सहज सुचलं म्हणुन... आता आपण बहुभाषिक व्हायलाच हवे...

 सहज सुचलं म्हणुन...

आता आपण बहुभाषिक व्हायलाच हवे...




सध्या संपूर्ण देशातच भाषिक वाद सुरू आहे. तामिळनाडू तिथले नागरिक हिंदी भाषा नको वाटते. महाराष्ट्रातही हिंदी भाषेला विरोधच केला जातो आहे. त्यावरून गेल्या आठवड्यात राडे देखील केले गेले. मात्र इथे मुद्दा असा येतो की भाषिक अस्मितेवरून इतके ताणणे गरजेचे आहे काय?

भारतात आम्ही त्रिभाषा सूत्र अवलंबले आहे. प्रत्येक प्रांताची मातृभाषा वेगळी आहे. सर्व देशात विविध  प्रांतीयांमध्ये संपर्क भाषा म्हणून हिंदी ही निश्चित झाली आहे, तर जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी इंग्रजी ही भाषा गरजेची असल्यामुळे स्वीकारली गेलेली आहे. त्यामुळे शिक्षणातही आणि व्यवहारातही हे त्रिभाषा सूत्र मान्य केले गेलेले आहे. तरीही आम्ही आपली मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी हे या तीनही भाषा पुरेशा शिकल्या होत काय याचाही विचार व्हायला हवा. 

माझेच उदाहरण द्यायचे झाले तर मराठी मातृभाषा असल्यामुळे आणि मराठीतूनच पत्रकारिता आणि लेखन करत असल्यामुळे मराठी भाषेवर माझे बऱ्यापैकी प्रभुत्व आहे, हे माझ्यासकट सर्वांनीच मान्य केले आहे. तसेच इंग्रजीतही मी बऱ्यापैकी लेखन,वाचन आणि संवादही करू शकतो. मला हिंदीत बोलणे आणि वाचणे शक्य आहे, पण हिंदी लिहायचे म्हणजे मला समस्या निर्माण होते. दिल्लीहून एक चाणक्य वार्ता नामक हिंदी पाक्षिक प्रकाशित होते. त्याचे प्रकाशक आणि संपादक डॉ.अमित जैन हे माझे चांगले मित्र आहेत. माझे अनेक लेख हिंदीत भाषांतरीत करून द्यावे अशी त्यांची मागणी असते. मात्र माझ्या मराठी लेखनाचे हिंदी भाषांतर करायचे तर मला ते कठीण जाते. मग मी माझ्या मराठी हिंदीत भाषांतरित करतो आणि माझे हिंदी दुरुस्त करून घेण्याची कसरत अमित जैन यांना करावी लागते. हे कितपत योग्य आहे? या देशातील प्रत्येकानेच इतर किमान एक तरी भाषेवर प्रभुत्व का मिळवू नये? असे अन्य भाषांवर प्रभुत्व मिळवणारे अनेक जण माझ्या पाहण्यात आहेत. त्यातील काही उदाहरणे मी या लेखात देणार आहे. 

आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे हिंदी भाषिक होते. हिंदीचे उत्तम साहित्यिकही होते. मला आठवते अटलजी परराष्ट्र मंत्री असताना नागपूरच्या घटाटे परिवाराच्या एका कार्यक्रमात अटलजी आले होते. तिथे अप्पासाहेब घटाटे यांच्या मुलांची अटलजी शुद्ध मराठीत बोलत होते. अटलजींचे हे बोलणे ऐकून मी थक्कच झालो. त्यानंतर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बोलताना अटलजी मराठीत सहज बोलायचे. त्यांना अन्यही भारतीय भाषा येत होत्या म्हणतात. 

जसे अटलजी होते तसेच आमच्या नागपूरचे ख्यातनाम पत्रकार अनंत गोपाळ शेवडे हे देखील होते. शेवडे हे महाराष्ट्रीयन, मात्र हिंदीवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची अनेक हिंदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पहिले विश्व हिंदी संमेलन आयोजित करण्याचा मानही त्यांनाच जातो. 

तसेच छत्रपती संभाजी नगरचे डॉ.यु. म. पठाण यांचेही उदाहरण देता येईल. पठाण सर हे मुस्लिम, त्यामुळे त्यांची मातृभाषा उर्दू ही आहे. मात्र पठाण सरांनी मराठी संत साहित्याचा गाढा अभ्यास केला आहे, आणि त्याची अनेक मराठी पुस्तके तर प्रकाशित झाली आहेतच, पण संत साहित्यावर अनेक मराठी व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. 

असेच नागपूरचे डॉ. विनय वाईकर हे व्यवसायाने डॉक्टर म्हणजेच भुलीकरण तज्ञ, पण या गृहस्ताचा उर्दू शेरोशायरीचा गाढा अभ्यास, त्यातून त्यांनी उर्दू गजलांमध्ये येणाऱ्या अनाकलनीय अशा दहा हजार शब्दांचा उर्दू ते मराठी हिंदी आणि इंग्रजी असा शब्दकोश तयार केला. त्यांच्या या उपक्रमाचे देशभरात स्वागत झाले. वाईकर अस्खलित उर्दूत सुरेख व्याख्यानेही द्यायचे. ख्यातनाम मराठी पत्रकार विद्याधर गोखले यांचाही उर्दू साहित्याचा दांडगा अभ्यास होता.

अशाच पुण्याच्या उमाताई कुलकर्णी, तीन वर्षांपूर्वी मला भेटल्या. त्यांची त्यावेळी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक भैरप्पा यांच्यासोबत भेट झाली होती. भैरप्पांच्या कानडी साहित्याचा मराठीत अनुवाद करण्याचे महत्त्वपूर्ण काम उमाताईंनी केले आहे. ज्यावेळी माझी भैरप्पांशी भेट झाली तेव्हा मी हिंदीत प्रश्न विचारत होतो आणि उमाताई त्याचे कानडीत भाषांतर करून लगेच भैरप्पांना सांगत होत्या. भैरप्पांनी कानडीत उत्तर दिले की उमाताई आम्हाला ते मराठीत भाषांतरित करून सांगत होत्या.म्हणजेच तीन भाषांसह चौथ्याही भारतीय भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले हे मान्य करावेच लागते ना. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या फळीत महाराष्ट्रातून अनेक तरुण प्रचारक देशाच्या विभिन्न भागात गेले. माझ्या वडिलांचे एक मित्र शरद बुचे हे खूप वर्ष तामिळनाडूमध्ये प्रचारक म्हणून राहिले होते. नंतर ते नागपुरात परतले. एक दिवस ते आमच्या घरी आले असता एक तामिळी गृहस्थ वडिलांना भेटायला आले. शरद काकांनी त्यांच्याशी अस्खलित तामिळ भाषेत संवाद साधला होता. मी सहज विचारले तेव्हा काकांनी सांगितले की मी तामिळ साहित्य सुद्धा खूप वाचले आहे. 

असेच जुन्या पिढीतले एक संघ प्रचारक श्रीकृष्ण  मोतलग हे देखील होते. त्यांचा बराचसा काळ आसाम या पूर्वेतील राज्यात गेला. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी परिषदेने आसाममधील काही विद्यार्थ्यांना शिकायला नागपुरात ठेवले होते. मोतलगजी त्यांच्याकडे नियमित जायचे आणि त्यांच्या भाषेत तासचे तास गप्पा मारायचे. असे आसाम मध्ये राहिलेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आले. 

आज अनेक परिवार उद्योगधंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यामुळे त्यांची मुले त्यांच्या मातृभाषे सोबतच मराठी देखील शिकली. त्यांच्यातलेच अनेक जण आज मराठीत चांगले लेखनही करत आहेत. याबाबत ख्यातनाम लेखक गिरीश जाखोटिया यांचे उदाहरण आपल्याला देता येईल. गिरीशजी मारवाडी समाजाचे, मात्र मराठी भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व आहे.गिरीशजींची मराठी भाषेत कित्येक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मराठीत भाषणही चांगले करतात. तसेच मारवाडी भाषिक राजकारणी चैनसुख संचेती आणि सुरेशदादा जैन यांचेही उदाहरण देता येईल. दोघेही मारवाडी पण त्यांचे मराठीवर चांगलेच प्रभुत्व आहे. अगदी मराठी मातृभाषा असल्यासारखे ते अस्खलितपणे बोलतात. 

ही सर्व उदाहरणे बघता या सर्वच मंडळींनी आपली मातृभाषा तर जपलीच, पण इतरही भाषेला तितकाच सन्मान दिला आहे असे लक्षात येते. प्राचार्य राम शेवाळकर म्हणायचे की मराठी ही माझी मातृभाषा आहे, तर हिंदीला मी मावशीचा दर्जा दिला आहे. आपल्याकडे तशीही माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यात मावशीचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. त्यामुळे इतर भाषांना आम्ही मावशीचा दर्जा द्यायला काय हरकत आहे? 

आता इथे मुद्दा असा येतो की तुम्ही एखाद्या परिसरात वर्षानुवर्ष राहिलात, तर तिथली भाषा हळूहळू तुम्ही आत्मसात करता. मग आपल्या मातृभाषेसोबतच तुम्ही तिथल्या बोलीभाषेलाही सन्मान देऊ लागता. मात्र आज नोकरीच्या निमित्ताने दोन-तीन वर्षांसाठी जर एखाद्या व्यक्तीला परप्रांतात येऊन राहावे लागले, तर त्याच्यावर तिथली भाषा बोलण्याची सक्ती करणे कितपत उचित ठरेल याचाही विचार व्हायला हवा. आज सरकारी नोकरीत विशेषतः केंद्राच्या नोकरीत तुम्ही कोणत्या प्रांतात फेकले जाल हे सांगता येत नाही. तिथे चार-पाच वर्ष राहिलात की पुन्हा दुसऱ्या प्रांतात तुम्हाला फेकले जाते. मग अशावेळी अशा व्यक्तीचे हिंदी बोलणे आम्ही मान्य करायला काय हरकत आहे? अशा व्यक्तीला तुम्ही मराठीत बोला म्हणून आग्रह धरणे आणि त्यासाठी राडे करणे हे चुकीचेच ठरते. 

आज जागतिकीकरणाच्या रेट्यात आम्हाला फक्त मातृभाषेचा अभिमान बाळगून चालणार नाही. आम्हाला बहुभाषिक व्हायलाच हवे. ती आजची गरज आहे. आज अन्य भाषा शिकून त्यात प्राविण्य मिळवणाऱ्यांची काही उदाहरणे मी वर दिली आहेत. अशी अजून अनेक उदाहरणे सापडतील. या व्यक्तींचा आदर्श ठेवून आपणही बहुभाषिक व्हायला काय हरकत आहे? त्याचबरोबर आपल्या प्रांतात आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतरांच्या ही भाषेचा उचित सन्मानही आपण करायलाच हवा, इतकेच सहज सुचले म्हणून सुचवावेसे वाटते. 

अविनाश पाठक, नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.