व्याधीशी लढाई पण वाढलीय. अशावेळी एकमेकांना ज्ञानाची.. औषधाची मदत केली तरच मानवी जीवन सुरक्षित राहील.
भारतीय संस्कृतीची मनोवृत्तीच 'सर्वे सन्तु निरामया' असल्याने अदृश्य कोरोना विषाणूने जगाला ग्रासले तेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी तत्काळ लस संशोधन करुन जगाचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती.
जागतिक स्तरावर आरोग्य जागृतीसाठी दरवर्षी एक विशेष थीम घोषीत होते. यावर्षी 'निरोगी सुरवात आशादायक भविष्य' या व्दारे निरोगी गर्भधारणा आणि बाळंतपण.. प्रसुतीनंतरचे आरोग्य यावर जनजागृती केली जाणार आहे.
आपल्या देशात गर्भार महिलांचा पोषण आहार.. आरोग्य तपासणी.. स्तनदा माता.. शिशु यांच्यासाठी गावपातळीवर कार्य सुरुच आहे. यावर्षी विशेष जागृती केली जाईल.
जग वेगवान झालेय. कुटुंब संघर्षात.. धावपळीत मातांचे स्वतःकडे.. बाळाकडे दुर्लक्ष होते. जीवनशैली बदलल्याने भौतिक सुखे वाढली. घरात नकळत होणारे आरोग्यदायी व्यायाम संपले.
एकेकाळी गर्भारपणात भारतीय गृहिणींना बाहेरील व्यायाम, औषध याची गरजच नव्हती. घरातील जेष्ठ महिलांचे आहाराविषयीचे मार्गदर्शन पुरेसे होते. खाली बसून कपडे धुणे, केरकचरा काढणे, रांगोळी काढणे.. तुळशीला पाणी देणे.. प्रदक्षिणा घालणे, भाज्या निवडणे.. स्वयंपाक करणे, देवासमोर दिवा लावून प्रार्थना करणे ही पद्धत होती. घरातील मोठ्या कुटुंबात उत्तम मनस्वास्थ्य.. आनंदी मन लाभल्याने आरोग्य समस्या नव्हत्या. शिवाय शुद्ध सात्विक दुधदुभते.. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला.. सात्विक अन्नधान्य खायला मिळायचे. नैसर्गिक बाळंतपण व्हायचे.
पण आता जीवन संघर्ष वाढलाय.. जीवनशैली बदललीय. निसर्ग बदललाय.. प्रदूषण वाढलेय. शुद्धता हरपतेय. अशावेळी नित्य संशोधनानंतरची औषधे.. मार्गदर्शन याचा लाभ गर्भार महिला.. बाळंतीण आणि शिशु यांना मिळायलाच हवा. भारताचे.. जगाचे भविष्य सुरक्षित ठेवायलाच हवे.
आधुनिक औषधे.. मार्गदर्शन आहेतच. पण गर्भार महिलांना आनंदी ठेवण्यासाठी सांजी.. पाळणा सोहळा ही पण आमची परंपरा. त्यांचे मन हे मोगरा फुलासारखे सुगंधीत असावे हा उद्देश.
आपणांस तसेच गर्भार महिला.. शिशु यांना निरामय आरोग्य लाभो हीच शुभकामना !!*
*मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।*
*पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥*
*मन हे शेवंती देऊ भगवंती ।*
*पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥*
*मन हे तुळशी देऊ हृषिकेशि ।*
*पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥*
*तुका ह्मणे ऐसा जन्म दिला देवा ।*
*तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥*
*रचना : संत तुकाराम महाराज*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०७.०४.२०२५*
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment