शतकी भागीदारी

 शतकी भागीदारी

आमचे गाववाले, म्हणजे मूळचे राजुरा (चंद्रपूर) निवासी आणि आता नागपूरकर झालेले सुभाष मुरलीधरराव उपाख्य बाबा देशपांडे आणि सौ. स्वाती वहिनी या दाम्पत्याच्या विवाहाचा परवा ७ एप्रिलला झालेला सुवर्ण महोत्सव आनंद देणाराच होता. माणसाचे कमाल आयुष्य शंभर वर्षे मानले तर विवाहाची शंभरी तर सोडाच, पंच्याहत्तरी सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे पन्नाशी हाच विवाहाच्या बाबतीत शतकाच्या बरोबरीचा विक्रम ठरतो.‌ (तोही योग फारच मोजक्यांच्या जीवनात येतो.) दोघांची मिळून शंभरची भागीदारी असे हे संयुक्त शतकच ठरते. त्याबद्दल दोघांचेही अभिनंदन.

बाबा माझ्याच पिढीचा, पण माझ्यापेक्षा ११-१२ वर्षे मोठा. राजुऱ्याचे देशमुख आणि देशपांडे हे तसे आधीच्या पिढ्यांपासूनचे नातेवाईक. त्यातही माझे वडील/काका आणि बाबाची आई हे भाऊबीज बंधू-भगिनी. म्हणजे, बाबा आणि मी मानलेले आतेमामे भाऊच. हे आभासी नाते जपत बाबाने मला नागपूरच्या पत्रकारितेत चंचुप्रवेश करण्यास मदत केली, हे मी कधीच विसरू शकत नाही.

१९७८ च्या जानेवारीत तरुण भारत साठी माझी मुलाखत घेतानाच मा. गो. वैद्यांनी मला विचारले- "नागपुरात राहायची सोय आहे का ? नसेल तर रेशीमबागेतील संघ कार्यालयात काही दिवस व्यवस्था करता येईल." मार्चमध्ये रुजू होताना सांगतो, असे म्हणत मी लगेच उत्तर टाळले. पण त्याचवेळी, रहाटे कॉलनीच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यावरील सुशीला भवन ही टुमदार बंगली मला खुणावत होती. बाबाची आत्या सुशीलाबाई उपाख्य जिजीबाई देशपांडे आणि काही भाडेकरू या घरात राहत होते. बाबा-वहिनी राजुऱ्याला होते. परतण्यापूर्वी जिजीआत्याला भेटलो. माझे वडील तिचे बालमित्र असल्याने ती आनंदाने तयार झाली. घरचाच माणूस आत्याला सोबती मिळणार म्हणून बाबाही तयार झाला. आणि, ४७ वर्षांपूर्वी अस्मादिक नागपुरात दाखल झाले, बाबा-जिजीआत्याच्या सौजन्याने. काही काळाने बाबा-वहिनीही मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने नागपूरला आले. त्यांच्या सोबतही मी राहिलो. सुशीला भवनातील या पहिल्या ३ वर्षांनीच माझ्या नागपूरकर पत्रकार होण्याची मजबूत पायाभरणी केली, हेही मला विसरता येणार नाही.

सुरुवातीला तरुण भारत बाल विभागात मी स्पर्धा चालवत असे. त्यासाठी येणारी शेकडो पत्रे छाटण्याचे काम स्वाती वहिनी फावल्या वेळात सहजतेने करून जात. बाबा बोलता बोलता राजकारण, क्रिकेट यांचा एखादा मुद्दा लिखाणासाठी सुचवून जायचा.‌ बाबा कट्टर संघ स्वयंसेवक अन् वहिनी अभाविपच्या धडाडीच्या कार्यकर्ता. नागपुरात स्थायिक झाल्यानंतर बाबाने दीक्षाभूमी वॉर्ड भाजपाचे अध्यक्षपदही भूषविले. पण दोघांमधीलही साधेपणा वर्षानुवर्षे तसाच कायम आहे. हेच या दम्पतीचे वैशिष्ट्य !

मला कळायला लागले तेव्हापासून, गेली ६०-६५ वर्षे मी बाबाला जवळून पाहत आहे. आज वयाच्या ८३ व्या वर्षीही तोच शिडशिडीत बांधा. पण बाबा क्रिकेट छान खेळायचा. विशेषत: त्याची फास्ट बोलिंग ॲक्शन तत्कालीन मोठ्या गोलंदाजांच्या धाटणीची अन् आम्हा सर्वांच्या आवडीची. त्याच बाबाने सहचारिणी सोबत लग्नाच्या खेळपट्टीवर भागीदारीचे शतक पूर्ण केले, याबद्दल मी पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो आणि दोघांचेही जीवनाचे शतक पूर्ण होवो, अशा शुभेच्छाही देतो🙏🏽

-@विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

  

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.