सफल प्रेमाची..........गंमत?
सफल प्रेमाची..........गंमत?
आज १ एप्रिल. अर्थात गंमतीचा.. चेष्टेचा.. मस्करीचा दिवस. हो.. नेहमीच गंभीरपणे जीवन का म्हणून जगायचे.. वर्षात किमान एक दिवस तरी बनवाबनवीचा हवाच.
अर्थातच एप्रिल फुल म्हणजे वेड्यात काढणारी.. धक्का देणारी गंमत. पण गंमत असली तरीही जिवघेणी थट्टा नको. विनोद बुद्ध्यांक तपासणारा हवा. जे टिका करताना मन दुखावणारा विनोद करतात.. लोक क्षणभर हसतात त्यांच्यासाठी रामदास स्वामी 'टवाळा आवडे विनोद' म्हणतात.
विनोद प्रत्येकालाच आवडतो. शारीरिक व्यंगावरचे विनोद कधीच मान्य नसतात. खरा विनोद तो असतो की, ज्याच्यावर विनोद केला, त्यानेही खळखळून हसत आनंदाने दाद द्यायला हवी.
एका कथेप्रमाणे एप्रिल फुल प्रारंभ चक्क १३८१ मध्ये झाला. त्यादिवशी म्हणजे ३२ मार्चला इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अँनचे लग्न आहे अशी अफवा पसरली. लोक आनंदोत्सव साजरा करु लागले. तेव्हा नंतर कळले की ३२ मार्च कॅलेंडरमध्ये नाहीच. १ एप्रिल आहे. तेव्हापासून हा गमतीचा दिवस सुरू झाला.
...पण कधीकधी अशीही गंमत केली जाते जी ऋणानुबंध जुळवते. आज लग्न ही समस्या झालीय. खरं म्हणजे आसपास आवडणारा जोडीदार दिसतो. सारे काही अनुरुप असतानाही बोलण्याचे ध्यैर्य नसल्यामुळे कधीकधी लग्न जुळत नाहीत. मग काही उत्साही १ एप्रिलचा फायदा घेतात. प्रेम व्यक्त करतात. म्हणजे 'वाजली तर पुंगी'. आणि समजा बाजू उलटलीच.. 'तो' किंवा 'ती' अंगावर धावले तर लगेचच आजचा दिवस कोणता ?.. असे म्हणत हसत सुटका करुन घेता येते.
पण ही १ एप्रिल ची मात्रा लागू होत आज अनेक संसार सुखात सुरू आहेत. अशा भाग्यवान जोडप्यासाठी आजचा दिवस फारच महत्वाचा. त्यांचे अभिनंदन.
एकमेकांना आपल्या मनातील भाव कळण्यासाठी १ एप्रिलचा हा दिवस अनेकांना फलदायी ठरला. तेव्हा इतरांनाही याचा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा.
या 'एप्रिल फुल' चा फायदा झाला, हृदयातील प्रेम व्यक्त करत सुखी संसार सुरू झाला तर आम्हांला अवश्य कळवा. हल्ली लग्नातील जेवणाचे वाढलेले दर बघता आम्हाला बोलवू नका, पण शुभमंगल झाल्याचे फोटो पाठवा. बोलवले नाही तरी आमच्या शुभेच्छा आहेतच.
आता जे बोलवतात त्यांच्याकडे तरी कुठे जाणे होते.. नसलेला वेळ.. लागणारा पैसा.. प्रवासाची दगदग यामुळे जायला परवडत नाही हो.. शिवाय निमंत्रीत सगळेजण पोहोचले तर समोरच्याचे दिवाळे निघेल. शिवाय तुमच्या उपस्थिती शिवाय आमचे लग्न होणारच नाही असे आग्रही निमंत्रण देणारे वधू-वर कुणाची वाट न बघता लग्न लावून मोकळे होतात. पूढे लेकुरवाळे भेटतात.
हो.. पण पोस्टाने नाही पण व्हाट्सएपच्या वरही लग्नाचे निमंत्रण नसले की मात्र आमचा भयंकर अपमान होतो. लायकीच काढल्यासारखे वाटते. अहंकार दुखावतो. म्हणून तुम्हांला ही खास जाणीव करुन दिलीय. असो.. हे असे एप्रिल फुल.
*सांग कधी कळणार तुला*
*भाव माझ्या मनातला !*
*रंग कधी दिसणार तुला*
*लाजणार्या फुलातला ?*
*गंधित नाजुक पानांमधुनी*
*सूर छेडिते अलगद कोणी*
*अर्थ कधी कळणार तुला*
*धुंदणार्या सूरातला ?*
*निळसर चंचल पाण्यावरती*
*लयीत एका तरंग उठती*
*छंद कधी कळणार तुला*
*नाचणार्या जलातला*
*जुळता डोळे एका वेळी*
*धीट पापणी झुकली खाली*
*खेळ कधी कळणार तुला*
*दोन वेड्या जीवातला..*
*🌹सुमंगल सावधान 🌹*
*०१.०४.२०२५*
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment